सोन्याचा प्रवास..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 06:02 AM2019-11-03T06:02:00+5:302019-11-03T06:05:04+5:30

जगात कोणालाही नसेल,  इतकं सोन्याचं आकर्षण भारतीयांना आहे. जगातील सर्वाधिक सोनंही भारतीयांच्या अंगावर आहे. पण खाणीतून सोनं काढल्यापासून त्याचे दागिने बनवण्यापर्यंत आणि  ते आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंतची सोन्याची वाटचालही विलक्षण आहे.

The journey of gold... | सोन्याचा प्रवास..

सोन्याचा प्रवास..

googlenewsNext
ठळक मुद्देसोनेरी भाग्य कायम उजळतं राहावं यासाठी बर्‍याच गोष्टी आपल्याला माहीत हव्यात. सोन्याची ही झळाळी आपलं ‘मूल्य’ मग आणखीच वाढवील.

- समीर मराठे

सोनं आणि सोन्याच्या दागिन्यांचं आकर्षण मानवाला कित्येक शतकांपासून आहे. त्यातही भारतीय नागरिकांचा यात प्रथम क्रमांक लागतो.
पिढय़ान्पिढय़ा सोन्याचा इतका संस्कार भारतीय नागरिकांवर झाला आहे, की अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोनं भारतीयांची साथ करीत असतं.
सोन्यातली भारतीयांची सामाजिक, मानसिक, भावनिक, सांस्कृतिक आणि आर्थिक गुंतवणूक महाप्रचंड असली, सोनं अंगाखांद्यावर मिरवायला आणि बाळगायला भारतीयांना खूपच आवडत असलं तरी सोन्याचा प्रवास आणि सोन्यासंदर्भातल्या अनेक गोष्टी मात्र आपल्यापासून अद्याप अज्ञातच आहेत. 
सोन्याचं जवळपास शून्य उत्पादन असलेल्या भारताचा सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र खूपच दबदबा आहे. जगातलं सगळं सोनं आधी लंडनच्या मार्केटला येतं आणि तिथून त्याची वाटचाल इतरत्र आणि भारताकडेही होते. भारत हा सोन्याचा प्रमुख आयातदार देश तर आहेच; पण सोन्याचे दागिने अंगावर मिरवणारे जगात सर्वाधिक नागरिकही भारतातच आहेत.
असं असलं तरी, खाणीतून अशुद्ध सोनं बाहेर काढल्यानंतर ते दागिने बनवण्यापर्यंतचा प्रवास फारच थोड्या जणांना माहीत आहे..
खाणीतून अशुद्ध सोनं आधी बाहेर काढलं जातं. ते शुद्ध करून त्याच्या चिपा बनवल्या जातात. 
सोनं वितळवणं (आटवणी करणं), ते शुद्ध करणं, त्याची शुद्धता तपासणं, या सोन्याच्या लगडी तयार करणं, त्याच्या तारा, पत्रे काढणं, त्यापासून दागिने तयार करणं, त्यावर पॉलिश, तासकाम करणं, हॉलमार्किंग करणं. अशा अनेक टप्प्यांनंतर सोनं आपल्या हातात येतं.
दागिने घडविण्यासाठी व्यापारी सर्वप्रथम सोन्याची चीप खरेदी करतात.  शुद्ध सोन्यापासून कलाकुसरीचे आणि नाजूक काम असलेले दागिने तयार करता येत नाहीत. म्हणून चांदी, तांबे यांसारख्या मिर्शधातूंचा योग्य मेळ त्यात घातला जातो. त्यापासून योग्य त्या शुद्धतेच्या सोन्याच्या लगड्या तयार करण्यात येतात. यासाठी शुद्ध सोन्याची चीप व चांदी-तांबे यांचा सुयोग्य मेळ करून भट्टीमध्ये ते वितळवतात. त्यानंतर आवश्यक त्या शुद्धतेच्या लगड्या (23 किंवा 22 कॅरेट) संबंधित कारागिरांकडे देण्यात येतात. कारागीर त्या लगडीपासून बारीक तार किंवा आवश्यक त्या जाडीचा पत्रा काढतो. सोन्याचा हा पत्रा डायप्रेसमध्ये नेला जातो. तिथे वेगवेगळ्या डिझाइनच्या टिकल्या, पदकं, दागिन्यांचे सुटे भाग तयार केले जातात. या सुट्या भागांना आवश्यकतेनुसार डाग देऊन कारागीर त्यापासून दागिना तयार करतो.
हा दागिना तापविल्यामुळे काळसर झालेला असतो. तो वापरायोग्य नसतो. त्यामुळे दुसरा कारागीर त्या दागिन्याला पॉलिश करून झळाळी आणतो. असा पॉलिश केलेला दागिना तासकाम करण्यासाठी दुसर्‍या कारागिराकडे जातो. आपल्याकडच्या बारीक हत्यारांच्या साहाय्यानं त्यावर तो तासकाम करतो. त्यानंतर हा दागिना विक्रीसाठी आणला जातो. ग्राहकांच्या अंगावर मिरवला जाताना ग्राहक आणि सोनं दोघांचंही भाग्य मग उजळतं !.
पण हे सोनेरी भाग्य कायम उजळतं राहावं यासाठी आणखीही बर्‍याच गोष्टी आपल्याला माहीत हव्यात. सोन्याची ही झळाळी आपलं ‘मूल्य’ मग आणखीच वाढवील.

घामाचा दागिन्यांवर होणारा परिणाम
घामाचा सोन्यावर काहीही परिणाम होत नाही. चांदी मात्र थोड्या प्रमाणात काळसर पडते. कारण पुष्कळ वेळा घामामध्ये सल्फरयुक्त संयुगे असतात. अर्थात ही प्रक्रिया फार मोठय़ा प्रमाणात होत नाही. त्यामुळे अंगठीसारखे दागिने साबणाने स्वच्छ धुतल्यास पूर्ववत चकाकू लागतात.

साबणानं दागिने काळे पडतात?
सर्वसाधारणपणे सोन्यावर साबण, डिटर्जंट, रसायनं, औषधं या पदार्थांची प्रक्रिया होत नाही. पोटॅशियम साइनाइड मात्र बराच वेळ सोन्याच्या सान्निध्यात असल्यास त्यावर प्रक्रिया होते. चांदीवर सर्वसाधारणपणे सल्फरयुक्त पदार्थाचा परिणाम होतो. अशा पदार्थांनी चांदीचा रंग काळसर होतो.

दागिन्याचा डाग काळा का पडतो?
सोने, चांदी आणि तांबे यांच्या मिर्शणातून डाग बनवलेला असतो. सर्वसाधारणपणे निम्मे सोने आणि चांदी-तांबे या प्रमाणात तो बनवतात. डागामध्ये असलेली चांदी हवेमुळे काळी पडते. तांब्यावर हवेची प्रक्रिया होऊन तांबं प्रथम हिरवट निळसर व पुढे काळं पडतं, म्हणून डाग दिलेली जागा काळी पडते. सौम्य नायट्रिक अँसिडचा हात फिरवल्यास हा भाग स्वच्छ दिसतो.

सोन्यातलं तांबं आणि चांदी !
सोन्याच्या दागिन्यांना टिकाऊपणा येणं आणि त्यावर उत्तम नक्षीकाम, तासकाम करता यावं यासाठी दागिने बनविताना काही प्रमाणात तांबं वापरतात. अल्प प्रमाणात जरी तांबं मिसळलं तरी दागिन्यांचा रंग तापवल्यावर काळा होतो. कारण दागिना तापवताना तांब्याची हवेमधील प्राणवायूशी प्रक्रिया होऊन कॉपर ऑक्साइड हा काळ्या रंगाचा पदार्थ तयार होतो. म्हणून दागिन्यांचा रंग पालटतो. या उलट या तपमानाला चांदी व हवेतील प्राणवायू यांची प्रक्रिया होत नाही म्हणूून फक्त चांदी मिसळलेल्या दागिन्यांचा रंग पालटत नाही. हे माहीत नसल्यानं अनेकदा ग्राहकाचा गैरसमज होतो. 

सोन्याची ‘कसोटी’
पारंपरिक पद्धतीने सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी काळ्या दगडाचा शेकडो वर्षांपासून वापर करण्यात येतो. हा दगड नेहमीच्या काळ्या दगडाप्रमाणे नसून तो हिमालयात किंवा नर्मदेच्या खोर्‍यात विशेषकरून आढळतो. हिमालयातदेखील गंडकी नदीच्या तीरावर तो जास्त करून सापडतो. त्यामुळे त्यास गंडकी पाषाण असंही म्हटलं जातं. हा दगड पूर्णपणे गुळगुळीत, खरखरीत किंवा ठिसूळही नसतो. तो उत्तम काळ्या रंगाचा असतो. त्यामुळे या दगडाचा वापर सोने व दागिन्यांची शुद्धता पारखण्यासाठी केला जातो. दागिना कसोटीच्या दगडावर घासण्यापूर्वी हा दगड एरंडीच्या बियांच्या तेलानं काहीसा गुळगुळीत व चकाकदार करण्यात येतो. त्यामुळे त्यावर दागिन्याची घर्षण क्रिया अधिक चांगली होते. अशाप्रकारे दगडावर अनेक दागिने घासले गेले की, कसोटीच्या दगडाचा पृष्ठभाग कॅल्शियमयुक्त पांढर्‍या दगडाने (फरशीने) घासून साफ केला जातो. मात्र आता कॅरेटो-मीटर हे यंत्र गेल्या काही वर्षांंपासून उपलब्ध झाले आहे. त्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढतो आहे.

‘मासले’
सोन्याची सर्वाधिक शुद्धता 24 कॅरेट असते. 24 कॅरेट म्हणजे 100} शुद्ध सोने. दागिने कोणत्याही शुद्धतेत तयार होऊ शकतात. उदा. 60} ते 99.5} असे दागिने ग्राहकाने बदल्यासाठी किंवा विक्रीसाठी आणल्यास, कसोटीवर घासून त्याची प्रत तपासली जाते. अशा दागिन्यांची शुद्धता उघड्या डोळ्यानं संशयास्पद वाटल्यास, ज्या शुद्धतेचं ते आहे त्याच सोन्याची नमुना पट्टी कसोटीवर घासलेल्या दागिन्याच्या खुणेजवळ शुद्धतेची घर्षण करून खात्री करण्यासाठी वापरतात. या नमुना पट्टीस ‘मासले’ म्हणतात. मासले 50}, 50.5}, 51}.. पासून 100} शुद्धतेपर्यंत कोणत्याही शुद्धतेत उपलब्ध असतात.

मजुरी ग्राहकाकडून का घेतली जाते?
सोन्याचा भाव हा सोने खरेदी आणि आणनावळ खर्चासह वाजवी नफा गृहीत धरून ठरवलेला असतो. हा भाव फक्त सोन्याचा असतो. सोन्याचे दागिने तयार करताना कारागिरांकडून ते तयार करून घ्यावे लागतात. व्यापारी दागिन्यांमध्ये भांडवलाची गुंतवणूक करतो. परंतु या दागिन्यामध्ये कारागिराने त्याचे कौशल्य वापरलेले असते. या कौशल्याची किंमत किंवा मोबदला कारागिरास द्यावा लागतो. म्हणून मजुरी ग्राहकांकडूनच घेतली जाते.

(उत्तरार्ध)
संदर्भसहाय्य : गिरीश टकले
(नाशिकच्या ‘टकले बंधू’ पेढीचे संचालक)

Web Title: The journey of gold...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.