पटकन उडी..?
By admin | Published: July 22, 2016 05:30 PM2016-07-22T17:30:38+5:302016-07-22T17:30:38+5:30
एक छोटंसं उदाहरण सांगतो. अदिती लहान होती. ज्युनिअर केजीमध्ये असेल. पोहण्याचा क्लास लावलेला. काही मुलं पोहायला घाबरत होती,
विवेक भालेराव
अदितीच्या व्यक्तिगत आयुष्यात तुमच्या तरुणपणापेक्षा काय चांगलं / वेगळं आहे? काय काळजी करण्यासारखं आहे?
- एक छोटंसं उदाहरण सांगतो. अदिती लहान होती. ज्युनिअर केजीमध्ये असेल. पोहण्याचा क्लास लावलेला. काही मुलं पोहायला घाबरत होती, उडी मारत नव्हती, रडत होती. मी अदितीला म्हटलं मार उडी. तशी तिनं कसलाही विचार न करता पटकन उडी मारली!
हे असं न घाबरता, पटकन, बिंधास्त उडी मारणं जे तिच्याकडे आहे, ते माझ्याकडे कधीच नव्हतं. आजही नाही. तिच्या वयाच्या सगळ्याच मुलांकडे हा आत्मविश्वास आहे. जे हवं, जे करावंसं वाटतं त्यात ते पटकन उडी मारून मोकळे होतात. मागचा-पुढचा विचार न करता ही मुलं पटकन नवीन विषयात उडी मारतात. अशी थेट उडी मारण्यात काही धोका असू शकतो याचा विचार ही मुलं कमी करतात याची थोडी काळजी वाटते.
अदितीच्या व्यावसायिक आयुष्यात तुमच्या तरु णपणापेक्षा काय चांगलं/वेगळं आहे? काय काळजी करण्यासारखं आहे?
- या मुलांची स्वप्नं खूप मोठी आहेत. आम्हीही पाहिलीच की स्वप्नं! मात्र मध्यममार्गी राहून, सगळ्यांना सांभाळून घेत, जरा बिचकत, जसं जमेल तसं आम्ही सुरुवातीला काम केलं. थोडं सावध राहून, सारासार विचार करून जमेल तसं आपल्या स्वप्नांकडे चालत राहिलो. आता तसं नाही. या मुलांना जे करावंसं वाटतं, त्यात ती सारं काही पणाला लावल्यासारख्या उड्याही घेतात. व्यवसायात अशी एकदम मोठी उडी घेणं हे माझ्या पिढीला धास्तीचं वाटू शकतं. वाटतंच. कधीकधी हेवाही वाटतो या बिन्धास्तपणाचा!
आमच्या पिढीसमोर स्वत:चा व्यवसाय उभा करताना जी आव्हानं होती त्यापेक्षा कितीतरी वेगळी आव्हानं या मुलांसमोर आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे उत्तरं शोधण्यासाठी त्यांना अन्य कुणाच्या अनुभवांचा उपयोग होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.
देशाच्या आर्थिक उदारीकरणानंतर आलेली व्यवसायातली स्पर्धा या पिढीला नवी उमेद देते हे मान्यच, पण त्या स्पर्धेची तीव्रता आणि वेग मला काळजी करण्यासारखा वाटतो.
आजच्या वातावरणात पुन्हा पंचवीस वर्षांचा होऊन बिझनेस सुरू करायची संधी मिळाली तर आवडेल/घ्याल का?
- नक्की घेईन! आवडेल पुन्हा पंचविशीत जाऊन आजच्या काळात काम करायला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शिस्तबद्ध काम करण्याचा प्रयत्न करीन. मी व्यवसाय सुरू केला, पण सुरुवातीची अनेक वर्षं अनेकानेक पातळ्यांवर झगडण्यात गेली. व्यवसाय म्हणजे नक्की काय याचा अर्थ मला खूप उशिरा कळला. अखंड कष्ट करणं हा एकच मार्ग माझ्या पिढीसमोर होता. आर्थिक उदारीकरणानंतरच्या बदलल्या वातावरणाने कष्टांचा वेगळा संदर्भ दाखवून दिला आहे. स्वत:च्या ढोरमेहनतीखेरीज इतरांमधल्या शक्यता हेरून, त्यांना कामाला लावणं हे व्यावसायिक कौशल्य असतं, हे मी फार उशिरा शिकलो. आता या साऱ्या गोष्टी वापरून, नव्या-बदलत्या काळात मला नव्यानं व्यवसाय करण्याची संधी मिळाली तर मी ती नक्की घेईन!