...एकावेळी फक्त एकच पाऊल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 06:01 AM2021-06-13T06:01:00+5:302021-06-13T06:05:02+5:30

कोविड होऊन गेल्यावर आपल्या शरीराचा अंदाज घेत, डॉक्टरांशी बोलूनच हळूहळू रुटीन बसवायला हवं. मला काही होत नाही हा आत्मविश्वास फाजील आहे.

... just one step at a time! | ...एकावेळी फक्त एकच पाऊल!

...एकावेळी फक्त एकच पाऊल!

Next
ठळक मुद्देकोविडमधून व्यवस्थित बरं होता येतं. पूर्वीसारखा व्यायाम, कामकाज सगळं सुरू करता येतं. फक्त गाडी रुळावर यायला वेळ लागतो आणि तो वेळ आपण स्वतःला दिला पाहिजे.

- मुक्ता चैतन्य

कोविड झाल्यावर जशी आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे तसंच कोविड पश्चातही काळजी घ्यायला हवी. कोविडनंतरचे त्रास मानसिक असतात, तसे शारीरिकही असतात. थकवा हा यातला महत्त्वाचा घटक आहे.

मीही यातून गेले. कोविडनंतर प्रचंड थकवा होताच. मानसिक ताणही काही प्रमाणात होताच, नाकारून चालणार नाही. थोडंसं काम केलं तरी दमायला व्हायचं. चालायला/ पळायला/ सायकलिंगला जाणं शक्य नव्हतं. घरकाम किंवा थोड्याशा ऑफिस कामानेही थकून जायला व्हायचं. चिडचिड होत होती. पण, त्याचा उपयोग नाही हेही माहीत होतं.

मी सगळं सबुरीनं घ्यायचं ठरवलं. बेबी स्टेप्स. ट्रेकमध्ये जेव्हा सलग खूप मैल चालायचं असतं तेव्हा एक वेळ येते की जाम थकून जायला होतं, आता एकही पाऊल टाकायला नको असं वाटायला लागतं. अशावेळी स्वतःला सतत सांगत राहायचं, बेबी स्टेप्स! एकावेळी एक पाऊल.. असं करत करत आपल्या मुक्कामाचं ठिकाण कधी येतं कळतही नाही. हीच स्ट्रॅटेजी मी कोविडनंतर अवलंबली. एकावेळी एक गोष्ट. एरवी मला एकावेळी अनेक गोष्टी करत राहण्याची सवय आहे. पण, कोविडनंतर मी स्वतःला बजावलं होतं की मल्टी टास्किंग करायचं नाही. कारण कोविडने ऊर्जा शोषून घेतली होती. त्यामुळे एकावेळी एक काम. दिवसभरात दोनच कामं झाली तरी हरकत नाही, त्याचा गिल्ट येऊ द्यायचा नाही हेही स्वतःला सांगितलं. आपण एका नव्या आजारातून बाहेर आलेलो आहोत, आजारापश्चात आपलं शरीर कसं वागेल आपल्याला माहीत नाही त्यामुळे कशाचीही घाई करायची नाही हे पक्कं ठरवलेलं होतं.

सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे माझा फिटनेस परत कमावणं. कोविडने सगळी ताकद काढून घेतली होती. गेलेली एनर्जी परत मिळवायला हवीच होती. घराखाली गल्लीतच थोडं चालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी भयानक थकायला झालं, पण म्हटलं ठिके, जमेल हळूहळू...

मोठ्या कष्टानं कमावलेला स्टॅमिना पार शून्यावर येतो तेव्हा जाम चिडचिड होते. त्यानंतर हतबल किंवा निराश हे दोन्ही वाटून देऊन चालणार नव्हतं. चालणं बरेच दिवस एखाद-दोन किलोमीटर पलीकडे नव्हतं. जेव्हा चालून विशेष दमत नाहीयोत हे लक्षात आलं त्यानंतर तीन-चार आठवड्यांत हळूहळू घरी व्यायाम सुरू केले. धिम्या गतीने मी बदल करीत होते. एक एक दिवस व्यायाम वाढवत नेला. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं सुरू होतं. योगासनं, कार्डिओ व्यायाम, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायामही सुरू केले... हळूहळू लय सापडली. या सगळ्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मनावरचा ताण कमी होत गेला. अस्वस्थता कमी झाली. व्यवस्थित झोप यायला लागली.

हे सगळं लिहिण्याचं कारण कोविड पश्चातच्या रिकव्हरीकडे अजिबात दुर्लक्ष करून चालत नाही. अनेक लोक डॉक्टरांनी दिलेली औषधं बंद करतात. आता काही होत नाही म्हणत मनमानी करायला लागतात. एकदम खूप चालायला/ पळायला/ व्यायाम करायला लागतात. एकदम प्रचंड घरकाम करतात. थोडक्यात खूप दगदग सुरू करतात. १५ दिवस एका खोलीत काढल्यावर आधीच कंटाळा आलेला असतो त्यामुळे लवकर रुटीन सुरू करायची घाई झालेली असते. आपण पूर्वीसारखेच आहोत हे स्वतःला सांगायचीही घाई असतेच. आपल्या शरीराचा अंदाज घेत, डॉक्टरांशी बोलूनच हळूहळू रुटीन बसवायला हवं. औषधं डॉक्टर सांगतील तोवर घेतलीच पाहिजेत. मला काही होत नाही हा आत्मविश्वास फाजील आहे. हा आजार नवा आहे, तो प्रत्येकाच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने वागतो, होणारे परिणाम वेगळे आहेत, अशावेळी निष्काळजीपणा करून चालणारच नाही.

मी कोविडनंतर धिम्या गतीने सुरुवात केली आणि आता मी माझा पूर्वीचा वेग पकडला आहे, तरीही मी अजूनही ‘बेबी स्टेप्स’ असंच स्वतःला सतत सांगत असते. कोविडमधून व्यवस्थित बरं होता येतं. पूर्वीसारखा व्यायाम, कामकाज सगळं सुरू करता येतं. फक्त गाडी रुळावर यायला वेळ लागतो आणि तो वेळ आपण स्वतःला दिला पाहिजे.

तेव्हा कोविडकाळात जशी काळजी घेतलीत तशीच नंतरही घ्या. स्वतःला जपा. कोविड होऊन गेलाय, आपल्यात अँटिबॉडीज् आहेत म्हणून मास्क न घालणं असले प्रकार करू नका. कोविड परत होऊ शकतोच. पण एकच लक्षात असू द्या, कोविड बरा होतो आणि आपण पूर्वीसारखे ठणठणीतही होतो.

Web Title: ... just one step at a time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.