मादाम तुसाद प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा

By admin | Published: April 23, 2016 01:32 PM2016-04-23T13:32:50+5:302016-04-23T13:32:50+5:30

प्रतिकृती. हुबेहूब. इतकी की तीच जास्त जिवंत वाटावी.. ज्याची प्रतिकृती तोच माणूस शेजारी उभा राहिला, तर त्याला स्वत:लाही ओळखता येऊ नये, की कोण असली आणि कोण नकली! असंच काही अगम्य आणि अद्भुत काम गेल्या दोन शतकांपासून अविरत सुरू आहे. शेकडो जगप्रसिद्ध व्यक्ती, जगद्विख्यात नेते, नामवंत खेळाडू अन् मनोरंजन विश्वातले आघाडीचे कलावंत अशा हुबेहूब अन् जिवंत वाटणा:या प्रतिकृतींच्या रूपात उभे आहेत.. मेणाच्या माणसांचं हे कुटुंब कसं आकाराला आलं?

Insatiable images from Madam Tussaud's realization | मादाम तुसाद प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा

मादाम तुसाद प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा

Next
>जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात मोदी यांची मेणाची छबी असेल  आणि त्यांच्या शेजारी उभं राहून कुणालाही फोटो काढता येईल. त्यानिमित्त..
 
- प्रतिनिधी
 
एक अशी दुनिया जिथं स्टार्स जन्म घेत नाहीत, तर निर्माण केले जातात.. 
एक अशी दुनिया जिथं सेलिब्रिटी लोकांच्या सहवासात अविरत असतात.. 
अशी दुनिया जिथं शेकडो वर्षापूर्वीचं तंत्रज्ञान वापरून हुबेहूब माणूस तयार केला जातो.. मेणाचा माणूस. ज्याच्यासमोर उभं राहिलं की वाटावं हा आत्ता आपल्याशी गप्पा मारेल.. अशी जिवंत दुनिया.. मेणाची जिवंत दुनिया..
दोनशे वर्षापासून मादाम तुसाद नावाची दुनिया जगाला भुरळ घालतेय.. 
मादाम तुसाद यांचं हे मेणाचं कुटुंब. ज्यात जगातली जवळपास प्रत्येक सुप्रसिद्ध व्यक्ती आहे आणि त्यात दिवसेंदिवस भर पडतच जातेय. मेणाच्या कुटुंबातली सदस्यसंख्या वाढतच जातेय. हे कुटुंब अविरत वाढतंय.  इतकं की जगातल्या जवळपास सा:याच खंडांमध्ये जाऊन विसावलंय आणि तिथल्या गळ्यातलं ताईतही बनलंय. या कुटुंबात प्रत्येकाला सहभागी व्हावंसं वाटतंय आणि यात आपण असलो म्हणजे आपल्याभोवती असणा:या प्रसिद्धीच्या वलयाला आणखी मोठं लौकिक मिळेल, अशी प्रत्येक सेलिब्रिटीची इच्छा असते. 
मादाम तुसाद यांचं हे मेणाचं कुटुंब. 
या कुटुंबाचं मूळ मात्र आहे एका स्वीस माणसाच्या घरात. स्वीत्झर्लॅडच्या बेर्न या छोटय़ा शहरात तो राहायचा. तो होता डॉ. फिलिप कर्टियस. पेशानं वैद्य. पण कलेची मोठी आवड असणारा. चित्र काढायचा. वेगवेगळ्या कलाकृती तयार करायचा. कधी कधी घरात बसून मेणाचे पुतळे बनवायचा. असे अनेक छंद त्याला होते. 
त्या काळी मेणाचे पुतळे वैद्यकीय शिक्षणासाठी वापरले जायचे. डॉ. फिलिप यांनी मेणाचे पुतळे बनविण्यात प्रावीण्य मिळवलं आणि त्यावर अधिकाधिक काम करायला सुरुवात केली. 
या फिलिपच्या घरात एक मोलकरीण होती. मोलकरणीची लेक मेरी ग्रोशोल्ज त्याच घरात तिच्यासोबत राहायची. ही मेरी होती मोठी हुशार. कोणतीही गोष्ट लगेच आत्मसात करायची. 
डॉ. फिलिप मेणाचे पुतळे बनवायचे, तेव्हा ही मेरी त्यांच्या अवतीभोवती असायची. त्यांना छोटी मोठी मदत करायची. हे करता करताच तिलाही मेणाचे पुतळे बनविण्याच्या कलेचा छंद लागला. फिलिप यांनीही तिला यात पारंगत करायचं ठरवलं. पुढे स्वत:चं कौशल्य आणि कल्पकतेच्या जोरावर या मेरीनं खूप मोठं काम केलं. अनेक थोर व्यक्तींचे मेणाचे हुबेहूब पुतळे या दोघांनी बनविले आणि प्रदर्शनात मांडले. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत गेला. 
त्या काळात चित्रपट बघायची किंवा आपल्या आवडत्या कलावंतांना सारखं पाहण्यासाठी टेलिव्हिजनसारखी सोय नव्हती. त्यामुळे आपले आवडते चेहरे पाहायचे म्हणून लोक या हुबेहूब दिसणा:या मेणाच्या पुतळ्यांकडे बघून समाधान मानायचे. दुधावरची तहान ताकावर भागवायचे. (परिस्थिती अजूनही बदललेली नाही. लोक अजूनही मेणाच्या पुतळ्यांना बघून आवडत्या व्यक्तीच्या जवळ असल्याच्या आभासात आनंदी होतात.) 
तोच आनंद द्विगुणित करण्यासाठी लोक मेरीच्या प्रदर्शनाला गर्दी करत. 
त्याच काळात तिचं काम पाहून फ्रान्सच्या राजघराण्याच्या थोर व्यक्तींच्या प्रतिमा तयार करण्याचं काम तिला मिळालं. पण हे काम इतकं भयंकर होतं की तिला त्यासाठी मुडद्यांचे ढीग उपसून ओळखीचे चेहरे बाहेर काढावे लागत आणि त्यांची प्रतिमा तयार करावी लागे. फ्रेंच राज्यक्रांतीचा काळ असावा तो. 
त्यानंतर मात्र या मेरीला एका अघोरी संकटातून जावं लागलं. राज्यक्रांतीनंतर अराजक माजलं. त्यात तिला आणि तिचे गुरू डॉ. कर्टिस यांना तुरुंगात डांबण्यात आलं. कारण काय, तर त्यांचे फ्रान्सच्या राजघराण्यासोबत काही काळ संबंध होते. हा काळ इतका भयंकर होता की, त्यात या दोघांनाही मृत्युदंड होणार होता. त्यासाठी मेरीच्या डोक्यावरचे केसही काढण्यात आले होते आणि तिची मान छाटली जाणार होती. त्यात डॉ. कर्टिस गेले आणि मेरी कशीबशी सुटली. तिला ओळखणा:या एका माणसानं सोडवलं. कर्टिसनं जाता जाता एक काम केलं होतं. आपली सगळी संपत्ती त्यानं मेरीच्या नावानं करून टाकली. 
मेरीला मेणाचे पुतळे बनविण्याचं तंत्र, त्यासाठीचं साहित्य आणि जागाही मिळाली होती. पण, अराजकाच्या स्थितीला कंटाळून ती हे सारं सोडून युरोपात गेली. कुठंतरी स्थायिक व्हायचं, आपलं बस्तान बसवायचं म्हणून ती गावोगाव हिंडत होती. पोट्रेट तयार करायची आणि जागा मिळेल आणि पैसा मिळेल तिथे प्रदर्शन लावायचं. पण त्यातून पैसा मिळेनासा झाला आणि ती पुन्हा मेणाचे पुतळे बनवण्याकडे वळाली. 
त्याच काळात मेरीचं फ्रँकॉइस तुसाद नावाच्या व्यक्तीशी लग्न झालं आणि तिचं नाव तिनं बदललं. ते होतं मादाम तुसाद. आजचं वॅक्स म्युझियम तिच्या याच नावानं जगप्रसिद्ध आहे.
या म्युझियमची सुरुवात झाली लंडनपासून. मेरीची वाट इथेही सोपी नव्हतीच. यात अनेक संकटं आली. कधी तिच्या संग्रहालयाला आग लागली, तर कधी त्यावर बॉम्ब टाकले गेले. पण मादाम तुसाद डगमगली नाही. तिनं तिचं काम अविरत सुरू ठेवलं. जसं जमेल तसं इतरांना आपलं ज्ञान ती वाटत राहिली आणि अनेक कारागीर तिनं तयार केले. 
हे काम इतकं भव्य होतं की तिच्याच नावाचं एक संग्रहालय लंडनच्या बेकर स्ट्रिटवर सुरू झालं. त्याच जागेवर मादाम तुसादनं आधी काही खोल्या भाडय़ानं घेऊन आपलं काम सुरू ठेवलं होतं. तीच जागा आता मोठय़ा संग्रहालयानं घेतली आहे. 
मादाम तुसाद यांच्या कुटुंबाचा हा पसारा आता एवढा वाढलाय की, जगभरात 21 ठिकाणी त्यांच्या नावाची वॅक्स म्युझियम्स आहेत. 
.. कुठे जगप्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आपल्या असण्याची छाप सोडताहेत, तर कुठे जुन्या काळातले राजे. हिटलर आणि चर्चिल यांच्यासारखे गेल्या शतकातले प्रसिद्ध लोकही आहेत. काही ठिकाणी जगप्रसिद्ध नटनटय़ा आहेत, तर कुठे खेळातल्या छानशा पोजमध्ये खेळाडू उभे आहेत. काही ठिकाणी आताच्या अॅनिमेशन चित्रपटांतील लोकप्रिय पात्रंही उभी आहेत, तर काही ठिकाणी खरेखुरे वाटावे असे नेतेही आहेत. 
गेल्यावर्षी काही दिवसांसाठी अमेरिकेत असताना मी लास वेगास येथे असणा:या मादाम तुसाद संग्रहालयाला भेट दिली होती. तिथं तर हॉलिवूड कलावंत आणि हॉलिवूड चित्रपटांतील काल्पनिक पात्र आणि क्रीडा जगतात सुवर्णाक्षरात नाव कोरलेले दिग्गज खेळाडू अगदी हुबेहूब पाहायला मिळाले होते. लिओनार्डो डिकॅप्रिओ, लेडी गागा, मुहम्मद अली, टायगर वूड्स यांच्यासह द हंक, स्पायडर मॅन अशी पात्रं आजूबाजूला पाहून आपण खरंच कोणत्या दुनियेत आहोत याबाबत आश्चर्य वाटायला लागतं. बाजूला उभा असलेला माणूस खरा कोणता आणि मेणाचा कोणता हेही ओळखणं कठीण जात होतं. आणि तिथल्या कोणत्याही पुतळ्यासोबत उभं राहून, कोणत्याही मुद्रेत फोटो काढायची पूर्ण मुभा असते. 
पण हे सारं मेणाचं विश्व तयार करणं सोप्पं काम नाही. डॉ. कर्टिस आणि त्यानंतर मादाम तुसाद यांनी सुरू केलेली ही मेणाच्या पुतळ्यांची परंपरा आजतागायत त्याच तंत्रज्ञानाच्या आधारावर सुरू आहे. सुरुवातीला ज्या व्यक्तीचा पुतळा बनवायचाय त्याचं मोजमाप घेतलं जातं. आता नवीन तंत्रज्ञानानुसार त्या व्यक्तीचे वेगवेगळ्या अँगलनं जवळपास 150 ते 20 फोटोही घेतले जातात. (पूर्वी या व्यक्तींची वेगळ्या कोनातून पोट्रेट तयार केली जात.) त्यावरून त्या व्यक्तीचा सुरुवाताला मातीचा पुतळा बनविला जातो आणि त्यानंतर त्याचा साचा तयार होतो. त्या साच्यात पातळ मेण भरून त्याचा मेणाचा पुतळा बनवतात. खरी कसरत यानंतर सुरू होते. हुबेहूब भाव, हुबेहूब डोळे, हातावरील, डोक्यावरील केस, दाढी, भुवया, ओठ, पापण्या अशा अनेक बारीक गोष्टींपासून ते हातापायांच्या नखांर्पयत सारं काही ‘ओरिजनल’, अस्सल वाटावं याची काळजी घेतली जाते. एवढंच नाही, तर ज्या व्यक्तीचा पुतळा बनवायचा आहे, त्याची प्रसिद्ध स्टाइल कोणती तेही ध्यानात घेतलं जातं. 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीतही असाच अभ्यास करून पुतळा तयार करण्यात आला आहे. क्रीम रंगाचा कुर्ता घालून नमस्कार करताहेत अशा मुद्रेत मोदी यांचे मेणाचे पुतळे लंडन, सिंगापूर, हाँगकाँग आणि बँकॉक येथील संग्रहालयांत पाहायला मिळणार आहेत. मादाम तुसाद यांच्या मेणाच्या कुटुंबात मोदी यांचा समावेश व्हावा यासाठी स्वत: मोदी यांना काही तास मोजमापासाठी द्यावे लागले होते. त्यानंतरची कसरत असते ती कारागिरांची.  मोदी यांच्या पुतळ्यावर 20 हून अधिक कारागिरांनी जवळपास चार महिने काम केल्याचं सांगतात. म्हणजे प्रत्यक्ष मोजमापाआधी मोदी यांच्या फोटोवरून कामाचा मूळ ढाचा बनवायला सुरुवातही झाली असणार.
हे कुटुंब वाढत वाढत आता भारतात येऊ घातलंय. पुढच्या वर्षी मादाम तुसाद कुटुंबाचं एक घर कदाचित दिल्लीत असेल आणि त्यात बॉलिवूड, क्रीडा, राजकारण आणि उद्योग क्षेत्रतील दिग्गजांच्या हुबेहूब प्रतिमा असतील. प्रतीक्षा या कुटुंबाची आहे. 
 
 
मेणाचाच वापर का?
मेणाचा पुतळा बनवणं अवघड असलं तरी त्याचा वापर गेल्या दोन शतकांपासून सुरू आहे. कारण, मेणाला माणसाच्या शरीरासारखा रंग देणं शक्य होतं; शिवाय त्यात माणसाच्या शरीरावर दिसणा:या शिरा, सुरकुत्यांपासून ते डागांर्पयत सा:याच गोष्टी सहज तयार करता येतात. त्यामुळं मेण हेच माध्यम आजही कायम आहे.
 
400 हून अधिक जगप्रसिद्ध व्यक्तींचे पुतळे आतार्पयत बनविण्यात आले असून, ते मादाम तुसादच्या वेगवेगळ्या संग्रहालयांत प्रदर्शनात मांडण्यात आलेले आहेत. 
 
239 वर्षापासून मेणाचे पुतळे बनविण्याची ही परंपरा सुरू आहे. 
 
25 लाखांहून अधिक पर्यटक मादाम तुसाद यांच्या जगभरातील म्युझियमला दरवर्षी भेट देत असतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे.
 
मेणाचा एक पुतळा बनवण्यासाठी 1.5 कोटी रुपयांचा खर्च येतो.
 
1088 किलो मेण लागते.
 
04 महिने एक पुतळा बनविण्यासाठी सहज लागतात. 
 
20 कारागीर एक पुतळा तयार करण्यासाठी  अखंड झटत असतात. 
 
बनवताना प्रत्येक पुतळ्याचा आकार 2 टक्के अधिक असतो. कारण, मेण कालांतराने आकुंचन पावते. ज्यामुळे नंतर पाहणा:याला पुतळ्यात फरक जाणवत नाही. 
 
1777 साली मादाम तुसाद (त्यावेळी मेरी ग्रोशोल्ज) यांनी पहिला मेणाचा पुतळा बनविला. तो होता फ्रान्सचे तत्त्वज्ञ आणि प्रसिद्ध लेखक व्होल्टेअर यांचा. त्यानंतर तिनं जॅक्स रोसेयू यांचा आणि बेंजामिन फ्रँकलिन यांचाही पुतळा बनविला. 
 
1795 साली मेरी ग्रोशोल्जचं फ्रँकॉइस तुसाद सोबत लग्न झालं आणि मेरीची मादाम तुसाद झाली. 

Web Title: Insatiable images from Madam Tussaud's realization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.