इब्राहिम अल्काझी!- एकमेवाद्वितीय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 06:05 AM2020-08-09T06:05:00+5:302020-08-09T06:05:18+5:30

तारूण्याच्या उंबरठय़ावर इब्राहिम अल्काझी  यांच्यासारखा गुरू लाभणं हे आमचं भाग्य. त्यांच्या शिकवणीवरच आमचा रंगभूमीवरचा प्रवास घडला.  केवळ कलाकार म्हणून नव्हे, एक सजग व  बहिर्मुख माणूस म्हणून त्यांनी आम्हाला घडवलं.  जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली.  अभिनयाच्या शक्यता आणि आमच्यातली क्षमता,  याची जाणीव करुन दिली.  जे करायचं ते उत्तमच हा वस्तुपाठ घालून देताना जगातलं अफाट ज्ञानभंडार आमच्यासमोर रितं केलं. त्याचवेळी आमचं वास्तवाचं भानही त्यांनी सुटू दिलं नाही. त्यांच्यासारखा गुरू पुन्हा होणे नाही!

Ibrahim Alkazi! - The unique teacher of theater.. | इब्राहिम अल्काझी!- एकमेवाद्वितीय..

इब्राहिम अल्काझी!- एकमेवाद्वितीय..

googlenewsNext
ठळक मुद्देअल्काझी यांची स्वत:ची एक विशिष्ट कार्यपद्धती होती. त्याबाबत ते नेहमी आग्रही असतं. त्यांचा आदरयुक्त दरारा असला तरी विद्यार्थ्यांना स्पष्ट आणि मनमोकळेपणे बोलण्याचं स्वातंत्र्यदेखील होतं. त्यांच्या शिकवणीवरच अनेकांचा रंगभूमीवरचा प्रवास घडला.

- ज्योती सुभाष

सुरूवातीच्या काळात माझा मराठी रंगभूमीशी तसा थेट संबंध कधीच आला नाही. बडोद्याला भरतनाट्यम विषयात पदवी संपादन केल्यानंतर या रंगभूमीशी थोडीफार जोडली गेले.  राष्ट्र सेवादलाच्या कला पथकामध्ये निळूभाऊ फुले यांच्यासारख्या कलावंतांसमवेत सामाजिक काम करीत होते. पथकातील वगनाट्यात सहभागी व्हायचे. पण दिल्लीला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये जाण्यापूर्वी माझं पाऊल महाराष्ट्रातील व्यावसायिक रंगभूमीवर कधीच पडलं नव्हतं. बडोद्यामध्ये मराठी आणि गुजराथी नाटकं केली असतील तेवढीच. 
त्यावेळी एका वृत्तपत्रात इब्राहिम अल्काझी यांचा परिचय आणि मुलाखत छापून आली होती. ती वाचून मी अक्षरश: भारावून गेले. त्यांच्याविषयी मला काहीच माहिती नव्हतं. त्यांचं साधं नावसुद्धा कधी ऐकलं नव्हतं. माझे थोरले बंधू नाटककार गो. पु. देशपांडे दिल्लीत राहात असल्यामुळे त्यांना तशी सर्व गोष्टींची कल्पना होती. पण मी नृत्य की नाटक यामध्ये गोंधळले होते. त्यावेळी असं वाटलं की रंगभूमी हे संपूर्ण अभिव्यक्तीचं माध्यम आहे. योगायोगानं अल्काझी यांच्याविषयी वाचनात आलंच होतं. एनएसडीमध्ये गेल्यानंतर नक्कीच फायदा होईल असं वाटलं नि जाण्याचा निर्णय घेतला. 
त्याकाळात एनएसडीमध्ये प्रत्येक वर्षासाठी केवळ दहाचं विद्यार्थ्यांना घेतलं जात असे. त्याकरिता सर्वांच्या मुलाखती घेतल्या जायच्या. मी तिथं प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला. मुलाखतीदरम्यान प्रत्येकाला छोटं सादरीकरण करावं लागायचं. कारण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जायची. मुलाखतीवेळी अल्काझी यांनी मला विचारलं की तुला शिष्यवृत्ती दिली नाही; पण प्रवेश दिला तर चालेल का? तेव्हा मी म्हटलं की पदवी मिळविली असल्यामुळे वडिलांवर अवलंबून राहाणं मला पटत नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती असेल तरच मी प्रवेश घेईन. मी फारसा विचार न करता उत्तर दिलं होतं, पण कदाचित माझा प्रांजळपणा त्यांना आवडल्यामुळे माझी निवड झाली असावी. 
दरम्यान, बडोदा शहर सोडण्यापूर्वी भारतीय रंगभूमीवरील ज्या दोन व्यक्तिमत्वांविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामध्ये अल्काझी यांच्याबरोबरीनं मोहन राकेश यांचंही नाव घ्यावं लागेल. त्यांचं ‘आषाढ का एक दिन’ पाहिल्यामुळे कधी या व्यक्तीला भेटेन असं झालं होतं. माझी अभिनयाची पाटी कोरी असताना भारतीय रंगभूमीविषयीचा दृष्टिकोन निर्माण करणारे अल्काझी यांच्यासारखे दिग्गज व्यक्तिमत्वच गुरू म्हणून समोर उभे राहिले. 
त्यावेळी आजच्या काळातील दिग्गज कलावंत नसरूद्दीन शाह, ओम पुरी, रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी, उत्तरा बावकर, बी. जयर्शी यांच्यासारखी मंडळीं समोर होती. यातील काही कलावंत माझे क्लासमेटदेखील होते. त्यामुळे आमच्या त्याकाळच्या बॅचचं नाव अजूनही काढलं जातं, याचा अभिमान वाटतो. आमच्यातील स्पर्धात्मक वातावरण देखील निकोप आणि तितकंच आव्हानात्मक होतं. सगळेच बुद्धिमान आणि कलात्मक. 
वयाच्या विशीमध्ये जागतिक रंगभूमीचा मला गंधही नव्हता. हा खूप मोठा आवाका आहे हे कळलं नि एका वेगळ्याचं जगाचं दर्शन मला घडलं. थिअरी अभ्यासक्रमाअंतर्गत जगभरातील वेगवेगळ्या नाटककरांची नाटकं केवळ  वाचलीच जायची नाहीत तर जागतिक परिप्रेक्ष्यातील या विद्वान नाटककारांकडून आम्हाला खूप काही शिकण्याची संधीदेखील मिळाली. त्यामुळे नाटकाचा काळ, प्रकार, नाट्यशैली याचं हळूहळू ज्ञान मिळू लागलं. अल्काझी सरांनी एक विशाल पटच जणू आमच्यासमोर उलगडला होता. त्यांचा अनुभव प्रचंड दांडगा होता. रॉय़ल अकॅडमी ऑफ ड्रामाटिक आर्टमध्ये ते शिकून आले होते. 
आज आशिया खंडातील सर्वोत्तम नाट्य शिक्षण संस्था कोणती असेल तर एनएसडीचाच उल्लेख केला जातो. याचं सगळं र्शेय अल्काझी सरांचंच आहे. आम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वानं दिपून गेलो होतो. त्यांच्यासारखी व्यक्ती आम्ही कधीच पाहिली नव्हती. आम्हाला केवळ कलाकार म्हणून न घडवता सजग व बहिर्मुख माणूस म्हणून त्यांनी घडवलं. जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली. कलाकाराच्या अभिनयाच्या काय शक्यता असू शकतात, तुमच्यात किती क्षमता आहे, याची जाणीव त्यांनी दिली.  वेगळी नाटकं वाचताना विभिन्न समाजाचं चित्र डोळ्यासमोर येतं, त्या जगाचा आवाका मनात निर्माण करण्याचा दृष्टिकोन त्यांनी आमच्यात विकसित केला.  

मग एक तुलनात्मक अभ्यास करायला लागलो की भारतीय माणूस म्हणून आपण कुठं आहोत? एक कलावंत म्हणून जी शिस्त असते, ती पण आम्ही दुसर्‍या बाजूला शिकत होतोच. आमच्या कलावंतांचं व्यक्तिमत्व विकसित होण्याचा भाग अल्काझींमुळे घडला. आमच्यासमोर रंगभूमीचा खूप मोठा कॅनव्हास त्यांनी उभा केला. अभिनयाच्या अभ्यासादरम्यान युरोपियन, अमेरिकन, जापनीज, ग्रीक रंगभूमीबरोबरीनेच भारतातील कन्नड, मराठी अशा प्रादेशिक भाषेतील नाटकांच्या सादरीकरणावेळी ‘नाटक’ नावाच्या शब्दाचं काय होऊ शकतं याचा भव्य पट त्यांनी जणू आमच्यासमोर उलगडला. 
वर्गात इंग्रजीमध्ये नाटक वाचलं जात होतं तरी त्याचा हिंदीमध्ये अनुवाद आणि सादरीकरण केलं जायचं. त्यामुळे मानवी मनाचे वेगवेगळे विभ्रम आम्हाला अनुभवायला मिळाले. याची अनुभती देण्यासाठी द्रष्टा माणूस लागतो जो आम्हाला अल्काझी यांच्या रूपात मिळाला.  
नाट्य प्रशिक्षण देणार्‍या संस्थांपुढे अल्काझी यांचा अभ्यासक्रम हा एक वस्तुपाठ होता. प्रत्येक नाटकामध्ये जगण्याचं कोणतं सत्य दडलेलं आहे ते आम्हाला विशद करून सांगायचे. त्यांचं इंग्रजीवर इतकं उत्तम प्रभुत्व होतं की त्यांना नाटक वाचताना बघणं हा एक अविस्मरणीय अनुभव असायचा. अंगावर रोमांच उभे राहायचे. ‘इडिपस’ हे जागतिक रंगभूमीवरचं मास्टरपीस असणारं नाटक. त्या नाटकाची कारूण्यता, भव्यता या गोष्टी त्यांच्या वाचनातून कळायच्या. वर्णनाच्या पलीकडे जाऊन अनुभूतीच्या पातळीवर तुमचा अभिनय कसा जाईल हे सोदाहरण ते सांगायचे. 
कलेचा अभ्यास करताना खूप गोष्टी शब्दांत मांडता येत नाहीत. त्या नि:शब्द असतात. भावभावना, मानवी मूल प्रवृत्तींबद्दल खूप काही त्यात दडलेलं  असतं. त्यामुळे नाटक  संपूर्ण जगण्याचा एक अर्थ असतो हे आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. कलावंतांसाठी वक्तशीरपणाची पठडी देखील त्यांनी निर्माण केली. जे शिकायला आलोय ते किती महत्वाचं आहे हे त्यांनी आमच्या मनावर बिंबवलं. एक अफाट ज्ञानभंडार तुमच्यासमोर उलगडलं जात आहे याचं आमचं भान त्यांनी कधी सुटू दिलं नाही. जे करतोय ते अतिशय उत्तम प्रकारे करायचं हे त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रूजवलं. 
तारूण्याच्या उंबरठ्यावर त्यांच्यासारखा गुरू लाभणं हे मी माझं भाग्य समजते. धर्मवीर भारतींचे ‘अंधायुग’ किंवा गिरीश कार्नाड  यांचे ‘तुघलक’ ही नाटकं अल्काझींच्या दिग्दर्शन शैलीत करता आली.  त्यांची स्वत:ची एक विशिष्ट कार्यपद्धती होती. त्याबाबत ते नेहमी आग्रही असतं. त्यांचा आदरयुक्त दरारा असला तरी विद्यार्थ्यांना स्पष्ट आणि मनमोकळेपणे बोलण्याचं स्वातंत्र्यदेखील होतं. त्यांच्या शिकवणीवरच आमचा रंगभूमीवरचा प्रवास घडला. त्यांच्यासारखा दुसरा गुरू होणे नाही. ते आज आपल्यात नसले तरी भारतीय आणि जागतिक रंगभूमीला अल्काझी कायमच स्मरणात राहातील. अल्काझी यांच्यासारख्या ¬षीतुल्य व्यक्तिमत्वाला माझी विनम्र र्शद्धांजली!

(लेखिका ज्येष्ठ अभिनेत्री आहेत.)

शब्दांकन : नम्रता फडणीस

Web Title: Ibrahim Alkazi! - The unique teacher of theater..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.