कसा, कुठे शोधावा आनंदाचा ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 06:02 AM2019-03-31T06:02:00+5:302019-03-31T06:05:04+5:30

भूतानने ‘हॅपिनेस इंडेक्स’ ही संकल्पना सुरू केली. अनेक देशांनी ती आंधळेपणाने उचलली. ‘समृद्धीतून येणारा आनंद’ हा निकष विषमतेला पोषक आहे. भारतासारख्या देशात ‘धैर्यातील आनंद’ म्हणजे चिवटपणे झगडण्यातला सकारात्मक आनंद या संकल्पनेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. आनंदाच्या साऱ्या छटांना कवेत घेणारे मापनसाधन तयार करणेही शक्य आहे.

In India 'Resilient Happiness' is more important than Happiness Index, explains Dr Anand Nadkarni | कसा, कुठे शोधावा आनंदाचा ठेवा

कसा, कुठे शोधावा आनंदाचा ठेवा

googlenewsNext
ठळक मुद्देभूतान या देशातील ‘आनंद मूल्यांक’ ही संकल्पना जशीच्या तशी उचलून संपूर्ण जगामध्ये राबवता येणार नाही.

- डॉ. आनंद नाडकर्णी

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट... एका तरुण आयएएस अधिकाऱ्याकडून भेटीसाठी आमंत्रण आले.
भेट मोठी प्रसन्न झाली.
‘‘आपल्या शहरामध्ये हॅपिनेसवर काही प्रोजेक्ट करायचा आहे’’ हा अधिकारी म्हणाला.
‘का बरं? अचानक?’ मी विचारले.
भूतान नावाच्या हिमालयातील परिकथेसारख्या वसलेल्या देशाने जगाला दिलेली एक देणगी म्हणजे, हॅपिनेस इंडेक्स अर्थात ‘आनंद मूल्यांक’. मी भूतानमध्ये, काही वर्षांपूर्वी आठ-दहा दिवस भटकंती केली आहे. जिथे सर्वसाधारण पर्यटक पोहोचत नाहीत अशा गाव-खेड्यांमध्येही गेलो आहे. ‘बदल’ या घटकाचा विचार केला तर अजूनही तिथले जनजीवन, संथ जलाशयासारखे आहे. जीवनशैलीबद्दलच्या आकांक्षा मर्यादित आहेत. कमी लोकसंख्या आणि अनेक समाजोपयोगी सरकारी योजना यामुळे ‘वेल्फेअर स्टेट’ ही कल्पना कागदावर राहिलेली नाही. बुद्ध्यांकाच्या संदर्भात सर्वसाधारण क्षमतेच्या सीमारेषेवर असणाºया मुलांसाठीचे निवासी आयटीआय मी थिंफूमध्ये पाहिले. एखादे कौशल्य आत्मसात करून स्वत:च्या गावी गेल्यावर तिथे बसून तयार केलेल्या परंपरागत उत्पादनांच्या विक्र ीची पूर्ण जबाबदारी तिथे सरकारी यंत्रणा घेते. पर्यटकांचा लोंढासुद्धा कसा मर्यादित करायचा याचे नियोजन या देशाची यंत्रणा करत असते. त्यामुळे या देशातील ‘आनंद मूल्यांक’ ही संकल्पना जशीच्या तशी उचलून संपूर्ण जगामध्ये राबवता येणार नाही.
माझी भूमिका मी त्याच्यासमोर मांडली. ‘समृद्धीतून येणारा आनंद’ असा निकष घेतला तर तो विषमतेला पोषक होतो. भारतासारख्या देशामध्ये समृद्धी या गोष्टीची एकच एक व्याख्या नाही. आणि आपला समाजही आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक स्तरांवर अतिशय भिन्न गटांनी बनला आहे.
आव्हानात्मक जीवन प्रवासामध्ये, ‘उत्कर्षासाठी केलेल्या विधायक आणि चिवट अशा प्रवासाचा आनंद’ हा निकष आपण प्रत्येक समाजगटासाठी वापरू शकू, असा आहे.
‘गलीबॉय’ नावाच्या अलीकडे आलेल्या चित्रपटातील नायकाचे उदाहरण घेऊन हा मुद्दा स्पष्ट करूया..
त्याचे नाव मुराद. तो राहत असतो, धारावीच्या वस्तीमध्ये. त्याच्या घरातले वातावरण काहीसे परंपरागत. वडील दुसरी शादी करतात. हा कॉलेजात जात असतो. पण भविष्याची वाट दिसत नसते. आउटलायनीतले विविध मार्ग खुणावत असताना त्याला भेटतं संगीत. त्या रॅप संगीतामधून तो स्वत:ची वेदना अधिक कलात्मकपणे कशी मांडतो आणि कलाकार म्हणून कसे घडवतो स्वत:ला, यातील चढ-उतारांची कहाणी या चित्रपटात आहे.
नायकाचे नावच आहे, मुराद; म्हणजेच तीव्र इच्छा. उत्कर्षाची इच्छा... तीसुद्धा चांगल्या मार्गाने. विषमतेच्या विरोधातली विद्रोही प्रतिक्रि या संहारातून नव्हे तर संगीतातून व्यक्त करायची. मुरादच्या मैत्रिणीच्या आलिशान घरातल्या स्नानगृहामध्ये तो पावले मोजून त्या खोलीचे आकारमान शोधतो. त्याच्या घरापेक्षा मोठे असते स्नानगृह.
मुराद जेव्हा कलाकार म्हणून एका पातळीला पोहोचतो तो आहे धैर्यानंद... इंग्रजीत त्याला म्हणतात ‘रिसिलिअन्ट हॅपीनेस’.
धैर्य या भावनेची गल्लत आपण नाकर्त्या आणि मुक्या सहनशीलतेबरोबर करतो. धैर्यामध्ये आहे स्वत:ला विकासाकडे नेणाºया धैर्याबद्दलची निष्ठा, अनेक अडचणींना तोंड देत पुढे जाण्याचा निडरपणा, अकस्माताला कवेत घेणारे डोळस साहस!..
ध्यैर्याकडे नेणाºया या धैर्यशाली प्रवासातही समाधानाचे क्षण असतात आणि मुक्कामावर पोहोचल्याच्या आनंदाची त्यात भर पडते..
मी ज्या ठाणे शहरात रहातो तिथे धैर्यातील आनंदाचे कौतुक करणारा एक प्रकल्प आहे ‘एकलव्य’. खडतर आर्थिक-सामाजिक परिस्थितीला तोंड देऊन शैक्षणिक प्रगती साधणाºया विद्यार्थी-विद्यार्थिनींना शोधून त्यांना पुढचे मार्गदर्शन आणि मदत करण्याचा हा उपक्रम आहे. ‘‘धैर्यानंदा’’च्या व्याख्येमध्ये जसा हा उपक्र म बसेल त्याचप्रमाणे एका उद्योजकाचा अथक प्रवासही बसेल, एका कलाकाराची विकासाकडे नेणारी धडपडसुद्धा बसेल, नवा शोध लावणाºयाची तपश्चर्याही त्यात येईल आणि निष्ठेने तासन्तास सराव करत उच्च पातळीवर पोहोचणारा खेळाडूसुद्धा येईल... स्थितिशीलतेच्या विरोधातल्या विधायक प्रवासाचा आनंद म्हणजे धैर्यानंद. हा मोजण्याचे मानसिक साधन तयार करण्यासाठी मानसशास्राच्या अभ्यासकांना एकत्र करूया.
‘असं खरंच करता येईल?... त्या अधिकाºयाने विचारले.
‘प्रत्येकाला स्वत:मधली धैर्यानंद क्षमता ओळखण्यासाठीचे शास्रशुद्ध स्वयंमापन साधन तयार करणे शक्य आहे... आणि हे मापन केले तर त्यातून अनेकांना प्रगतीकडे आणि उन्नतीकडे नेण्यासाठी प्रेरणाही देता येईल.’ मी म्हणालो.
‘प्रगती आणि उन्नती म्हणजे एकच ना?’ तो अधिकारी म्हणाला.
‘प्रगती’ या शब्दामध्ये भौतिक सुखांमधली वाढ जास्त अपेक्षित आहे आणि प्रगतीची गती ही समतल पृष्ठभागावर आहे. उन्नतीच्या प्रवासात, स्वत:ला वेगळ्या पातळीवर नेणे अपेक्षित आहे. विचार आणि भावनांच्या विस्ताराबरोबर येते ती उन्नती. आपल्या परंपरेने म्हटले आहे, प्राप्तीनंतर मिळते ते सुख आणि भौतिक सुखांच्या प्राप्तीपलीकडे असतो तो आनंद.
आनंद ही अनेक पदरी अवस्था आहे. ‘‘धैर्यानंद म्हणजे, चिवटपणे झगडण्यातला सकारात्मक आनंद.’’ आपण जे काम करत असतो त्यामध्ये स्वत:ला विरघळून टाकण्याचा एक असतो तन्मयानंद... आपल्या परंपरेत त्याला म्हणतात, कर्माचे अकर्म होणे... ज्या संस्कृतीमध्ये या ‘प्रोसेस हॅपीनेस’च्या भावना तीव्र, ती संस्कृती फक्त प्रगत रहात नाही तर ‘उन्नत’ होते.
सहकार्यातून येणारा आनंद हा स्वार्थी आणि अप्पलपोट्या आनंदापेक्षा कितीतरी भारी! आणि त्यानंतर आहे देण्यातला आनंद... आस्थेतून उमलणारा, स्वार्थाच्या पार जाणारा आनंद... कुणाला तरी हरवण्यातही आनंद आहे; पण उत्कृष्टतेच्या ध्यासातून येणारा आनंद त्याहून श्रेष्ठ मानायला हवा.
खरे तर आनंदाच्या साºया छटांना कवेमध्ये घेणारे मापनसाधन तयार करणे शक्य आहे... पण त्याचे ध्येय, संख्यात्मक विश्लेषण आणि टक्केवारीपुरते मर्यादित असता कामा नये... प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या आत्मपरीक्षणासाठी ते वापरले पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने हे साधन समजावून स्वत:कडे नव्याने पहायला हवे. आपल्या समाजातल्या वाढत्या, अप्पलपोट्या आनंदाबद्दल आपण बोलतो. शेजाऱ्यांपासून पर्यावरणापर्यंत सगळ्या घटकांना हानी पोहोचवणाºया आनंदाबद्दल नापसंती व्यक्त करतो... पण, मनाला सुन्न करणारी धुंदी म्हणजे आनंद नव्हे हे सांगणारे उपक्र म, योजना राबवतो आहोत का आपण?... अन्नाची नासाडी, रोषणाईतला ऊर्जाव्यय, दणदणाटी आवाजातला बेफाम जल्लोष ही प्रतीके, या जीवनशैलीतल्या आनंदाची की आत्ममग्न गुंगीची?...
आनंद या भावनेवर आपण राष्ट्रीय धोरण आणि नीती कधी तयार करणार?... देशाच्या नेतृत्वापुढे हा प्रश्न कधीकाळी तरी येणार का?... की जगातल्या एका ‘हॅपिनेस इंडेक्स’वर आमच्या देशाचा क्र मांक तळागाळातला आला म्हणून आपण गळे काढत राहायचं?... आणि हे असे परिपत्रकांचे कपटे फडकवत राहायचे?..
‘आपल्या शहरासाठी नेमके काय करता येईल त्याचा एक प्राथमिक आराखडा द्याल का डॉक्टर?... तुमची संस्था या क्षेत्रात इतकी वर्षं काम करते आहे...’ अधिकारी म्हणाले.
धैर्यानंद अनुभवलेल्या अनेक रोल मॉडेल्सना एकत्र आणणे ते सकारात्मक भावनिकता पसरवणारे जाणीव-जागृती कार्यक्र म असे एक प्रकल्पचित्र तयार केले. ‘आनंददूत’ नावाची एक संकल्पना तयार केली, ज्यामध्ये समजूतदार नागरिकांना प्रशिक्षित करता येईल. आपल्या सगळ्यांचा भर आहे तणाव नियोजनावर. विधायक आनंदाची निर्मिती हे उद्दिष्टसुद्धा महत्त्वाचे नाही का? आपल्या मानवसंसाधन आणि सांस्कृतिक विभागांनी हॅपीनेस पॉलिसी तयार करायला नको का? अत्यंत गांभीर्याने घ्यायचा विषय आहे हा... वरून आलेले सर्क्युलर खाली दामटवण्याचा नव्हे.
ही कागदपत्रे मी त्या अधिकाºयाकडे पोहोचवली, त्याला आता बºयापैकी काळ लोटला आहे. शेवटी उत्साही अधिकाºयालादेखील स्वत:चा प्राधान्यक्रम स्वत:च्या मर्यादांमध्ये ठरवावा लागतच असणार. असो. आनंद आहे(?)..
(लेखक ज्येष्ठ मनोविकासतज्ञ आणि ‘आयपीएच- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ’ या संस्थेचे संचालक आहेत.)

anandiph@gmail.com

Web Title: In India 'Resilient Happiness' is more important than Happiness Index, explains Dr Anand Nadkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.