अभिनव फार्मर्स क्लब
By Admin | Published: July 10, 2016 10:01 AM2016-07-10T10:01:35+5:302016-07-10T10:01:35+5:30
अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातून थेट ग्राहकांना भाजीपाल्यासह धान्य, फळे आणि दूधही पुरविण्याची व्यवस्था सुरळीत यंत्रणेसह चालू आहे.
style="text-align: justify;">
राजानंद मोरे -
मोबाइल अॅपवरून भाजी
भाजीपाला उत्पादक
शेतकऱ्यांचा क्लब आणि
शहरातील निवासी संकुले
यांच्या सहभागाने ग्राहकांच्या दारात
भाजीपाला पोचू लागला.
मग फळे आणि दुधाचाही
पुरवठा सुरू झाला.
या यंत्रणेत आता महिला बचतगटही
सहभागी झाले आहेत...
मुळशी तालुक्यातील माण हे तसं छोटंसं गाव. या गावात सुरू झाला अभिनव फार्मर्स क्लब. महाराष्ट्रासह देशभरात एक लाखाहून अधिक शेतकरी सदस्य असलेला हा क्लब. या क्लबच्या माध्यमातून थेट ग्राहकांना भाजीपाल्यासह धान्य, फळे आणि दूधही पुरविण्याची व्यवस्था सुरळीत यंत्रणेसह चालू आहे.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या शेतमालासाठी विक्रीची व्यवस्था उभी करण्याची ही कल्पना ज्ञानेश्वर बोडके यांची. सध्या तेच या ग्रुपचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी १९९८ मध्ये नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कर्ज घेऊन पॉलिहाऊसमधील फुलशेतीला सुरुवात केली. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. हे पाहून याच गावातील काही शेतकऱ्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधत फुलशेती सुरू केली. त्यांना रग्गड उत्पन्न मिळू लागले. सर्वांचा आत्मविश्वास दुणावला. नियोजनबद्ध मार्केटिंगचा निर्णय झाला आणि यातूनच २००० मध्ये अभिनव फार्मर्स क्लबची सुरुवात झाली. नाबार्डकडे नोंदणी करण्यात आली. त्यावेळी माण आणि परिसरातील काही गावांतील १७ शेतकरी या गटात आले. दुसऱ्याच वर्षी या गटात ३०० हून अधिक शेतकरी सहभागी झाले.
फुलशेती वाढत गेली. आर्थिक परिस्थिती सुधारली. पण काही वर्षांनी फुलशेतीचा खर्च वाढल्याने ती टप्प्याटप्याने बंद करून भाजीपाला विक्रीचा निर्णय झाला. २००४ साली सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी १०-१२ शेतकरी पुढे आले.
सुरुवातीला दररोज निघालेला माल टेम्पोने बाजार समितीत नेण्यात येत होता. लागवड ते विक्रीपर्यंत झालेल्या खर्चाची सर्व नोंद ठेवली जात होती. त्याचा विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नाशी कधीच ताळमेळ बसला नाही. गणित सतत तोट्यातच जाई. हे लक्षात आल्यानंतर भाजीपाला बाजार समितीत न पाठवता थेट ग्राहकांपर्यंत न्यायचे ठरले. त्यासाठी नाबार्डने मदतीचा हात दिला. पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावरील नाबार्डच्या सोसायटीमध्ये माल विकण्याची परवानगी मिळाली. तिथे चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्याचवेळी शहर व परिसरातील इतर सोसायट्यांमध्ये चाचपणी सुरू झाली. एक-एक सोसायटी जोडली जाऊ लागली. पण महिला भाज्या निवडून घेत असल्याचे आढळले. त्यामुळे पॅकिंगमधून भाज्या देण्याची कल्पना पुढे आली. त्यालाही चांगलाच प्रतिसाद मिळाला.
‘अभिनव’च्या थेट ग्राहकांपर्यंतच्या कल्पनेने पाय रोवायला सुरुवात केली. ग्राहकांनाही त्याची भुरळ पडली. केवळ भाजीपाल्यावर न थांबता फळे, धान्य आणि दूध विक्रीलाही सुरुवात करण्यात आली. पण हे काम फक्त शेतकऱ्यांना शक्य होत नसल्याने आता त्यासाठी ठिकठिकाणच्या महिला बचतगटांची मदत घेतली जात आहे. त्यांना पैसे मिळू लागल्याने त्यांनी आनंदाने काम स्वीकारले. सुरुवात झाली तेव्हा काही सोसायट्यांमधून चांगली वागणूक मिळाली नाही. पोलिसांकडून कारवाई होत होती. बाजार समितीकडून भीती दाखविली जात होती. पण त्यावेळी कृषी विभागाकडून विक्रीबाबतचे पत्र मिळाले. त्यामुळे आधार मिळाला.
सध्या प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊनच भाजीपाल्याचा टेम्पो उभा केला जातो. कुठेही रस्त्यावर उभे राहून भाजी विक्री होत नाही. सोसायट्यांना वेळा आणि दिवस ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकांकडून मागणी केली जाते. आज पुणे जिल्ह्यात सुमारे अडीच हजार शेतकरी आणि ११२ महिला बचतगट ‘अभिनव’शी संलग्न आहेत. केवळ पुणे जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि परराज्यातही ‘अभिनव’ने थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहचविण्याची जणू चळवळच उभी केली आहे. चांगल्या मालाच्या निवडीपासून त्याचे पॅकिंग, वाहतूक, ग्राहकांशी संपर्क यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामध्ये एकही मध्यस्थ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव आणि ग्राहकांनाही रास्त दरात भाजीपाला उपलब्ध झाला आहे. पण हे केवळ एका शेतकऱ्याने उभे केलेले नाही. शेतकऱ्यांच्या संघटनातून ‘शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत’ ही कल्पना रुजू लागली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या नियमनातून मिळालेली मुक्ती शेतकऱ्यांसाठी आर्थिक शोषणातून मुक्तीची दारे खुली करणारी ठरली आहे.
‘अभिनव क्लब’ सारखे यश मिळवायचे असेल तर त्यासाठी गरज आहे ती एकत्र येऊन काम अन् सक्षम यंत्रणा उभी करण्याची.
संधी आणि प्रयत्न
नियमनमुक्ती ही शेतकऱ्यांसाठी खूप चांगली संधी आहे. सध्या एकत्र येऊन थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहचवणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. थेट हातात ताजा भाजीपाला मिळावा, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी यामध्ये उतरतील, तेवढे ग्राहकही प्रतिसाद देतील. त्यासाठी गटागटाने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन व्यवस्था निर्माण करायला हवी. त्यासाठी इतर कुणाकडून अपेक्षा करण्याची गरज नाही. ग्राहकांशी प्रामाणिक राहून काम केल्यास शेतकऱ्यांचे केवळ हितच होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे बाजार समित्यांमध्ये होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी पुढे यायला हवे. ही काळची गरज आहे.
- ज्ञानेश्वर बोडके
प्रमुख, अभिनव फार्मर्स क्लब
व्हॉइस एसएमएस आणि अॅपवरून खरेदी...
अभिनव क्लबने सुरुवातीला आयआयटी, पवई यांच्याकडून भाजीपाल्याच्या नोंदणीसाठी व्हॉइस एसएमएसचे तंत्रज्ञान विकसित करून घेतले. त्याद्वारे ते ग्राहकांकडून भाज्यांची मागणी घेत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘अभिनव’ नावाचे मोबाइल अॅप सुरू केले आहे. या अॅपवर आपल्याला कोणत्या व किती भाज्या हव्या आहेत याची माहिती टाकल्यानंतर त्या भाज्या घरपोच दिल्या जातात. याला आता प्रतिसाद वाढत चालला आहे.