हे प्रेमाचे संगीत आहे...हृदयाशी संबंधित आहे....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:11 AM2018-11-25T09:11:00+5:302018-11-25T09:15:02+5:30
सखी माझी : माझ्या कवीहृदयाच्या हळुवार कप्प्यात गोड, सुंदर व लोभस सखीचे आकर्षक रूप दडलेले आहे.
- कवी योगिराज माने
माझ्या कवीहृदयाच्या हळुवार कप्प्यात गोड, सुंदर व लोभस सखीचे आकर्षक रूप दडलेले आहे. हा कप्पा मात्र मला जिवापाड प्रिय आहे. मी एकांतातच हा कप्पा उघडतो व माझ्या सखीची भेट घेतो. तिच्याशी संवाद साधून मी आनंदी होतो, मोहरतो, बावरतो व रोमांचितही होतो. सखीची लाडिक अदा माझ्या जीवाला भूल पाडते. सखीनामाच्या उच्चाराने दिवसाचा प्रारंभ झाल्यावर माझ्या आनंदाला उधाण येते. सखीशी साधलेला क्षणभराचा लाडिक संवादही मला प्रचंड ऊर्जा देतो. मी नव्या जोमाने व उमेदीने आयुष्याला सामोरे जाण्यास तयार होतो. समोर येणारे प्रश्नही मला सोपे वाटतात आणि उत्तरे सापडू लागतात.
सखीच्या भक्कम साथीने जगण्याचे कोडे सुटू लागते. तिच्या धुंद सहवासामुळे अवघ्या चराचरातून संगीत ऐकू येऊ लागते. पंचेंद्रिये तृप्त होतात. संपूर्ण भोवताल सुंदर दिसू लागतो. मनाचे फुलपाखरू आभाळात गिरक्या घ्यायला लागते. साऱ्या आसमंताला गुलाबी छटा प्राप्त होते. प्रेमाची धून अहर्निश वाजू लागते. तसे संगीताचे अनेक प्रकार आहेत. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, पाश्चात्य संगीत यासोबतच नितांत सुंदर असलेले प्रेमाचे संगीत. प्रेमाच्या संगीताची महती व नशा प्रेमवीरांनाच ठाऊक. प्रेमाच्या संगीताचे सूर, ताल व बोल वेगळे असतात.
आपल्या सखीला न बोलताही सारे कळू लागते. इशाऱ्याला बोल फुटतात. प्रेमाच्या संगीताची जादू काही औरच असते. हे संगीत केवळ आणि केवळ हृदयाशी संबंधित असते. हे संगीत ऐकताच प्रेमिकांना प्रेमज्वर चढतो; परंतु काही केल्या तो उतरत नाही. त्यासोबतच माझ्या सर्वांगावर प्रेमाचा रंगही सांडल्यामुळे माझ्या आयुष्याला सुंदर इंद्रधनूचे रूप प्राप्त झाले आहे. प्रेमरंगामुळे मला इतर सर्व रंग फिके वाटत आहेत. माझ्या जीवाला सखीची एक अनावर ओढ प्रत्येक क्षणी लागलेली असते.
तिच्या आठवणींनी माझ्या मनावर मोरपीस फिरते व तिच्या निकटच्या दर्शनाने माझ्या कवीमनाला वेड लागते. या वेडामुळेच मला माझे जगणे सुसह्य व आनंददायी होते. आजकाल मी कोणाच्या अंकित आहे, हे माझ्या श्वासांनाही कळू लागले आहे, एवढे मात्र खरे़
हे प्रेमाचे संगीत आहे..
हृदयाशी संबंधित आहे....
क्षेत्र गुलाबी केवळ आमुचे..
परक्याला प्रतिबंधित आहे....
तिचा सांडला रंग मनावर..
माझी दुनिया रंगीत आहे....
श्वासांनाही कळू लागले..
मी कोणाच्या अंकित आहे....
या जन्मी ती सखी भेटली..
किती पिढ्यांचे संचित आहे...