International: पंतप्रधान नाचल्या, मग बिघडले कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2022 12:02 PM2022-08-28T12:02:31+5:302022-08-28T12:03:16+5:30
International: पंतप्रधान निवासात मद्यपानाची पार्टी ठेवून वर त्याचा व्हिडिओ काढण्याचा अगोचरपणा फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन यांच्या चांगलाच अंगलट आला...
- विनय उपासनी, मुख्य उपसंपादक
पंतप्रधान निवासात मद्यपानाची पार्टी ठेवून वर त्याचा व्हिडिओ काढण्याचा अगोचरपणा फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन यांच्या चांगलाच अंगलट आला...
पंतप्रधानपदाचा स्वतःचा म्हणून एक आब असतो. त्यामुळे त्या पदावरील व्यक्तीला अष्टावधानी राहून आपले दैनंदिन जीवन जगावे लागते. त्यात खासगी क्षण अभावानेच मिळतात. ते स्वतःपाशीच ठेवायला हवे. मात्र, काहींना त्याचे भान राहात नाही. मग त्यातून वाद-विवाद उद्भवतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन होय. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना तर पदच सोडावे लागले. जगातील सर्वांत तरुण पंतप्रधान म्हणून मरिन यांची ख्याती आहे. वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी त्या फिनलंडच्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जगभरातून कौतुक झाले. गेल्या महिन्यात त्यांच्या निवासस्थानी एक मेजवानी झाली. तीत त्यांनी मद्यधुंद अवस्थेत डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची प्रचंड झोड उठली. मरिन यांनी नुकतीच झाल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली.
२०१९ पासून सत्तेत असलेल्या मरिन यांचा राजकीय जीवन प्रवास वयाच्या विशीतच सुरू झाला. कॉलेजमध्ये असतानाच त्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या युवा शाखेच्या कार्यकर्त्या बनल्या. आपल्या फायरब्रॅण्ड वक्तृत्वामुळे साना मरिन पक्षात आणि लोकांमध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी पावल्या. मग युवा शाखेच्या अध्यक्ष, टॅम्पेरे शहराच्या नगराध्यक्ष, पक्षाच्या उपाध्यक्ष, खासदार आणि २०१९ मध्ये थेट पंतप्रधानपद अशा प्रगतीच्या पायऱ्या झरझर चढत गेल्या.
आक्रमक परराष्ट्रनीती हाही मरिनबाईंच्या कौतुकाचा विषय आहे. त्यांचा खमकेपणा वाखाणण्यासारखा असल्याने फिनलंडचे नागरिक मरिन यांना मद्यधुंद पार्टी प्रकरणासाठी माफही करतील.