कायाकल्प योजनेच्या माध्यमातून मालेगावी नागरी आरोग्य केंद्रांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 01:53 PM2023-03-17T13:53:42+5:302023-03-17T13:53:58+5:30
कायाकल्प योजनेच्या माध्यमातून मनपा क्षेत्रातील १४ आरोग्य नागरी केंद्रांची गुणांकन तपासणी प्रक्रिया राबविण्यात आली.
अतुल शेवाळे
मालेगाव : कायाकल्प योजनेच्या माध्यमातून मनपा क्षेत्रातील १४ आरोग्य नागरी केंद्रांची गुणांकन तपासणी प्रक्रिया राबविण्यात आली. ही योजना मनपा आरोग्य अधिकारी सायका अन्सारी यांच्या मार्गदशनाखाली गेल्या तीन दिवसांपासून गट पद्धतीने भेट देत तपासणी सुरू आहे. शहरातील नागरी आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या सोयीसुविधांचा आढावा व तपासणी केली जाते.
या केंद्रामध्ये असलेल्या आरोग्यविषयक सुविधांची तपासणी प्रक्रियेत नागरी आरोग्य केंद्रातील रजिस्टर, आरोग्यविषयक तक्ते, डिफ्रीजर आयएलआर, स्वछता, हँड वॉश, लॅब, इन्फेक्शन कॅट्रोल रजिस्टर, परिसरातील स्वच्छता आदी गोष्टी तपासून त्यांचे गुणांकन सिद्ध करून ज्या आरोग्य केंद्रात सुखसुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध आहेत, अशा केंद्रांना आरोग्य विभागामार्फत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस व रोख रक्कम देत गौरविण्यात येणार आहे. या बक्षिसासाठी नागरी केंद्रामध्ये चढाओढ निर्माण झालेली पाहायला मिळाली. सजावट करणे, रांगोळी काढणे, रजिस्टर टापटीप असणे या गोष्टी नागरी केंद्रामध्ये प्रत्यक्ष दिसून आल्या.
यामध्ये प्रथम बक्षीस दोन लाख रुपये, द्वितीय दीड लाख रुपये, तृतीय पन्नास हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये मालेगावातील तीन दिवसांत सर्व नागरी आरोग्य तपासणी करीत शेवटी आयेशानगर नागरी आरोग्य केंद्राची तपासणी करून कायाकल्प योजनेचा समारोप करण्यात आला. शहरातील नागरी आरोग्य केंद्रांची प्रतवारी व कामाचा दर्जा ठरविता येणार आहे. या गुणांकन तपासणीचे प्रमुख अधिकारी सिटी प्रोग्राम मॅनेजर, नाशिक डॉ. शैलेश लोंढे, राकेश थेटे, जयश्री आहेर, वैद्यकीय अधिकारी खालदा रफत आदी उपस्थित होते. योजनेला यशस्वी करण्यासाठी सर्व नागरी आरोग्य केंद्रांच्या सर्व वैद्यकीय अधिकारी, जीएनएम, एएनएम फार्मसिस्ट, शिपाई या सर्वांनी सहकार्य दाखवत गुणांकन तपासणी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.