बालीतील भारतीय संस्कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 07:05 AM2018-10-14T07:05:05+5:302018-10-14T07:05:05+5:30
भारतीय संस्कृतीतले अनेक घटक बालीत पाहायला मिळतात. बालीत हिंदूंची संख्याही ८५ टक्के, तरीही बालीवासीयांना आपल्या परंपरांचा खूप अभिमान. इथला निसर्ग तर सुंदर आहेच; पण आपला इतिहास आणि अस्तित्व जपण्याची त्यांची धडपडंही कौतुकास्पद.
- सचिन जवळकोटे
स्थळ : इंडोनेशियातल्या बालीचा उल्लूवाट्टू पॉइंट.
वेळ : सायंकाळी सहाची. सूर्य मावळू लागलेला. समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या छोट्याशा स्टेडियममध्ये तीन ते चार हजार पर्यटक दाटीवाटीनं बसलेले.
समोरच्या मोकळ्या जागेत पंधरा-वीस कलाकार जोरजोरात हातवारे करताहेत. याच आवाजाच्या पार्श्वभूमीवर रामायणातला सीताहरणाचा प्रसंग उलगडण्यात बाकीचे कलाकार मग्न. सलग सव्वा तास चाललेल्या या नाट्याविष्काराचा अनुभव घेण्यात पर्यटकही दंग.
लंकादहनाच्या दृश्यानंतर सोहळा संपला. टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर बालीनी देवाच्या वेशभूषेतील कलाकारानं पर्यटकांशी संवाद साधला. ज्या देशाचं नाव पुकारलं जायचं, तिथली मंडळी लगेच हात वर करून जोरात प्रतिसाद द्यायची. ‘इंडिया’चं नाव निघताच निम्मं स्टेडियम उठून उभं राहिलं. शिट्ट्यांचा आवाज घुमला.
रामायण अन् महाभारत हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग. रामजन्मापासून ते सीतेच्या वनवासापर्यंतचा प्रत्येक प्रसंग भारतीयांना तोंडपाठ.. तरीही भारतातून हजारो लोक सातासमुद्रापलीकडं जाऊन बालीत पोहचतात. तिथल्या कलाकारांच्या तोंडून रामायणाची कथा ऐकतात. कथ्थक नृत्यासारख्याच पदलालित्याला मनापासून दाद देतात. पिकतं तिथं विकत नसतं, याची प्रचिती घेऊन परततात... कारण, या ‘बाली’ प्रवासासाठी एका पर्यटकावर किमान पाऊण लाख रुपये खर्च होतात. इथल्या नृत्यावर रोज पंधरा लाखांचा गल्ला जमा होतो.
बाली हा इंडोनेशियाच्या पूर्वेकडील प्रांत. अनेक बेटांचा समूह असलेल्या या मुस्लीम देशातील बाली परिसरात सर्वाधिक लोकसंख्या हिंदूवासीयांचीच. जवळपास ८५ टक्के. खरं तर हे बेट आदिवासींचं. चेहºयाची ठेवण चिनी-जपानी मंडळींसारखीच. बसकं नाक. मिचमिचे डोळे. यांची बोलीभाषा वेगळी. राहणीमान वेगळं.. मात्र पहिल्या शतकात दक्षिण भारतातील काही व्यापारी जहाजातून या बेटावर पोहचले. स्थायिक झाले. त्यांच्यासोबत भारतीय संस्कृतीही तिथं पोहचली. स्थिरावली. फोफावली. इथले राम-कृष्ण तिथंही देव बनले. विष्णूची मंदिरं उभारली गेली. हनुमानाचा जप सुरू झाला. श्रीगणेशाची पूजाही सुरू झाली. भारतात आजही विष्णूची मंदिरं बोटांवर मोजण्याइतपत असावीत; परंतु बालीतील विष्णूची महाकाय मूर्ती जगातली सर्वात उंच समजली जाते. इथल्या मुख्य चौकात कालियामर्दन करणाºया कृष्णाचा अवाढव्य पुतळा आजही पर्यटकांचे डोळे दिपवितो. महाकाय रथावर आरूढ झालेल्या कृष्ण-अर्जुनाचं शिल्प अचंबित करून टाकतं. हे सारं पाहताना, अनुभवताना क्षणभर भास होतो की, ‘अरेऽऽ, आपण आपल्या भारतातच आहोत की काय?’
...पण ही भारतीय संस्कृती नसून आमची बाली संस्कृती आहे, असं ते ठासून सांगतात. या प्रांतानं हिंदू धर्म स्वीकारला असला तरी भारतीय संस्कृतीला मात्र ते आपलं मानत नाहीत. कारण त्यांना स्वत:चं अस्तित्व जपायचंय. आपण भारताची कॉपी करतो, ही ओळख त्यांना पूर्णपणे पुसून टाकायचीय. म्हणूनच ते देत राहतात शेकडो वर्षांपूर्वीच्या मूळ बालीतील इतिहासाचे दाखले. गोडवे गात राहतात बेटावरच्या आदिवासी परंपरेचे.
‘जुनं ते सोनं’ ही म्हण प्रत्यक्षात सार्थ ठरविलाय इथल्या मंडळींनी. त्यांच्याकडच्या जुन्या मंदिरांचे भग्नावशेष वेगळ्या स्वरूपात जगासमोर आणून त्यांनी निर्माण केलाय नवा ‘टुरिझम पॉइंट’. इथल्या मंदिरांची रचना जवळपास तामिळनाडू अन् आंध्र प्रदेशातल्या ऐतिहासिक वास्तूसारखीच. वळणा-वळणाच्या नाजूक बेलबुट्टीची नक्षी इथल्या दगडी मंदिरांवर कोरलेली. जणू कामाक्षी मंदिराच्या शिखराची आठवण यावी अशी.
बालीत हजारो मंदिरे असल्याचा एक अंदाज. शहराची लोकसंख्या तर केवळ १२ लाख. प्रत्येक घराच्या अंगणात छोटं का होईना देऊळ आहेच. आपल्याकडच्या तुळशीवृंदावनासारखं. फक्त त्यांच्या आकारमानानुसार घरातल्यांची श्रीमंती म्हणे प्रकट होते !
इथली एक महिला गाइड. नाव तिचं सुची. मोडक्या-तोडक्या भाषेत का होईना गायत्री मंत्र म्हणून दाखविते.. तर ही सुची म्हणत होती, ‘इथली जुनी परंपरा जगाला खूप आवडते. बालीत सर्वाधिक पर्यटक येतात आॅस्ट्रेलियातून. केवळ दोन तासांचं हवाई अंतर असल्यामुळे आॅस्ट्रेलियन टुरिस्टची संख्या वरचेवर वाढतच चाललीय. त्यानंतर गर्दी असते तैवानची. तिसरा क्रमांक लागतो भारतीयांचा.’
इथल्या तरुणींना आवडतं सोनचाफ्याचं फूल. बहुतांश जणींच्या केसात माळलेलं हे फूल लक्ष वेधून घेतं. रस्त्यालगत तर पाच-पाच फुटांवर दिसून येतात सोनचाफ्याची झाडं.
प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग करण्यात इथली मंडळी माहीर. काही दशकांपूर्वी इथल्या एका डोंगरावर ज्वालामुखी भडकलेला. आता तो निद्रिस्त असला तरी तिथपर्यंत जाण्यासाठी बाली प्रशासनानं सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यात. जळून खाक झालेल्या डोंगरासमोर शेकडो हॉटेल्सची रेलचेल. राखेतूनही पैसा कमवायला ही मंडळी तयार.
पर्यटकांना मार्गदर्शन करताना समीर देशमुख बोलत होते, ‘अलीकडच्या पाच-सहा वर्षांमध्ये महाराष्टÑीयन पर्यटकांमध्ये बालीची क्रेझ निर्माण झालीय. तिथं जाणाºयांच्या संख्येतही प्रचंड वाढ झालीय. त्यातही हनिमून डेस्टिनेशन म्हणून बालीची स्वतंत्र ओळख होऊ लागलीय. त्या देशात ज्या पद्धतीनं सोयी-सुविधा पुरविल्या जातात, त्या पाहता आपल्यालाही खूप काही शिकण्यासारखं.’
अकराव्या शतकात बांधल्या गेलेल्या इथल्या हत्तीच्या गुहेलाही हजारो पर्यटक भेट देतात. गरुड, सिंह अन् हत्तीच्या निर्जीव मूर्ती पाहण्यासाठी पर्यटक या बेटावर येतात. त्यावेळी मनात विचार येतो, ‘हे सारे प्राणी तर आपल्याकडे आजही जिवंत आहेत. तरीही आपण त्यांच्याकडे पाठ फिरवून दगडी शिल्पं पाहण्यासाठी कैक तासांची हवाई सफर करत राहतो.’ याला कारण एकच.. बालीचा केवळ निसर्गच सुंदर नाही, तर त्यांची परंपरा जपण्याची धडपड कौतुकास्पद. इतिहास सादर करण्याची अनोखेदार शैलीही लाजबाब.
हजारो भारतीय होताहेत ‘बाली’निवासी...
मुंबई ते बालीचं अंतर जवळपास पावणेसहा हजार किलोमीटरचं. हिंदू संस्कृती हा समान दुवा सोडला तर भारताशी बालीचा सुतराम संबंध येण्याची शक्यता कमीच. तरीही इथून तिकडं स्थायिक होणाऱ्या भारतीयांची संख्या वरचेवर वाढतच चाललीय. सध्या किमान पाच हजार भारतीय तरी तिथं व्यवसायात स्थिरावल्याचं सांगितलं जातंय.
तिथं कायमस्वरूपी राहण्याची परवानगी परदेशातील कोणत्याच नागरिकाला मिळत नाही. मात्र, दरवर्षी व्हिसाची मुदत वाढवून राहण्याची सवलत मिळते. तिथं जागाही विकत घेता येत नाही. तरीही भाडेकरारानं जागा घेऊन हॉटेलिंग व्यवसायात उतरलेले भारतीय भरपूर. महाराष्ट्र , गुजरात अन् राजस्थानातून बालीला जाणाºया पर्यटकांची संख्या लक्षणीय. तिकडचं इंडोनेशियन भोजन आपल्याला बिलकुल पचनी पडत नसल्यानं भारतीय खाद्यपदार्थांच्या हॉटेल्सना आपसूकच मागणी. त्यामुळं इंडियन हॉटेल्सची संख्या वाढलेली. एका पंजाबी नागरिकानं बालीत चार वेगवेगळ्या ठिकाणी शाखा सुरू केलेल्या. विशेष म्हणजे, त्याचे फूड मॅनेजर चेन्नई अन् कोचीचे. म्हणजे.. मालक उत्तर भारतीय, कर्मचारी दाक्षिणात्य, भोजन मात्र अस्सल महाराष्ट्रीयन अन् गुजराती ! भारतीय एकतेची झलक पाहायला मिळतेय चक्क परदेशी बालीत.
(लेखक ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)
sachin.javalkote@lokmat.com