कर्मयोगी टिळक

By admin | Published: June 7, 2014 07:17 PM2014-06-07T19:17:48+5:302014-06-07T19:17:48+5:30

डॉ. सदानंद मोरे लिखित ‘कर्मयोगी लोकमान्य’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन आज (रविवारी) मराठा चेंबर ऑफ कॉर्मस, टिळक रस्ता येथे सकाळी साडेदहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. त्यानिमित्त ग्रंथकाराने करून दिलेली या ग्रंथाची ओळख.

Karmayogi Tilak | कर्मयोगी टिळक

कर्मयोगी टिळक

Next

 डॉ. सदानंद मोरे

 
भारतभूमीला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी जणू स्वत:ला पणालाच लावले होते. अशा व्यक्तींमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे नाव विशेष महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व करताना त्यांनी हा लढा भारतीय पातळीवर नेऊन त्याच्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. साहजिकच, ते अखिल भारतीय पातळीवरील पहिले नेते ठरले.
टिळक महाराष्ट्रातील असल्यामुळे मराठी माणसाला त्यांच्याविषयी विशेष आस्था आणि अभिमान असणे स्वाभाविक आहे. या आस्थाअभिमानापोटीच आणि जिज्ञासेपोटीही अनेक मराठी अभ्यासकांनी टिळकचरित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. ‘कर्मयोगी लोकमान्य : चिकित्सक आकलन’ हा ग्रंथही असाच एक प्रयत्न आहे. अनेक मराठी व इंग्रजी टिळकचरित्रे उपलब्ध असताना या नव्या चरित्राची गरज काय, असे एखाद्याला वाटू शकते.
या प्रश्नाचे एक उत्तर बदलेला काळ व बदललेली वाचकांची पिढी, हे आहे. टिळक गेल्यानंतरच्या शंभर वर्षांत अनेक स्थित्यंतरे झाली.  देश स्वतंत्र झाला. त्याने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला. टिळकांच्या काळात जोमाने पुढे येत असलेली व खुद्द टिळकांनाही जिचे आकर्षण वाटत होते ती मार्क्‍सची साम्यवादी प्रणाली आज लुप्तप्राय झाल्यासारखी आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर जवळजवळ अर्धशतकभर जगातील राष्ट्रांची दोन छावण्यांत विभागणी होऊन त्यांच्यात शीतयुद्ध चालू राहिले. शीतयुद्धाच्या काळात भारताने अलिप्तवादाचा आश्रय घेऊन स्वत:ला दूर ठेवले होते खरे; पण त्यानंतरच्या दहशतवादी युद्धखोरीपासून तो वेगळा राहू शकला नाही.
दुसर्‍या बाजूला जागतिक पातळीवरील नव्या अर्थकारणाचा परिणाम म्हणून भारतात एक नवश्रीमंत नवमध्यम वर्ग तयार झाला. त्याच्या गरजा, जीवनदृष्टी, आशाआकांक्षा पूर्वीपेक्षा गुणात्मकरीत्या वेगळय़ा आहेत. या नव्या पिढीला आपला जुना इतिहास या बदललेल्या संदर्भात, बदललेल्या परिप्रेक्ष्यात व त्यांना समजेल अशा चौकटीत, भाषेत सांगायची गरज आहे. त्याला टिळक चरित्राचा अपवाद असण्याचे कारण नाही.
हा झाला वाचकांच्या गरजेचा मुद्दा. दुसरा मुद्दा ग्रंथाच्या अंगभूत वेगळय़ा वैशिष्ट्याचा आहे. टिळक लढाऊ स्वातंत्र्यसेनानी होते; पण त्यांच्या या लढाऊपणाला, किंबहुना एकूणच जीवनाला भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान होते. या अधिष्ठानाला बाजूला ठेवून त्यांच्या चरित्राची नीट संगती लावता येत नाही. निष्काम कर्मयोग ही त्यांची तात्त्विक जीवननिष्ठा त्यांच्या कृतींचे अधिष्ठान होते. प्रस्तुत ग्रंथात ही जीवनदृष्टी मध्यवर्ती ठेवून तिच्या अनुषंगाने चरित्राचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रंथनामातील ‘कर्मयोगी’ हा शब्द त्यातूनच आला आहे. टिळक मंडालेच्या तुरुंगवासातून मुक्त झाल्याच्या घटनेला शंभर वर्षे  पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्याचा योग या ग्रंथाच्या माध्यमातून साधता आला, यासाठी लेखकाला कृतार्थ झाल्याचे वाटणे स्वाभाविक आहे..
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Karmayogi Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.