दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:00 AM2019-09-22T06:00:00+5:302019-09-22T06:00:04+5:30

‘लतादीदी म्हणजे साक्षात संगीत.  सप्तसुरांचा त्रिवेणी संगम.  स्वप्न आणि संगीताचा उष:काल! संगीताचं वर्तमान आणि भविष्यही. महाराष्ट्राला सापडलेल्या या अलौकिक स्वरावर अनेक पिढय़ा सुसंस्कारी झाल्या.  दीदींच्या स्वरासोबत अनेकांना  आयुष्याचा सूर सापडला.’ 

Interview of Chief Minister Devendra Fadnavis on Voice of the Millennium Lata Mangeshkar on the occasion of her 90th birthday | दीदी

दीदी

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलगडला लतादीदींच्या आठवणींचा पट.

मुख्यमंत्री 
देवेंद्र फडणवीस 
यांनी उलगडला आठवणींचा पट.

भारतरत्न लता मंगेशकर. अनेक पिढय़ा त्यांच्या स्वरांच्या साथीने सुसंस्कारी झाल्या. त्या स्वरासोबत अनेकांना आयुष्याचा सूर सापडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरी त्याला अपवाद कसे असतील? 
सध्या निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असलेले फडणवीस दीदींबद्दल बोलताना हळवे होतात आणि ‘दीदींची तुम्हाला आवडणारी गाणी सांगा’ म्हटले, तर शेकडो आहेत म्हणतात ! 
लतादीदींचा नव्वदावा वाढदिवस येत्या 28 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांशी झालेल्या गप्पांचा हा अंश..

* लता मंगेशकर यांचे तुमच्या आयुष्यातील स्थान नेमके कसे व्यक्त कराल?
 - मन आणि भावना कधीच विभक्त होऊ शकत नाही. शरीर आणि आत्माही विभक्त होऊ शकत नाही. तसेच गाणे आणि आयुष्य हेही वेगळे होऊच शकत नाही. नेमके तसेच लतादीदी आणि संगीत कधीच वेगळे होऊ शकत नाही. लहानपणापासूनच गाण्याची आणि गाणे ऐकण्याची आवड असल्याने स्वाभाविकच लतादीदी हा करोडो र्शोत्यांप्रमाणे माझ्याही आयुष्यातील एक अनमोल ठेवा आहे. माझा आणि त्यांचा परिचय माझ्या बालपणापासूनचा. निरनिराळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटी अलीकडे होत असल्यातरी त्यांच्या गीतांच्या रूपाने त्या फार पूर्वीपासून परिचित आहेत.
* तुम्ही किती वर्षांचे असल्यापासून गाणी ऐकत आलात आणि लतादीदींची गाणी वेगळी आहेत, असे तुम्हाला कधी वाटले?
- साधारणत: चौदा ते पंधरा वर्षांचा असल्यापासून त्यांची गाणी ऐकत आलो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला अनेक कार्यक्रम आम्ही करीत असू. लतादीदींनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्याचे त्यात विशेष स्थान असायचे. राष्ट्रभावनेने ओतप्रोत त्या गीताच्या कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या ओळी आजही ते गाणे ऐकताना काळजाचा ठोका चुकवतात आणि दीदींचा आवाज डोळ्यात पाणी आणतो. दीदी हे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. ते असामान्य, अलौकिक आणि अमूल्य आहे. परमेश्वराने आपल्या देशाला अनेक अर्थाने अनेक देणग्या दिल्या आहेत. त्यातील लतादीदी हा अत्यंत अमूल्य ठेवा आहे आणि तो कायम राहाणारा आहे.
* कधी मन खूप आनंदी असते, कधी मनात वेदना, व्यथा येतात, अशावेळी कुठेतरी चालू असलेले लतादीदींचे गाणे तुमच्या भावना व्यक्त करते आहे, असे वाटले का? काय सांगाल.?
- आनंद, वेदना, व्यथा असे शब्द वा भावना सार्वजनिक क्षेत्रात काम करताना फार कमी येतात. आनंद होतो, तेव्हा त्यात रममाण व्हायचे नसते आणि वेदना, व्यथा होतात, तेव्हा त्यात गुंतून रहायचे नसते. ही शिकवण कायम माझ्या गाठीला आहे. आनंद सगळ्यांसोबत वाटायचा असतो. वेदना, व्यथा संपवायच्या असतात. समाजासाठी काही करता आले, यातच आनंद मानायचा असतो. हे सूत्र मी कायम जपले आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे लतादीदींचे एक वेगळे स्थान आमच्या सर्वांच्या मनात आहे ते त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्य पुढे नेण्यात दिलेल्या योगदानामुळे. खरे तर अवघ्या मंगेशकर कुटुंबीयानेच या कामात मोठे योगदान दिले आहे. लतादीदी सावरकरांना आपल्या पित्यासमान मानतात. जयोस्तुते, सागरा प्राण तळमळला अशी कितीतरी गीते त्यांनी गायिली. लतादीदींची ती सगळी गाणी आजही सतत नवी ऊर्जा, प्रेरणा देत राहतात.
* अमृता वहिनीदेखील गाणी गातात. त्यांचा आवाज सुंदर आहे. तुम्हा दोघांना दीदींची आवडलेली दहा गाणी निवडा, असे सांगितले तर तुम्ही कोणती गाणी निवडाल?
- हा सर्वांत कठीण प्रश्न आहे. एखाद्या सागराला 10 थेंबांमध्ये सामावून दाखविता येतं का? नाही ना, तसेच लतादीदी आणि त्यांचे  गीतविश्व दहा गाण्यांमध्ये सांगता येणे अवघड आहे. त्यांनी एक हजारावर चित्रपटांसाठी गाणी गायिली. 36 प्रादेशिक भाषांमध्येही त्यांचा आवाज गाण्यांच्या रूपाने कायम राहिलेला आहे. अखिल विश्वाचा संकुचित विचार करता येणार नाही. त्यांच्या मला आवडत असलेल्या गाण्यांची यादी तयार करायचीच असेल तर ती शेकडो गाण्यांची करावी लागेल. तरीही ती आवड पूर्ण होईल की नाही सांगता नाही येणार..
* आमदार म्हणून लतादीदींना कधी भेटला होतात का? आणि मुख्यमंत्री म्हणून केव्हा भेट झाली? तुमच्या भेटीच्या काही व्यक्तिगत आठवणी सांगाल?
- आमदार म्हणून भेट झाली ती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने. पण, त्यावेळी फार असा संपर्क  आला नाही. आमदार होण्यापूर्वी मी नगरसेवक असताना नागपूर महापलिकेतर्फे  त्यांचा सत्कार करण्यात आला होता. तेव्हाही एकदा भेट झाली. 
त्यानंतर प्रत्यक्ष भेटी व्हायला लागल्या त्या मी मुख्यमंत्री झाल्यापासून. आता अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची भेट होते. आपुलकी, साधेपणा, विनम्रता इतकी की, या कार्यक्रमांच्या निमित्ताने 15 मिनिटे आवर्जून स्वतंत्रपणे गप्पांना वेळ देतात. माझ्या अनेक निर्णयांचे कौतुक करतात. भेट झाली नाही, तरी त्यांचा फोन येतोच. आता अगदी अलीकडे कोल्हापूर आणि सांगलीचा पूर पाहून त्या व्यथित झाल्या. त्यांनी लगेचच मदतीचा धनादेश पाठवून दिला. पण, आपण मदत केली, हे कुणाला सांगू नका, असेही मला सांगितले. अखेर मीच त्यांना विनंती केली आणि त्यांनी केलेली मदत सार्वजनिक केली. ‘तुम्ही फार चांगले काम करीत आहात. महाराष्ट्राच्या वैभवासाठी असेच काम करीत रहा’, हे त्यांचे शब्द मला कायम अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा देत असतात. मला अजूनही आठवते, मुख्यमंत्री झाल्यानंतर ‘आप की अदालत’मध्ये एकदा माझी मुलाखत त्यांना आवडली. त्यांनी आवर्जून ती चांगली झाल्याचा मला फोनही केला होता.
* धकाधकीच्या राजकीय जीवनात विरंगुळ्याचे क्षण म्हणून कोणत्या गायकांची गाणी तुम्हाला आवडतात?
- अगदी खरे सांगायचे झाले तर अलीकडे विरंगुळ्याचे क्षण लाभतच नाहीत. प्रवासात कधी गाणी लागतात तेवढीच ऐकली जातात. ज्या गाण्यात सात सूर असतात ती सगळीच गाणी मला आवडतात. अर्थातच लतादीदी, आशाताई, उषाताई, पं. हृदयनाथ, मोहम्मंद रफी, किशोरकुमार यांच्यापासून ते अगदी शंकर महादेवन, कैलाश खेर, अरिजित यांच्यापर्यंत सार्‍यांचीच गाणी मी ऐकली आहेत. वेळ मिळेल तशी ऐकतोदेखील.
 * लतादीदी आणि महाराष्ट्र यांचे नाते तुम्ही कशा पद्धतीने पाहता?
-  मला अतिशय आनंद आहे की, लतादीदी वयाची 90 वर्षं पूर्ण करीत आहेत. महाराष्ट्राने आजवर अनेक कन्या देशाला दिल्या आणि त्यांनी महाराष्ट्राचे नाव जगात कोरले. दीदी गानकोकिळा आहेत, देशाच्या कन्या आहेत. लतादीदी म्हणजे संगीत आहे. सप्तसुरांचा त्रिवेणी संगम आहे. लतादीदी म्हणजे स्वप्न आहे, लतादीदी हा संगीताचा उष:काल आहे. ते संगीताचे वर्तमान आहे, भविष्य आहे. महाराष्ट्राचे नाव घेतले की काही नावे वेगळी करताच येत नाहीत तसे महाराष्ट्र आणि लतादीदी अभिन्न आहेत. मी तर म्हणेन की लतादीदी हे महाराष्ट्राचं वैश्विक वैभव आहे. मी त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तम आणि दीर्घायुष्य चिंतितो.
मुलाखत - अतुल कुलकर्णी
(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, मुंबई)

..................
लतादीदींच्या गायन-कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘लता 90’ हा कार्यक्रम ‘जीवनगाणी’ संस्थेच्या वतीने सादर केला जाणार आहे. व्हॅल्युएबल ग्रुप यांची प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमात लतादीदींच्या नऊ दशकांच्या सुरेल कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘लता’ हा ग्रंथ ‘जीवनगाणी-सांजशकुन’ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. या ग्रंथातही ही मुलाखत वाचायला मिळेल.

छाया : गौतम राजाध्यक्ष  सौजन्य : नूतन आसगावकर

Web Title: Interview of Chief Minister Devendra Fadnavis on Voice of the Millennium Lata Mangeshkar on the occasion of her 90th birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.