...आता पुरे!

By admin | Published: September 30, 2016 06:12 PM2016-09-30T18:12:10+5:302016-09-30T18:31:28+5:30

पाकिस्तानच्या फॅसिस्ट सत्ताधाऱ्यांकडून बलुचिस्तानमध्ये झालेल्या अनन्वित अत्याचारांच्या कहाण्या क्रूर आणि हिंस्र आहेत. कोणाही देशाच्या इतिहासात इतका क्रूर, विध्वंसक काळ आला नसेल.

... it is enough! | ...आता पुरे!

...आता पुरे!

Next

 - डॉ. शाहझवार करिमझादीयांची विशेष मुलाखत

पाकिस्तानच्या फॅसिस्ट सत्ताधाऱ्यांकडून बलुचिस्तानमध्ये झालेल्या अनन्वित अत्याचारांच्या कहाण्या क्रूर आणि हिंस्र आहेत.
कोणाही देशाच्या इतिहासात इतका क्रूर, विध्वंसक काळ आला नसेल.
बलुच राजकीय कार्यकर्त्यांचे 
आणि विचारवंतांचे खून हा येथे सर्वसामान्य प्रकार आहे.
एखाद्या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याला गाडीमागे बांधून फरपटत नेणे हादेखील पाकिस्तानी लष्कराचा आवडता खेळ आहे. 
एखाद्या बलुच व्यक्तीला उंचावरून फेकून देणे आणि मग त्याचा सावकाश होणारा वेदनादायी मृत्यू पाहण्याचा ‘आनंद’ लुटणे 
हेही इथे चालते.
लष्कराकडून बलुची गायक आणि कवींच्या घशात अ‍ॅसिड ओतण्याचे प्रकारही वारंवार केले जातात. 
डोळे फोडणे, अवयव कापणे, 
त्वचा काढणे असे अघोरी अत्याचार अनेक बळींवर करण्यात आले आहेत.
- इतका दीर्घकाळ हे जगापासून लपून राहिले.
पण यापुढे बलुचांवरचे हे अत्याचार दडवून ठेवणे, त्यांच्या स्वातंत्र्याची अस्मिता चिरडून टाकणे पाकिस्तानला शक्य होणार नाही.


बलुच लोकांमध्ये वेगळे होण्याची इच्छा तयार होण्यामागे प्रमुख कारणे कोणती आहेत?
- मुळात पाकिस्तान हीच एक पोकळ कल्पना आहे. ते राष्ट्र नाहीच. बलुच मात्र प्राचीन इतिहास असलेले, संस्कृती आणि नैतिक मूल्ये जपणारे राष्ट्र आहे. पाकिस्तान मात्र इतरेजनांचा तिरस्कार करणारी संज्ञा आहे, असेच आम्हाला वाटते. तेथे या संज्ञेच्या पायावर लष्करी, व्यावसायिक, धार्मिक सत्तेची उभारणी झाली आहे. अशा हुकूमशाही देशाचा बलुच कधीही भाग नव्हताच त्यामुळे वेगळे होणे ही संज्ञा आमच्याबाबत लागूच होत नाही. 
बलुचिस्तान हा इराणी पठाराचा एक भाग आहे. बलुचिस्तान ही स्वतंत्र अस्तित्व असलेली संज्ञा असून, आता आम्ही तिच्या पूर्ण स्वतंत्र अस्तित्वासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मानववंशशास्त्रदृष्ट्या आम्ही कुर्दिश, पर्शियन, अफगाणी राष्ट्रांच्या जवळचे आहोत. बलुचिस्तानच्या दुर्गम स्थानामुळे बाहेरील लोकांच्या हस्तक्षेपाविना जगण्यास बलुच लोक शिकले आहेत. बलुचिस्तानचे क्षेत्रफळ ५ लाख साठ हजार चौ. किमी असून, १२०० किमी लांब सागरकिनाराही लाभलेला आहे. या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे बलुचिस्तानला एकसंधता आणि एकजिनसत्त्व लाभले आहे. बलुच लोक या भूभागावर गेली अनेक शतके राहात आहेत, सतराव्या शतकामध्ये (१६६६) त्यांनी येथे खनाते आॅफ कलातच्या अधिपत्याखाली पहिले राष्ट्र राज्य स्थापन केले. बलुचांचे हे सार्वभौम राज्य १३ नोव्हेंबर १८३९ पर्यंत म्हणजे ब्रिटिशांनी आक्रमण करेपर्यंत अबाधित होते.
आपल्या भूभागाचे रक्षण करण्यासाठी बलुची लोकांनी नेहमीच प्रयत्न केले, उठावही केले. ब्रिटिशांनी मेजर जनरल एफ.जे. गोल्डस्मिथ (१८१८-१९०९) यांच्या अध्यक्षतेखाली पर्सो-बलुच सीमा आयोगाची निर्मिती केली, त्यामध्ये बलुची लोकांनाच स्थान नव्हते. या आयोगाने एका काल्पनिक रेषेची निर्मिती केली, ती गोल्डस्मिथ रेषा म्हणून ओळखली जाते, या रेषेच्या पश्चिमेकडील भाग १८७१ साली पर्शियाला देऊन टाकण्यात आला. १८९३ साली २४५० किमी लांबीची ड्युरांड रेषा काढण्यात आली, हेन्री मॅकमोहन यांनी तिची लांबी वाढवली. या रेषेमुळे बलुचिस्तानचा उत्तरेचा काही भाग तोडून अफगाणिस्तानला देऊन टाकण्यात आला. बलुचांबरोबर पश्तुन लोकांनीही या रेषेला नेहमीच बेकायदेशीर ठरविले आहे. इतकेच काय, तर १९४९ साली झालेल्या लोया जिरगा (ग्रँड कौन्सिल)मध्ये अफगाणी लोकांनी या दोन्ही सीमारेषा बेकायदेशीर असल्याचे सांगत ड्युरांड रेषा करार नाकारला आहे. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रातही अफगाणिस्तानने दाद मागितली आहे.
बलुचिस्ताननेही पर्शिया आणि ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्यासाठी आपले प्रयत्न चालूच ठेवले होते. १९२० साली मीर युसुफ माग्सी, अझीझ कुर्द आणि अमिन मझारींसह काही बलुचींनी अंजुमन-ए-इत्तेहाद-ए-बलुचिस्तान (बलुचिस्तान ऐक्य मंडळी)ची स्थापना केली. बलुचिस्तानचे स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी ब्रिटिशांची वसाहतवादी राजवट संपविणे, स्थानिक बलुची भाषांचे संवर्धन, आधुनिक शिक्षणपद्धतीची सुरुवात करणे, तसेच येथील संस्कृती व ऐतिहासिक वारशांचे जतन करणे हे या लोकांचे ध्येय होते. त्यामध्ये बलुचिस्तानमध्ये लोकशाही राज्याची स्थापना करणे हे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट होते.
या ध्येयाच्या प्राप्तीसाठी, १९३३ साली युसुफ माग्सी यांना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी व्यावहार्यता तपासणे व कायदेशीर मार्गांचा विचार करण्यासाठी लंडनला पाठविण्यात आले. ब्रिटिश सरकारसमोर बाजू मांडण्यासाठी वकिलाची नेमणूक करा, असा सल्ला माग्सी यांना देण्यात आला. त्यानुसार कलातच्या खानाची बाजू मांडण्यासाठी एका गुजराती वकिलाची नेमणूक करण्यात आली. हे वकील होते पाकिस्तानचे संस्थापक एम.ए. जिना. ब्रिटिशांकडे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची बाजू मांडणे हे त्यांचे काम होते, ते त्यांनी १९३६ पासून पाकिस्तानच्या निर्मितीपर्यंत केले. बलुचींचा पाकिस्तानशी असलेला एवढाच काय तो संबंध.

पाकिस्तान सरकारने बलुचींची फसवणूक केली, असे बलुची लोकांना कोणत्या कारणांमुळे वाटते? 
भारतीय मुस्लिमांमधील फार थोडे मुस्लीम पाकिस्तानच्या निर्मितीच्या बाजूने होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला विरोध व शह देण्यासाठी इंग्रजांनी मुस्लीम लीगची स्थापना केली. त्यामुळे जेव्हा भारतात सत्ता चालणे अशक्य होण्याची वेळ आली तेव्हा भारतीय लोकशाही राज्याचे महत्त्व कमी करण्यासाठी पाकिस्तान या संकल्पनेला बळ देण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला दाबण्यासाठी ज्या संरचनेचा आधार घेतला होता, त्याच संरचनेकडे पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतरही सत्तेचे हस्तांतरण करण्यात आले. या संरचनेमध्ये पंजाबी मुस्लीम लष्कर, धार्मिक, व्यावसायिक आणि राजकीय घटकांचा समावेश होता. त्यामुळे पाकिस्तानात स्वातंत्र्य, मानवता, लोकशाही, विचारस्वातंत्र्य, धर्माचे सत्तेपासून वेगळे असणे, कायद्याची सत्ता या संकल्पनांना थारा नाही, हे वेगळे सांगायला नको.
याच्याबरोबर उलट बलुचिस्तान हे पुरातन इतिहासावर आधारित राष्ट्र आहे. स्वातंत्र्यासाठी बलुचिस्तानने एम.ए. जिना यांची वकील म्हणून नेमणूक केली होती आणि ते बलुच स्वातंत्र्याच्या पक्षामध्येही होते. इतकेच नव्हे तर त्यांनी ४ आॅगस्ट १९४७ रोजी स्टॅण्डस्टिल अ‍ॅग्रीमेंटवर स्वाक्षरीही केली. या कराराच्या आधारावरच बलुचींनी स्वातंत्र्याच्या मागणीचा उच्चार केला. त्यापाठोपाठ ११ आॅगस्ट १९४७ रोजी बलुचिस्तानचे सत्ताधीश अहमद यार खान यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली. याचे वृत्तांकन १२ आॅगस्टच्या न्यू यॉर्क टाइम्समध्ये झाले होते. त्यानंतर बलुचिस्तानच्या हाऊस आॅफ कॉमन्ससाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये ५२ पैकी ३९ जागा बलुचिस्तान नॅशनल पार्टीला मिळाल्या. जेव्हा बलुचिस्तान पाकिस्तानात सामील व्हावे असा ठराव मांडण्यात आला तेव्हा वरिष्ठ आणि कनिष्ठ दोन्ही सभागृहांनी तो नाकारला आणि बलुचिस्तानच्या स्वतंत्र अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले. बलुचिस्तानच्या स्वतंत्र अस्तित्वाचा निर्णय जिनांना समजल्यावर त्यांनी ब्रिटिशांच्या संमतीने पंजाबी मुस्लीम लष्कराच्या मदतीने १८ मार्च १९४८ रोजी बलुचिस्तानवर ताबा मिळवला आणि बेकायदेशीरपणे तो पाकिस्तानला जोडला. प्रश्न पाकिस्तानने बलुचिस्तानला फसविण्याचा नसून बलुचिस्तानच्या लोकशाही हक्काचा आहे. बलुचिस्तानने वसाहतवादापासून स्वतंत्र होण्याच्या आणि स्वत: जगण्याचा मार्ग व सरकार ठरविण्याच्या अधिकारावर चर्चा झाली पाहिजे.

बलुचिस्तानमध्ये सरकारकडून होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल बोलले जाते, त्याबद्दल थोडे सांगा..
पाकिस्तानच्या फॅसिस्ट सत्ताधाऱ्यांकडून बलुचिस्तानमध्ये झालेल्या अनन्वित अत्याचार आणि मानवी अधिकारांच्या उल्लंघनाबद्दल थोडक्यात सांगणे केवळ अशक्य आहे, इतकी त्यांची संख्या व स्वरूप मोठे, क्रूर आहे. बलुचिस्तानवर पाकिस्तान आणि इराणचा ताबा हा बलुच इतिहासातील काळा टप्पा म्हणावा लागेल, त्याशिवाय इतिहासात इतका क्रूर, विध्वंसक काळ कोणताच नसेल. बलुच राजकीय कार्यकर्त्यांचे आणि विचारवंतांचे खून हा येथे सर्वसामान्य प्रकार आहे. बलुच नेते बलाच मारी यांचा २००७ मध्ये खून झाला. प्रसिद्ध विचारवंत प्रा. सबा दश्तीयारी यांची १ जून २०११ रोजी हत्त्या झाली तर दुसरे महत्त्वाचे प्राध्यापक अब्दुल रझाक झेहरी बलोच यांना ११ जुलै २०१३ रोजी संपविण्यात आले. हाबी जलीब बलोच या नावाजलेल्या वकिलांना १४ जुलै २०१० रोजी ठार मारण्यात आले. या हत्त्यांबरोबर बलुच राजकीय नेत्यांच्या हत्त्या (एक्स्ट्राज्युडिशिअल मर्डर्स)ही पाकिस्तानने चालू ठेवल्या आहेत. १९६० साली नवरोज खान यांच्या पाच मुलांना आणि भाच्यांना सुक्कुर कारागृहामध्ये मारण्यात आले. नवरोज खान यांनी पाकिस्तानविरोधात १९५८ साली उठाव केला होता, वयाच्या ९०व्या वर्षी त्यांचा कारागृहातच मृत्यू झाला.
एखाद्या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याला गाडीमागे बांधून फरपटत नेणे हादेखील पंजाबी लष्कराचा आवडता खेळ आहे. १९७०च्या दशकामध्ये मिर्झा मारी यांचा पुत्र वाजा वादेराह शिर हमाद अलियानी याला चाप्पी काच गावापासून खान सुरेन खौर गावापर्यंत गाडीमागे बांधून फरपटत नेण्यात आले होते. अनेक लोकांवर एकत्रित अत्याचार करण्याची पद्धत १९७३-७७च्या संघर्षात चालू झाली. एखाद्या व्यक्तीला उंचावरून फेकून देणे आणि मग त्याचा सावकाश होणारा वेदनादायी मृत्यू पाहण्याचा ‘आनंद’ ते लुटत असत. बलुचिस्तानमध्ये याप्रकारचा क्रूर प्रघात असल्याचे ब्रिगेडियर तारिक महमूद यांनी अतिशय अभिमानाने मान्य केले होते. या प्रकाराला स्वॅट मॉडेल असे नावही देण्यात आले होते. पाकिस्तानी लष्कर आणि जिहादी गटांनी पाकव्याप्त बलुचिस्तानमध्ये असंख्य कारागृहांची निर्मिती केली आहे. बलुच कैद्यांना इतर कैद्यांसमोर फाशी देणे ही पंजाबी अधिकाऱ्यांची आवडती गोष्ट होती. मानवी अधिकारासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना मारण्याची तर हजारो उदाहरणे देता येतील. अब्दुल गफार लांगोव बलोच यांना २००१ पासून अनेकदा अटक झाली होती. ११ डिसेंबर २००९मध्ये त्यांना पुन्हा अटक झाली, त्यानंतर त्यांचा कोणताच थांगपत्ता लागला नाही, १ जुलै २०११ रोजी त्यांचा थेट मृतदेहच सापडला. नूर महंमद मारी यांचा अटकेत अनन्वित छळ करण्यात आला. हमिज शाहीन यांना २० मार्च २०११ रोजी अटक झाली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा छिन्नविछिन्न स्थितीतील मृतदेह सापडला. बलुच मुक्ती चळवळीचे आघाडीचे सदस्य आणि पत्रकार रझाक गुल यांना १८ मे २०१२ रोजी पकडून त्याच दिवशी संपविण्यात आले. सामान्य बलुची व्यक्तीने बलुच मुक्ती चळवळीबाबत आस्था दाखवली तर त्यालाही अशाच क्रूर छळाला सामोरे जावे लागते. लष्कराकडून बलुची गायक आणि कवींच्या घशात अ‍ॅसिड ओतण्याचे प्रकारही वारंवार केले जातात. घनी जान बलोच हा बलुच गायक यातून बचावला; पण त्याच्यावर अनन्वित अत्याचार झाल्यामुळे त्याला कायमचे अपंगत्व आले. डोळे फोडणे, अवयव कापणे, त्वचा काढणे असे अघोरी अत्याचार अनेक बळींवर करण्यात आले आहेत.
१९४८, १९५८, १९६२, १९६८, १९७३-७७ आणि २००२ या संघर्षाच्या काळामध्ये हजारो बलुचींना आपली घरे सोडावी लागली, कित्येकांची घरे सुटली गेली. १९७३-७७ या काळामध्ये पंधरा हजार बलुचींना ठार मारण्यात आले. वर्ष २००० पासून असंख्य मानवाधिकार कार्यकर्ते बेपत्ता आहेत. २० हजार बलुचींचे अपहरण झाले आणि त्यांना नाहीसे करण्यात आले. २००० बलुच राजकीय नेते आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे मृतदेह सापडले आहेत. १७ जुलै २०१४ रोजी खुसदार येथील तूटक येथे अपहृत कार्यकर्त्यांना दफन केलेले सामुदायिक स्मशान सापडले. पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानला छळण्यासाठी मुजाहिदीन, अल-कायदा, लष्कर-ए-तयबा, जैशे मोहमद इन्फाल ट्रस्ट, तेहरेक-ए-उर्मती रसूल आणि तेहरेक-ए-तफुझ-ए-किबिला या संघटनांना मदत केली आहे. पाकिस्तानच्या मदतीशिवाय या संघटनांना बलुचिस्तानमध्ये हालचाली करणे शक्य नाही. पाकिस्तानने अणुबॉम्बची चाचणीही बलुचिस्तानातच घेतली हेदेखील लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तानने इथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करून त्याचा विनाश केला आहे. बलुचींना त्यांच्या भाषा, संस्कृती, कला, संगीत, नैतिक व सांस्कृतिक मूल्यांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. बलुच समाज, अर्थव्यवस्था, पर्यावरणाचा पूर्णत: नाश करण्यात आला असून, बलुच राष्ट्र दरिद्री झाले आहे.

बलुचिस्तानच्या विकासासाठी आपण जगाने काय भूमिका घ्यावी, असे आपल्याला वाटते?
बलुचिस्तानच्या स्थितीबद्दल जगाला आता हळूहळू माहिती मिळत आहे. इतकी वर्षे वसाहतवादी शक्तींनी बलुचिस्तानला इतर जगापासून दूर बंदिस्त करून ठेवले होते. मात्र आता रशियन साम्राज्याचा अस्त, अरब उठाव आणि माहिती तंत्रज्ञानाच्या, संवादक्षेत्राच्या विकासामुळे इराण आणि पाकिस्तानसारख्या वसाहतवादी सत्ता बलुचांवर होणारे अन्याय लपवू शकत नाहीत. दुसऱ्या बाजूस बलुचांनी आपली स्वातंत्र्य चळवळ धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीची असल्याचे सिद्ध केले ्आहे. जगाला याची जितकी माहिती मिळत जाईल तितका लोकशाही देशांचा बलुची लोकांना पाठिंबा मिळत जाईल. जोपर्यंत बलुच पूर्ण लोकशाही व्यासपीठावर येऊन तसेच योग्य मार्ग आखून एकत्र येणार नाहीत तोपर्यंत जगाचा त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होणार नाही.

पाकिस्तान आणि चीन बलुचिस्तानचा आवाज दाबण्यासाठी एकत्र येतील असे आपल्याला वाटते का?
- पाकिस्तान आणि चीन बलुचिस्तानची स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी आधीच एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान चीनची दिशाभूल करत आहे. पाकिस्तानच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक असतो. बलुच लोकांच्या वतीने इतर पक्षांनी केलेले सर्व करार आम्ही बेकायदेशीर मानतो. चीन आणि पाक लष्कराने बलुचिस्तान मधील नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी व बंदरांसाठी केलेले करार बेकायदेशीरच आहेत. चीनने हे करार रद्द करावेत, अशी आमची मागणी आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट रोजी केलेल्या भाषणाकडे आपण कसे पाहता?
- नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचे महत्त्व खालील कारणांमुळे आहे, असे मला वाटते.
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाबद्दल फाळणीनंतर प्रथमच भारताच्या पंतप्रधानांनी आव्हान दिले आहे. पाकिस्तान ही एक अपयशी व्यवस्था आहे. पाकिस्तानच्या लष्करामुळे त्याच्या सर्व शेजारी देशांना सहन करावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याला पुष्टीच मिळाली असून, यामुळे बलुचींनी आजवर सहन केलेल्या वेदना आणि शोषणाची दखल घेण्यात आली आहे. भारताच्या भूमिकेमुळे बलुचिस्तानला आपला आवाज दूरवर नेण्यात यश मिळणार आहे.

बलुचिस्तान व भारत यांच्यामधील ऐतिहासिक-सांस्कृतिक संबंधांबद्दल काय सांगाल?
- फाळणीपूर्वी बलुचिस्तान आणि भारत हे शेजारी देश होते. भारतीय संस्कृती सर्वात प्राचीन आहे. बलुचिस्तानसह संपूर्ण प्रदेशावर भारताचा प्रभाव आहे. पण लक्ष वेधण्यासारखी सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे बलुचिस्तान आणि भारताचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण धर्मनिरपेक्ष आणि मानवतावादी आहे. भारत आणि बलुची लोकांसाठी धर्म आणि श्रद्धा या वैयक्तिक बाबी आहेत. बलुच आणि भारतीय त्यांचे सामाजिक प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवतात. बलुचांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यास इंग्लंडमधून पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे भारताच्या लोकशाही भूमिकेलाही नेहमीच पाठिंबा दिला. बलुचिस्तानचे स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित झाल्यास भारताला सामरिकदृष्ट्या, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मदत होणार आहे. भारताला महासत्ता होण्यासाठी बलुच राष्ट्रासारखा मित्रही मिळेल. बलुचिस्तानचा अफगाणिस्तान शांत होण्यातही हातभार लागणार आहे. मध्य आशिया, अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांच्या माल वाहतुकीसाठी बलुचिस्तान ट्रान्झिट पॉइंटसारखा वापरला जाऊ शकतो. भारत आणि बलुचिस्तानच्या मैत्रीमुळे चीनच्या विस्तारवादाला खीळ घालता येईल.

(डॉ. शाहझवार करिमझादी हे इंग्लंडमध्ये हर्टफोर्डशायर विद्यापीठात अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याते आहेत. त्यांनी इंग्लंडसह अनेक देशांमध्ये अध्यापनाचे काम केले आहे. ते लंडनमधील ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूटमध्ये सिनिअर रिसर्च फेलोदेखील आहेत. डॉ. शाहझवार यांनी बी.एस्सी. आणि लंडन विद्यापीठाकडून अर्थशास्त्रातील एम.ए. पदवी संपादन केली आहे. त्यांनी मॉनेटरी इकॉनॉमिक्समध्ये पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांनी लंडन विद्यापीठाच्या ब्रिकबेक महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयात पदवीही त्यांनी घेतली असून, ग्रीनविच विद्यापीठातून शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांनी तीन पुस्तकांचे लेखनही केले आहे.)

संवाद : ओंकार करंबेळकर

 

Web Title: ... it is enough!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.