इरोम शर्मिला, ले मशाले आणि मी

By admin | Published: August 12, 2016 06:05 PM2016-08-12T18:05:33+5:302016-08-12T18:33:20+5:30

मणिपूरची आयर्नलेडी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या इरोम चानू शर्मिला या कार्यकर्तीने अखंड सोळा वर्षं चाललेलं तिचं उपोषण नुकतंच सोडलं

Irom Sharmila, Le Manshale and Me | इरोम शर्मिला, ले मशाले आणि मी

इरोम शर्मिला, ले मशाले आणि मी

Next

 - ओजस सु. वि.

इरोम शर्मिला, 
ले मशाले
आणि मी

मणिपूरची आयर्नलेडी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या
इरोम चानू शर्मिला या कार्यकर्तीने 
अखंड सोळा वर्षं चाललेलं 
तिचं उपोषण नुकतंच सोडलं 
आणि सक्रिय राजकारणात शिरून व्यवस्थाबदलासाठी झगडत राहण्याचा नवा निर्धार व्यक्त केला.
ईशान्येकडल्या राज्यांमध्ये लष्करी दलांना विशेष अधिकार देणारा कायदा (‘अफ्स्पा’) रद्द केला जावा, या मागणीसाठी सुरू असलेलं
इरोम शर्मिला यांचं प्रदीर्घ उपोषण हे देशातल्या जनआंदोलनांच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं पर्व आहे!
शर्मिला यांची कहाणी 
गावागावांत पोचावी, 
यासाठी एकपात्री कार्यक्रम 
सादर करण्याचा वसा उचलला 
ओजस सु. वि. या मराठी तरुणीने!
तिने चौदा राज्यांमध्ये 
अडीचशेच्या वर प्रयोग केले.
शर्मिलासोबतच्या गेल्या सात वर्षांच्या प्रवासाची ओजसने सांगितलेली 
ही कहाणी!



इरोम शर्र्मिला विषयी मी पहिल्यांदा ऐकलं ते २००६ मध्ये. इतकी वर्षं कसं कोणी उपोषण करू शकतं? आणि त्याबद्दल वर्तमानपत्रात एक ओळही छापून येत नाही, सरकार त्या उपोषणाची साधी दखल घेत नाही... हे कसं? असा प्रश्न मला पडला आणि तो डोक्यातून सुटूनही गेला. नंतर प्रणब मुखर्जी या बंगाली रंगकर्मीसोबत नाटक करत असताना त्याने ईशान्य भारताविषयी खूप काही सांगितलं, तिथले व्हिडीओ दाखवले. त्यानंतर मला खडबडून जाग आली. मग मी शर्मिलाविषयी, तिच्या लढ्याच्या प्रेरणांविषयी वाचत गेले, मिळेल तिथून माहिती मिळवत राहिले.. जितकं जास्त कळत गेलं तितकी जास्त अस्वस्थता वाढली. 
मे २०१० मध्ये सिविक चंद्रन यांच्या नेतृत्वाखाली ‘हिंद स्वराज शांती यात्रा’ केरळहून इंफाळला निघाली होती. शर्र्मिलाच्या उपोषणाला दहा वर्षं पूर्ण होत होती आणि गांधीजींच्या ‘हिंद स्वराज’चं ते शताब्दी वर्ष होतं. ज्या देशातून गांधीजींनी जगाला शांती आणि सत्याग्रहाचं तत्त्वज्ञान दिलं, त्याच देशाच्या ईशान्य कोपऱ्यातली एक तरुणी मूकपणे, शांतीपूर्ण आग्रहाने आपला मुद्दा, सत्याची बाजू मांडत दृढ निश्चयाने अन्नपाणी वर्ज्य करून होती. हे निमित्त साधून देशभरच्या शांतिमार्गी लढ्यांना जोडत ‘हिंद स्वराज शांती यात्रा’ हा सांस्कृतिक जत्था चालला होता. त्यात तानिया ही तरु ण अभिनेत्री सिविक चंद्रन यांनी लिहिलेलं ‘मैरा पैबी’ हे मल्याळम नाटक करत होती. पण पुढे यात्रा पुणे, भोपाळ, दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी अशी जाणार असल्यामुळे ‘उत्तर भारतातील प्रेक्षकांसाठी हिंदीमध्ये हे नाटक करशील का?’ असं मला आयोजकांनी विचारलं. एकाच आठवड्यात पाच प्रयोग म्हणजे माझ्यासारख्या छोट्या कलाकारासाठी पर्वणीच! आणि शिवाय इतके दिवस अस्वस्थ करणारा विषय हाताळायला मिळणार म्हणून माझ्यातल्या कार्यकर्तीलाही बरंच वाटलं!
८ मे २०१० ला रात्री माझ्या हाती अनुवादित इंग्रजी स्क्रि प्ट आलं आणि १३ ला जत्था पुण्यात पोचणार. ते चार दिवस खूप विचारमंथन, वाचन, नेटवर माहिती शोधणं, व्हिडीओ बघणं, तिथल्या नृत्याबद्दल, मार्शल आर्टबद्दल जाणून घेणं आणि त्याचसोबत नाटकाच्या व्हिज्युअल्सचा विचार एकपात्रीच चालू होता! अखेर मणिपूरच्या लढ्याविषयीचं माझं आकलन, सिविक चंद्रन यांचं स्क्रिप्ट, अंशू मालवीय यांची कविता आणि शर्मिलाच्या मुलाखतींमधले तिचे कोट्स या सगळ्याचं मिळून स्क्रि प्ट कागदावर उतरवलं. 
या नाटकाचं मूळ नाव ‘मैरा पैबी’ म्हणजे मशाली घेऊन चाललेल्या बायका - त्याची जनकवी बल्लीसिंह चिमा यांच्या ‘ले मशाले चल पडे है...’ या गीताशी नाळ जुळते त्यामुळे या नाटकाचं नाव ‘ले मशाले’ ठेवावं असं माझ्या आईनं सुचवलं.
प्रयोगाच्या एक दिवस आधी लबीब हा लोकायतचा मल्याळी कार्यकर्ता पहिल्यांदाच भेटला. आम्ही आदल्या दिवशी कुठलं संगीत कुठे वाजवायचं ते बोलून ठरवलं. तालीम वगैरे करायला वेळच नव्हता. १३ तारखेला एस. एम. जोशी फाउंडेशनच्या खुल्या रंगमंचावर प्रयोग होता. प्रयोगापूर्वी मला नेहमीचं टेन्शन नव्हतं आलं. खरं सांगायचं तर नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळीच पहिल्यांदा मी एकसंध पूर्ण नाटक केलं. मी नाटक करत नव्हते; नाटक माझ्यातून येत होतं. नाटक झाल्यानंतर मलाच कळलं नाही की मीच हे नाटक केलंय. खूपच आध्यात्मिक अनुभव होता तो. 
पहिल्याच प्रयोगाला पुण्याच्या प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. खरंतर तिथे साउण्ड सिस्टीम नीट नव्हती, लोकांपर्यंत ‘संवाद’ पोचला नाही तरी नाटक नीट पोचलं होतं! खरंतर हीच इरोमच्या लढ्याची ताकद आहे! सोळा वर्षात ती काहीही बोलली नाही तरी तिच्या कृतीने देशाला विचार करायला भाग पाडलं. त्या टाळ्या माझ्यासाठी नव्हत्या, तर त्या शर्मिला आणि मणिपुरी महिलांच्या लढ्याच्या गोष्टीसाठी होत्या. त्यांच्या लढ्यात ती ताकद होती.. ती व्हिज्युअल्स होती.. ते बॉडी पॉलिटिक्स होतं.. शरीर स्टेकला लावायची हिंमत होती. शर्मिलाचं उपाशी राहत आपलं शरीर पोखरत मूकपणे पोटतिडकीने मागणं मांडणं, मनोरमावरचा निर्घृण हिंसक बलात्कार आणि त्याला मणिपुरी महिलांनी नग्न होऊन दिलेलं उत्तर, ‘आर्मीमेन’ दाखवत असलेला ‘पुरु षार्थ’ आणि त्यांच्या बुटांखाली चिरडत जाणारी महिलांची शरीरं आणि एकूणच तिथली सुंदर मातृप्रधान हळुवार संस्कृती... हे सारं बॉडी पॉलिटिक्स एक कलाकार म्हणून आपसुकच माझ्या शरीरातून अभिव्यक्त होत होतं.
जत्थ्यासोबत मी पुढे गेले. भोपाळमध्ये एका लायब्ररीमध्ये प्रयोग झाला. कोलकात्याला तर चक्क राउंड टेबलभोवती लोक बसलेले, मधे माईक सिस्टीमच्या वायर आणि त्या टेबलच्या वर उभं राहून प्रयोग केला! तो लोकांना खूपच भावला. कारण ती चौकटीबाहेरची कथा ‘प्रोसिनियम’च्या नेहमीच्या चौकटी मोडून सादर झाली. हा प्रयोग कुठल्याही प्रकारच्या स्टेजवर - स्टेजविरहित जागेत सादर होऊ शकतो आणि प्रत्येक जागेच्या स्ट्रक्चरमुळे त्याला नवनवीन वैशिष्ट्य लाभतं, हे पुढे लक्षात आलं. 
कोलकात्यात महाश्वेतादेवींना भेटण्याचं भाग्य लाभलं! संपूर्ण जत्थाच त्यांना भेटायला गेला होता. त्यांचं शर्र्मिलावर मुलीसारखं प्रेम! त्यांना स्क्रि प्ट वाचून दाखवायला लागले तर त्या मधेच थांबवून म्हणाल्या की हे करूनच दाखव. मग त्यांच्याच त्या छोट्याशा खोलीत पूर्ण प्रयोग केला. संपल्यावर दोन क्षण शांतता आणि त्या त्यांच्या ठाम आवाजात म्हणाल्या- ‘‘सॉल्लीड!’’... ‘‘होल कलकत्ता शुड बी मेड टू वॉच धिस’. नंतर त्यांनी मायेने पाठीवरून हात फिरवला, त्याचा स्पर्श अजूनही जाणवतो... 
पहिले काही प्रयोग मी इरोम शर्र्मिला ही ‘एक संवेदनशील राजकीय कार्यकर्ती’ असं रंगवलं. त्यामुळे खरंतर मला तिच्या कवितेच्या काही ओळी आणि काही वक्तव्यांचे अर्थ नीटसे उमजले नव्हते.
४ नोव्हेंबर २०१० रोजी तिच्या उपोषणाला दहा वर्षं पूर्ण होण्याच्या निमित्ताने इंफाळमध्ये, शर्मिला आधी काम करायची त्या ‘जस्ट पीस फाउंडेशन’ने तीन दिवसांची परिषद भरवली होती. त्यात देशभरातले मान्यवर, समर्थक जमले होते. तिथे ‘ले मशाले...’ चा प्रयोग होता. मी पहिल्यांदाच जवळून मणिपूरची संस्कृती अनुभवली. रस्ते, बाजार, शेतं, व्यापार, शहर जिथे तिथे बायका - मातृप्रधानता म्हणजे काय ते पाहिलं. जागोजागी उभे राहिलेले सशस्त्र सैनिक आणि त्यांच्या संशयी नजरा म्हणजे काय ते अनुभवलं. रस्त्यावर चालताना कोण सामान्य, कोण इनसर्जंट, कुठून कधी गोळी येईल अशी भीती बाळगून चालणारे लोक पाहिले. संध्याकाळी ५ वाजता कडेकोट बंद होणारं शहर पाहिलं. 
४ तारखेला दिवसभर बरेच जाहीर कार्यक्र म व्यवस्थित पूर्वपरवानगी घेऊन आयोजले होते. पण ‘आले आर्मीच्या मना तेथे कोणाचे चालेना’ याचा प्रत्यय आला... सर्व कार्यक्र म ऐनवेळी होऊ दिले नाहीत. वर इरोम शर्मिलाची पूर्वनियोजित भेटही नाकारली गेली! 
आम्ही कशीही तिची भेट मिळवायचीच हे ठरवलं. अखेर आयोजकांनी कॅण्डल लाइट मार्च करत 

हॉस्पिटलच्या तिच्या खोलीपर्यंत जायचं ठरवलं. तिथे सुरक्षारक्षकांचं हृदय पाघळून तिला दुरून बघण्याची परवानगी अखेर मिळाली. 
‘तुला लोक भेटायला आले आहेत’ असं कुणीतरी तिला सांगितलं. उपोषणाला १० वर्षं पूर्ण झाल्याचा दिवस, पण तिला कोणालाच भेटू दिलं नव्हतं. ती खोलीतून डोकावली आणि एकदम इतके आपले लोक हातात ज्योत धरून उभे आहेत ते पाहून तिला गहिवरूनच आलं, अश्रूंचा बांध फुटला. ती मोकळेपणाने रडली आणि आमच्यापर्यंत चालत आली. क्षीण पण ताठ, ठाम पावलं टाकत! तेव्हा तिच्यातलं निर्धारी माणूसपण मला दिसलं. मी उत्स्फूर्तपणे माझ्या हातातली मेणबत्ती तिला दिली. बबलू लोइतान्ग्बामने मी तिचं नाटक करते हे सांगितलं. तिने साश्रू डोळ्यांनी कृतार्थ आणि कुतूहलमिश्रित नजरेनं माझ्याकडे पाहिलं. त्या क्षणांनी मला खूप काही शिकवलं तिच्याबद्दल. त्यानंतरच्या प्रयोगात मी कायमच तिला माणूस म्हणून रंगवलं आणि नाटकाला अनेक नवे आयाम माझ्यासाठी आपसूकच उलगडत गेले. 
आधी मी प्रयोग करत असताना नाटकाचा एक भाग म्हणून मधेच एक घोट पाणी पीत असे. पण तिचा भाऊ सिंगजित यांनी सांगितलं, ‘शर्र्मिला पाणीही पीत नाही. कापसाचा बोळा फिरवून दात घासते.’ हे ऐकून मी अवाक् झाले. आणि अर्थातच तो बदल प्रयोगात केला. 
मणिपूरमधले कार्यकर्ते म्हणतात- ‘‘मेन लॅँड इंडियातल्या एका कलाकाराने शर्मिलावर नाटक करणं महत्त्वाचं आहे. एकतर भारतातून आवाज उठणं महत्त्वाचं आणि ते करताना मणिपुरी कलाकारासारखा तुमचा जीव जाण्याची भीती नाही!’’ हे नाटक बघताना लहान मुलांना भीती वाटते. पण मणिपूरमधल्या एका प्रयोगानंतर एक आई तिच्या चार वर्षाच्या मुलीला घेऊन आली. ती म्हणाली, ‘‘प्रयोग सुरू होण्यापूर्वी स्टेजवर आर्मीचा युनिफॉर्म बघून ही रडायला लागली आणि घरी जाऊ म्हणत होती. मी थोडा वेळ नाटक पाहू मग जाऊ असं म्हटलं. नाटक सुरू झाल्यावर तू मुक्तपणे बागडते आहेस, गोष्टी सांगते आहेस आणि आर्मी ड्रेसला जाब विचारते आहेस हे पाहून छोटीला खूप मजा वाटली. तिची भीती दूर पळून गेली...’’ 
मला मणिपूरमधल्या छोट्या मुलीच्या मनात खोलवर रुजलेल्या भीतीची जाणीव नव्हती आणि या नाटकातल्या अशा ताकदीचीही!
देशभरात प्रयोग करताना तिथले मणिपुरी विद्यार्थी येतात. बहुतेक वेळा प्रयोगानंतर येऊन म्हणतात, ‘‘आम्ही या परिस्थितीपासून दूर पळून जायला, जीव वाचवायला म्हणून ‘इंडिया’त शिकायला येतो. पण हा प्रयोग बघून वाटतं की आपण इथे बसून तरी काही करायला पाहिजे.’’ अशीच एक विद्यार्थिनी बेंगळुरूमधले प्रयोग बघायला आली आणि आता सक्रि य कार्यकर्ती बनून यूएनमध्ये मणिपुरी जनतेचं प्रतिनिधित्व करायला गेली. तेव्हा तिला दिल्ली विमानतळावर अनुभवलेल्या वंशवादाविरुद्धही तिने आवाज उठवला. केरळमध्ये हे नाटक खूपच उचललं गेलं. सलग १०-१५ प्रयोगांचे निदान दोन-तीन तरी दौरे झाले. ते तिथल्याच रंगकर्मींनी आयोजित केले होते. तिथलं वैशिष्ट्य हे की, अगदी शेवटचा बसस्टॉप असलेल्या खेडेगावातही स्वत:चा रंगमंच असतो. प्रामाणिकपणे नाटकं करणारा एकतरी नाट्यगट असतो. केरळच्या स्थानिक मीडियाने याचा खूपच चांगला प्रसार केला. केरळच्या प्रत्येक गावात हे नाटक माहीत आहे असं म्हणणं धाडसाचं ठरणार नाही. केरळमधून शर्मिलाला खूप समर्थन उभं झालंय. नर्मदा खोऱ्यात बडवानी इथे जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या संमेलनात या नाटकाच्या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्या-त्या आंदोलनाच्या कार्यक्षेत्रात कृती कार्यक्रम झाले. राजस्थानमधेही अरु णा रॉय, कविता श्रीवास्तव यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रयोग लावले. 
नाटकाला आलेल्या प्रेक्षकांमधून समर्थक उभे झाले आणि त्याचा प्रभावी उपयोग करून घेत शर्र्मिलाच्या समर्थनाचे अनेक कार्यक्रम होत राहिले. अजूनही होतात. तिथला एक रॅप सॉँग बनवणारा युवा गट अफ्स्पाविरोधी अनेक गाणी तयार करतो आहे. राजस्थानमध्ये एका शाळेत प्रयोग होता. पोरं भलतीच दंगा करत होती. शिक्षकांचं काही ऐकत नव्हती, पाहुण्यांचं भाषण ऐकत नव्हती. प्रयोग रद्द करूया अशी चर्चा सुरू झाली. मी म्हटलं की मी पाच मिनिटं अंदाज घेते आणि नकळत प्रयोगाला सुरु वात केली. तीन-चार मिनिटाच्या भरपूर दंग्यानंतर पोरं चिडीचूप झाली आणि शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन प्रयोग पाहिला. प्रचंड टाळ्या पडल्या आणि पुढे शांततेत प्रश्नोत्तरेही झाली. मला नाटकाची जादू कळली! 
तिथला आणखी एक अनुभव म्हणजे पोलीस ट्रेनिंग अकादमीत प्रयोग होता! विरोध होणार हे अपेक्षितच होतं. पण संपूर्ण प्रयोगभर सन्नाटा होता. आणि प्रश्नोत्तरं सुरू झाल्यावर मात्र धारदार वाग्बाण प्रेक्षकांकडून निघू लागले. आयोजक आणि मी ऐकत होतो. संवाद साधायचा प्रयत्न करत होतो. आणि एक प्रेक्षक उठून म्हणाले- ‘‘मै पिछले ३० सालसे मणिपूरमें सर्व्हिस कर रहा था. और इस नाटक में दिखाई दी गयी एक भी चीज झूट नहीं है! यह आर्मीकी इनकनव्हिनिअंट सच्चाई है!’’ स्वत: लष्करात सेवा केलेल्यांकडून आलेल्या अशा स्पष्ट वक्तव्यानंतर चर्चेची दिशाच बदलली.
शर्मिलाची ही कथा भाषेपलीकडे पोचणारी आहे आणि ‘अफ्स्पा’च्या पलीकडे जाऊन कोणत्याही लोकलढ्यांना बळ देणारी आहे, याचा प्रत्यय मला ओरिसाच्या प्रयोगांत आला. ओरिसात पोस्कोविरोधी संघर्ष समितीने गावागावांत प्रयोग आयोजित केले होते. पुढे तिथल्या लढ्यामध्ये शर्मिलाच्या गोष्टीमधून महिलांना अधिक ताकद मिळाली. 
दालिंगबाडी या एका आदिवासी पाड्यावर प्रयोग होता. तो आठवडे बाजारचा दिवस होता. तिथे एका मोठ्या फणसाच्या झाडाखाली ताडपत्री टाकून, मागे साड्यांची सजावट करून ‘स्टेज’ बनवलं होतं. माईक धड नाही आणि हिंदीचा गंधही नसलेले शंभर प्रेक्षक अवतीभवती उभे. नाटकभर अख्खी चाळीस मिनिटं सगळे उभेच होते. नाटक संपल्यानंतर बराच वेळ ते काही न काही बोलत राहिले. स्वत:हून खिशातले बाजारासाठी आणलेले ५-१० रु पये हॅट कलेक्शनकरून माझ्या हाती आणून दिले. त्यांची किंमत लाख मोलाची आहे. 
एकदा पोस्कोग्रस्त गावातून प्रयोग करून बाहेर पडताना संध्याकाळी पोलिसांची गाडी मागे आली आणि आम्हाला चौकीत घेऊन गेली. ओरिसात अटक म्हणजे तीन दिवस जेलमध्ये अशी ख्याती! माझ्यासोबत मणिपुरी कार्यकर्ता बबलू होता. त्याने तातडीनं काही मेसेज केले. पोलिसांनी आमचं सामान तपासलं, अनेक प्रश्न विचारले. पण तितक्यात ओरिसाच्या कुठल्याशा मंत्र्यांचा पोलीस स्टेशनात फोन आला आणि ‘‘आम्हाला मदुराईहून पीपल्स वॉचच्या हेन्द्री तीफेनचा फोन आला होता. हे मानव अधिकारासंबंधी काम करणारे कार्यकर्ते आहेत, यांना सोडून द्या’’ असं सांगण्यात आलं. मदुराईला आधी हेन्द्रींच्या संस्थेने दहा प्रयोग आयोजित केले होते. त्यांना ही बातमी कळताच त्यांनी ही सगळी धावपळ केली. मला मानव अधिकारासंबंधी काम करणऱ्यांच्या नेटवर्कचं विशेष वाटलं! आम्हाला सोडून दिल्यानंतर मात्र आम्ही जाऊ त्या गावात सीआरपीएफचे सैनिक पाठलाग करत होते. एका अशाच छोट्या गावात नव्याने भरती झालेले अधिकारी प्रयोग होऊ नये याचे प्रयत्न करत होते. दबाव टाकण्यासाठी खुल्या रंगमंचाच्या भोवती बऱ्याच पोलीस व्हॅन उभ्या केल्या. पण तरीही प्रयोग सुरू झाला. ते अधिकारी अगदी दुसऱ्या रांगेत येऊन मोबाइलवर शूटिंग करू लागले. थोड्या वेळाने त्यांनी मोबाइल खिशात ठेवला आणि पूर्ण प्रयोग शांतपणे पाहिला. नंतर चहालाही बोलावलं. संयमितपणे सांगितलेल्या सत्यामध्ये संवाद सुरू करण्याची केवढी ताकद असते याची प्रचिती देणारा हा अनुभव मोठा विलक्षणच होता.
असाच एक संस्मरणीय अनुभव शिलॉँगमधला. तिथे माहिती अधिकाराविषयी राष्ट्रीय अधिवेशन चालू होतं. रात्री ईशान्य भारताच्या सातही राज्यांमधल्या कलाकारांनी आपापली कला सादर केली आणि त्या कार्यक्र माचा शेवट ‘ले मशाले’ने झाला. सातही राज्यं वेगवेगळी पण या एका मुद्द्याने, एका लढ्याने जोडल्याची हृद्य अनुभूती सर्वांनाच आली. हे नाटक विशाखापट्टणममधील ळएऊ७ मध्ये सादर झालं आणि या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय रंगमंचही मिळाला. एकही प्रयोग न लावता याचे सुमारे दोनशे प्रयोग झाले. कित्येक मौल्यवान अनुभव गाठीशी मिळताहेत. खूप ठिकाणहून प्रयोगांसाठी बोलावणी यायला लागली. एवढा देश पालथा घालायचा म्हटलं तर एका व्यक्तीला शक्य नाही. अनेक ठिकाणी खेड्यापाड्यात तिथल्या स्थानिक भाषेत प्रयोग झाले तर अधिक चांगलं, या विचाराने मी इतर कलाकारांना हे नाटक करण्याचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद मिळाला त्यामुळे मी जेनी या चेन्नईच्या अभिनेत्रीचं तमीळमध्ये; अधिनाचं मल्याळममध्ये, रेखा ठाकूरचं मराठीत, जहानआराचं हिंदीत नाटक बसवू शकले. त्या आणखी लोकांपर्यंत नाटक पोचवताहेत. आणखीही कलाकारांचं स्वागत आहे. 
हे नाटक आज घडत असलेल्या जिवंत इतिहासाचं आहे. याची संहिताही प्रवाही आहे जी इरोम शर्मिलाच्या प्रवाही जीवनावर प्रेरित आहे. इरोम शर्मिला आणि मणिपुरी लढाऊ महिलांच्या सृजनात्मक संघर्षावर आधारित हे नाटक सादर केल्यानंतर दरवेळी मला एक नवी चेतना, ऊर्जा देतं. आशा आहे की, प्रेक्षकांनाही ते सदैव ऊर्जा देत राहील... संघर्षाच्या कायम तेवणाऱ्या ज्योतीसारखं! 

सुन्न करणारं बॉडी पॉलिटिक्स
सोळा वर्षांत शर्मिला काहीही बोलली नाही तरी तिच्या कृतीने देशाला विचार करायला भाग पाडलं. शर्मिला आणि मणिपुरी महिलांच्या लढ्यात जबरदस्त ताकद होती.. सुन्न करणारी व्हिज्युअल्स होती.. बॉडी पॉलिटिक्स होतं.. शरीर स्टेकला लावायची हिंमत होती. शर्मिलाचं उपाशी राहत आपलं शरीर पोखरत मूकपणे पोटतिडकीने मागणं मांडणं, मनोरमावरचा निर्घृण हिंसक बलात्कार आणि त्याला मणिपुरी महिलांनी नग्न होऊन दिलेलं उत्तर, ‘आर्मीमेन’ दाखवत असलेला ‘पुरु षार्थ’ आणि त्यांच्या बुटांखाली चिरडत जाणारी महिलांची शरीरं आणि एकूणच तिथली सुंदर मातृप्रधान हळुवार संस्कृती... हे सारं बॉडी पॉलिटिक्स एक कलाकार म्हणून आपसूकच माझ्या शरीरातून अभिव्यक्त होत गेलं...

‘प्रॉपर्टी’
या नाटकाचे शब्द सुचण्याआधी मला यातील व्हिज्युअल्स दिसली, रक्ताच्या ठशांनी भरलेलं फडफडणारं वर्तमानपत्र दिसलं, चोळवटली जाणारी प्लॅस्टिकची बाटली ऐकू आली, पूर्ण नाटकभर उपस्थित असणारा निर्विकार पण धडकी भरवणारा आर्मीचा युनिफॉर्म दिसला, आजीने शाल पांघरून सांगितलेल्या लोककथा त्या शालीची आणि संस्कृतीची ऊब जाणवली, शर्मिलाची ओळख बनलेली तिच्या नाकातली ती फोर्सफीडिंगची नळी दिसली... अखेर एवढीच ‘प्रॉपर्टी’ घेऊन ते नाटक उभं राहिलं.

Web Title: Irom Sharmila, Le Manshale and Me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.