नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी प्रवास..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 06:02 AM2021-09-19T06:02:00+5:302021-09-19T06:05:05+5:30
एक छोटा उद्योजक ते मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे देशातील प्रमुख उत्पादक; हा हर्ष मारीवाला यांचा प्रवास सर्वसामान्य आणि नवउद्योजकांना प्रेरणा देणारा आहे.
- मेहा शर्मा
हर्ष मारीवाला हे ‘मॅरिको’ या प्रथितयश कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष. छोट्या कौटुंबिक उद्योगाद्वारे सुरुवात करताना एका प्रमुख भारतीय बहुराष्ट्रीय उपभोक्ता वस्तू उत्पादक कंपन्यांचं साम्राज्य त्यांनी उभं केलं. आशिया आणि आफ्रिका खंडातील २५ पेक्षाही जास्त देशांमध्ये आज त्यांची उत्पादनं पोहोचली आहेत. आरोग्य, सौंदर्य आणि लोकोपयोगी वस्तूंच्या अनेक क्षेत्रात त्यांची उत्पादनं प्रसिद्ध आहेत. ‘हर्ष रिॲलिटिज, द मेकिंग ऑफ मॅरिको’ नावाचं एक पुस्तक त्यांनी नुकतंच लिहिलं आहे. मॅनेजमेंट गुरू राम चरण हे या पुस्तकाचे सहलेखक आहेत. आपल्या कौटुंबिक उद्योगाचा आलेख त्यांनी कसा उंचावत नेला, त्यात त्यांना काय काय अडचणी आल्या, त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला, याची माहिती तर त्यातून मिळतेच, पण स्वातंत्र्योत्तर भारताची प्रगती कशी होत गेली, याचीही एक रुपरेखा त्यातून आपल्या नजरेसमोरुन झरझर सरकत जाते. छोट्या ग्राहकोपयोगी वस्तू ते नव्या जगातील यशोदायी, यशस्वी कॉपोर्रेट कंपन्यांच्या उभारणीपर्यंत भारताची वाटचाल यातून प्रतित होते.
एक छोटा उद्योजक ते एफएमसीजी (फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुडस) - मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे देशातील प्रमुख उत्पादक; हा त्यांचा प्रवास सर्वसामान्य आणि नवउद्योजकांना प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या कौटुंबिक उद्योगात कोणीही व्यावसायिक अनुभवी व्यक्ती नसतानाही नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या सहकार्याने हा उद्योग चालवला जात होता. आपल्या टीमवरचा विश्वास हाच त्याचा प्रमुख आधार होता. या काळात अनेक भावनिक आणि तणावाच्या प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं, पण आपल्या निर्णयांनी सगळ्या अडचणींतून ते बाहेर पडले. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या कथा, कादंबरीप्रमाणे वाचकाला ते गुंतवून ठेवते आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांना यशाची वाटही दाखवते. या पुस्तकाचे मुखपृष्ठही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्या पारदर्शकपणे त्यांनी पुस्तकात अनेक गोष्टी मांडल्या आहेत, त्याचं प्रतिबिंब या मुखपृष्ठातून उमटतं.
‘हर्ष रिॲलिटिज, द मेकिंग ऑफ मॅरिको’-
हर्ष मारीवाला व राम चरण