ज्योत्स्नाबाई.... ज्योत्स्नाआई
By admin | Published: May 10, 2014 05:56 PM2014-05-10T17:56:25+5:302014-05-10T17:56:25+5:30
गोव्यातून मुंबईत आलेली एक साधीभोळी लहानशी पोर. अथक परिश्रमांच्या बळावर तिनं ‘स्वरज्योत्स्ना’ असं नावं मिळवलं. त्या गायला लागल्या, की वाद्यं आपोआप झंकारायला लागत, असं म्हटलं जात असे. गायिका म्हणूनच नव्हे, तर अभिनेत्री म्हणूनही नाव कमावलेल्या जुन्या पिढीतील कलावंत ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आज होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कन्येनं केलेलं स्मरण.
Next
वंदना खांडेकर
गोव्यातून मुंबईत आलेली एक साधीभोळी लहानशी पोर. अथक परिश्रमांच्या बळावर तिनं ‘स्वरज्योत्स्ना’ असं नावं मिळवलं. त्या गायला लागल्या, की वाद्यं आपोआप झंकारायला लागत, असं म्हटलं जात असे. गायिका म्हणूनच नव्हे, तर अभिनेत्री म्हणूनही नाव कमावलेल्या जुन्या पिढीतील कलावंत ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आज होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कन्येनं केलेलं स्मरण.
एका लहानशा गाणार्या मुलीचं नाव १९२५-२६पासून मुंबईत खूपच गाजू लागलं होतं. तेव्हाचा रेडिओ म्हणजे ‘बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’वरून तिचे वारंवार कार्यक्रम होत. ती होती दुर्गा केळेकर. गोव्याहून आठव्या-नवव्या वर्षीच मुंबईला आलेली. आपल्या वडील बहिणीबरोबर-गिरिजाबाई केळेकरबरोबर गाणं शिकून मोठी गायिका होण्यासाठी! तशी तर ती झालीच, पण शिवाय एक थोर अभिनेत्री म्हणूनही तिने खूप मोठं नाव मिळवलं. तिचीच जन्मशताब्दी आपण वर्षभर साजरी केली. आज ११ मे २0१४ रोजी तिने वयाची शंभरी पार केलीय- ती असती तर! असं म्हणावंसं खरंच वाटत नाही. कारण, तिचा असामान्य आवाज आणि गाणं कालर्मयादेच्या पलीकडचं आहे, असं मला मनापासून वाटतं. तिच्या गाण्याची टेप लावली, की ती मुळी प्रगटच होते माझ्यासमोर. असा एक कमालीचा जिवंतपणा आणि एक वेगळीच ऊब तिच्या आवाजात आहे. असा दैवी गुण असलेला आवाज विरळाच. तो आहे आमच्या आईचा- दुर्गा केळेकर ऊर्फ ज्योत्स्ना भोळेचा. तिची एक मैत्रीण (दिल्लीची सुहास भिसे, जी आईला ‘माझिया माहेरा’ म्हणण्यासाठी भांडावून सोडत असे!) एकदा मला म्हणाली, ‘ज्योत्स्ना सहज बसून गात असली, तरी तिच्याबरोबर वाद्यं वाजताहेत, असंच वाटतं. असं कसं ग?’ मी काय बोलणार? आवाजातला एक जिवंत झंकार, असंच म्हणावं लागेल ना? आई सोळा-सतरा वर्षाची असताना केशवराव भोळे भावगीत गायक म्हणून मुंबईत खूप लोकप्रिय झाले होते. दुर्गाला तर या भावगीतांनी अक्षरश: वेड लावलं. हे काही वेगळंच आहे, असं तिला जाणवलं आणि आपल्या भावाच्या (रामराय) वशिल्याने ती केशवरावांकडे शिकू लागली. तिचा आवाज, तीव्र ग्रहणशक्ती, बरहुकूम सूक्ष्म गोष्टीही गाण्यात प्रतीत करणं या वैशिष्ट्यांनी गुरू प्रसन्न झाले! आणि आयुष्यभरासाठी तिच्या उन्नतीची जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतली. ते तिचे पती, गुरू, मार्गदर्शक झाले. १९३२मध्ये दोघं विवाहबद्ध झाले आणि १९३३मध्ये ‘नाट्यमन्वंतर’च्या ‘आंधळ्यांची शाळा’ नाटकात ज्योत्स्नाबाईचं पहिलं पदार्पण झालं! एकीकडे तिची भावगीतं लोकप्रिय होत होती, तर दुसरीकडे ती अभिनेत्री म्हणून मान्यता पावत होती आणि यावर कळस तिच्या शास्त्रीय गायनाने चढवला. छोट्या रेडिओवरची छोटी दुर्गा आता ज्योत्स्ना भोळे म्हणून ऑल इंडिया रेडिओवरची श्रोत्यांची अत्यंत आवडती गायिका झाली! तर देशभरच्या प्रतिष्ठित संगीत सभांमधून तिने आपली कला सादर करून नाव मिळवलं. शाबासकी तर तिला थोर कलावंतांकडून अगदी लहानपणापासूनच मिळाली! पहिली शाबासकी मा. दीनानाथ यांची. कोण कौतुक होतं त्यांना तिच्या आवाजाचं आणि गाण्याचं! ती ९-१0 वर्षांची असताना तिला ‘बोल भावंदा बोल’ हे पंजाबी भजन त्यांनी शिकवलं. तिची पहिली ध्वनिमुद्रिका ‘पाहा गोकुळी रंगल्या गोपबाळा’ बाहेर आली, तेव्हा तर ते ज्याच्या त्याच्याकडे त्याची प्रशंसा करीत होते! पपांनाही (केशवराव) ते खूप मानीत. आई-पपांची तर त्यांच्यावर अपार माया होतीच!
मुंबईच्या लॅमिंग्टन रोडवरच्या म्युनिसिपल शाळेत दुर्गाच्या वर्गात नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्वांची मुलगी होती- नलिनी. नलिनीच्या आग्रहामुळे त्यांच्या घरी जाऊन दुर्गाने नानांना म्हणजे बालगंधर्वांना गाऊन दाखवलं आणि त्यांची शाबासकी तर मिळवलीच; पण ‘मुली, फार छान गातेस हो! खूप मोठी होशील,’ असा आशीर्वादही मिळविला आणि योगायोगाने पुढे बालगंधर्वांनी एक सत्कार समारंभाच्या प्रसंगी ‘माझ्यानंतर मला ज्योत्स्नाबाईच दिसतात,’ असे उद्गार काढले आणि ज्योत्स्नाबाईनी ते सार्थ केले.
ती फार फार तर १३ वर्षांची असताना मुंबईला आग्रा घराण्याचे उस्ताद खादिम हुसेन खाँ यांच्याकडे तालीम घेत होती. खाँसाहेबांनी ‘पिया मिलन की आस’ ही जोगियातली ठुमरी तिला शिकवली. रियाजात ती गात असताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ‘बस्स, बेटा! अब और नहीं सुन सकता!’ असे उद्गार त्यांनी काढले! आणि त्यांच्या शेवटच्या काळात, आजारी असताना आई भेटायला गेली असताना, त्यांनी आईला ही आठवण मुद्दाम सांगितली! असं दैवी भाग्य नशिबी असणं खरंच दुर्मिळ!
रँ. र. पु. परांजपे, यशवंतराव चव्हाण अशा कित्येक असामान्य व्यक्तींचं तिच्या संगीतावर प्रेम! ‘आजारपणातही ज्योत्स्नाबाईचं गाणं ऐकावंसं वाटतं,’ अशी इच्छा प्रगट करणं आणि आईने ती तत्काळ पूर्ण करणं, ही गोष्ट साधी नाही. आजाराचाही विसर पाडण्याची ताकद तिच्या आवाजात असल्याचीही ग्वाही आहे. सामान्य रसिक, जाणकार रसिक यांची तर ती अत्यंत मनपसंत गायिका होतीच; पण परखड समीक्षक, केशवराव भोळे, तिचे गुरू व पती यांनीही तिच्यावरील लेखात ‘असाधारण गोड आवाजाची एक रसाळ गायिका’ असा तिचा गौरव केला आहे!
या तिच्या जन्मशताब्दीवर्षात मी तिच्या आठवणींत बुडून गेले. एक नक्की, ती माझी आई नसती, तरी माझी सर्वाधिक आवडती गायिका झाली असती- म्हणजे आहेच! बसताक्षणी सूर लागायचा तिचा, तोही सहजसुंदर! रागदारीतला शास्त्रशुद्ध सौंदर्यपूर्ण विस्तार, रंजकता, सूक्ष्म विचार आलापीत, तानक्रियेत जराही सौंदर्य ढळू न देणं, नाटकातल्या पदांमधल्या अर्थाला धरून तो तो भाव शब्दोच्चार, स्वरोच्चरातून प्रगट करणं, गाण्यातला संयम जपणं ही सगळी किमया तिला साधली होती. भावगीतातही तेच! प्रारंभीच्या भावगीतांनाही एक वेगळीच मजा आहे. ‘दिन मावळला’, ‘शिरी घागर पाझरते’, ‘नाचती ओठावरी बोल वेड्या प्रीतीचे’ अशा अनेक भावगीतांनी लावलेली हुरहुर ७0 -८0 वयातल्या मंडळींना आजही अस्वस्थ करते! आणि ती गाणीही किती लांबलचक असायची. पण, आईला सगळी शेवटपर्यंत तोंडपाठ होती! पी.एल. काकांचं आवडतं गाणं होतं ‘होताच उजळ आभाळ’ आणि अखेरच्या काही दिवसांत त्यांना ते ऐकावंसं फार वाटत होतं. आईला त्यांनी ते बोलून दाखवताच आई त्यांच्या घरी गेली आणि ते पानभर गाणं घडाघडा पाठ म्हणून दाखवलं! किती खूश दिसत होते दोघेही! तिचंही वय ऐंशीच्या वर होतंच तेव्हा; कॅन्सरही झाला होता. पण, वृत्तीचा ताजेपणा, टवटवीतपणा, मनाची उभारी तो कॅन्सरचा राक्षसही हिरावून घेऊ शकला नाही. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेऊन शांत राहिली, गात राहिली. कोणी भेटायला आलं, की गप्पांत, आठवणी सांगण्यात, ऐकण्यात रमायची. ‘ज्योत्स्नाबाई भेटल्या की किती प्रसन्न वाटतं हो!’ हे तर मी अगणित वेळा ऐकलंय. तिची स्वाभाविकता हे तिचं वैशिष्ट्य होतं. तिचं गाणं तिच्यापासून वेगळं नव्हतंच. तिच्या व्यक्तिमत्त्वाचंच प्रतिबिंब होतं ते. सहज, स्वाभाविक, अत्यंत आकर्षक!
तिच्या लहानपणाच्या किती तरी गोष्टी, आठवणी ती आम्हाला सांगायची. ते मला फारच आवडायचं. तेव्हाचं गोवं, अगदी साधीसुधी राहणी, खाणंपिणं, तिच्या आईची म्हणजे आमच्या आजीची करडी शिस्त! आई धरून ही चौदा भावंडं होती. आईचा नंबर चौथा! थोरल्या दोन बहिणी म्हणजे गिरिजाबाई आणि केसरबाई तर उत्तम गायिका होत्याच, पण आणखी दोन बहिणींनाही गाण्याची उपजत देणगी होती. सर्वांत धाकटी ललिता (खांडेपारकर) तर अत्यंत गुणवान. आईला तिचा अतिशय अभिमान होता. बडे गुलाम अलींच्या ठुर्मया, लताबाईंची हिंदी गाणी ती इतकी हुबेहूब म्हणायची की बस्स! चित्रकारही होती, जे.जे. स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थिनी होती.
पुढे मुंबई आकाशवाणीवर कोकणी विभागात नोकरी करत होती, तेव्हा तिने कोकणी गीतांना लावलेल्या चाली फारच लोकप्रिय झाल्या. आईच्या पाठीवरची मंगला रानडे. तीही नाटकात काम करायची आईबरोबर. जवळजवळ सर्वच भावंडांमध्ये कलागुण उतरले होते, त्यांच्या आजीचे! माझी पणजी खूप उत्तम गायची म्हणे.
आईला एखादं गाणं आठवलं, की ती लगेच मला म्हणून दाखवायची आणि शिकवून टाकायची. एकदा एक ठुमरी शिकवली-‘जाओ जाओ मै ना मानू तोरी बतिया’. तेव्हाच नेमका माझा कार्यक्रम होता कुठे तरी. मी लगेच त्या कार्यक्रमात ती ‘ताजी ताजी’ ठुमरी पेश केली! बंदिशीही अशीच बोलता बोलता सांगायची आणि मग त्या रियाजात आम्ही पक्क्या करायचो. ‘विधिलिखित’ नाटकातलं ‘ताराया दीन अबला या’ असंच एकदा शिकवलं. आम्ही दोघी दिल्लीला जात असता नुकतंच रेडिओत ध्वनिमुद्रित झालेलं, ललितामावशीने चाल दिलेलं एक कोकणी गाणं शिकवलं आगगाडीत! तो प्रवास मी विसरूच शकणार नाही. तिच्या भूमिकांचा, गाण्यांचा, मैफलींचा पगडा आहेच मनावर; पण हे असे अविस्मरणीय क्षण खूप दिले तिने मला.
अशी आई कुठे कायमची जाते थोडीच? या तिच्या जन्मशताब्दीवर्षात तर माझ्यासाठी या वर्षाचा विषयच ती आहे आणि तिच्यावरच्या लोकांच्या प्रेमामुळे आम्हाला खूप सदिच्छा आणि आशीर्वाद मिळतात ते वेगळंच! आईविषयी बोलताना पपांना क्षणभरही विसरता येत नाही. तिच्या उपजत गुणांना अधिक प्रकाशमान करून जी सौंदर्यतत्त्वं त्यांनी तिच्या कलेत बिंबवली- हे तर मला ऐतिहासिकच काम वाटतं, अन्यथा, दुर्गा केळेकर आपल्याला ज्योत्स्ना भोळेच्या रूपात मिळती ना! त्रिवार, अनेकवार सलाम या दोघांना!
(लेखिका ज्योत्स्ना भोळे यांच्या कन्या आहेत.)