काकूचा, माझा आणि देशाचा पासपोट
By Admin | Published: May 8, 2016 01:08 AM2016-05-08T01:08:21+5:302016-05-08T01:08:21+5:30
तोएक अत्यंत विलक्षण अनुभव होता. एकाच वेळी गदगदून टाकणारा, हळवा करणारा आणि आनंदाचे उधाण आणणारा! सन 1986. बहुधा एप्रिल महिना असावा.
>- ज्ञानेश्वर मुर्ळे
काकू म्हणजे माझी आई.
नऊवारीचा पदर डोक्यावरून
न ढळणा:या काकूच्या पासपोर्टवर
तिची सही नाही, अंगठा आहे!
- तिच्याकडला हा स.नि.डा.आ.
आणि माझा डिप्लोमॅटिक पासपोर्ट
ही एक खूण आहे;
..भारतीय लोकशाहीच्या प्रवासाची!
तोएक अत्यंत विलक्षण अनुभव होता. एकाच वेळी गदगदून टाकणारा, हळवा करणारा आणि आनंदाचे उधाण आणणारा! सन 1986. बहुधा एप्रिल महिना असावा. मी तोक्योच्या नरीता विमानतळावर दोन अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींचे स्वागत करायला गेलो होतो. एरवी भारताचा विदेशातील अधिकारी या नात्याने देशाच्या पंतप्रधानांपासून केंद्र व राज्य सरकारांमधले मंत्री, वरिष्ठ अधिकारी वर्ग, संसद सदस्य, शास्त्रज्ञ, कलाकार यांसारख्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे विमानतळावर स्वागत करायला किंवा त्यांना निरोप द्यायला जाणो होत असे.
पण त्या दिवशी मी ज्यांना घ्यायला गेलो होतो ते या सर्वाहून अधिक श्रेष्ठ व महत्त्वाचे होते. निदान माङया दृष्टीने.
विशेष पाहुणो येतात तेव्हा एक वेगळा पास काढून थेट विमानाच्या दरवाजार्पयत जाण्याची परवानगी मिळते, तीही मी काढली होती. विमान येईर्पयत जिवाची कालवाकालव होत होती. विमान उतरताच ती थोडी कमी झाली; पण तिची जागा उत्सुकतेने, उत्कंठेने घेतली. ते टर्मिनलला लागेर्पयत आणि त्यानंतर विमानाचा दरवाजा उघडेर्पयतचा दहा-पंधरा मिनिटांचा काळ खूप दीर्घ वाटत होता. शेवटी एकदाचं विमान आलं आणि दरवाजा उघडला. समोर तात्या आणि काकू (माङो आईवडील)! मला पाहून त्यांचे डोळे चमकले. मग ओले झाले. आम्ही सगळेच गहिवरून गेलो.
तिथून त्यांना घेऊन मी इमिग्रेशन काउंटरकडे चालू लागलो. चालता चालता मी त्यांच्याकडून पासपोर्ट मागून घेतले. विशेष अतिथींसाठी असलेल्या काउंटरवरती पासपोर्टवर ठप्पा मारून लगेच सुटका झाली. त्यानंतर सामान घ्यायच्या हॉलमध्ये सामानाची प्रतीक्षा करत असताना हातातला काकूचा पासपोर्ट सहज उघडला. काळ्या पांढ:या रंगांमधला तिचा फोटो. तिचे भव्य कपाळ, बोलके डोळे, ठळकसे कुंकू, डोक्यावरचा पदर! मला तिचा चेहरा तेजस्वी वाटला. त्यानंतर सहज फोटोखाली नजर गेली. तिथे सहीची जागा. पण तिथे सही तर नव्हतीच.
सही असणो शक्यही नव्हते. कारण काकू शाळेत कधी गेली नव्हती. म्हणजे तशी ती पहिलीला गेली होती. पण शाळेत तपासणीसाठी इन्स्पेक्टर येणार अशी कुणीतरी भीती घातली आणि तिने शाळेला जी बुट्टी दिली ती कायमचीच. तिने पुन्हा शाळेत जावे म्हणून कुणीच सक्ती केली नाही. तिचा भाऊ पाचवीर्पयत शिकला, पण ती पहिली नापास राहिली. त्यानंतर काही वर्षातच तेराव्या वर्षी तिचे लगA झाले. शाळा राहिली. तशीच सही राहिली. मध्यंतरी 1974 ला संपूर्ण जिल्हा साक्षर झाला. तेव्हा तिनेही पत्र्याच्या डब्यावर लिहिलेली डाळींची नावे वाचून दाखवली. डाळी कोणत्या आणि डबे कोणते, याची तिला आधीपासून कल्पना होती. त्यामुळे सही राहिली ती राहिली. त्या जागी आली सहीची निशाणी डावा अंगठा. स.नि.डा.आ. तिला त्यात काही गैर वाटले की नाही माहीत नाही. आम्हाला का वाटले नाही याचे मात्र उत्तर माङयाकडे नाही.
त्या दिवशी तो अंगठा सहीच्या जागी पाहून मला एकदम गहिवरून आले. त्या सहीच्या वरच्या बाजूला असलेल्या फोटोतून ती त्याच वात्सल्यपूर्ण नजरने सगळ्या जगाकडे आणि तिच्या लेकरांकडे बघत होती. मी समोर पाहिले. ती आणि तात्या गोंधळून न जाता नरीता विमानतळावर होणारे जपानचे पहिले दर्शन आपल्या डोळ्यांनी टिपत होते. आपला शिकला सवरलेला आणि जपानमध्ये भारत सरकारच्या वतीने अधिकारी बनून गेलेला मुलगा आपल्या सोबत आहे या गोष्टीचा एक संयत विश्वास त्यांच्या चेह:यावर होता. धोतर, लांबलचक पांढरा शर्ट आणि त्यावर तपकिरी रंगाचा कोट घातलेले तात्या व नऊवारी, त्यावर झंपर (आताच्या भाषेत ब्लाऊज) व डोक्यावर पदर घेतलेली काकू दोघेही त्या झगमगाटाने भरलेल्या प्रगत देशाच्या विमानतळावर इतर प्रवाशांपेक्षा खूप वेगळे दिसत होते. पण त्यांच्या एकंदरीत वावरण्यात कोणताही गोंधळलेला भाव नव्हता. माङो लक्ष पुन्हा एकदा काकूचा फोटो आणि त्याखालचा तिचा ‘अंगठा’ यांच्याकडे गेले. माङया हातातला पासपोर्ट मला एकदम फार अर्थपूर्ण वाटला. तो पासपोर्ट एका अर्थाने तिने आयुष्यात आजवर केलेल्या प्रवासाचे सार दर्शवित होता. त्याचप्रमाणो तो माङया तिथवरच्या प्रवासाचाही अर्क होता. एका अर्थाने समाजाने तिचा जो शिक्षणाचा प्रवास देठातूनच छाटला होता तो माङया पिढीत पूर्ण झाला. त्या शिक्षणाने आमच्या दोघांच्याही जीवनात आमूलाग्र बदल आणला. प्रवास, सुखसोयी यांच्या बरोबरीने नव्या जगात प्रवेश करण्याचा ‘पासपोर्ट’ आम्हाला मिळाला. मी शिक्षणाअभावी गावातच राहिलो असतो तर हा नव्या जगाचा ‘पासपोर्ट’ आम्हाला मिळणो शक्य नव्हते. काकू तर पासपोर्ट काढायला गेलीच नसती. 1985 साली गावात पासपोर्ट काढणो तर राहू द्या; पण पासपोर्ट शब्दाचा स्पर्शही फार थोडय़ा लोकांच्या विचारांना आला असेल.
जपानच्या नरीता विमानतळावरचा तो प्रसंग तब्बल तीस वर्षानी 1 एप्रिल 2क्16 रोजी मला जसाच्या तसा आठवला. त्या दिवशी मी विदेश मंत्रलयातील अधिकारी या नात्याने आयुष्यात पहिल्यांदा कोल्हापूर आणि सोलापूर या माङया आणि शेजारच्या जिल्ह्यांना कार्यालयाच्या कामानिमित्त भेट दिली. विदेश मंत्रलयाचे कोल्हापुरात कोणते काम? - तर मी कोल्हापुरात पासपोर्टच्या कॅम्पचे उद्घाटन केले. सोलापुरात तिथे नव्याने उघडायच्या पासपोर्ट कार्यालयासाठी लागणा:या जागेची पाहणी केली.
कॅम्पच्या उद्घाटनाच्या भाषणात मला नरीता विमानतळावरच्या त्या प्रसंगाची आठवण झाली. नरीता विमानतळावरची आठवण आणि कोल्हापुरातील पासपोर्टच्या कॅम्पचे उद्घाटन या दोन्हीत मला एकाचवेळी विरोधाभास आणि सुसंगती जाणवली. पूर्वी पासपोर्टचा प्रवास मोठय़ा शहरांमधून अधिक मोठय़ा शहरांकडे व्हायचा. आता तो जिल्हा नि गावोगावी पोहोचतोय. पूर्वी पासपोर्टची मर्यादित उपलब्धता आपल्या देशाच्या अज्ञानाची, गरिबीची व निरक्षरतेची खूण होती. आता देशातल्या 8क् पेक्षा अधिक केंद्रांमधून लोकाभिमुख पद्धतीने पासपोर्ट उपलब्ध करून दिला जातो आहे. भारत सरकारच्या विदेश मंत्रलयाने हे काम जवळजवळ अभियानासारखे चालवले आहे. आज वर्षाला दीडेक कोटी पासपोर्ट जारी केले जात आहेत. ही उपलब्धता साक्षर, सजग, गतिशील आणि स्वतंत्र भारताच्या प्रगतीच्या वाटचालीची खूण आहे.
मी विदेश सेवेत रुजू झालो, त्यानंतर जपानमध्ये कामासाठी सरकारच्या वतीने पाठवण्यात आले. विनंती न करता सामान्य असा नव्हे, तर विशेष व्यक्ती, मंत्री व संसद सदस्यांसाठी दिला जाणारा ‘डिप्लोमॅटिक (राजनयिक) पासपोर्ट’ देण्यात आला. माङया विनंतीवरून माङया आईवडिलांना फारसा त्रस न होता मुंबईला पासपोर्ट मिळाला. त्या काळात मी विदेश सेवेत नसतो आणि माङया आईने पासपोर्टसाठी सगळ्या अडचणी सोसून अर्ज केलाही असता, तर तिला पासपोर्ट मिळालाही असता, तर त्यावर ‘इमिग्रेशन क्लिअरन्स रिक्वायर्ड’ (विदेश गमनासाठी ना हरकत पत्र आवश्यक) असा शिक्का निश्चित पडला असता. तिला तिच्या ‘अंगठय़ा’मुळे व्यवस्थेला स्पष्टीकरण देणो भाग पडले असते.
..आणि आज तिचा मुलगा न्यू यॉर्कमध्ये भारताचा काउन्सिल जनरल म्हणून काम करून भारतात परत येतो, आणि संपूर्ण भारताच्या पासपोर्ट व व्हिसा या दोन्ही विभागाचा विदेश मंत्रलयातील धोरण व अंमलबजावणी यांचा प्रमुख या नात्याने जन्मभूमीत पासपोर्टचा कॅम्प लावतो याचे श्रेय शिक्षण आणि लोकशाही यांच्या सकारात्मक प्रवासास जाते.
कोल्हापूरच्या भाषणात म्हणूनच पासपोर्टचे वर्णन मी ‘मुक्तीचा महामार्ग’ असे केले. प्रत्येक भारतीयाला, मग तो ग्रामीण असो वा शहरी, अंगठेबहाद्दर किंवा उच्चशिक्षित, गरीब वा अमीर त्याला त्याच्या दारात, घरात पासपोर्ट मिळावा या माङया स्वप्नपूर्तीसाठी मी आता स्वत:ला झोकून देणार आहे. उगीच नाही हिंदीत पासपोर्टला ‘पार पत्र’ म्हणत. जीवनप्रवाहातील अडचणींपासून सर्वाना सुखरूप ‘पार’ पाडायला मदत करणारे ते ‘पार पत्र’!
भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे नुकतेच न्यू यॉर्कहून परत येऊन विदेश मंत्रलयात वरिष्ठ पदावर रुजू झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या छोटय़ा गावापासून थेट जगाच्या व्यासपीठावर पोचलेल्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ते बदलांच्या अनेक प्रवाहांचे साक्षीदार झाले.
आजवरच्या वाटचालीत मनाशी जमलेले श्रेयस वाटून देणारी ही नवी लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.
(लेखक भारतीय परराष्ट्रसेवेतील
वरिष्ठ अधिकारी आहेत.)
dmulay58@gmail.com