जाफरखानी सतारिया ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:54 PM2019-02-23T23:54:53+5:302019-02-24T00:02:59+5:30
ख्यातनाम प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांना अनेक प्रतिभावंत गायक -वादक - कलावंतांचा सहवास मिळाला. ते क्षण टिपणाऱ्या कॅमेऱ्यामागच्या त्यांच्या नजरेने केवळ संस्मरणीय प्रकाशचित्रेच नव्हेत, तर श्रीमंत आठवणींचा ऐवजही जपला. अशाच आठवणींची ही मालिका.
माझ्या प्रकाशचित्रणास सुरुवात होऊन दोन-तीन वर्षेच झाली होती. शास्रीय संगीताच्या आवडीमुळे साहजिकच सर्व मैफिलींमध्ये आता श्रवणानंदाबरोबरच कलावंतांच्या भावमुद्रा कॅमऱ्यात बंदिस्त करण्याचा छंदही जडला होता. दोन-तीन वर्षात जमलेल्या भावमुद्रांचे एक प्रदर्शन करावे असेही मनात येत होते. ‘औद्योगिक प्रकाशचित्रण’ करणे हा व्यवसायाचा भाग असल्याने अधूनमधून मुंबईला चक्कर असे. कधी काही साहित्य आणण्यासाठी, कधी मुंबईच्या वेगवेगळ्या आर्ट गॅलरीतून प्रदर्शित होणारी प्रदर्शने पाहण्यासाठी तर कधी नुसतीच जिवाची मुंबई करण्यासाठी. त्यातच एखादी संगीत मैफल असेल तर मग तो ‘अॅडिशनल’ आनंदही..
असेच एके दिवशी मी व माझा मोठा भाऊ हेमंत काही कामासाठी मुंबईला गेलो. शिवाजी पार्कजवळील राजा बढे चौकात एक काम होते. ते लगेचच झाले. नंतर रमत गमत आम्ही शीतला देवी मंदिरापर्यंत पोहचलो. आमच्याजवळ वेळ भरपूर होता. सहज मनात आले म्हणून तेथील एका गल्लीत वळलो. विविध प्रकारची छोटी छोटी दुकाने. आम्ही मजा घेत चालत राहिलो.
बरेच पुढे गेल्यावर एक शिंप्याचे दुकान दिसले. दोनच शिलाई मशीन. एक जण खाली मान घालून शिलाई करीत होता तर दुसरा एका उभ्या व्यक्तीशी गप्पा मारत होता. या दृश्यात तसे विशेष काहीच नाही. पण दुकानात उभी असलेली ती व्यक्ती साधारण सहा फूट उंचीची असावी. काळेपणाकडे झुकलेला वर्ण, कुरळे म्हणता येतील असे घनदाट केस, लक्ष वेधून घेणारे बाकदार नाक आणि अंगात वर लाल रंगाचा कुडता व खाली जांभळ्या रंगावर नक्षी असलेली लुंगी.
या व्यक्तीला आपण नक्कीच आधी पाहिलंय असं आम्हाला दोघांनाही वाटत होतं. पण लक्षात येत नव्हतं. आम्ही तसेच पुढे गेलो. काही पावले चालल्यावर एकदम ट्यूब पेटली... त्या व्यक्तीला आपण ग्रामोफोन कंपनीच्या लाँग प्ले रेकॉर्ड कव्हरवर पाहिलंय. ते सतारवादक आहेत. पण एवढा मोठा सतारवादक अशा वेशात आणि तेही अशा छोट्याशा टेलरकडे कशाला येईल? मनात विचार आले.. त्यांच्यासारखीच दिसणारी व्यक्ती असेल, जाऊ दे. पण पाय पुढे टाकवेना. परत उलटे फिरलो. दुकानापाशी येऊन उभे राहिलो.
त्यांनी आमच्याकडे पाहिले. धीर धरून
मनात शब्द जुळवले आणि त्यांना नमस्कार करीत मी विचारले, ‘‘माफ करा, आपण खाँसाहेब आहात का?’’
त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले.
ते म्हणाले, ‘‘जी हाँ. मैं अब्दुल हलीम जाफर खाँ हूँ. आपकी तारीफ?’’
आमच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. विश्वास बसत नव्हता; पण आमच्या समोर उभे होते पद्मश्री अब्दुल हलीम जाफर खाँ.
मग भानावर येत आम्ही आमची ओळख करून दिली. पुण्याहून आलोय हे सांगितले. त्यांना कौतुक वाटले. माझ्या गळ्यात कॅमेरा बॅग होतीच.
मी परत एकदा धीर एकवटून त्यांना माझ्या छंदाबद्दल सविस्तर सांगितले व विचारले की, ‘‘मी तुमचा फोटो काढू शकतो का?’’
त्यांच्या चेहऱ्यावर परत एकदा हास्य उमटले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाले, ‘‘यहाँसे नज़दिक ही मेरा घर है. वहाँ चलिये. वहाँ निकालेंगे.’’
किती साधेपणा ! ते दुकानाची पायरी उतरले व आम्ही त्यांच्या मागून चालू लागलो. काहीच अंतर गेल्यावर त्यांचे घर आले. ती एक जुन्या काळी बांधलेली इमारत होती. मध्यभागी मोकळे अंगणवजा चौक व डाव्या बाजूस लाकडी जिना. जिन्याने चढून आम्ही त्यांच्या घरात पोहोचलो.
बाहेरच्या खोलीतच त्यांचे दोन शिष्य सतार वादनाचा रियाज करीत बसले होते. त्यातील एका शिष्याला खाँसाहेबांनी आत जाऊन चहा करायला सांग असे फर्मावले व आम्हाला बसायला सांगितले.
मला वाटले की आता खाँसाहेब त्यांचा ड्रेस बदलायला जातील व चहा येईतोपर्यंत परत येतील. पण खाँसाहेब आमच्या समोरच बसले. त्यांनी खूण करताच कोपऱ्यात ठेवलेली त्यांची सतार त्यांच्या शिष्याने त्यांच्याकडे सोपविली.
उजव्या हाताच्या अनामिकेत अडकवलेली नखी त्यांनी तर्जनीच्या टोकावर लावली, करंगळीच्या नखाने हलकेच तरफेच्या तारा छेडल्या आणि ती खोली सतारीच्या स्वरांनी भरून गेली. ‘जाफरखानी’ बाजाचे निर्माते आणि उस्ताद विलायत खान, पं. रविशंकर यांच्या बरोबरीने भारतातील सितार त्रिमूर्तीचा अविभाज्य भाग असलेले उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान त्यांचे ‘जाफरखानी’ स्वरशिल्प साकारू लागले. मोठेपणाचा कोणताही आविर्भाव नाही की फोटोसाठी म्हणून वेगळा पेहराव नाही. श्रोते होतो आम्ही दोघे भाऊ व त्यांचा एक शिष्य!
माझ्या जन्माच्या एक वर्ष आधी प्रदर्शित झालेला ‘कोहिनूर’ हा चित्रपट शालेय जीवनात मी अनेक वेळेला पाहिला होता. बरेच दिवस माझा असा समज होता की ‘मधुबन में राधिका नाचे..’ या गाण्यातील सतार अभिनेता दिलीपकुमार यानेच वाजवली आहे. त्याचा अभिनय होताही तसाच. तंत्राची माहिती होत गेल्यावर उलगडा होत गेला. आणि ती सतार वाजवलेले समर्थ हात आत्ता आमच्यासमोर सतार छेडत होते.
मी बॅगमधून कॅमेरा काढला. ५० एमएम फोकल लेन्थची लेन्स. ४०० एएसएची
फिल्म आधीच भरलेली. फ्लॅश तर मी
वापरतच नव्हतो. रस्त्याच्या बाजूला असलेल्या भल्या मोठ्या खिडकीतून परावर्तित प्रकाश
खोलीत पसरला होता. आणि आता बरोबरीनेच सतारीचे स्वर.
मी त्यांच्या एका मागोमाग एक भावमुद्रा माझ्या कॅमेऱ्यात पकडत गेलो. माझ्या मनाजोगती प्रकाशचित्रे मिळाल्यावर मनात एक स्वार्थी विचार चमकून गेला की खाँसाहेबांनी सांगितलेला चहा अजून तासभर तरी येऊ नये. त्यांची तंद्री भंग पावू नये. म्हणजे ही अचानकपणे आमच्या पदरात पडलेली मैफल, हा स्वरांचा लोट असाच वाहता राहील. पण नशिबाला हे मान्य नव्हते. आणि थोड्याच वेळात चहाचे कप घेऊन तो दुसरा शिष्य आला. स्वरशिल्पात हरवलेले खाँसाहेब त्या जादुई दुनियेतून परत त्या खोलीत आले. एक जबरदस्त तिहाई घेऊन त्यांनी वाजवणे थांबवले, वाद्याला नमस्कार केला आणि सतार खाली ठेवली. परत एकदा तो हास्यभरीत चेहरा.
माझ्याकडे पाहून त्यांनी विचारले, ‘‘मिल गयी आपको सही तस्विरें?’’
मी होकारार्थक मान हलवली.
ते म्हणाले, ‘‘चलो, अब चाय पिते हैं.’’
वागण्यातही परत तीच सहजता.
मग चहापान झाले. आम्ही परत कसे जाणार आहोत याविषयी त्यांनी चौकशी केली.
त्यांना परत एकदा नमस्कार करून मी म्हणालो, ‘‘थँक्यू खाँसाहेब, कुछ ही दिनोंमे मैं आपके लिये प्रिंट्स लेकर आऊंगा..’’ ते हां म्हणाले व परत एकदा प्रसन्न हसले. आम्ही दोघेही निघालो. आम्हाला जिन्यापर्यंत निरोप द्यायला ते आले व म्हणाले, ‘‘आते रेहना.’’
जिन्याच्या लाकडी पायऱ्या उतरताना माझ्या मनात प्रश्न होते की आज सकाळी घरातून निघताना आपण कोणाचे दर्शन घेतले होते? शीतला देवीपाशी पोहोचल्यावर आम्हाला गल्लीत वळावेसे का वाटले? असा फोटोसेशन माझ्या नशिबात कोणी प्लॅन केला? काही मिनिटांपूर्वी ओळख झालेल्या आम्हाला स्वत:च्या घरी नेऊन चहा पाजून सतार ऐकवावी असे खाँसाहेबांना का वाटले असावे?
..पण असे प्रश्न पडले की त्याला कोणतेही तार्किक उत्तर मिळत नाही अन् आपण त्याचे श्रेय अलगद नशिबाला देऊन हलके होऊन जातो...
- सतीश पाकणीकर
sapaknikar@gmail.com
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)