कामगारांचा तो ऐतिहासिक संप
By admin | Published: June 14, 2014 06:28 PM2014-06-14T18:28:19+5:302014-06-14T18:28:19+5:30
संघटना नाही. संपाचा आदेश नाही, संपासाठी कामगारांची स्वत:ची मागणी नाही, असंतोषाच्या जनकाच्यावरील अन्यायाविरूद्ध संप. साम्राज्यशाहीच्या दडपशाही विरोधात संप. कामगार क्षेत्रातील न भूतो न भविष्यती अशी ही घटना. त्याला दिलेला उजाळा..
Next
सूर्यकांत परांजपे
कार्तिकी यात्रेनिमित्त भव्य स्वदेशी संमेलन व प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याठिकाणी टिळकांनी स्वदेशीचा अर्थ स्पष्ट केला. ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकून जनतेचे कर्तव्य संपत नाही, तर स्वत:च्या राज्याची-स्वराज्याची मागणी केली पाहिजे, असे सांगून हा मंत्र खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आदेश त्यांनी दिला. त्यांनी जनसमुदायाला सांगितले, की देशाची स्थिती कठीण होत चालली आहे. दडपशाहीचे कायदे पास होत आहेत. तुम्ही ज्या श्रद्धेने पंढरपूरला येता त्या श्रद्धेने, निष्ठेने, कळकळीने देशाचा विचार करा. या स्थितीची खेड्यापाड्यांपर्यंत चर्चा करा. आज जनतेकडे शस्त्रे नसली तरी स्वदेशीचे प्रभावी अस्त्र आहे आणि त्याचा वापर करा. १५ डिसेंबर १९0७ रोजी चिंचपोकळी येथे तेल्या-तांबोळय़ांच्या पुढार्यांचे मजुरांसमोर भाषण झाले. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले, की स्वदेशी हा पोटापाण्याशी निगडीत विषय आहे. मी गिरणीतील कापड घेतो म्हणून तुम्हाला मजुरी मिळते. स्वदेशीपासून तुमचा फायदा आहे. उदरनिर्वाहासाठी तुम्ही येथे येता. उद्योगधंदे आहेत. म्हणून स्वदेशीचा हेतू तुम्हाला उद्योगधंदे मिळावेत, जे आहेत ते भरभराटीस येवून तुमचे कल्याण व्हावे हा आहे. तुम्ही २ लाख आहात. तुम्ही ही स्थिती समजावून घ्यावी व समजल्यावर इतरांना सांगावी, हेही त्यांनी सांगितले. हा तर्क जनतेच्या मनाला भिडला. स्वदेशी चळवळीचा परिणाम म्हणून भारतातील ब्रिटिश कापडाची आयात घटली. १९0७ मध्ये मँचेस्टरमधून होणार्या कापडाची आयात ४ कोटी २५ लाख यार्डने घटली. टिळकांनी सांगितले, की काबाडकष्ट करून निर्वाह करणार्या बहुसंख्य लोकांची स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत देशस्थिती सुधारली, असे म्हणता येणार नाही.
अशा तर्हेने असंतोषाच्या जनकाच्या या आवाहनाने शेतकरी, कामकरी, व्यापारी, शेठजी, विचारवंत असे सर्वजण जनशक्तीत सामील झाले. सुरत येथील काँग्रेसच्या अधिवेशनात लोकमान्यांनी भाकीत केले, की आता देशात दडपशाही सुरू होणार. त्यांचे भाकीत खरे ठरले. मोठय़ा प्रमाणात दडपशाही सुरू झाली. सुशीलचंद्र सेन नावाच्या कोवळय़ा मुलाला सेशन जज्ज किंग्ज फोर्ड यांनी फटक्यांची शिक्षा सुनावली होती. याची प्रतिक्रिया म्हणून किंग्जफोर्ड यांचे दिशेने अँसिड बाँब फेकला गेला. त्यात केनेडी नावाची स्त्री व तिची मुलगी मृत्युमुखी पडली. यामुळे सरकारच्या दडपशाहीचे होमकुंड पेटले व त्यात अनेकांच्या आहुत्या पडू लागल्या.
दडपशाहीमुळे लोकमान्य अस्वस्थ झाले. १२ मे १९0८ रोजी ‘देशाचे दुर्दैव’ या लेखाद्वारे राज्यकर्त्यांच्या बेजबाबदारपणावर टिका केली. ९ जून १९0८ रोजी ‘हे उपाय टिकाऊ नाहीत’ हा अग्रलेख प्रसिद्ध करून दडपशाहीमुळे माथेफिरू निर्माण होतात, असे म्हटले. या लेखातून सरकार विषयी जनतेमध्ये द्वेष व तिरस्कार उत्पन्न केला व तसा प्रयत्न केला असे आरोप करून टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला. त्यांना २४ जून १९0८ रोजी अटक झाली.
१३ जुलै १९0८ रोजी खटल्याची सुनावणी सुरू झाली. टिळकांनी स्वत: संपूर्ण केस चालवली. उलट तपास घेतला. न्यायालयासमोर २३ तास भाषण केले. राजद्रोहासंबंधी काय समज आहे हे दाखविण्यासाठी इंग्लिश लॉ रिपोर्टातील अनेक उदाहरणे दिली. विलायतेत वर्तमानपत्रांना जी सवलत मिळते ती मला मिळाली पाहिजे, अशी मागणी लोकमान्यांनी केली.
राष्ट्रीय चळवळ मोडून काढण्याचा चंग बांधलेले सरकार टिळकांना दोषी धरणार हे निश्चित होते. राजद्रोहाचे आरोप असलेल्या खटल्याचा निकाल २२ जुलै १९0८ रोजी रात्री १0 वाजता लागला. राजद्रोहासाठी न्यायमूर्ती दावर यांनी लोकमान्यांना ६ वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून एक हजार रुपयांचा दंडही केला. शिक्षा भोगण्यासाठी त्यांची रवानगी मंडालेच्या कारागृहात केली गेली.
शिक्षेची अटकळ कामगारांनी बांधली होती. त्यामुळे शिक्षेची वार्ता ऐकण्यापूर्वीच संपाला थोड्याफार प्रमाणात सुरूवात झाली होती. प्रत्यक्ष शिक्षेची बातमी कानी पडताच शिक्षेचा व साम्राज्यशाहीच्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी कामगारांनी कडक हरताळ पाळण्याचा निर्णय केला. शिक्षेच्या प्रत्येक वर्षाला एक याप्रमाणे कामगारांनी ६ दिवस कापड गिरण्यांत संप केला. कामगारांच्या संपात दुकानदारही सामील झाले होते. संपाचे ६ दिवस झाले तरी ते दुकाने उघडण्याच्या मनस्थितीत नव्हते. कामगारांची तीच अवस्था होती.
खटल्याच्या सुनावणीच्यावेळी कामगारांचे थवेच्याथवे हायकोर्टाकडे जायचे. लोकमान्यांबद्दल कामगारांच्या मनात एवढा आदर होता, की त्यांच्या अटकेच्या बातमीने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. १६ जुलै १९0८ रोजी खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी क्विन व लक्ष्मीदास गिरण्यांतील कामगारांनी संप पुकारला. इतर गिरण्यांत जाऊन दंगल केली. १९ व २0 जुलैला सर्वच गिरण्यांतील कामगारांनी संप पुकारला.
संघटना नाही. संपाचा आदेश नाही, संपासाठी कामगारांची स्वत:ची मागणी नाही, असंतोषाच्या जनकाच्यावरील अन्यायाविरूद्ध संप. साम्राज्यशाहीच्या दडपशाही विरोधात संप. कामगार क्षेत्रातील न भूतो न भविष्यती अशी ही घटना होती.
(लेखक कामगार क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)