मला पाॅवरलिफ्टिंगमध्ये रस हाेता खरा, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 12:15 PM2022-06-19T12:15:46+5:302022-06-19T12:16:04+5:30
इथे अठरा पगड जाती, जमातींची माणसं गुण्यागोविंदानं राहतात. मी इथे आल्यापासून बॉम्बस्फोट, अतिवृष्टीसारखी बरीच संकटं पाहिली. पण, दुसऱ्या दिवशी पुन्हा नेटाने उभं राहणारं जगाच्या पाठीवरचं हे कदाचित एकमेव शहर असेल. प्रणाम मुंबई !
- आस्ताद काळे, अभिनेता
२३ ऑगस्ट २००३ रोजी मी व्यवस्थित ठरवून आणि हातात ‘लग्नकल्लोळ’ नावाचं एक संगीत नाटक घेऊन मुंबईत आलो. तत्पूर्वी मी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजतर्फे पुरुषोत्तमला थोडाफार अभिनय केला होता. पण, माझा मुख्य भर होता तो गायकीकडे. या नाटकातही गायक नट असल्याने मला काम मिळालं होतं. पुण्यात मी पं. गंगाधरराव पिंपळखरे बुवांकडे ९ वर्षे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. मुंबईत आल्यावर देखील पं. सत्यशील देशपांडे आणि पं. रघुनंदन पणशीकरांकडून अतिशय बहुमोल मार्गदर्शन मिळालं. परंतु मला इथे आल्यावर एका कामातून दुसरं काम मिळत गेलं ते अभिनेत्याचं, त्यामुळे गाणं मागे पडलं.
मी मुंबईत आलो ते घरच्यांच्या आर्थिक, मानसिक आणि वैचारिक भरभक्कम पाठिंब्यावर. त्यात हातात काम असल्यामुळे मानसिक स्थैर्य होतं. मुंबईत येण्यापूर्वीच माझी राहण्याची सोय झाली होती. माझ्या आजीचा पार्ल्यात एक फ्लॅट होता जिथे सचिन कुंडलकर भाड्याने राहात होता. त्याने आधीच ठरवून टाकलं, की मीही तिथे त्याच्यासोबतच राहणार. त्यामुळे मला मुंबईत स्थलांतराचा त्रास तर झाला नाहीच, पण कधी कुठलाही संघर्ष करावा लागला नाही. परेश मोकाशी, पुष्कर श्रोत्री आणि हृषिकेश जोशी या माझ्या सिनियर्सनी मला अतोनात मदत केली आणि मला कधीही माझ्या घराची आणि घरच्यांची उणीव भासू दिली नाही. हृषिकेशने तर पहिल्याच दिवशी माझं मुंबई लोकल या विषयावर एक बौद्धिक घेतलं, ज्यामुळे मला मुंबईची लोकल ट्रेन सेवा पटकन समजली आणि आत्मसात करता आली.
मी मुंबईत यायचं हे आधीपासून ठरवलेलंच होतं. नट नसतो नसतो तर गायक नक्कीच झालो असतो. नाही तर ऑडिओग्राफर किंवा सिनेमॅटोग्राफर झालो असतो. मला व्यायामाची बऱ्यापैकी आवड असल्याने पॉवरलिफ्टिंग करण्यातही मला रस होता. पण, मायबाप रसिकांच्या प्रेमाचं वजन अभिनेत्याच्या पारड्यात पडल्याने मी आज एक पूर्णवेळ अभिनेता म्हणून नावारूपास आलोय.
मी मूळचा पुणेकर असल्याने मुंबईची तुलना नेहमीच पुण्याशी करतो. या दोन्ही शहरांची स्वभाव वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. मुंबईचं कसं आहे माहीत आहे का... हे शहर आधी तुम्हाला त्याच्या वेगाने शारीरिकदृष्ट्या पार दमवतं. पण, त्यातून तुम्ही चिकाटीने उभे राहिलात तर हे शहर कमाल आहे.
- शब्दांकन :
तुषार श्रोत्री