..इफ्फी वयात येतोय!
By admin | Published: December 6, 2015 12:51 PM2015-12-06T12:51:10+5:302015-12-06T12:51:10+5:30
एवढा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पण कुठे कसली गडबड नाही, कसला गोंधळ नाही, मोठमोठय़ा रांगा नाहीत, आरडाओरडा नाही, वचावचा भांडणं नाहीत.. सगळं कसं शांत. निवांत. सुशेगात! जो भेटे तो म्हणो, ‘अजिबात गर्दी नाही’. .पण जगभरच्या सिनेमाची मस्त मैफल जमलेली असताना काहीतरी चुकल्यासारखं मात्र सतत वाटत होतं. .हवे होते तेवढे प्रेक्षक! ते कुठे होते?
Next
>- पंधरा वर्षाच्या परिश्रमांना तारुण्याचा बहर आत्ता कुठे दिसतो आहे खरा!
अशोक राणे
सुशेगाद गोवा.. त्याचं सुशेगाद फेस्टिव्हल !
- यंदाच्या इफ्फीचं म्हणजे ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चं वर्णन याच शब्दात करता येईल. नव्हे तेच त्याचं प्रथमदर्शनी नजरेत भरणारं वैशिष्टय़ ! कुठे कसली गडबड नाही, कसला गोंधळ नाही, मोठमोठय़ा रांगा नाहीत, आरडाओरडा नाही, वचावचा भांडणं नाहीत.. सगळं कसं शांत. निवांत. सुशेगात !
इफ्फीतल्या तमाम सा:या गोष्टींबद्दल, विशेषत: पाहिलेल्या चित्रपटांबद्दल भरभरून बोलताना ‘अजिबात गर्दी नाही’ हे निरीक्षण प्रत्येकाच्या तोंडून यायचंच आणि जवळपास सर्वांची एकच प्रतिक्रिया असायची.. बरंय एकाअर्थी आपल्याला तरी शांतपणो सिनेमा पाहता येतोय!
गोव्यातल्या या गप्पा ऐकताना माङो वडील कोकणातल्या आमच्या गावातली एक गोष्ट सांगायचे, त्याची मला आठवण झाली.
गावातला एक खादाड माणूस लग्नाच्या वगैरे पंक्तीत पहिल्या जागेवर बसायचा आणि वाढपी आले की त्यांच्यावर खेकसायचा,
‘‘मेल्या वाड तरी. काय नकावडा वाडतस?’’ - असं खेकसून पत्रवळ तुडुंब भरून घ्यायचा.
सर्वांना वाढून वाढपी परत यायचे आणि विचारायचे,
‘‘कोनाक काय व्हया रे..?’’
- की हा म्हणायचा,
‘‘हकडे कोनाक कायोव नको..’’
गर्दी, गोंधळाचा त्रस होत असूनदेखील मी मात्र प्रेक्षक - प्रतिनिधी कमी होते म्हणून मनोमन हळहळलो. तथाकथित हौश्यागवश्यांना दूर ठेवताना एका गोष्टीचा सर्वानाच विसर पडला की यातूनच काही जण सच्चे चित्रपट रसिक म्हणून पुढे येत असतात.
इफ्फी अकरा वर्षांपूर्वी गोव्यात आला तेव्हा इथे ख:या अर्थाने चित्रपटाची जाण, जागतिक चित्रपटाची समज असलेले मोजके, अक्षरश: मोजके चित्रपट रसिक होते. ते गेल्या अकरा वर्षात निश्चितच वाढले. तसेच ते आजच्या आणि उद्याच्याही प्रेक्षकातून पुढे येतील.. आणि उगाचच गर्दी करतात म्हणून त्यांना दूर ठेवायचं हा काही पर्याय नाही.
गोव्यात चित्रपट संस्कृती नाही हे गोव्यात इफ्फी आणायचं ठरलं, तेव्हापासून म्हटलं जात होतं. पण मग गेल्या अकरा वर्षात ती इथे निर्माण होऊन वाढीला लागली नाही का?
- मी तरी याचं उत्तर नक्कीच होकारार्थी देईन.
पूर्वी बाहेरचे लोक येऊन इथे चित्रपट निर्मिती करायचे. आता इथेच चित्रपटसृष्टी भरभरक्कमपणो उभी राहते आहे. इंडियन पॅनोरामा तसेच राष्ट्रीय पुरस्कारात कोकणी चित्रपट आपला ठसा उमटवत आहेत. परदेशातील महोत्सवात बक्षिसं मिळवित आहेत. फिल्म बझारमध्ये इंटरनॅशनल को-प्रोडक्शनसाठी कोकणी निर्माते-दिग्दर्शक प्रयत्न करीत आहेत. एका जाणतेपणाने चित्रपट माध्यमावर बोलणारे प्रेक्षक दरवर्षी वाढताना मला दिसत आहेत. मग असं असताना या गर्दीतच कुठेतरी असलेल्या चांगल्या कसदार रसिकाला दूर ठेवायचं हे काही खरं नाही. बरं तर त्याहून नाही. माङयातला फिल्म सोसायटीचा कार्यकर्ता त्यामुळे नक्कीच खंतावला.
यंदा गर्दी कमी होण्याचं वा राखण्याचं कारण आहे तीनशेवरून थेट हजारावर नेऊन ठेवलेलं प्रतिनिधी शुल्क!ं कसल्याही भाववाढीला एक मर्यादा हवीच हवी. आणि विशेषत: कलासंस्कृतीच्या संदर्भात तर हवीच हवी! त्यामुळे गेल्या अकरा वर्षात चित्रपट प्रेक्षकाचा रसिक बनलेला वर्ग वगळता सर्वसामान्य गोवेकर यावर्षी या महोत्सवापासून दूरच राहिला. स्वाभाविकच आहे.
आणखी एक वर्ग दूर राहिला आणि तो म्हणजे तरुण वर्ग, विशेषत: कलाशिक्षण घेणारा विद्यार्थी! जगभरच्या महोत्सवात आम्ही हाच वर्ग मोठय़ा प्रमाणात बघत असतो. तोच उद्याच्या सिनेमाचा सर्वेसर्वा आहे. भारतात आज सर्वदूर मीडिया स्कूल्स उघडल्या आहेत. त्यातून गोव्यातले किमान पाचशे कलाशाखेचे विद्यार्थी या महोत्सवासाठी येऊ नयेत.? हे वाईट आहे. कुठल्याही चित्रपट महोत्सवासाठी, तीमधून तयार होणा:या चित्रपट संस्कृतीसाठी हे निश्चितच पोषक नाही. ते टाळलं पाहिजे.
गर्दी होते तर थिएटर्स वाढवली पाहिजे. इफ्फीच्या गोव्यातील स्थापनेपासून महत्त्वाची आणि जोरकस भूमिका घेणारे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दरवेळी आणखी थिएटर्स उपलब्ध करून देऊ अशा घोषणा केल्या, पण आहेत कुठे ती थिएटर्स.?
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुख्य गरजांची जेवढी शासनाने काळजी घ्यायची असते तेवढीच जनतेची कलाविषयक उपासमार होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागते. कारण त्यातूनच संपन्न, समजदार, प्रगल्भ नागरिक तयार होत असतो. तिकडे मडगावला अतिशय देखणं आणि प्रशस्त रवींद्र सदन उभं केलेलं आहे. तिथे का नाही चित्रपट महोत्सवाचंच एक उपकेंद्र करायचं? तसं ते केलं तर तेवढी आठेकशे आसनं उपलब्ध होतील आणि तेवढय़ा रसिकांची सोय होईल. चित्रपटांबरोबरच महोत्सवातील इतरही उपक्रम तिथे करता येतील. त्यामुळे मडगावातल्या आणि पणजीपासून दूर परंतु मडगावच्या आसपासच्या मंडळींची सोय होऊ शकेल. पण ते रिकामं ठेवायचं किंवा उद्घाटन सोहळ्यासाठी त्याचा वापर करून तिथे स्टार परेड करायची आणि तिथल्या रसिकांच्या तोंडाला पानं पुसायची, याला काय अर्थ आहे? गोवा शासन आणि इफ्फीच्या आयोजनात गोव्याची यजमानाची भूमिका बजावणा:या ईएसजी म्हणजेच एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ इंडियाला हे कळत कसं नाही?
नाही म्हणायला गोव्यात काही ठिकाणी ओपन एअर थिएटर उभी करून महोत्सवाचा भाग म्हणून काही दर्जेदार, आशयघन चित्रपट दाखविले जातात; परंतु हे पुरेसं नाही.
आत्मस्तुतीचा आरोप होईल तो स्वीकारून याच मुद्दय़ावर जाता जाता आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतो. वर म्हटल्याप्रमाणो गोव्यात नसलेली चित्रपट संस्कृती काही आभाळातून पडणार नाही किंवा पश्चिमेकडून उसळत येणा:या समुद्री लाटांतून येणार नाही. ती सततच्या प्रयत्नातून उभी करता येईल. गेली अकरा वर्षे इथल्या समविचारी मित्रंना, विशेषत: कला अकादमी आणि ईएसजीतल्या परिचितांना सतत एक कार्यक्र म मी सुचवतो आहे आणि तो म्हणजे महोत्सवाच्या आदल्या दिवशी महोत्सवात काय आणि कसं पाहायचं याची एक कार्यशाळा घ्या. त्यात जगभरच्या महोत्सवात सातत्याने हजेरी लावणा:या समीक्षक अभ्यासकांना बोलवा. ते इफ्फीत दाखवण्यात येणा:या चित्रपटांविषयी, तिथल्या विविध उपक्रमांविषयी बोलतील आणि त्याचा इथल्या समजदार होऊ पाहणा:या रसिक प्रेक्षकाला फायदा होईल. इथली चित्रपट संस्कृती सुदृढ व्हायला मदत होईल. आणि हे अगदी दरवर्षी करण्याची गरज नव्हती. पहिल्या पाचेक वर्षात यातून एक जाण पसरली असती आणि आमच्यासारख्या कुणा बाहेरच्या समीक्षकांना या कामासाठी येण्याची गरज राहिली नसती.
उलट इथलाच, गोव्यातलाच कुणी तरी म्हणाला असता, ‘‘काय कळना नाय तुका.. ये हांव तुका सांगता..’’
यंदा एक अभूतपूर्व गोष्ट घडली आणि तीसाठी इफ्फीच्या आयोजकांचं अगदी मनापासून कौतुक करायलाच हवं.
महोत्सव सुरू होण्याआधी जवळपास आठ दिवस कॅटलॉग आणि पहिल्या पाच दिवसांचं फिल्म शोजचं वेळापत्रक ऑनलाइनवर उपलब्ध होतं. एरवी महोत्सव निम्यावर आला असताना कॅटलॉग बहुतेकांच्या हाती पडायचा नाही. त्या पाश्र्वभूमीवर हे नवलच म्हणायचं. त्यामुळे महोत्सवात काय आणि किती ऐवज आहे ते वेळेआधी कळलं आणि काय आणि कधी पाहायचं ते ठरवायला मदत झाली.
या अशा सा:या सांस्कृतिक वातावरणात चित्रपट पाहणं, त्याबद्दल बोलणं - ऐकणं - वाचणं हे सारं समृद्ध करणारं होतं. यातल्या किती तरी चित्रपटांनी रसिकांना भरभरून आनंद दिला आणि तेवढंच अस्वस्थही केलं. आज अवघं जग एका निकराच्या वळणावर येऊन ठेपलं आहे. ते सारं वास्तव, त्याला वेढून असलेलं राजकारण आणि तेवढाच महत्त्वाचा असलेला ऐतिहासिक संदर्भ याचं दर्शन या सा:या चित्रपटांतून घडलं. महोत्सवात पाहायचे सिनेमे म्हणजे दोन घटक्याची करमणूक नव्हे. ते व्यासपीठ आहे चित्रपट माध्यमाची जाण वाढवणारं आणि सभोवतालाचं प्रगल्भ भान देणारं. ते यंदाच्या इफ्फीनं दिलं.
इफ्फी वयात येतोय, प्रगल्भ होतोय हे आता म्हणता येईल. आजच्या भाषेत म्हणायचं तर इफ्फी युजर फ्रेंडली होत चाललाय.
असाच चालू राहू दे.
आमेन!
एक जमलेली मैफल
कोणी कितीही तक्र ार केली तरी एक गोष्ट खरा महोत्सव रसिक सहजपणो मान्य करील की आपला इफ्फी हा जगभरच्या चित्रपटांची लज्जतदार मेजवानी पेश करत असतो. यंदाही याचा प्रत्यय आला. महोत्सवांचा महोत्सव असं सार्थ वर्णन इफ्फीचं आता ख:या अर्थाने करता येईल. बर्लिन, कान, मॉस्को, कालरेव्हीवारी, व्हेनिस, टोरांटो या बडय़ा आणि मान्यवर महोत्सवात गाजलेल्या आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटांचा विशेष भरणा यावर्षीच्या महोत्सवातील इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, सिनेमा ऑफ द वर्ल्ड आणि फेस्टिव्हल कॅलिडोस्कोपमध्ये होता. त्याशिवाय द मॅन हू न्यू इन्फिनिटी, डॅनिश गर्ल आणि द क्लान हे 2क्15 मध्ये जगभर चर्चेत असलेले चित्रपट अनुक्रमे ओपनिंग फिल्म, मीडफेस्ट फिल्म, क्लोजिंग फिल्म म्हणून दाखवले गेले. पैकी पहिली फिल्म फारशी अनेकांना आवडली नाही. परंतु अन्य दोन इफ्फीतही चर्चेत होत्या. याशिवाय मास्टर स्ट्रोक, कण्ट्री फोकस (स्पेन), फस्र्ट कट, रिस्टोअर्ड क्लासिक्स, होमेज, कटेम्पररी अर्जेटिना सिनेमा, डॉक्युमेंटरी, रेट्रोस्पेक्टिव्ह : आमोस गिताई (इस्त्रयल), ट्रिब्यूट : अॅना कॅरीना, ट्रिब्यूट : निकिता मिखिलकोव्ह या विभागातून वर म्हटल्याप्रमाणो जगभरचे तर इंडियन पॅनोरामा : फिक्शन - नॉन फिक्शन, न्यू हॉरीझन्स फ्रॉम नॉर्थ - इस्ट, होमेज, विमेन कल्चर ऑफ सिनेमा, दादासाहेफ फाळके विनर शशी कपूर, रेट्रोस्पेक्टिव्ह : अरीबम श्याम शर्मा या विभागातून नवे-जुने भारतीय चित्रपट दाखवले गेले. हा सारा ऐवज लक्षणीय होता आणि निवडीला आव्हान देणारा होता. याच्या बरोबरच मास्टर क्लास, इन कॉन्व्हरसेशन आणि ओपन फोरम या तीन उपक्र मांतून देश-विदेशातील चित्रपटसृष्टीतील अनुभवी मंडळी बोलली आणि त्यातून एकूणच चित्रपट जगताचं अंतरंग सर्वागानं उलगडत गेलं.
फिल्म बझार!
यावर्षीच्या इफ्फीतल्या आणखी एका उपक्र माचा विशेष उल्लेख करायला हवा आणि तो म्हणजे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन.एफ.डी.सी.) आयोजित करीत असलेला फिल्म बझार!
यावर स्वतंत्रपणो लिहिता येईल एवढी त्याची कमाई आहे.
आपले पहिलेवहिले चित्रपट करू पाहणा:या भारतीय तरुणांना या फिल्म बझारचा केवढा तरी फायदा झाला. लक्ष्मीकांत शेतगावकर या कोकणी दिग्दर्शकाचा ‘पैलतडीचो मनीस’ यातूनच निर्माण झाला आणि जगभर सन्मानाने पोचला. अशी किती तरी नावं घेता येतील.
यंदा महाराष्ट्र सरकारच्या दादासाहेब चित्रनगरीच्या अंतर्गत मराठी चित्रपटांना या जागतिक बाजारपेठेत आणण्यात आलं.
आयोजनाबरोबरच खर्चाची जबाबदारीही शासनानेच उचलली. चित्रनगरीचे सरव्यवस्थापक लेखक, कवी संजय कृष्णाजी पाटील यांनी त्यासाठी खास पुढाकार घेतला. त्याबद्दल त्यांचं खास कौतुक करायला हवं.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)
ashma1895@gmail.com