अक्षरांना शारीरिक अंतराचं भान देणारा अक्षरकर्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 06:04 AM2020-07-12T06:04:00+5:302020-07-12T06:05:21+5:30

अक्षरांना चेहरा तर असतोच असतो;  पण अक्षरांना मणका असतो,  अक्षरांना असतात खांदे, हात, पाय, पंजे, बोटं  आणि धडही असतं अक्षरांना. हे जाणलं ते कमल शेडगे यांनीच!

Kamal Shedge- An artist, who realizes the beauty and physical distance of the letters | अक्षरांना शारीरिक अंतराचं भान देणारा अक्षरकर्ता 

अक्षरांना शारीरिक अंतराचं भान देणारा अक्षरकर्ता 

Next
ठळक मुद्देकमल शेडग्यांनी अक्षरांना स्वत:च्या पायावर उभं रहायला शिकवलं, तेही शारीरिक अंतराचे नियम घालून देऊन !

- चंद्रमोहन कुलकर्णी
चित्रकारानं मुद्दाम घडवलेलं अक्षर हे केवळ कलात्मक असून पुरणार नाही, तर ते शब्दार्थाचं वाहन असावं, ही संकल्पना दलालानंतर पुढे कमल शेडग्यांनी नेली, रुजवली, वाढवली, फुलवली आणि पुढे तिला रसरशीत फळंही आली.
सिनेमा-नाटकाचं नाव असो, लेखाचं शीर्षक असो, की कथा कादंबरीचं किंवा समीक्षात्मक पुस्तकाचं शीर्षक; त्या त्या नावांतनं ध्वनित होत असलेला अर्थ, आणि लेखक, संपादक, प्रकाशक, जाहिरातदार अथवा नाटक-सिनेमाचा दिग्दर्शक यांना अपेक्षित असलेला अर्थ स्वत:च्या संस्कारातनं आणि कलात्मक संपादनाच्या गवाक्षातून पहायचा आणि वाचकासमोर ठेवायचा अशी मोठी प्रक्रिया करणारा कमल शेडगे हा अक्षरकर्ता.
देवनागरी अक्षरांमधला विशिष्ट अकलात्मक मराठी बोटचेपेपणा अलगद बाजूला सारूनपण मराठी बाणा विसरू न देता साठसत्तरच्या दशकातल्या अमेरिकन आणि युरोपियन  ग्राफिक डिझाइनर्सनी ग्राफिक आर्टला बहाल केलेला निओमॉडर्न पोशाख देवनागरी अक्षरांना रुबाबात चढवला, तो सर्वप्रथम, कमल शेडग्यांनी!
सत्तरच्या दशकात एका मराठी दैनिकाच्या अतिशय दुर्वाच्य, आणि किडक्या फॉण्टसमवेत कमल शेडग्यांची अक्षरं छापून आली की त्या विरोधाभासामुळे त्या दैनिकाच्या रविवारच्या पुरवण्या अक्षरश: हिरव्यागार होऊन जात असत.
अक्षर फक्त वळणदार नसतं आणि ते फक्त सुंदरही नसतं, अक्षर अर्थासहित असतं, अक्षर आशयासहित असतं. अक्षराचे फराटे निर्थक नसतात, तर ते असतात अक्षरांचे श्वास!
अक्षरांना अवयव असतात, ते अशक्त असतात, सुदृढ असतात नि सशक्तही असतात, हे सांगितलं कमल शेडग्यांनी!
एखाद्या चित्रकाराचा, मानवी शरीराच्या स्नायूंचा आणि अस्थींचा अभ्यास असावा, तसा अभ्यास होता कमल शेडग्यांचा. अक्षरांची अँनॉटामी पाठ होती त्यांना. 
अक्षरांना चेहरा तर असतोच असतो; पण अक्षरांना मणका असतो, अक्षरांना असतात खांदे, हात, पाय, पंजे, बोटं आणि धडही असतं अक्षरांना.. अक्षरांमधल्या आकड्यांनाही स्वत:चं मूल्य असतं आणि स्वल्पविराम, अल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह आणि एकेरी-दुहेरी अवतरणचिन्ह ह्या मंडळींना आपापलं काम प्रभावीपणे कसं करावं आणि आशय आणखी बहारदार कसा करावा, हे शिकवलं कमल शेडग्यांनी.
कमल शेडग्यांनी अक्षरांना स्वत:च्या पायावर उभं रहायला शिकवलं, तेही शारीरिक अंतराचे नियम घालून देऊन ! 
अक्षरांच्या दोन उभ्या दंडांमधल्या, दोन गोलाकारांमधल्या, खरं तर दोन श्वासांमधल्या जागांचा अवकाश अचूक ओळखला ह्या कलावंतानं आणि त्या ‘मधल्या जागांच्या अवकाशा’चा सन्मानही केला !
- त्यांना सलाम!

chandramohan.kulkarni@gmail.com
(लेखक ख्यातकीर्त चित्रकार आहेत)

Web Title: Kamal Shedge- An artist, who realizes the beauty and physical distance of the letters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.