झाडे, रंग आणि रेषा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 06:05 AM2019-10-06T06:05:00+5:302019-10-06T06:05:11+5:30
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने ताडोबा अभयारण्यातल्या इराई रिट्रीट या रिसॉर्टमध्ये जवाहरलाल दर्डा मेमोरिअल आर्ट कॅम्पचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. देशभरातून आलेल्या वीस मान्यवर चित्रकारांच्या सहभागाने रंगलेल्या या सुंदर अनुभवाच्या आठवणींचा हा पूर्वार्ध..
- साधना बहुलकर
आर्ट कॅम्प किंवा आर्टिस्ट कॅम्पची मूळ कल्पना म्हणजे संयोजकांनी निवडलेले वेगवेगळ्या ठिकाणचे चित्रकार एखाद्या जागी एकत्रितपणे जमून राहातात, परस्परांशी संवाद करतात आणि आपापली चित्रे काढतात. यातून चित्रकार मंडळींचा एकमेकांशी प्रत्यक्ष परिचय होतो, एकमेकांच्या काम करण्याच्या पद्धती बघण्याची दुर्मीळ संधी मिळते. एकत्रित काम करण्याचा आनंद मिळतो. कलानिर्मिती मागच्या एकमेकांच्या प्रेरणा, त्यामागची भूमिका, दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी खेळीमेळीचे अनौपचारिक वातावरण लागते. विचारांची देवघेव होते. आठवणींना उजाळा मिळतो.
सामान्यत: असे कॅम्प तीन ते आठ-दहा दिवसांचे असतात. त्यासाठी सर्वसाधारणपणे कलाक्षेत्रात थोडे फार नाव झालेल्यांची निवड होते. त्यांचा येण्या-जाण्याचा खर्च करून मानधनही दिले जाते. आयोजकांच्या शक्यतेनुसार, क्षमतेनुसार कॅम्पचे ठिकाण ठरते. अर्थात असे काही उपक्रम होण्यामागे लहानमोठी आर्थिक उलाढालही असते. कॅम्पच्या कालावधीत ठरवलेल्या आकाराची एक किंवा दोन चित्रे काढून ती आयोजकांना दिली जातात. काही वेळा त्यांचे प्रदर्शन भरविले जाते. प्रदर्शनात किंवा एरवीही ती चित्रे विकली जातात. काहीवेळा खासगी संग्रहासाठी ती जतन केली जातात किंवा कधी भेटीदाखल म्हणूनही दिली जातात.
एकुणातच वेगवेगळ्या बाजूंनी आर्टिस्ट कॅम्प हा उपक्रम कलावंत आणि रसिकांच्यात वेगवेगळ्या प्रकारे आदान-प्रदान घडवीत असतो.
असे आर्टिस्ट कॅम्प म्हणजे एक आगळा-वेगळा माहोल असतो. रंगीबेरंगी तर तो असतोच; पण त्याचबरोबर एकमेकांना सहज जमेल तसे जाणून घेण्याचा निखळ आनंद देणारा असतो. चित्रकलेत वास्तववादी, अमूर्त (अँब्स्ट्रॅक्ट), पारंपरिक, आधुनिक, अलंकारिक (डेकोरेटिव्ह), विरूपीकरणात्मक (डिस्ट्रॉर्शन) अशा अनेक प्रकारे कलानिर्मिती होत असते. त्यात आपापली वैशिष्ट्ये जपत वेगवेगळ्या पद्धतीने कलावंत आपली अभिव्यक्ती करीत असतात. साहजिकच त्यांच्या अस्मिता, मत-मतांतरेही असतात. त्यामुळे मग गट आणि गटबाजीही अपरिहार्य असते. पण आर्टिस्ट कॅ म्पच्या दिवसात मात्र हे सर्व मागे ठेवून कलाकार तेथे एकत्र येतात. आनंदात राहतात. काम आणि मजा दोन्ही मनापासून करतात.
दिनांक 30 सप्टेंबर 2019
नागपूरच्या जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीने ताडोबा अभयारण्यात आयोजित केलेल्या आर्टिस्ट कॅम्पला निघायचे म्हणून मुंबईतील त्या दिवशीची सकाळ मला वेगळी उत्साही वाटत होती. ठरल्याप्रमाणे सकाळी 9 ला घर सोडले. विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच या कॅम्पचे क्यूरेटर विनोद शर्मांचा फोन, ‘अरे भाई ! कहा हो तुम दोनो, मै तो कबका पहूच गया हूँ। अपने गेट पर तुम्हारा इंतजार कर रहा हूँ।’- खरे म्हणजे दचकलोच आम्ही!
घाईघाईने विमानतळात शिरून ठरल्या गेटवर पोहचलो, तरी आमच्या या ‘कॅम्प क्यूरेटर’ मित्राचा पत्ता नाही. नंतर बर्याच वेळानी ते आले. म्हणजे मघाचा फोन व त्यानंतरचा ‘इंतजार’ ही त्यांनी घेतलेली फिरकी होती ! एकेक करीत कलाकार मंडळी विमानतळावर जमत गेली. सोबत पेंटिंग केलेल्या कॅनव्हासच्या लांबट गुंडाळ्या हातात असल्याने परिचय नसला तरी विदर्भातील ताडोबा आर्टिस्ट कॅम्पवासी सहजपणे ओळखता येत होते.
नागपूरला पोहचलो आणि आम्हाला घ्यायला आलेल्या बसने थेट दर्डा कुटुंबीयांच्या घरी गेलो. विजय दर्डा यांचा स्नेहशील पाहुणचार मनसोक्त घेऊन तेथून मग थेट ताडोबाकडे प्रयाण.
करकरीत तिन्हीसांज संपून अंधार दाटू लागला तरी ताडोबा जवळ येत असल्याची चाहूल लागत नव्हती. अखेर ‘ईराई रिट्रिट’ या मुक्कामाच्या जागी पोहचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ-नऊ वाजले होते. बसमधून उतरताच हिरवाईच्या ताज्या स्वच्छ हवेचा गंध पावलागणिक जाणवत गेला. ‘ईराई’च्या स्वागतकक्षात त्यांच्या वतीने आणि दर्डा कुटुंबीयांच्या वतीने कलाकार, अतिथींच्या जथ्थ्याचे उत्साहाने आणि अगत्याने पारंपरिक स्वागत झाले.
सगळे फ्रेश होऊन अध्र्या तासात परतले, तोवर डायनिंग हॉलबाहेरची प्रशस्त गॅलरी दीपदानांनी लखलखत होती. बघता बघता अड्डे पडले, आणि ओळखपाळख करून घेत, जुन्या परिचयाचे दाखले शोधत गप्पा सुरू झाल्या.
मध्यरात्र उलटली, तरी विषय संपले नाहीत, गप्पा सरल्या नाहीत !
शेवटी दुसर्या दिवशी सकाळी होणार्या उद्घाटनाची वेळ पुढे ढकलून साडेअकरा करण्यात आल्याची घोषणा झाली; मग तर सगळेच आणखी निवांत झाले!
1 ऑक्टोबर 2019.
आर्टिस्ट कॅम्पचे आणि चित्रकारांनी बरोबर आणलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन एका छोटेखानी, देखण्या हॉलमध्ये झाले. अमित गोनाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी रात्रभर जागून गुंडाळलेली चित्रे उलगडून लाकडी चौकटीवर ताणून सज्ज केली होती. या कॅम्पसाठी पॅरिस, आसाम, हैदराबाद, गुजरात, मुंबई, पुणे येथून आलेल्या चित्रकारांचे विजय दर्डांनी औपचारिक; पण मनमोकळे स्वागत केले. त्यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केलेला आशावाद मनाला स्पर्शून जाणारा होता. दर्डा म्हणाले, ‘जातिभेद आणि कट्टर धार्मिकतेने समाजात निर्माण केलेल्या भिंती उद्ध्वस्त करण्याचे सार्मथ्य कलेमध्ये आहे. हे कधी ना कधी घडेल आणि विभागलेल्या समाजाला एक एकसंध अंत:स्वर मिळेल.’
परदेश आणि देशाच्या विविध भागांतून आलेल्या वीस कलाकारांची आजूबाजूला लावलेली चित्रे त्यांच्या कलावैशिष्ट्यांची ओळख करून देत देशातील कलेचे वैविध्य व्यक्त करत होती. कलाकारांच्या मनात पुढील चार दिवसांत काढल्या जाणार्या चित्रांचे बेत रचले जात होते. एकमेकांच्या निर्मिती प्रक्रियेची उत्सुकताही होती.
दुपारच्या भोजनानंतर कलाकार मंडळी आपापल्या कॅन्व्हाससमोर सरसावली होती. त्याबद्दल पुढच्या रविवारी..
अमूर्ताचा शोध
हलकेहलके का असेना, लोकांना अमूर्त चित्र-शैलीतले र्मम आता उलगडू लागले आहे, असे मला वाटते आणि त्याचा आनंदही होतो. हे र्शेय अर्थातच प्रयोगशील अशा नव्या दमाच्या चित्रकारांचे आहे, हे नि:संशय ! तसे पाहाता अमूर्ताचा शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया आहे; पण दृश्य माध्यमात मात्र अमूर्ताप्रति काहीशी अप्रीती होती, अजूनही आहे. हे चित्र लवकर बदलेल, अशी मला आशा वाटते.
मी जयपूरला जन्मले, पुढे फ्रान्समध्ये स्थायिक झाले, तरी माझा भाऊ पवनार आर्शमात मुक्कामाला असतो. त्यामुळे विदर्भ हे माझे माहेर आहे, असेच मी मानते. या कॅम्पला येणे हे माझ्यासाठी माहेरपणाच्या कौतुकासारखेच आहे!
- सुजाता बजाज, पॅरिस
‘सह-अस्तित्व’
समाजमनामध्ये काहीही व्यापक बदल घडवण्याचा मार्ग चित्रकलेतून- खरे तर कोणत्याही कलेतून जातो, असे माझे मत आणि अनुभवही आहे. कला माणसाला भावनिक स्तरावर स्पर्शून जाते आणि त्याला विचारालाही उद्युक्त करते. असे ‘दोन्ही’ स्तरावरचे आवाहन दुर्मीळ म्हणूनच महत्त्वाचे !
म्हणूनच चित्रकाराच्या कामामागे निश्चित प्रेरणा असली पाहिजे, असे मी मानतो. मी स्वत: सध्या ‘सह-अस्तित्व’ या संकल्पनेभोवती काम करतो आहे. माणूस आणि निसर्ग यांच्या सह-अस्तित्वाच्या शक्यता रंगरेषांमधून शोधत जाणे हा मोठा विलक्षण रोमांचक अनुभव आहे.
- दीपक शिंदे, मुंबई
सच्चा अंत:स्वर
माणसाला उन्नयनाच्या दिशेने नेणारा ‘समग्र शिक्षणा’चा मार्ग कलानिर्मितीच्या वळणावरूनच जातो, गेला पाहिजे असे मला वाटते. ज्या समाजात कला आणि कलावंताला मान असतो, त्या समाजाचा अंत:स्वर सच्चा असतो, असे खुशाल समजून चालावे.
नव्या चित्रकारांना मोठय़ा संधी आहेत, तसेच त्यांच्या मार्गावर मोहही मोठे आहेत आणि संयम नावाच्या गोष्टीशी त्यांचा फारसा परिचय नाही. हे बदलेल, तर बरे.
- विजेंदर शर्मा, दिल्ली
आर्ट कॅम्पची संस्कृती
जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टींमुळे नव्या पिढीतल्या चित्रकारांना खर्या अर्थाने जगाची दारे खुली झाली. पण त्यातन उघड्या दारांमधून अनेक गैर गोष्टीही आत आल्या. त्यामध्ये उधार-उसनवारीची सवय, ही सर्वात घातक गोष्ट इथल्या वातावरणात मुरली. कलेच्या पोषणासाठी हे उचित नव्हे. माध्यमांचा प्रसार वाढला आहे हे खरे; पण त्यातून कलासमीक्षा हद्दपार झाली आहे, याचेही वैषम्य वाटते !
या वातावरणात आर्ट कॅम्पची संस्कृती विकसित होणे उल्हसित करणारे आहे.
- सुहास बहुलकर, मुंबई
(लेखिका ज्येष्ठ चित्रकार आहेत.)
sadhanabahulkar@gmail.com