अज्ञानपीठाचा रामराम!

By admin | Published: February 15, 2015 02:37 AM2015-02-15T02:37:57+5:302015-02-15T02:37:57+5:30

पांडुरंग ते चांगदेव ते खंडेराव असा प्रवास करत जनस्थान ते ज्ञानपीठ अशी स्टेशनं घेत हल्ली तुम्ही सिमल्याला थंड हवेच्या ठिकाणी असता आणि मी इकडे सांगवीतच..!

Ignorant Rama Ram! | अज्ञानपीठाचा रामराम!

अज्ञानपीठाचा रामराम!

Next
>आधी नकार, मग व्यवस्थेला शरण, मग व्यवस्थेतल्या व्यवस्थेत बंड करू पाहणं, मग व्यवस्थेचं चक्क संशोधन वगैरे करणं अशा अनेक इत्यादी वगैरे गोष्टी करत करत पांडुरंग ते चांगदेव ते खंडेराव असा प्रवास करत जनस्थान ते ज्ञानपीठ अशी स्टेशनं घेत हल्ली तुम्ही सिमल्याला थंड हवेच्या ठिकाणी असता आणि मी इकडे सांगवीतच..!
 
ति,
रा. रा. भालचंद्र नेमाडे यांसी सप्रेम रामराम!
हे पत्र लिहायचं ठरवलं आणि सगळ्यात मोठी गोची उदाहरणार्थ अशी झाली की, इथं या पत्रचा मायना लिहिताना हुबेहूब असं काय लिहावं या विचारातच तासभर तंतोतंत अडून बसलो. 
तुमच्या नावाआधी ‘तीर्थरूप’ असं लिहावं असं आधी मनात आलं होतं. कारण मला जन्माला घालणारे तुम्ही एकाअर्थी माङो बापच; पण आपल्यात वयाचा फरक फारसा नाही. तुम्ही पंचविशीत होता तेव्हा मीही साभिनय आणि सदेह पंचविशीतच होतो. आज आपण दोघेही पंचाहत्तरीत असू. तर पन्नास वर्षानंतर शोधायचाच म्हटलं तरी आपल्यात फक्त नावाचाच फरक असणार. म्हणजे असं की तुम्ही ज्ञानपीठ वगैरे विजेते मराठी लेखक आणि मी तहहयात काहीही न जिंकू शकलेला पांडुरंग सांगवीकर. तुम्ही कायम देशी मातीशी नाळ जुळवून असलेले आणि मी कुठल्याच भुईत रुजू न शकलेला असा. पण हे फरक क्षुद्र आहेत. कारण तुम्हाला ज्ञानपीठ वगैरे आणि मी कायम जगरहाटीतल्या अज्ञानपीठाचा शंकराचार्य. यात थोर वगैरे काही अजिबातच नाही आणि कुणीही माणूस एकदा ‘पांडुरंग सांगवीकर’ झाला की त्याला कशातच आणि कशाचंच काही थोर वाटत नाही, हे मागच्या पन्नासभर वर्षांनी हुबेहूब सिद्धच करून दाखवलेलं आहे. 
अशा दृष्टीने पाहिलं म्हणजे आपल्यात फार काही फरक उरत नाही. मग असंही लक्षात आलं, की तुम्ही माझी म्हणजे तुमचीच स्वत:ची गोष्ट लिहिलेली आहे. आता माझी म्हणजे तुमचीच गोष्ट असं जर असेल तर ‘मी म्हणजेच तुम्ही’ असं आयडेन्टीटीचं काहीच्या काही त्रंगडं होऊन बसतं. 
मग मी म्हणालो, आपण आपला सरळ देशी रामराम घालून मोकळं व्हावं. 
मी म्हणालो, पांडोबा, मुद्यावर ये. नमनालाच मणभर गूळ काढू नकोस.
तर मुद्दा असा की एकेकाळी आपण सबंध आणि सर्वंकष व्यवस्थेलाच नकार देत असू. तुम्ही आणि मी दोघेही. माझं निमित्त करून तुम्ही इथल्या व्यवस्थेत नकार रुजवला असं समीक्षक वगैरे तत्सम जमातीचे लोक इथे-तिथे म्हणत असतात किंवा हे समीक्षक वगैरे लोक याच्या नेमकं उलट असंही काही म्हणाले असण्याची शक्यता आहे. समीक्षक त्या-त्या वेळी त्यांना वाटेल तसं-तसं काहीही म्हणू शकतात हे एक आणि कोणत्या वेळी कोण समीक्षक किंवा उदाहरणार्थ लेखक त्याच्या-त्याच्या अजेंडय़ानुसार कधी काय म्हणाला हे आपण मुद्दाम लक्षात ठेवायचं काही कारण नाही हे दुसरं. 
तर ते सोडा. 
आधी नकार, मग व्यवस्थेला शरण, मग व्यवस्थेतल्या व्यवस्थेत बंड करू पाहणं, मग व्यवस्थेचं चक्क संशोधन वगैरे करणं अशा अनेक इत्यादी वगैरे गोष्टी करत करत पांडुरंग ते चांगदेव ते खंडेराव असा प्रवास करत जनस्थान ते ज्ञानपीठ अशी स्टेशनं घेत हल्ली तुम्ही सिमल्याला थंड हवेच्या ठिकाणी असता आणि मी इकडे सांगवीतच चिरंतन जुनाट पारावर बसून समवयस्क म्हाता:यांसोबत अध्यात्म वगैरे भाकड गोष्टींची चर्चा करत करत उकाडय़ात पेंगत असतो. 
आता हा एकंदरीत बराच विनोदी प्रकार वाटत असला तरी, तुम्ही तंतोतंत सिमल्याला किंवा कुठेही असलात तरी तुमच्या रक्तातली सांगवी सुटणं शक्य नाही आणि मी सांगवीच्या भुईतच अजूनही अधांतरी मुळांना आधार शोधत असतो ही आपल्यातली मूलभूत गोष्ट आहे. 
व्यवस्थेला नकार असू देत की, पुरस्कारांचा स्वीकार असू देत; तुम्ही कुठेही गेलात आणि कितीही मोठे वगैरे झालात आणि मी कुठेच गेलो नाही आणि कितीही काहीही झालो नाही तरी शेवटी आपल्यातली सांगवी कुठेच जाणार नाही हे मला माहीत आहे. 
तुम्ही तिकडे ठिकठिकाणी कुठे कुठे आणि मी इकडे सांगवीतच कुठे कुठे- व्हाया नामदेव भोळे-शेवगे लावत चाललोय, हेच मला महत्त्वाचं वाटतं. त्या दृष्टीने पाहिलं तर शेवगे लावणं हिच एक गोष्ट अंतिम महत्त्वाची असते.
आता कुणा पश्चिमेचं लांगुलचालन वगैरे शैलीतल्या सलमान रश्दीला किंवा उदाहरणार्थ इतरही आणखी कुणाला हे इतकं साधं म्हणणं पटत नसेल, तर त्याला आपण काय करणार ? खरं बोलणा:याला तिरसट म्हणणं हा प्रकार खास इंग्रजी असतो. इंग्रजी शिकलेले, बोलणारे आणि म्हणून स्वत:ला जरा कमी इंग्रजच समजणारे सगळे असेच असतात हे आपण पुण्यात काहीबाही भंपक विद्यापीठीय शिक्षण घेत होतो तेव्हापासून पाहत आलेलो आहोतच. तेव्हा तो रश्दी किंवा कोण तो टिनोपॉल की नायपॉल काय म्हणतो ते आपण लक्षात घ्यायचं कारण नाही. आपण आपल्याला काय वाटतं ते बोलत राहू. कायम इंग्रजीतून बोलत आणि लिहित राहणं हे एकंदरीत गुलाम मानसिकतेचंच लक्षण हे म्हणणं अगदीच खरं नाही असं कोण म्हणोल ? - म्हणोल तो म्हणोल.
शेवटी असं की.
विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात सार्थक ठरो की ठरो निर्थक आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा,ढळो की न ढळो, हे पहाटे पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य, या खिन्न विनाशतत्त्वाच्या झपाटय़ात दरवळो की न दरवळो अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ, साचो की न साचो, घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ; - सांगवी अवकाश व्यापूनच उरेल आपला. सांगवीला, मला आणि तुम्हाला नखशिखांत लगटून असलेली माती सोडवून घेणार नाहीच तिचे आपल्यावर चढलेले कालजयी लेप. माती आदि असते आणि मातीच अंत हे तुमच्या-माङयाशिवायही लक्षावधींना माहीत आहे. लक्षावधी पांडुरंग आहेत, लक्षावधी चांगदेव आणि तितकेच खंडेराव ! ते ही गोष्ट सांगतच राहतील आणि हे सगळे ही गोष्ट सांगत राहतील तोवर आपणही असूच असू. लौकिक पुरस्कार असतील-नसतीलही. असं किंवा कसंही मोजलं तरी त्याने काही फरक पडत नाही.
- आता हे मला कुठून कळलं ? 
तर हा ज्ञानपीठ जाहीर झाल्यावर पेपरात आणि टीव्हीत आनंदी-आनंदासोबत ‘काही लोक’ जळकुटल्याचाही वास येऊ लागला तेव्हा आमचा शेजारी नाम्या काय म्हणाला ते सांगतो. तो म्हणाला, ‘‘हे ज्ञानपीठ का काय ते मिळालं ही भालबासाठी काय लै मोठ्ठी गोष्ट नसणार. आपला गडी पुरस्काराबिरस्काराने मोठा होणारा नाही अन् पुरस्कार न मिळाल्याने बारका होणारा नाही. गावोगावी सांगवी आहेत, सांगवी-सांगवीत पांडोबा आहे म्हणजे भालबाही आहेच. तो आपली गोष्ट चालू ठेवीलच.’’
- गोष्ट चालू राहणं आणि ती सांगणं महत्त्वाचं. 
अधिक काय लिहू ?
- तुमच्यातलाच मी,
पांडुरंग सांगवीकर
 
 

Web Title: Ignorant Rama Ram!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.