काश्मीर घाटीतला हायवे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 06:02 AM2019-04-14T06:02:00+5:302019-04-14T06:05:05+5:30
जम्मू-श्रीनगर हायवे. या महामार्गावरच पुलवामाच्या हल्ल्याचे रक्त आहे. या हल्ल्याची पुनरावृत्ती टळावी आणि सुरक्षा दलांची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून हा अख्खा महामार्गच आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. जम्मू आणि श्रीनगर यांना जोडणारा हा रस्ता बंद राहणं म्हणजे इथल्या जनजीवनाची रक्तवाहिनीच गोठणं! ... तीन वर्षांपूर्वी याच रस्त्यावरून केलेल्या प्रवासाच्या आठवणी तेच तर सांगतात...
- समीर मराठे
जम्मू-श्रीनगर हायवे.
जागतिकीकरणाची पंचविशी पार केलेल्या भारतातले बदल पाहत कन्याकुमारीपासून भटकत आम्ही इथवर पोहोचलो होतो.
आॅगस्ट २०१६ची ही गोष्ट.
ठिकठिकाणी बदललेला, बदलत असलेला, भारताची विविधता दाखवणारा भूप्रदेश पाहात, तिथल्या माणसांचे, संस्कृतीचे, विकासाचे बदलते पदर मनात नोंदवत आम्ही पुढे पुढे जात होतो.
जम्मू-श्रीनगर हायवेवर पोहोचलो आणि हा प्रवास एकदम थबकला ! काश्मीर पुन्हा एकदा धडधडून पेटलेलं होतं. त्यात रोज रात्री हा रस्ता बंद असण्याची भर पडली होती. सुरक्षेच्या कारणास्तव बनिहालजवळचा जवाहर टनेल बंद करण्यात आलेला होता. सकाळी ९ ते संध्याकाळी ६, लष्करी वाहनं वगळता रस्ता सर्वांसाठी बंद!
आम्ही बनिहालजवळ पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे ६ वाजले होते आणि रस्ता बंद झालेला होता. जवाहर टनेलपाशी वाहनांच्या लांबच लांब रांगा. आमचीही गाडी त्या लायनीत उभी राहिली. दोनच मिनिटांनी मागे वळून पाहिलं तर आमच्यामागे आणखी शेकडो गाड्या लागलेल्या. पुढे आणि मागे कित्येक किलोमीटरपर्यंत रांग लागलेली ! आता ना पुढे जाता येत होतं, ना मागे फिरता येत होतं.
पाय मोकळे करायला म्हणून गाडीतून थोडा वेळ उतरलो. पाहिलं तर दगडफेकीत गाड्यांच्या काचा फुटलेल्या होत्या. अनेकांनी त्या फुटलेल्या काचांवर फडकी बांधलेली होती आणि त्याच अवस्थेत त्यांचा प्रवास सुरू होता.
संध्याकाळ वर चढत गेली, तशी अनेक ट्रक ड्रायव्हर्सनी आपापल्या ट्रकमधून स्टोव्ह, भांडी, डाळ, तांदूळ.. स्वयंपाकाचं सामान बाहेर काढलं आणि तिथेच रस्त्याच्या कडेला त्यांचा स्वयंपाक सुरू झाला. जेवण झाल्यावर दिवसभराच्या शिणवट्यामुळे अनेकांनी गाडीतच निवांतपणे ताणून दिली.. कारण आता पुढचे कित्येक तास कोणतीच गाडी इंचभरही पुढे सरकणार नव्हती.
या गर्दीत भारतभरातून आलेली माणसं जशी होती, तसे स्थानिक रहिवासीही होते. पर्यटकांची संख्या जवळपास शून्य असली, तरी काही ना काही कामानिमित्त, धंद्यानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी होती.
इतके तास इथे घालवायचे असल्यामुळे हळूहळू या साऱ्यांशीच गप्पाटप्पा सुरू झाल्या. प्रत्येकाची एकच दर्दभरी कहाणी होती. रस्ता बंद असल्यामुळे किती त्रास होतो आणि किती नुकसान होतं याची. वेळ जातो, खर्च वाढतो, नाशवंत माल असला तर नुकसान होतं आणि काहीही झालं तरी रस्त्यावरचं हे आयुष्य थांबवता येत नाही. महाराष्टÑ, पंजाब, हरयाणा, हिमाचल, केरळ, तामिळनाडू.. अगदी देशाच्या प्रत्येक टोकावरून आलेली वाहनं इथे दिसत होती.
जम्मू-काश्मीर हायवे संध्याकाळनंतर वाहतुकीसाठी बंद होतो, वेळेत पोहोचलो नाही तर किमान १५-२० तास अडकून पडावं लागतं, हे सारं माहीत असलं तरी स्टिअरिंग व्हील हातात धरावंच लागतं. कारण त्याशिवाय गत्यंतरच नाही. हा रस्ताच त्यांचं आयुष्य होता, आहे. जम्मूहून भाजीपाल्यापासून तर अनेक प्रकारचा माल याच मार्गानं इथे येतो आणि काश्मीरमधूनही सफरचंदांपासून तर अक्रोड, सुक्यामेव्यापर्यंतचा सारा माल याच रस्त्यानं देशभरात पोहोचतो. सगळ्यांसाठीच हा रस्ता म्हणजे अन्नदाता.
एनएच-४४ हायवेचा हा भाग. कन्याकुमारीपासून ते श्रीनगरपर्यंत देशाच्या दोन्ही टोकांना जोडणारा हा देशातला सर्वात मोठा हमरस्ता. सर्वसामान्य माणसांसाठी जेवढा महत्त्वाचा, तेवढाच लष्करासाठीही. पाकिस्तान बॉर्डरवर जेवढे जवान आणि दारूगोळा जातो, तो एकतर या हायवेनं नाहीतर थेट विमानानं. लष्करी दळणवळणासाठीही हा हायवे म्हणजे प्राणच !!
जम्मू आणि काश्मीर यांच्या बरोबर मधोमध जवाहर टनेल हा पावणेतीन किलोमीटरचा बोगदा. अलीकडे जम्मू पलीकडे काश्मीर. हा रस्ता बंद झाला म्हणजे जम्मू-काश्मीरचं जणू रक्तच गोठतं.
नैसर्गिक आपत्ती, दरडी कोसळणं, इत्यादि कारणांनीही या मार्गावरील वाहतूक बºयाचदा बंद असते. त्यामुळेही नागरिकांची मोठी कोंडी होते, अपघात होतात; पण काश्मीरच्या लोकांसाठी ही जीवनवाहिनी सुरू असणं, हृदयाची धडधड सुरू असण्याइतकीच महत्त्वाची आहे.
आता पुन्हा एकदा नव्याच कारणानं हा रस्ता चर्चेत आला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्य वाहनांसाठी जम्मू-श्रीनगर हायवे; विशेषत: बारामुल्ला ते उधमपूर हा २७१ किलोमीटरचा हायवे आठवड्यातून दोन दिवस; रविवार आणि बुधवारी पहाटे ४ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्याचं सरकारनं जाहीर केलंय. अर्थात हा निर्णय तूर्तास ३१ मेपर्यंतच असला तरी त्यामुळे काश्मिरात मोठंच काहूर उठलंय. काश्मीर प्रश्नाचे अभ्यासक, कार्यकर्ते, राजकीय नेते यांनीही त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
काश्मीर प्रश्नासंदर्भात बºयाच वर्षांपासून काम करत असलेल्या आणि काश्मीर तसंच उर्वरित भारतासाठी दुवा म्हणून काम करत असलेल्या पुण्याच्या ‘सरहद’ या संस्थेचे संस्थापक संजय नहार म्हणतात, अयोग्य वेळी घेतलेला अत्यंत अयोग्य असा हा निर्णय आहे. धुमसत्या काश्मीरच्या निखाºयांवर आताच कुठे थोडी राख धरू लागली आहे, दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत, अशा वेळी जम्मू-श्रीनगर हायवे बंद करण्याचा निर्णय म्हणजे या निखाºयांवर पुन्हा फुंकर मारण्यासारखं आहे. राजकीय कारणांसाठी असे निर्णय कदाचित अल्पकाळासाठी फायदेशीर वाटतीलही; पण दीर्घ कालावधीसाठी भारताच्या दृष्टीनं हा निर्णय घातकच आहे. आंतरराष्टÑीय पातळीवरही त्यामुळे आपल्याबाबत एक नकारात्मक संदेश जाईल. जम्मू-श्रीनगर रस्ता सर्वसामान्यांसाठी, व्यापाºयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नाशवंत मालाचं नुकसान होणं, मालाची वाहतूक ठप्प होणं, उशीर होणं, खर्च वाढणं.. यामुळे लोकांच्या त्रासात, नाराजीत आणखी भर पडेल. शिवाय हा त्रास काही फक्त काश्मिरी लोकांनाच नाही, तर सर्वांना होईल. सुरक्षा जवानांच्या सुरक्षित प्रवासासाठीच हा निर्णय घेण्यात आला असेल तर हवाई मार्गानं त्यांची वाहतूक करणं हा सर्वात सोपा, बिनधोक आणि कमी खर्चाचा पर्याय आहे. रस्ते मार्गानं त्यांची वाहतूक करणं हा आतबट्ट्याचा आणि जास्त खर्चिक मामला आहे, असंही संजय नहार यांचं मत आहे.
काश्मीरमधल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निर्णयाबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं.
काश्मीरमधील मुक्त पत्रकार आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते फिरदोस मंजूर म्हणतात, कश्मिरी इकॉनॉमी पे इसका बहुत बुरा असर पडेगा.. सामान्यांना वेठीस धरलं जाणं इथे नित्याचंच आहे. सततच्या चौकशा आणि तलाशी ! लोकांचं जगणं आधीच हराम झालेलं आहे, त्यात हा निर्णय त्यांचं पेकाट मोडणारा ठरणार आहे. हडेलहप्पी, मनमानी, दडपशाही आणि रॉयल व्हिक्टोरियन आॅर्डरचा हा उत्तम नमुना आहे. लोक यामुळे आणखी दूर जातील..
खुर्शीद अहमद भट हा श्रीनगरमधील आणखी एक युवा कार्यकर्ता. त्याचे वडील लष्करात होते. तो स्वत: लष्कराशी संबंधित नसला तरी काही उपक्रमांत तो लष्कराला मदत करतो, त्याचंही म्हणणं आहे, हा निर्णय थोड्या दिवसांसाठी असला, इमर्जन्सी म्हणून अनेकांना त्यातून सूट दिलेली असली तरीही सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर त्यामुळे अतिशय विपरीत परिणाम होईल. विशेषत: उधमपूर, रामबन आणि बनिहाल भागातील नागरिकांना त्याचा जास्त त्रास सोसावा लागेल. कारण त्यांना इंटरनल कनेक्टिव्हिटी नाही. काश्मीर आणि काश्मीरबाहेरच्या लोकांसाठीही हा रस्ता ‘लाइफलाइन’ आहे. त्यांची वाहनंच नाही, तर आयुष्यच या रस्त्यावर चालतं. रोजच्या जगण्यासाठी लागणाºया वस्तूंपासून तर आॅइलच्या टॅँकर्सपर्यंत साºया गोष्टींची वाहतूक या मार्गावरूनच होते. तीच बंद झाली तर त्यांचा श्वास गुदमरणारच..
**
२०१६चा तो प्रसंग पुन्हा आठवतोय. जम्मू-श्रीनगर मार्गावर जवाहर टनेलजवळ अडकल्यानंतर आम्ही श्रीनगरमध्ये प्रवेश केला. तिथे जिवावरच्या दोन प्रसंगांतून सहीसलामत वाचल्यानंतर श्रीनगरहून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. कर्फ्यू आणि दगडफेकीत अडकू नये म्हणून पहाटे ४ वाजेच्या अंधारात, हेडलाइट बंद ठेवूनच आम्ही जम्मूच्या दिशेनं निघालो. जवाहर टनेलजवळ पोहोचलो, तेव्हा सकाळचे सात-साडेसात वाजले होते. पुन्हा रस्ता बंद ! आलो तेव्हासारखीच आताही वाहनांची भलीमोठी रांग लागली होती. सारे नऊच्या ठोक्याची वाट पाहत होते, कारण त्याचवेळी रस्ता खुला होणार होता.
तिथेच भेटले महम्मद अशरफ मीर. त्यांचा जवळचा नातेवाईक; हृदयविकाराचा पेशंट घेऊन जम्मूला निघाले होते. डॉक्टरांची अपॉइनमेन्ट होती; पण टनेल उघडण्याची उतावीळपणे वाट पाहत होते. अस्वस्थही होते.
ते म्हणाले, ‘इन्सानियत, जम्हूरियत और काश्मिरीयत ये सिर्फ बोलनेकी बाते है। सरकारने बताना चाहीए, रास्ता बंद करके वो क्या जनता का फायदा कर रही है? मिलिटरी के लिए रस्ता खुला है और इधर पेशंट गाडी मे पडा है..
टनेल उघडला आणि अशरफभार्इंबरोबर आम्हीही घाटीतून बाहेर पडलो. हा रस्ता आणि या रस्त्यावरचे अनेक अनुभव मात्र कायमचे मनात घर करून बसले..
हजारोंची जीवनवाहिनी!
जम्मू-श्रीनगर मार्गावरून रोज सरासरी १२०० ट्रक धावतात. तेवढेच आॅइल टॅँकर्सही. सर्वमामान्य प्रवाशांना घेऊन जाणारी सुमारे एक हजार प्रवासी वाहनंही याच मार्गानं लोकांना रोज त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवतात. ‘सीझन’मध्ये वाहनांची संख्या आणखीच वाढते. या काळात केवळ काश्मिरातूनच सफरचंद आणि फळांचे किमान हजारभर ट्रक या मार्गानं रोज देशभरात जातात. याशिवाय सुरक्षा जवानांच्या ताफ्यातली किमान पाचशे वाहनंही रोज याच मार्गानं परिस्थितीवर नजर ठेवत असतात.
हायवे- जीवनदायी, तसा विनाशकारीही!
काश्मिरात जे अनेक व्यवसाय चालतात, त्यात मधमाशा पालन हाही एक प्रमुख व्यवसाय. काश्मिरातील आणि देशातील हजारो लोकांचं आयुष्य या व्यवसायावर अवलंबून आहे. काश्मीरमधील जवळपास दोन हजार व्यावसायिक जम्मू, सांबा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि देशाच्या इतर भागात मधमाशा पाठवतात, तर पंजाब, उत्तराखंड, हरयाणा.. इथूनही काश्मिरात या व्यवसायाशी संबंधात व्यापार होतो.
पण या व्यावसायिकांची मुख्य अडचण अशी की, जम्मू-श्रीनगर हायवेवर सुरक्षा जवानांच्या कॉनव्हॉयसाठी बऱ्याचदा इतर वाहनं थांबवली जातात. अनेक तास थांबून राहावं लागतं. मधमाशा एका ठरावीक तापमानातच जिवंत राहू शकतात. ट्रक थांबवून ठेवल्यामुळे तिथलं तापमान वाढतं आणि मधमाशा मरतात. मधमाशा आणि त्यांची पोळी नष्ट होण्याचं प्रमाण जवळपास पंचवीस टक्के आहे. त्यामुळे हा व्यवसायच जणू संपण्याच्या मार्गावर आला आहे. त्यात आता आठवड्यातून दोन दिवस रस्ता बंद राहणार असल्यामुळे या व्यावसायिकांचे कंबरडेच मोडणार आहे. एप्रिल महिना हा तर या धंद्याचा सीझन. काश्मिरातून या महिन्यात मधमाशांच्या पोळ्यांनी भरलेले किमान पाच हजार ट्रक देशात इतरत्र जातात.
यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष नूर मोहम्मद यांनी थेट राज्यपालांनाच साकडं घातलं आहे, ‘आमची वाहनं अडवून ठेवू नका. जवानांच्या ताफ्याबरोबर आमचीही वाहनं जाऊ द्या, नाहीतर हा व्यवसाय आणि त्यावर जगणं अवलंबून असलेल्या साऱ्यांचंच मरण अटळ आहे..’
(लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्तसंपादक आहेत.)
sameer.marathe@lokmat.com