... शवासन घालून फक्त झोपून राहिलो !!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 06:01 AM2021-05-23T06:01:00+5:302021-05-23T06:05:02+5:30
लक्षणं असेपर्यंत मी टीव्ही पाहिला नाही, पुस्तक वाचलं नाही. मोबाईलकडे पाहिलं नाही. मला औषधांहून खरा फायदा झाला तो बेडवर तसाच पडून राहिल्याचा !
- डाॅसंजयजानवळे
बालरोगतज्ज्ञ असल्याने माझा दिवस अगदी व्यस्त असतो. वेळ काढून मी रोज नित्यनेमाने जिमला जातो. दर रविवारीचा लाॅंग रन सहसा कधी चुकत नाही. लाॅकडाऊनपूर्वी मी अनेक मॅरेथाॅनमध्ये धावलो होतो. मुंबईची टाटा मॅरेथाॅन वयाच्या सत्तेचाळीसाव्या चांगल्या टायमिंगने पूर्ण केली. लिखाणाचा ही छंद आहे. तात्पर्य हेच की, माझं आनंदी जगणं सुसाट वेगाचं होतं. त्यामुळे ‘आज’ श्वास घ्यायला वेळ नसताना मला पंधरा दिवस आपल्याला एकाच खोलीत रहावं लागेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
तीन महिन्यापूर्वी पाचसहा दिवस सर्दी- खोकला झाला होता तो एक गोळीही न घेता बरा झाला होता. ताप असतानाही त्याचवेळी सत्तर किलोचं डेडलिफ्ट केलं होतं.
रविवारी पंधरा किमी धावलो ; दिवसभर पेशंट ही तपासले. त्या दिवशीच रात्री अंगात ताप भरला, थंडी वाजत होती. घसा खवखवत होता. प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. सकाळी जीमला जाण्याचं त्राण अंगात उरलं नव्हतं. यावेळचं दुखणं वेगळंच असल्याचं जाणवत होतं. सोमवारी (१५ मार्च) सकाळी केलेली रॅपिड ॲंटिजन टेस्ट पाॅझिटिव्ह आली. आता पंधरा दिवस गृह विलगीकरणात रहायचं होतं. त्यावेळी पस्तीस बालरुग्ण हाॅस्पिटलात भरती होते. ऑब्झर्व्हर म्हणून येत असलेल्या एका नवख्या बालरोगतज्ज्ञाने वेळोवेळी मोबाईलवर मार्गदर्शन करण्याच्या अटीवर हाॅस्पिटलचं काम पाहण्याचं मान्य केलं.
कोविड-१९ ने हळूहळू रंग दाखवायला सुरुवात केली. तीन दिवस चांगलाच ताप येत होता, थंडी वाजत होती, घसा दुखणं, प्रचंड अंगदुखी, अशक्तपणा अशी लक्षणं होती. तोंडाला चव नसल्याने खाण्याची अजिबात इच्छा नव्हती. एरवी माझी झोप अवधी पाच-सहा तासाची. पण आता तासनतास बेडवर तसाच पडून राहायचो तेव्हा, झोपही येत असे. लक्षणं असेपर्यंत मी टीव्ही पाहिला नाही, पुस्तक वाचलं नाही. मोबाईलकडे पाहण्याची तर इच्छाच नव्हती. मला औषधांहून खरा फायदा झाला तो बेडवर तसाच पडून राहिल्याचा.
लहानपणापासून माझे आई वडील मला ‘हा फार भित्रा आहे’ असं म्हणत असत. एक डाॅक्टर म्हणून हा काम कसं करील, हा प्रश्न त्यांना पडत असे. साधी जखम झाल्यामुळे मी दहा वर्षांपूर्वी एक टी.टी. चे इंजेक्शन घेतलं होतं, त्यावेळी मला दरदरुन घाम आला, चक्कर ही आली होती. यावेळी मात्र मी अजिबात भ्यायलो नाही. मेंदूला तर मी विचार करु नकोस, असा आदेशच दिला. ‘बरं होणार’, असा आत्मविश्वास बाळगला. शरीराच्या पेशीन पेशींचं कोरोना विषाणूंशी द्वंद्व सुरु होतं. शवासन घातल्यासारखं निपचित पडून राहिल्याने सर्व पेशी जणू एकवटून लढल्या आणि त्यांनी कोरोनाला हरवलं.
शरीर रिकव्हर व्हायला लागलं. चांगलं बरं वाटायला लागल्यानंतर एक दिवस सकाळी टेरेसवर गेलो. वार्मअप् केलं. अन् हळूवार चालायला लागलो. मॅरेथाॅन पूर्ण करणाऱ्याला त्यादिवशी पावलं टाकण्याचंही त्राण उरलं नव्हतं. हळूहळू चालणं वाढवलं, दिवसातून दोनदा चालत असे. मला आता बरं वाटायला लागलं होतं. रोज योग केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढली, मनावर दाटलेले तणाव, मळभ दूर झालं.
चालणं, धावणं हलक्या गतीने सुरु केलं.. विलगीकरणाच्या तिसाव्या दिवशी २१ किमीचं अंतर कापलं. महिन्याभरात एकूण ६० किमी धावलो. हे सगळं मी माझं हाॅस्पिटलचं २४ तास काम सांभाळून केलं होतं. नियमित व्यायाम, उत्तम समतोल आहार, मनाची मॅरेथॉन मानसिकता, सकारात्मक विचार यांच्या बळावर वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मी कोरोनाला मात दिली.. याचा आनंद मला शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे.
(बालरोगतज्ज्ञ, बीड)
dr.sanjayjanwale @gmail.com