बाष्कळ बडबडवीरांची खुन्नस आणि नीरजच्या शब्दांचा भाला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 06:01 AM2021-08-29T06:01:00+5:302021-08-29T06:05:01+5:30
ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने आपण अव्वल ‘खेळाडू’ आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. खेळाच्या माध्यमातून धार्मिक विद्वेष, अफवा आणि कोणावरही उगाच चिखलफेक करणाचा ‘अजेंडा’ कोणीही पुढे चालवू नये, असे सांगताना आपल्या पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्यालाही ‘ट्रोल’ होण्यापासून त्याने सांभाळून घेतले आहे.
- सुकृत करंदीकर
खेळाच्या मैदानात भारत-पाकिस्तान एकमेकांचे कट्टर स्पर्धक असतात. फुटबॉल खेळणाऱ्या इंग्लंड-फ्रान्स यांच्यात टोकाची चुरस दिसते. चीन-जपान खेळात भिडणार असतील, तर तिथेही खुन्नसच असते. असं का, याची उत्तरं त्या-त्या देशांच्या इतिहासात, राजकारणात आहेत. धर्माच्या आधारावर पाकिस्तान भारतापासून फुटला आणि दोन्ही देशांना फाळणीचा विखार सोसला. नरसंहार, अत्याचाराचे खोल वार करण्यात आघाडीवर कोण होतं, याबद्दल दोन्ही देश आजही एकमेकांवर आरोप करतात. पुढे भारताच्या मर्दुमकीमुळे पूर्व पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळालं. बांगलादेश अस्तित्वात आला. भारतासोबतच्या दोन्ही युद्धांत पाकिस्तानचे लाजीरवाणे पराभव झाले. काश्मीर खोऱ्यातल्या भ्याड कारवायांमध्ये नेहमी मार खातो तो पाकिस्तानच. भारतासोबतचं राजकीय-धार्मिक वैर जोपासण्याच्या या खेळात पाकिस्तान आजघडीला पुरता भिकेकंगाल, कर्जबाजारी देश बनला आहे. दुसरीकडे भारत मंगळावर स्वारी करण्याच्या बेतात आहे. या अत्यंत विपरित स्थितीतही भारतासोबतचं शत्रुत्व गोंजारत राहणं, ‘पाकिस्तानी अवाम’ला भारताविरोधात भडकवत राहणे ही पाकिस्तानवर कब्जा करून असलेल्या तिथल्या लष्कराची आणि राज्यकर्त्यांची नितांत गरज आहे. पाकिस्तानातली अनिश्चित राजकीय स्थिती, धार्मिक संघटनांचा प्रभाव, लष्कराचे प्रभुत्व यामुळे पाकिस्तानात अनेक मूलभूत गोष्टींचा अभाव आहे. त्यामुळेच तर गेल्या पंचाहत्तर वर्षांत पाकिस्तानला अवघी दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकता आली. हॉकीमधला पाकिस्तानचा दबदबा केव्हाच ओसरला. क्रिकेटच्या मैदानात हा देश कधी सातत्य राखू शकत नाही. इतर अनेक क्रीडा प्रकार तर कराची, इस्लामाबाद, लाहोरसारख्या मोजक्या शहरांच्या बाहेर अजून माहितीही नाहीत.
भारतातले चित्र पूर्ण वेगळे आहे. खंडप्राय भारताच्या कानाकोपऱ्यातल्या तरुणाईपुढे आशावाद आहे. महत्त्वाकांक्षा आहेत. केवळ क्रीडाच नव्हे, तर विज्ञान, आयटी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शेती, अवकाश, कला या विविध क्षेत्रांतल्या हजारो प्रेरणादायी ‘सक्सेस स्टोरिज’ भारतीय तरुणाईपुढे आहेत, म्हणून तर ईशान्येकडच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून मीराबाई चानू येते आणि ऑलिम्पिक विजेती होऊन जाते. उत्तर प्रदेशातल्या मुली जगातली मैदाने गाजवतात. हरियाणातले पहिलवान युरोपच्या पहिलवानांना घाम फोडतात. या सगळ्यांना पाहात त्याच्यापुढे जाण्याची ईर्ष्या बाळगणारी नवी पिढी घडण्याची प्रक्रिया भारतात अखंड चालू आहे. ती क्रिकेटमध्ये आहे, कुस्तीत आहे, बॅॅडमिंटनमध्ये आहे किंवा हॉकीसारख्या अन्य क्रीडा प्रकारात.
असे असूनही भारतातला ठरावीक वर्ग पाकिस्तानशी स्पर्धा करण्यात, तुलना करण्यात आघाडीवर असतो. हा बालिशपणा नसतो. स्थानिक राजकारणातली गणिते जपण्यासाठी धार्मिक उन्माद पेटवत राहणे ही या गटाची राजकीय गरज आहे. पाकिस्तान्यांशी संवाद ठेवल्यानं, मैत्री राखल्याने कोणी देशद्रोही ठरत नाही. नीरज चोप्राचा भाला पाकिस्तानच्या अर्शद नदीमने वापरला म्हणून नीरजचे सुवर्ण पदकावरचे लक्ष्य विचलित झालेले नव्हते, पण फुटकळ निमित्ताने धार्मिक विद्वेष माजविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. हा विखारी वर्ग एका बाजूला, तसाच कला-क्रीडेच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान भाऊ-भाऊ होतील, असा आशावाद बाळगणारा भोंगळ वर्ग दुसऱ्या बाजूला. एखादा मुशायरा, शेरोशायरीची मैफल, लिट-फेस्ट, क्रिकेट किंवा हॉकीचा मैत्रीपूर्ण सामना खेळविल्याने भारत-पाकिस्तान एकत्र येतील, अशी अपेक्षा ठेवणारा. यात गैर काही नाही, पण याला वास्तवाचे बुड हवे. वास्तव काय, तर राजकीय, तात्त्विक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धार्मिक मतभेद तीव्र असताना गाण्याबजावण्यातून, खेळण्यातून वैर संपल्याचे उदाहरण जगाच्या पाठीवर मिळणे मुश्कील आहे. याचा अर्थ असा नव्हे की, कला, क्रीडेच्या क्षेत्रातही शत्रुत्व, खुन्नस बाळगली पाहिजे. जगात अव्वल व्हायचं, तर एकाग्रता खेळावरच करावी लागते. सचिन तेंडुलकर मैदानाबाहेर कधीच वायफळ बोलताना दिसला नाही. म्हणूनच तो वाँडरर्सच्या मैदानात शोएब अख्तरचा ताशी १४०-१४५ किलोमीटर वेगाचा चेंडू पॉइंटवरून शांतपणे प्रेक्षकांमध्ये भिरकावून देऊ शकला. खेळाडूंकडून चार गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपण ज्या क्षेत्रात असू, तिथे प्रामाणिकपणाने, मेहनतीने सर्वोच्च दर्जा राखणे महत्त्वाचे. वैर जपण्यापेक्षा मैदान मारत राहा. मग ते कोणतेही असो, बाकी बाष्कळ बडबडवीरांना अनुल्लेखाने मारणे श्रेयस्कर. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचे सांगणे इतकेच आहे.
(सहसंपादक, लोकमत, पुणे)