पहिले माझा ‘कान्हा’..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:02 AM2020-03-08T06:02:00+5:302020-03-08T06:05:06+5:30
मुलाला झोपेतून उठविणे, त्याची अंघोळ, नास्ता या सार्या गोष्टी त्याची आई नव्हे, तर त्याचे बाबाच उत्साहाने करतात.
- अविनाश साबापुरे
विश्वसुंदरी, अभिनेत्री लारा दत्ता लग्नानंतर एकदा नागपुरातील जाहीर कार्यक्रमात म्हणाली होती.. करिअरपेक्षाही छोटे मूल सांभाळणे ही ‘टफ’ जबाबदारी असते.. हीच टफ जबाबदारी खेड्यापाड्यातील महिला अत्यंत निग्रहपूर्वक पूर्ण करीत असतात. स्वत:ची स्वप्ने बाजूला ठेवून मुलांच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सारे काही विसरून झटत राहतात. त्यातून कष्टासोबतच आईपणाचे, आपले मूल मोठे होतानाचे, त्याच्या बाललीला अनुभवण्याचे एक अनोखे सुखही त्यांना मिळत असतेच; पण या सार्या जबाबदारीत एकट्या आईनेच का पूर्णवेळ द्यावा? मुलांच्या जडणघडणीत बाबाची काहीच जबाबदारी नसावी का?
लग्न झाले, मूल झाले, त्यानंतर बाळाची, मुलांची सारी जबाबदारी एकट्या आईची असे स्वत:च ठरवून आपापल्या कामधंद्यात मश्गूल होऊन जाणारे बाबालोक सर्वत्र दिसतात. पण त्यामुळे मुलांच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम करीत असतात. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यात त्यात अडचणी तर निर्माण होतातच; पण मुलांची, संसाराची, घराची. सारी जबाबदारी एकट्या आईवर, घरातल्या महिलेवर येते. दिवसेंदिवस घरातल्या या जबाबदार्या वाढतच जातात. महिला त्यात आयुष्यभर अडकून जातात आणि बाबा पालक मात्र ‘हे आपलं काम नाही’ म्हणत त्यातून कायम अलिप्तच राहतात.
कुटुंबव्यवस्थेतील नेमका हाच कच्चा दुवा हेरून खेड्यापाड्यात बदल घडविला जात आहे. त्यासाठी युनिसेफने सुरू केलेला ‘बालसंगोपन, कुटुंबाचे आणि समुदायाचे सक्षमीकरण’ हा प्रकल्प महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.
आईच्या उदरातून आलेलं लेकरू पुढे जेव्हा बाबाच्या खांद्यावर बसून जग पाहायला लागतं तेव्हा ते खर्या अर्थाने घडत जातं. हाच बदल यवतमाळ जिल्ह्यातल्या वेणी (ता. बाभूळगाव) नावाच्या खेड्यात पाहायला मिळतो. दोन-चार एकर शेतीवर गुजराण करणार्या गरीब कुटुंबात मुलांचे संगोपन म्हणजे, केवळ बाईने पार पाडायची जबाबदारी, हा समज असतो. पण वेणी गावातील अनेक कुटुंबांनी तो खोडून काढला. या कुटुंबांमध्ये आईपेक्षाही बाबाच मुला-मुलींची अधिक काळजी घेताना दिसतात. नव्हे, हे बाबाच जणू मुलांची आई बनले आहेत.
सचिन चौधरी हे त्यापैकीच एक. त्यांचा तीन वर्षांचा कान्हा म्हणजे त्यांचे जग. कान्हाला खांद्यावर बसवून संपूर्ण गावात फिरवून आणणे, हा सचिन यांचा रोजचा शिरस्ता. त्यांच्या अंगणात पाय ठेवताच लहानगा कान्हा दुडुदुडु धावत येऊन सर्वात आधी शेकहँड करतो. येणार्या पाहुण्याला सर्वात आधी नाव विचारतो, मग स्वत:चेही नाव सांगतो. घरात बसायला जागा देतो. पाहुणे कोठून आले, कोणत्या कारणाने आले सारी वास्तपुस्त हा तीन वर्षांचा मुलगाच करतो.
एवढी समज या छोटुकल्यात कोठून आली असावी? त्याचे गुपित दडले आहे, आई बनलेल्या त्याच्या बाबांच्या वागण्यात. सचिन चौधरी सांगतात, कान्हाच्या प्रत्येक गोष्टीवर आमचे लक्ष आहे. कान्हाच्या आईला वेळ नाही असे नाही. पण मुलगा माझाही आहे, तेव्हा त्याची जडणघडण मीही केलीच पाहिजे. अंगणवाडीताईकडून आम्हाला मुलांच्या पालनपोषणाविषयी सखोल मार्गदर्शन मिळतेच. पण बाबा म्हणून मलाही माझ्या मुलाचे सारेकाही करण्यात माझा स्वत:चा सन्मान वाटतो. मी रोज कान्हासाठी एक दोन तास देतो. पहिले कान्हा नंतर बाकी कामे. मी माझ्या कान्हाला कधी एक थापडही नाही मारत. मारण्यापेक्षा त्याला काय म्हणायचे आहे ते समजून घेतले की त्याचा हट्टही कमी होतो, हा माझा अनुभव आहे.
सकाळ होताच कान्हाला झोपेतून उठविणे, त्याची अंघोळ घालून देणे, त्याच्या आवडीचा नास्ता त्याला तयार करून देणे ही सारी कामे आई नव्हे त्याचे बाबा करतात.
कान्हाची आई सुवर्णा सांगते, बाकीच्या मुलांपेक्षा आमचा कान्हा एवढा ‘अँक्टिव्ह’ असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्याच्यासोबत त्याचे बाबा जास्तीत जास्त वेळ राहतात. मी स्वयंपाक करत असेल तर ते कान्हासोबत खेळत असतात. नुसते खेळतच नाही तर त्याला जेऊही घालतात. आता कान्हा आणि त्याच्या बाबाचं एक अनोखं नातं निर्माण झालं आहे. ते दोघंही रोज हरिपाठाला जातात. आज तीन वर्षातच कान्हा संपूर्ण एबीसीडी म्हणतो.
सचिनप्रमाणेच वेणी गावातील विजय चौधरी या शेतकर्याचाही आपल्या दोन मुलींविषयी असाच अनुभव आहे.
विजय चौधरी दोन्ही मुलींची आई सोनूपेक्षाही जास्त काळजी घेतात. देवयानी आणि समृद्धी या मुलींना गोदी बसवून (पाठीवर बसवून) फिरविणे हा त्यांचा आवडता कार्यक्रम. मुली म्हणजे माझा मुलगाच आहे, हे विजय चौधरी यांचे उद्गार बरेच काही सांगून जातात.
मुलींच्या तयारीसाठी आईला वेळ मिळावा म्हणून हा शेतकरी चहा, स्वयंपाकही स्वत: करतो. मुली जेव्हा ‘भांडे-भांडे’ खेळतात, तेव्हा विजयरावही त्यांच्यात सामील होतात. स्वत: घोडा बनून मुलींना आगळी सैर घडवितात. बाप-लेकीच्या या अनोख्या नात्यातून मुली अधिक कणखर बनतील हा त्यांचा विश्वास आहे.
माता सभांना बाबांची हजेरी!
युनिसेफच्या वतीने सध्या ‘बालसंगोपन कुटुंबाचे आणि समुदायाचे सक्षमीकरण’ हा प्रकल्प राबविला जात आहे. त्यात बाबा पालकांवर विशेष भर देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील झरी, पांढरकवडा, घाटंजी, दिग्रस, राळेगाव आणि बाभूळगाव तालुक्यांमध्ये हा प्रकल्प सध्या सुरू आहे. प्रामुख्याने अंगणवाडीताईच्या माध्यमातून पालकांना मार्गदर्शन केले जाते. मुलांचा आहार-विहार कसा असावा, यासोबतच पालकाचे मुलांसोबतचे वर्तन कसे असावे, याबाबत माहिती दिली जाते. त्यासाठी दर शनिवारी अंगणवाडीत माता सभा घेतली जाते. आश्चर्य म्हणजे, मुलांचे संगोपन आणि त्यांच्या जडणघडणीबाबत जागृत झालेले पुरुष पालक या सभांना आवर्जून हजेरी लावतात. आपल्या अडचणी मांडतात. वेणी गावात सध्या मंदा लोहट या तालुका समन्वयक म्हणून काम पाहात आहेत, तर शमशादताई या अंगणवाडीसेविका माता सभांमध्ये माहिती देतात.
avinashsabapure@gmail.com
(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
(छायाचित्रे - रुपेश उत्तरवार)