रंगांचा सेंद्रिय उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 06:00 AM2019-03-31T06:00:00+5:302019-03-31T06:00:04+5:30
होळी हा आपल्यासाठी तसा नेहमीचा विषय. ती छायाचित्रणातून सादर करायची तर तिची सेंद्रियता कशी जपता येईल आणि होळीच्या मूळ भावनेपर्यंत कसं जाता येईल हा प्रश्न माझ्यापुढे होता. त्यातलं पावित्र्य, ती उत्स्फुर्तता टिपण्याचं काम मी केलं.
कणकवलीसारख्या छोट्या गावातून सहा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासह आपला प्रवास सुरू करणारा इंद्रजित खांबे हा कलावंत. न मळलेल्या वाटा धुंडाळणारा. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत त्यानं जगभरातल्या फोटोग्राफर्सशी जोडून घेत स्वत:च्या चौकटींची मोडतोड केली. कधी कोकणातला दशावतार टिप्माला, कधी कोल्हापुरातली कुस्ती, कधी कोकणातले अज्ञात रस्ते पालथे घातले तर कधी थेट हंपीच्या दगडांचं विराट रूप नव्यानं शोधलं. त्याच्या कामाचं सातत्य व चित्रचौकटीतला ताजेपणा पाहून ‘अॅपल’सारख्या कंपनीनं राजस्थानातील होळी डॉक्युमेंट करण्याचं निमंत्रण दिलं. इंद्रजितने टिपलेल्या या अनोख्या ‘रंगसोहळ्याला’ जगभरातून दाद मिळते आहे..
* ‘अॅपल’कडून राजस्थानातील ‘होळी’चा रंगोत्सव टिपण्यासाठी बोलावलं गेलं. कसं?
- मागच्या वर्षी जानेवारीत ‘मोबाइल फोटोग्राफी स्पर्धे’त माझ्या फोटोला प्रथम क्र मांकाचं बक्षीस म्हणून अॅपलचा आयफोन मिळाला नि यावर्षी मार्चमध्ये ‘अॅपल’च्या इन्स्टाग्राम पेजवर मी काढलेले आठ फोटो व व्हिडीओ अपलोड झालेत! विलक्षण वाटतंय. त्यांच्या प्रतिनिधींनी सोशल मीडियावर मी केलेलं काम पाहून माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांना माझ्याकडून राजस्थानसारख्या ठिकाणी होणारा होळीचा उत्फुल्ल रंग फोटोबद्ध करून हवा होता. त्यांच्या धोरणानुसार त्यांना माझ्या व्हिजनमध्ये रस होता. त्यांनी मला निवडण्याचं कारण हेच सांगितलं की, माझं काम त्यांना रॉ व नैसर्गिक वाटलं.
* होळी, रंगपंचमी. अतिपरिचित फ्रेम्स ! दडपण नाही आलं?
खरं तर बोलण्याची सुरुवात अशीच झाली की भारतामध्ये फोटोग्राफीच्या बाबतीत होळी ही सगळ्यात क्लिशे आहे. भारतातले बहुसंख्य फोटोग्राफर हे होळीच्या दिवशी नांदगाव आणि वाराणसी या भागामध्ये जाऊन फोटो काढतात. तिथे अक्षरश: हुल्लडबाजी चालते. सगळ्यात जास्त शोषण या ठिकाणी कोणाचं होत असेल तर बायकांचं होतं. महिला फोटोग्राफर्सची छेडछाड करण्याचे किस्सेही तिथं भरपूर घडलेत. एका फोटोग्राफर मैत्रिणीनं सोशल मीडियावर आपला असा अनुभव लिहिला व खेद व्यक्त केला की, छेडखानी चालू असताना आजूबाजूला इतके फोटोग्राफर्स होते; पण ते इतके गुंगून गेले होते की कुणीही मदतीला आलं नाही. तिनं लिहिलं तेव्हा बºयाच महिला असेच अनुभव सांगत व्यक्त झाल्या. रंगांच्या बौछारीत ही छेडछाड लक्षात येत नाही नि ते नेहमीचं झालेलं आहे. होळीत काही आत्मा राहिलेला नाही अशा वातावरणात परत आपल्याला होळी फोटोग्राफीतून सादर करायचीय तर तिची सेंद्रियता कशी जपता येईल नि होळीच्या मूळ भावनेपर्यंत कसं जाता येईल हा प्रश्न माझ्यापुढे होता. शिवाय डॉक्युमेंटरी फोटोग्राफरचं हे वैशिष्ट्यच असतं की दोन-तीन दिवसांत निवडलेल्या परिसराशी जुळवून घेत पटकन नि उत्स्फूर्तपणे तिथल्या गोष्टी बघायला सुरुवात करायची असते. काम पूर्ण करायचं असतं. त्यामुळं दडपण होतंच; पण माझ्या मदतीला भरपूर टीम होती. त्यांनी सहकार्य नि आत्मविश्वास दिला.
* मग?
तर वेगळं काय करूया असा विचार सुरू झाला व त्यातून थीम ठरली. उदयपूरमध्ये फुलांपासून सुरू होत नैसर्गिक रंगांपर्यंतचा प्रवास कसा होतो यावर संशोधन करून एक स्टोरी चार्ट बनवू हे ठरलं. त्यावेळी मला पहिल्यांदा आठवल्या बहिणाबाई चौधरी. मी त्यांचा एक किस्सा ऐकलेला की त्या गुलमोहराचं झाड लावत होत्या आणि त्यांच्या मुलानं, सोपानदेवनं त्यांना विचारलं की आई, फळंबिळं न देणारं गुलमोहराचं हे झाड तू का लावतेस? त्यांनी उत्तर दिलं होतं, उन्हाळ्यात जेव्हा निसर्ग अगदी शुष्क असतो तेव्हा झाड डोळ्यांना ‘उभारी’ देईल. हे आठवलं तेव्हा मी ठरवलं की आपण तिथून सुरुवात करायची. पळस अर्थात पलाश म्हणजे जंगलाची आग. कदाचित कधीतरी डोंगरदºयात फिरताना माणसांना रंगानं पेटलेलं हे झाड बघून रंगीत कपडे घालून स्वत:ला सजवण्याची, रंग उधळण्याची कल्पना सुचली असेल. उदयपूरमध्ये स्थानिक स्तरावर अशी फुलं गोळा करून एक विशिष्ट प्रक्रि या करत रंग बनतात. तेच पाहायचं होतं. फुलं गोळा करायला येणाºया बायकांना आम्ही कुठल्या सूचना दिल्या नव्हत्या, की कपडे अमुक घाला, नटून या, सजून या वगैरे. त्या जंगलात कशा जातात, झाडावर चढतात, फुलं तोडतात, कुटतात, शिजवतात, पाणी गाळून उरलेल्या मिश्रणात आरारोट मिसळतात हे टप्पे पाहिले. टिपले. दुसºया दिवशी उन्हात वाळून तयार झालेले खडूसारखे केक कुटले की हे सुंदर निसर्गरंग हातात येतात. ही होळीच की !
* हो, पण त्या बायका मॉडेल नव्हेत. बुजल्या नाहीत?
गंमतीशीर गोष्ट अशी की शूट संपल्यावर बायका हातात रंग घेऊन फिरत होत्या. मला कळेना. विचारलं तर म्हणाल्या, तुम्हाला रंग लावायचाय! शूटमध्ये सामील असणाºया टीमवर रंग उधळून त्यांनी आनंद साजरा केला. हे कनेक्शन कुठूनतरी या फोटोंमध्ये उतरलं नसतं तर नवल. आणखी इंटरेस्टिंग गोष्ट अशी की नाजूक फुलं काढण्यापासून अंतिम रंगांच्या टप्प्यापर्यंत एकाही फ्रेममध्ये तुम्हाला पुरुष दिसणार नाहीत. या व्यवसायात फक्त स्रियाच काम करतात. आम्ही त्यांच्या प्रक्रि येला फक्त फॉलो करत होतो. त्या बुजल्या केव्हा असत्या जर तुम्ही दहा मिनिटांसाठी फोटो काढायला गेला असतात ! चांगला फोटो मिळण्याचं रहस्य हे असतं की तुम्ही वेळ किती देताय ! कुठल्याही नवीन लोकेशनला गेल्यावर तुम्ही लगेच फोटो काढू नका. निरीक्षण करा, मिसळा... तासाभरानंतर लोक तुम्ही आहात हेच विसरून जातात नि त्यांच्या नैसर्गिक स्वभावानुसार वागायला लागतात मग फोटो मिळणं सुरू होतं.
* म्हणजे पठडीबाज होण्याचा धोका टाळता येतो तर!
बरेचसे फोटोग्राफर फोटोग्राफी सुरू कशी करतात? - तर ते कोणाचं तरी काम सोशल मीडियावर बघतात आणि त्यांना वाटतं की, कॅमेरा उचलावा. माणूस दिवसाला शेकडो फोटो सोशल मीडियावर पाहतो व त्याचे प्रभाव कुठंतरी मेंदूच्या कप्प्यांमध्ये साचून राहातात. ज्यावेळी तो तशाच ठिकाणी पोहोचतो त्यावेळी आधी बघितलेली फ्रेम नेणिवेत असते नि तीच त्याला समोरच्या दृश्यात दिसते. स्वत:चं असं काही दिसतंच नाही. म्हणून जी जागा कुणी फार वेगळ्या तºहेनं धुंडाळलेली नाही तिथं जावं. यातूनच, जिथले दगड, माती, गोटे, पाणी, गुरं, संस्कृती, माणसं यांच्याबाबतीत माझा मेंदू कोरा होता तिथलं माझं पाहणं व त्यातून झालेलं काम इतरांपेक्षा उठून आलं असू शकेल, कौतुकाला पात्र ठरू शकलं असेल.
* पण अशा अज्ञात जागा फोटोतून दाखवून तिथली सुंदर नैसर्गिक व्यवस्था बिघडण्याचा धोका?
तो आहेच, त्यामुळं जबाबदारी मोठीय. हंपीमध्ये मी जे फोटोग्राफर्ससाठी वर्कशॉप घेतले त्यात भारतभरातून पंधरा लोक उपस्थित होते. ज्या तºहेची हंपी आम्ही सोशल मीडियातून प्रसिद्ध करतोय त्यातून माणसांचा लोंढा वाढू शकतो हे कळलं होतं. मग आम्ही जबाबदारी म्हणून काय करू शकतो? हा विचार करत तिथल्या सानापूर तळ्यानजीकची साफसफाई आम्ही केली. वीस पोती कचरा व दारूच्या बाटल्या गोळा केल्या. अशी प्रतिक्रि या देता येऊ शकते ! त्याचा दोन्ही घटकांना फायदा होऊ शकतो. तंत्रज्ञानाचे फायदेतोटे असणार हे उघड आहे; पण तुम्ही कुठल्या बाजूला उभे आहात ते तुमच्या निर्णयातून कळतंच. जसं उदयपूरच्या होळीचं, की सण असून कुठलीही धार्मिकता न येता रंगांबद्दलच्या मूलभूत प्रेरणा नि उत्सव महत्त्वाचा ठरला!
...
मुलाखत : सोनाली नवांगुळ