मी म्हणेन ती पूर्व..सेनाप्रमुखांचे बिनधास्त बोल

By admin | Published: June 17, 2016 05:44 PM2016-06-17T17:44:28+5:302016-06-17T18:03:40+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी कायमच मराठी माणसावर गारुड केलं. त्यांच्या वादळी भाषणांनी केवळ खळबळच माजली नाही, महाराष्ट्राचं आणि देशाचंही राजकारण ढवळून निघालं.

I would say that before the chiefs of the army chief | मी म्हणेन ती पूर्व..सेनाप्रमुखांचे बिनधास्त बोल

मी म्हणेन ती पूर्व..सेनाप्रमुखांचे बिनधास्त बोल

Next

हर्षल प्रधान

शिवसेनाप्रमुख खऱ्या अर्थाने गाजले, ते त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे. शिवसेनाप्रमुख त्यांच्या शब्दाला जसे जागायचे, तसेच त्यांच्या वक्तव्यांवरसुद्धा नेहमी ठाम असायचे. एकदा ते बोलले की बोलले. मग मागे फिरायचे काम नाही. शिवसेनाप्रमुखांनी अशी अनेक वादळी वक्तव्ये केली होती, ज्याच्यामुळे महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून निघाले. हिंदूंना या देशात खरा आधार जर कोणी दिला असेल, तर तो बाळासाहेब ठाकरे यांनी. मराठी माणसाच्या स्वाभिमानाला जसे त्यांनी सतत पेटत ठेवले, तसेच हिंदूंनाही आश्वस्त ठेवले. ‘बाबरी मशीद पाडणारे जर शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे’, असे म्हणणारे शिवसेनाप्रमुख हे एक विरळच व्यक्तिमत्त्व होते. 

 

१९९९ मध्ये श्रीकृष्ण आयोगाचा वाद पेटला होता. श्रीकृष्ण आयोगाने शिवसेनेवर ठपका ठेवला होता. बाळासाहेबांनाही यात दोषी धरण्यात आले होते. राज्यात युतीची सत्ता येऊन गेली होती. सत्ता गेल्यानंतरचा १९९९ चा दसरा मेळावा. त्या मेळाव्यात शिवतीर्थावर नेहमीप्रमाणे अतिप्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. श्रीकृष्ण आयोगाचा विषय त्यांनी काढला. ते म्हणाले, ‘‘श्रीकृष्ण आयोगाच्या बाबतीत मला एवढेच सांगायचे आहे, अन्यायाने हात लावाल तर माझ्यासमोर जो निखारा बसला आहे, ही आग स्वस्थ बसणार नाही. ही धमकी नाही, हे सत्य आहे. प्रयत्न करणार असाल तर करा. आलात सत्तेवर ठीक आहे, पण माजू नका. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावरून मला अटक होण्याची शक्यता आहे. मला त्याची पर्वा नाही. माझी त्याला तयारी आहे. आणीबाणीच्या काळात रजनी पटेल यांनी मला निरोप दिला होता की, म्हणे काही मिनिटांत शिवसेनेचे नेते गजाआड होऊ शकतात.

 

मी त्यांना उलटा निरोप पाठवला, आम्ही गजाआड गेलो तर बाहेर तुझी प्रेतयात्रा, अंत्ययात्रा निघालेली असेल. श्रीकृष्ण आयोगाच्या बाबतीतही मला हेच सांगायचे आहे. अन्यायाने हात लावाल तर याद राखा. सीमा आंदोलनाच्या वेळी अशीच दहा दिवस मुंबई धगधगत होती. हे मर्द आणि हे निखारे ध्यानात ठेवा..’’ मुंबईवर शिवसेनाप्रमुखांचे अतोनात प्रेम होते. मुंबईला कायम मराठी माणसानेच चालवावे, हा त्यांचा विचार स्फटिकाप्रमाणे स्पष्ट होता. मुंबईत इतर भाषिकांनी कामधंद्यापुरते यावे आणि मुंबईला बेहाल करावे हे त्यांना पटत नसे. बाळासाहेब म्हणाले होते, ‘‘१९९५ सालापर्यंत जे आलेत, ते मुंबईकर म्हणून आमचेच. त्यात मुसलमान आहेत, पण बांगलादेशचे मुसलमान नाहीत. ते ९५ च्या आधी आले असले, तरी त्यांच्या ढुंगणावर लाथ मारून त्यांना हिंदुस्थानातून हाकलून दिले पाहिजे.

 

शिवसेना कुणाच्याही विरोधात नाही, उत्तर भारतीयांच्याही नाही. हिंदू म्हणून आम्ही त्यांना जवळ केले आहे. पण मुंबईची लोकसंख्या वाढवायची तरी किती? शहराचा विचार करा. एका खोलीमध्ये ५0 लोक राहतात, तिथे शंभर लोक राहायला आले, तर तुमचाही श्वास गुदमरेल आणि त्यांचाही. १९९५ पर्यंत जे मुंबईत आले, ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत, त्यांचा मुंबईकर म्हणून आम्ही स्वीकार केला आहे. पण मुंबईचा तुकडा पाडण्याचा डाव शिवसेना कधीही यशस्वी होऊ देणार नाही.
शिवसेनाच मुंबईला वाचवू शकते

 

२००७ मध्ये शिवसेनाप्रमुखांनी आपल्या मुलाखतीत म्हटले होते की, मुंबईचे अस्तित्व नष्ट होऊ शकणार नाही. मराठी माणूस काही मेला नाही, तो जिवंत आहे. तो पुन्हा एकदा उभा राहील. मराठी माणूस जागा आहे. मुंबई ही आमच्या महाराष्ट्राची राजधानी आहे. ती देशाची आर्थिक राजधानी असेलही, त्याची मला पर्वा नाही. ती आर्थिक का, तर मुंबईहून त्यांना सगळा लगदा मिळतो. पण ती महाराष्ट्राची राजधानी आहे हे कोणीही विसरू नये, मराठी माणसानेही विसरू नये. या राजधानीत आम्हाला काही किंमत नसावी, याचे उत्तर कोणी देत नाही. नुसत्या निवडणुका लढवितात आणि शेवटी झाल्या की अपानवायू सोडत असतात. शिवसेना मी काढली नसती, तर काय झाले असते या मराठी माणसांचे? उद्ध्वस्त झाला असता तो, पूर्ण उद्ध्वस्त. त्याच्याकरिता कोणी मायेचा टिपूससुद्धा गाळला नसता. शिवसेनेने ते केले.

 

देशहितासाठी हिंदुत्व
शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात असत. २00८ मध्ये त्यांच्या मुलाखतीत त्यांनी त्यांची हिंदुत्वाबद्दलची व्याख्या स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘होय, मी मराठीच आहे. मला मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे, पण देशहितासाठी हिंदू म्हणून एकवटण्याची गरज आहे. देश संकटात आहे, इस्लामचा धोका वाढतो आहे. त्यामुळे हिंदू म्हणून एकवटावेच लागेल. उद्या काही गडबड झाली, महाराष्ट्रात झाली, हिंदुस्थानात झाली तर महाराष्ट्र एकाकी लढू शकणार नाही, गुजरातही नाही. आमच्या हिंदुस्थानात हिंदू म्हणून एकवटण्याचीच आता नितांत गरज आहे. इस्लामचा धोका आता मोठा होत चालला आहे. म्हणूनच मी हिंदुत्व देशहितासाठी मांडले आहे. याचा अर्थ असा नाही की मी मराठीला विसरलो. आपल्या आईला कोण विसरणार? सगळ्यांनीच मराठीचा अभिमान बाळगायला हवा. पहिल्यांदा तुम्ही हा देश सार्वभौम आहे, ही भावना लक्षात घेतली पाहिजे.’’

 

२००९ मध्ये शिवसेनाप्रमुखांनी सर्वात प्रथम ‘काँग्रेसला गाडले तरच देश वाचेल’ असा नारा दिला होता. पुढे हाच नारा भाजपाने ‘काँग्रेस हटाव, देश बचाव’ असा २0१४ मध्ये दिला. बाळासाहेब जे बोलायचे, तेच पुढे व्हायचे. २००९ मध्ये जेव्हा त्यांनी शिवसेना म्हणजे काय हे सांगितले होते, तेव्हाच त्यांनी काँँग्रेस कशा पद्धतीने या देशामध्ये जातीयवादाचे विष पेरते आहे, हेही सांगितले. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, ‘‘मी शिवसैनिकांना जे तयार केले आहे, ते वेगळ्या विचारांनी तयार केले. अत्यंत निष्ठावंत, कडवट आणि कठोर असा मी त्याला तयार केला. तो कधीही जाती-पातीचा विचार करणार नाही, हा मला आत्मविश्वास आहे. मी जात-पात कधीच मानत नाही. शिवसेनेचे पहिल्यापासून हे धोरण आहे. माझ्याकडे जे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत त्यांना कधी मी जात विचारली नाही.

 

जाऊन विचारा त्यांना की, बाळासाहेबांनी कधी तुम्हाला जात विचारली आहे का?... माणूस चांगला आहे, कडवट आहे, शिवसैनिक आहे ही आमची जात असेल म्हणा. वाटल्यास कडवट शिवसैनिक ही एक जातच आहे म्हणावं. मी काय करू त्याला? मी जाती-पातीच्या भयानक विरोधात आहे. माझे वडीलही होते, मी पण आहे. काँग्रेसवाल्यांनी जाती-पाती पाळल्या आहेत. हे काँग्रेसवाल्यांचे पाप आहे. काँग्रेसवाल्यांनी नुसती सुरुवात नाही केली, तर त्यांनी त्याचे कायदे बनविले. जातीनुसार राखीव जागा व मतदारसंघाचे कायदे बनवल्यावर ते मानावेच लागतात. काँग्रेसने जी घाण करून ठेवली आहे, ती निस्तरावी लागणार आहे आपल्याला.’’

 

बाळासाहेबांचे विचार स्पष्ट, अधोरेखित आणि नि:स्वार्थी असेच होते. त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांचा कुठलाच स्वार्थ दडलेला जाणवायचा नाही. निरपेक्ष, नि:स्वार्थीपणे त्यांनी या महाराष्ट्राची, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची आणि देशातल्या हिंदू माणसांची सेवा केली. त्या बदल्यात त्यांनी काहीच मागितले नाही, स्वत:साठी काही ठेवले नाही. आपले बोलणे हेच आपले शस्त्र आणि आपले शिवसैनिक हेच आपले कुटुंब आणि संपत्ती असे ते मानत आले. त्यांच्या या विचारांवर आजही शिवसेना कार्यरत आहे आणि पुढील अनेक वर्षे ती अशीच कार्यरत राहील.

Web Title: I would say that before the chiefs of the army chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.