सजग भोक्ता कसं व्हायचं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 06:50 AM2018-09-16T06:50:23+5:302018-09-16T06:50:23+5:30
सायकल चालवतो, पोहायला शिकतो, ध्यानही तसंच सहज शिकता येतं. प्रत्येक गोष्ट सरावाशी जोडलेली असते. ध्यान हे कोणतंही गूढ नाही,ध्यान म्हणजे संसारातून विरक्तीही नाही.³f ती एक शुद्ध ऐहिक प्रक्रिया आहे.
-डॉ. यश वेलणकर
ध्यान या शब्दाचा संदर्भ आपण अध्यात्म, धर्म, उपासना यांच्याशी जोडला आहे. ध्यान-धारणा म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी किंवा साक्षात्कारासाठी करायची साधना असा अर्थ गृहीत धरला जातो. आपण ध्यानाचा तो अर्थ गृहीत न धरता त्याचा ऐहिक अंगाने विचार करीत आहोत. ध्यान हा शब्द उच्चारताच अंधर्शद्धा निर्मूलनाची तात्त्विक बैठक असलेले बुद्धिवादी त्याकडे थोतांड म्हणून पाहू लागतात, तर सर्शद्ध धर्माभिमानी आपल्याच धर्मात सांगितलेले ध्यान कसे शास्त्रीय आहे हे सांगू लागतात.
मानसोपचार आणि मेंदूविज्ञान अशा दोन अंगांनी सध्या ध्यानावर संशोधन होत आहे. त्याचा परिणाम म्हणून परदेशात ध्यान पद्धती चिकित्सा म्हणून वापरली जाते आहे. आपल्या देशात ध्यान शिकवले जाते; पण ते जुन्या किंवा नव्या संप्रदायाच्या बंधनात आहे. ते संप्रदायमुक्त करणे आवश्यक आहे. ध्यान पद्धती चिकित्सा म्हणून वापरणारे डॉक्टर आपल्या देशात खूप कमी आहेत. जे आहेत ते कोणत्या न कोणत्या संप्रदायाचे अनुयायी आहेत. ही स्थिती बदलणे आवश्यक आहे.
मानसिक तणाव, डिप्रेशन, आत्महत्या यांचे प्रमाण कमी करायचे असेल तर माइण्ड फुलनेसचा थेरपी म्हणून उपयोग करणारे थेरपिस्ट अधिकाधिक तयार व्हायला हवेत.
ध्यान हे आपण साधू आणि ¬षी यांच्याशी जोडले आहे. त्यामुळे ती काहीतरी गूढ प्रक्रि या आहे, असा आपण गैरसमज करून घेतलेला आहे. ही गूढता काढून टाकणे आवश्यक आहे.
आपण ध्यान अध्यात्माशी जोडले असल्याने एखादा माणूस ध्यान करू लागला म्हणजे संसारापासून विरक्त झाला,
मोक्षाच्या मार्गाला लागला असा चुकीचा समज करून घेतो. आपण जे ध्यान समजून घेत आहोत ती शुद्ध ऐहिक प्रक्रिया आहे. संसारी माणसाने सर्व व्यवहार करीत असताना स्वत:ला आनंदी, उत्साही आणि स्वस्थ ठेवण्याचा तो एक उपाय आहे. सजगता ध्यान हे सजगता वाढवणारा मेंदूचा व्यायाम आहे.
सजग भोक्ता व्हायचे म्हणजे परिसराचे भान ठेवायचे पण स्वला विसरायचे. भूतकाळातील अपमान आणि भविष्याच्या चिंता सोडून देऊन त्या क्षणाचा आनंद घ्यायचा. पंचज्ञानेंद्रियांनी तो क्षण उत्कटतेने अनुभवायचा. सौंदर्य न्याहाळायचे, रस चाखायचा, गंध हुंगायचा, नाद ऐकायचा आणि स्पर्श अनुभवायचा. सजगता नसेल तर असा आनंद अनुभवता येत नाही, कारण मनात विचार येत राहतात. हे विचार एकतर तुलना करणारे असतात. या क्षणाची, या अनुभवाची दुसर्या अनुभवाशी तुलना होत राहते. या गाण्याची त्या गाण्याशी तुलना, या दृश्याची त्या दृश्याशी तुलना. असे तुलना करणारे, दुसर्या क्षणाची आठवण देणारे विचार येत राहतात किंवा आता हा आनंद मिळतो आहे हा सतत कसा मिळेल, उद्या कसा मिळेल याचे विचार मनात येत राहतात. सजगतेच्या, माइण्ड फुलनेसच्या नियमित अभ्यासाने असे विचार कमी होतात. ते आले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष कसे करायचे याचे कौशल्य विकसित होते. म्हणूनच रसिकतेने आयुष्याचा आनंद घेण्यासाठी सजगता ध्यानाचा अभ्यास आवश्यक आहे.
रसिकता परिस्थितीवर अवलंबून नसते, मन:स्थितीवर असते. उपभोगाचा हव्यास म्हणजे रसिकता नाही. सुंदर दिसणारे प्रत्येक फूल मलाच मिळायला हवे असे वाटणे म्हणजे रसिकता नाही. सौंदर्याचा, विविधतेचा आदर करणे म्हणजे रसिकता, माझ्या उपभोगाचा आणि मीचाच विसर पडणे म्हणजे रसिकता. अशी रसिकता विकसित करावी लागते. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. बुद्धिबळाचा खेळ माहीत असेल तरच त्याचा आनंद घेता येतो. सूर, ताल आणि राग यांचे ज्ञान असेल तरच गायकाने घेतलेली जागा लक्षात येते. आज इंग्लिश मीडिअममध्ये शिकत असलेल्या अनेक मुलांना पु. ल. देशपांडे यांचा विनोद कळत नाही, त्याचा आनंद घेता येत नाही कारण मराठी शब्दांचे विविध अर्थ त्यांना माहीत नसतात. रसिक होणे ही एक साधना आहे.
सजगता ध्यान म्हणजे माझे शरीर आणि मन यांच्याप्रती साक्षीभाव वाढवायचा. शरीरातील संवेदना, मनातील भावना साक्षीभावाने पाहायच्या; पण याचा अर्थ जबाबदारी नाकारायची आणि आनंदाचा, सुखाचा त्याग करायचा असे नाही. सजग व्हायचे म्हणजे निर्णयक्षमता विकसित करून अधिक चांगला कर्ता व्हायचे आणि रसिकता विकसित करून अधिक चांगला भोक्ता व्हायचे. ही प्रक्रि या आयुष्यभर चालू ठेवायची.
(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)
yashwel@gmail.com