इंदिरा गांधी : एका चैतन्यरूपाचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 06:01 AM2021-10-31T06:01:00+5:302021-10-31T06:05:02+5:30
इंदिरा गांधी ज्या विद्वेषाच्या बळी होत्या, तो विद्वेष आता बहुरूपी राक्षसाचे रूप घेऊन आपल्या सामाजिक- राजकीय जीवनात अराजकी थैमान घालतो आहे. इंदिरा गांधींची हत्या करून त्यांना इतिहासातून पुसून टाकायचे प्रयत्न मात्र फसले. आजही त्या चैतन्यरूपाने आपल्यात आहेत!
- कुमार केतकर
बरोबर ३७ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींची, त्यांच्या सुरक्षा जवानांकडून, सकाळी नऊच्या सुमारास हिंस्र हत्या झाली. भारतच नव्हे, तर अवघे जग या भीषण घटनेने हादरले. एखादा महावृक्ष उन्मळून पडल्यानंतर परिसरातील भूमी जशी भूकंपसदृश धक्का अनुभवते, तसे आपल्या देशाने अनुभवले. एका चैतन्यपर्वाचा हाहाकारी शेवट झाला. भारताच्या राजकारणाला तेव्हा जी अनपेक्षित कलाटणी मिळाली तिची आवर्तने आजही उमटत आहेत. इंदिरा गांधी ज्या विद्वेषाच्या बळी होत्या, तो विद्वेष आता बहुरूपी राक्षसाचे रूप घेऊन आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात अराजकीय थैमान घालतो आहे. वरवर पाहता या थैमानाचे भान आपल्याला येत नसले तरी समाजाच्या अंतरंगात जी कमालीची अस्वस्थता, असंतोष आणि अनिश्चितता दिसते आहे, ती त्या ३१ ऑक्टोबर १९८४ पासून सुरू झाली आहे!
ज्यांचा जन्मच १९८४ मध्ये झाला, ते आज ३७ वर्षांचे आहेत. त्यावर्षी जे ५-७ वर्षांचे होते ते आज चिळीशीच्या मध्यावर आहेत. त्यांच्यापैकी कुणीही इंदिरा गांधींना थेट पाहिलेले नाही, त्यांच्या विराट सभा चैतन्याने कशा रसरसलेल्या असत ते अनुभवलेले नाही, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने वातावरण कसे भारले जात असे हे अनुभवलेले नाही.
इंदिरा गांधींच्या काळात मोबाइल फोन नव्हता, इंटरनेट नव्हते, पर्सनल कॉम्प्युटर - आयपॅड - टॅब हे काहीही नव्हते, चराचरात व्हॉटसॲप व्यापून राहण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आजच्या व्हॉटसॲप पिढीला इंदिरा गांधी नावाची स्त्री-शक्ती जागतिक स्तरावर कसा प्रभाव टाकत असे, याचा अंदाज येणार नाही.
कृत्रिमरीत्या तसा प्रभाव टाकण्यासाठी आज जसे सध्याच्या पंतप्रधानांना पेट्रोल पंपांपासून ते व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटसपर्यंत आणि टेलिव्हिजनच्या नऊशे वाहिन्यांवरून सतत आपली छबी दिसावी म्हणून कोट्यवधी रुपये खर्चण्याची, ‘मन की बात’ सक्तीने सर्वांना ऐकायला/ पाहायला लावण्याची गरज भासते, तशी इंदिरा गांधींना भासली नाही. अर्थातच, तेव्हा हे माध्यम तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते आणि सर्व माध्यमे आपल्या दावणीला बांधण्याची गरज इंदिरा गांधींना नव्हती, वा तशी विकृत मनीषाही नव्हती!
रजनीकांत जसे चित्रपटातून अक्राळविक्राळ चाळे करून आपले अलौकिकत्व दाखवायचा प्रयत्न करतो, ते आपण राजकारणाच्या माध्यमातून करू शकतो, असे दाखवण्याचा सध्याच्या ‘मसीहा’चा हास्यास्पद प्रयत्न असतो. कधी मगरी- सुसरींशी पाण्यात झुंज दे, तर कधी वाघाचे दात मोज, कधी केदारनाथच्या गुहेत चष्मा लावून तपश्चर्या कर.. असे प्रयत्न इंदिरा गांधींना करावे लागले नाहीत. कारण त्यांचा प्रभाव त्यांच्या कर्तृत्वातून पडत असे, त्यांची प्रतिमा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रतीत होत असे आणि त्यांचे ममत्व दूरच्या जंगलातील आदिवासींना आणि अगदी आफ्रिकेतल्या एखाद्या लहान देशातल्या महिलेलाही भावत असे.
इंदिर गांधींचा तो प्रभाव पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विलक्षण विचारसामर्थ्यातून त्यांना प्राप्त झाला होता. तशी कीर्ती आणि प्रतिभा आपल्याला लाभत नाही म्हणून गेली सात वर्षे तमाम नेहरूतत्त्वाला आणि त्या ऐतिहासिक परंपरेला पुसून टाकण्याचा महाकाय प्रयत्न सध्या चालू आहे. नेहरूंचे तत्कालीन निवासस्थान असो वा त्यांनी उभारलेला नियोजन आयोग असो, इंदिरा गांधींच्या नावे असलेले जागतिक कीर्तीचे कलादालन असो वा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असो; ते सर्व जमीनदोस्त करून तेथे आपला ठसा उमटविण्याचा जो विध्वंसक उपक्रम सध्या सुरू आहे, त्यामुळे नेहरूंचा वा इंदिरा गांधींचा ऐतिहासिक ठसा पुसला जाईल हा मात्र भ्रम आहे. कारण आज अजून तरी देशाची एकात्मता, एकता आणि सार्वभौमत्त्व टिकून आहे, त्याचे श्रेय नेहरू-इंदिरा गांधींना आहे, हे अंतर्मनात सर्व जण जाणून आहेत. धुवाधार प्रचाराने तो वारसा उधळून टाकता येणार नाही.
इंदिरा गांधी नावाचे चैतन्यरूप कशामुळे तयार झाले? ते समजून घेण्यासाठी त्यांच्या जीवनप्रवासातील काही टप्प्यांचा वेध घ्यावा लागेल; परंतु हा स्मरणलेख म्हणजे त्यांचे चरित्र नव्हे, त्यामुळे त्यांचे बालपण, गांधीजींच्या अंगाखांद्यावर, स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यकर्त्या-नेत्यांच्या व्यापक परिवारात, अत्यंत चित्तथरारक अशा घटनांनी वेढलेल्या काळात, नंतर १९४२ च्या ‘चलेजाव’ चळवळीपर्यंत त्यांचे आयुष्य संस्कारित होत गेले. ‘चले जाव’च्या चळवळीच्या वेळेस त्या २५ वर्षांच्या होत्या. तेव्हासुद्धा नक्की स्वातंत्र्य केव्हा मिळेल याची निश्चिती नव्हती. फाळणी वा त्यानंतरच्या हत्याकांडाचा विषयच नव्हता. ‘चले जाव’ चळवळीने देशातले वातावरण पूर्णपणे भारलेले होते. त्यातील चैतन्याचे स्फुल्लिंग इंदिराजींच्या हृदयात रुजले. खरे म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या काळात सुमारे ११ वर्षे त्यांचे वडील, जवाहरलाल नेहरू तुरुंगात आणि आई कमला १९३६ पर्यंत प्रथम चळवळीत, नंतर आजाराने त्रस्त आणि मग मृत्युमुखी पडलेल्या! त्यामुळे इंदिरा गांधींना आई-वडिलांचा कौटुंबिक सहवास फारसा लाभलाच नाही; पण काँग्रेस हे त्यांचे महाकुटुंब होते आणि गांधींजींसारखे तेजस्वी आजोळ होते. असा परिसर लाभायला खरोखरच नियती प्रसन्न असावी लागते... असो.
फिरोज गांधींबरोबर विवाह झाला; पण त्यापाठोपाठच स्वातंत्र्य, फाळणी आणि हिंसाकांडाचा हाहाकार, नेहरू पंतप्रधानपदी नियुक्त झाले; पण हिंदू- मुस्लीम विद्वेष आणि दंग्यांच्या वणव्यातून देश बाहेर काढून त्यांना एक सार्वभौम, लोकशाही शिल्प उभे करायचे होते. स्वातंत्र्य चळवळीतील सहकारी होते; पण काँग्रेस म्हणजे एक कारवाँ होता. त्यात सर्व धर्मांचे, जातींचे, पंथांचे, विविध विचारसरणी मानणारे, डावे, उजवे, मध्यममार्गी, जहाल, मवाळ, स्त्रिया या सर्वांना बरोबर घेऊन कारवाँ पुढे न्यायचा होता.
इंदिरा गांधींनी काही वर्षांनीच वडिलांना सचिव-सदृश कामात मदत करण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासात राहायचा निर्णय घेतला. त्यापूर्वी त्यांना राजीव आणि संजय, असे दोन पुत्र झाले होते. मुलांचे संगोपन करत करतच नेहरूंनाही विविध प्रकारची मदत करायची जबाबदारी त्यांनी अंगावर घेतली.
आज नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांंना त्या कुटुंबाचे झंझावाती आयुष्यच माहीत नाही. कोणकोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले याचा अंदाज नाही. फाळणीनंतरच्या हिंदू-मुस्लीम विद्वेषानंतर समाजात शांतता प्रस्थापित करायची होती. अर्थव्यवस्था उभी करायची होती. दुसऱ्या महायुद्धानंतर विस्कटलेले जग अजून सावरलेले नव्हते. युरोप आणि मुख्यत: रशिया बव्हंशी बेचिराख झाले होते. सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धाला सुरुवात झाली होती. आफ्रिकेतील आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देश साम्राज्याच्या शृंखलांमध्ये अडकलेले होते. आफ्रिकेतल्या वंशवादी वर्णद्वेषाला गोऱ्या युरोपियन राष्ट्रांचा पाठिंबा होता. चीनमध्ये १९४९ मध्ये क्रांती होऊन तो देश माओंच्या नेतृत्वाखाली संघटित होत होता. जगातील सर्व देशांमधली जनता नेहरूंकडे आदर्श म्हणून पाहत होती. नेहरूंकडे तिसऱ्या जगाचे नेतृत्व असे आपणहून चालत आले. त्यासाठी त्यांना सारखे विविध देशांना भेटी देऊन तेथील नेत्यांचे लांगूलचालन करावे लागले नाही.
इंदिरा गांधी या सर्व काळात नेहरूंच्या बरोबर असल्याने जगातील सर्व राष्ट्रप्रमुख, लेखक, विचारवंत, चित्रकार, शिल्पकार यांच्या संपर्कात आल्या. त्यांचे राजकीय आणि सांस्कृतिक विश्व आणि संवेदना विस्तारल्या त्या नेहरूंबरोबरच्या त्या काळातील वास्तव्यामुळे. नेहरूंचे संबंध आइन्स्टाइनपासून चार्ली चॅप्लीनपर्यंत आणि बर्नार्ड शॉपासून ते बट्राँड रसेल यांच्यापर्यंत होते. त्या सर्वांना महात्मा गांधींबद्दल प्रचंड आदर होता आणि नेहरूंबद्दल मैत्रीपूर्ण आस्था होती. जर वारशाने इंदिरा गांधींकडे काही आले असेलच, तर तो वारसा हा आहे; सत्तेचा नाही. मात्र, ज्यांना सत्ता आणि मतलबी धर्मश्रद्धा यापलीकडे काही दिसू शकत नाही, त्यांना असे मूर्खपणाने वाटते की, नेहरू कुटुंबाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा पुसून टाकता येईल.
नेहरूंच्या निधनानंतर (१९६४) इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या नाहीत. काँग्रेस पक्षाने लालबहादूर शास्त्रींची निवड केली. जर नेहरूंनी लिहून ठेवले असते की, ‘माझ्यानंतर इंदिरा गांधींना पंतप्रधान करावे’ तर घराणेशाहीचा आरोप तथ्यपूर्ण झाला असता; परंतु नेहरूंनी पंतप्रधान असतानाच शास्त्रींना क्रमांक दोनचे स्थान देऊन त्यांचे ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व मान्य केलेले होते. असो.
शास्त्रींच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधींनी यावे ही विनंती त्यांनी केल्यानंतर त्या तेथे माहिती व नभोवाणी खात्याच्या मंत्री म्हणून रूजू झाल्या. १९६६ मध्ये शास्त्रीजींचे अकस्मात निधन झाले नसते तर पुन्हा पक्षांतर्गत निवडणुका घ्यायचा प्रश्नच आला नसता आणि इंदिरा गांधी पंतप्रधान तेव्हा झाल्या नसत्या. मग १९६७ च्या निवडणुका स्वाभाविकच शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली झाल्या असत्या आणि काँग्रेस पुन्हा निवडूनही आली असती. परंतु १९६७ च्या निवडणुका इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली झाल्या. काँग्रेस सत्तेत आली पण क्षीण बहुमताने. राम मनोहर लोहियांनी इंदिरा गांधींचे वर्णन ‘गुंगी गुडिया’ असे केले होते. १९६७ मध्ये देशातील १६ पैकी आठ राज्यात काँग्रेसचा पराभव झाला. त्या पराभवाचा अर्थ आणि अन्वयार्थ लावून इंदिरा गांधींनी पक्षांतर्गत बंडसदृश परिवर्तन सुरू केले. परिणामी १९६९ मध्ये पक्षात फुट पडली. कारण इंदिरा गांधींनी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, राजेरजवाड्यांचे तनखे रद्द केले, शेतकरी-शेतमजूरांच्या भल्याच्या जमीन सुधारणा सुरू केल्या. पुढे १९७१ ची ‘गरीबी हटाओ’ ही त्यांची घोषणा त्या आर्थिक सुधारणांमधून आली.
इंदिरा गांधींनी त्यांच्या विरोधकांचा पाडाव करुन देशातील विचारपध्दतीलाच कलाटणी दिली. त्याचवर्षी म्हणजे 1971 च्या अखेरीस बांगला देश मुक्ती संग्राम सुरु झाला. इंदिरा गांधींनी मुजीबुर रहमान यांना पुर्ण पाठिंबा दिला. पाकिस्तानची फाळणी झाली. धर्माच्या आधारावर देश उभा राहु शकत नाही, हे इतिहासाने सिध्द केले.
इंदिरा गांधींचा हा विजय त्यांच्या देशांतर्गत विरोधकांना आणि इंग्लंड अमेरिकेला मानवणारा नव्हता. त्यांचा लष्करी आणि राजकीय तळ म्हणजे पाकिस्तान नामोहरम झाला होता. त्याचा सूड म्हणून इंदिराविरोधी जे अराजकी तांडव उभे झाले; त्याला इंग्लंड-अमेरिकेचा पाठिंबा होता. मदतही होती. आणीबाणीची ही पार्श्वभूमी आहे पण या लेखाचा विषय तो नाही.
इंदिरा गांधींची हत्या करून त्यांना इतिहासातून पुसून टाकायचा तो प्रयत्न फसला. आजही त्या चैतन्यरूपाने आपल्यात आहेत.
(ज्येष्ठ पत्रकार, राज्यसभा खासदार)