घुंगरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:03 AM2020-02-23T06:03:00+5:302020-02-23T06:05:06+5:30
केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असताना स्पेनला जायची संधी मिळाली आणि तिथे कथक नावाच्या आजवर न ऐकलेल्या भारतीय नृत्यप्रकाराची चाहूल लागली. घरदार सोडून आणि कुटुंबाला दुखावून 95 साली मी प्रथम भारतात आले ते अनेक आडवे-तिडवे प्रश्न मनात घेऊनच. पण नऊ वर्षांच्या भारतातील या मुक्कामाने आयुष्यभर पुरतील अशा अनेक गोष्टी दिल्या. कथकचे हे ऋण फेडण्यासाठी पुढील कित्येक जन्म पायात घुंगरू बांधण्यासाठी मी आनंदाने तयार आहे..
- मसाका सातो
अशक्य वाटणारी आणि आपल्या दृष्टीच्या कितीतरी पल्याड असलेली एखादी दुर्मीळ गोष्ट हजारो मैलांचे अंतर ओलांडून आपल्या ओंजळीमध्ये कशी येते? कुठे आकाराला येते ही योजना? आणि कोणाच्या आशीर्वादाने? तसे नसते तर, नृत्याच्या नादाला सीमेबाहेर ठेवणार्या जपानच्या एका गावातील माझ्यासारखी तरु णी कथकपर्यंत कशी पोहोचली असती? तेही पंडित बिरजू महाराजजींसारख्या गुरुपर्यंत? हे सगळे घडून दोन दशके उलटली असतील; पण आजही ताजे आहे सगळे स्मरणात. जपानमधील निगाटा ते भारतातील दिल्लीपर्यंतचा मोठ्ठा, परीक्षा बघणारा प्रवास आणि त्यातील अनेक क्षण. काही उदास तर काही झळझळीत..
आपल्या कुशीत राहणार्या तरु णींना नृत्याचे शिक्षण घेण्याचे स्वप्न कधीतरी पडू शकते यावर जणू अजिबात विश्वास नसावा अशा जपानमधील निगाटा नावाच्या गावात वाढले मी. टोकिओपासून दोनेकशे किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाला समजत होती ती फक्त अभ्यासाची भाषा आणि त्यानंतर फार तर फार पियानो शिकण्याची चैन! अशा अन्न-पाण्यावर जगत असताना हे नृत्याचे वारे माझ्या कानात शिरले कुठून? सांगणे फार अवघड आहे. त्यामुळे हे खूळ माझ्या आईला समजणे शक्यच नव्हते, शिवाय महिन्याच्या दोन टोकांची जेमतेम जुळवाजुळव होत असताना मुलीच्या या भलत्या-सलत्या हट्टासाठी पैसे आणायचे म्हटले तर कुठून? मग, सगळ्या जपानी मुलींसारखी मीही इकेबाना शिकण्याचा उपचार पार पाडायला गेले आणि काही काळ पियानो.
केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असताना स्पेनला जायची संधी मिळाली आणि तिथे शिकलेल्या फ्लेमिन्को नावाच्या नृत्यप्रकाराने मला कथक नावाच्या आजवर न ऐकलेल्या भारतीय नृत्य प्रकाराची चाहूल दिली.
लोकनृत्य आणि संगीताला आपल्यामध्ये सामावून घेणार्या या ‘फ्लेमिंको’ नृत्यप्रकाराची मुळे नेमकी कोणत्या भूमीतील? या प्रश्नाच्या उत्तरादाखल कोणीतरी तेव्हा भारतातील कथक नृत्याचे नाव घेतले. माझ्या गावातील मॉनेस्ट्रीमुळे मला बुद्ध आणि भारताचे नाते समजले होते. त्याच भारतातील कथक नृत्याचा बुद्धाशी काही संबंध असेल? त्याने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाशी?.
95 साली प्रथम भारतात आले ते असे अनेक आडवे-तिडवे प्रश्न मनात घेऊनच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या दौर्यात प्रथम कथक बघितले. एकदा, दोनदा आणि जणू त्याची भूल पडून परत परत बघत राहिले! तो अनुभव घेत असताना मला जाणवत गेले, वयाच्या आठव्या वर्षापासून मला ज्या नृत्याची ओढ होती ते हे, अगदी हेच.! आणि ठरवले, आईचा कडवा विरोध धुडकावून इथेच राहायचे. माझी इंजिनिअरिंगची पदवी, तोशिबा कंपनीतील पैशाची ऊब देणारी नोकरी, सगळे आता या कथकपुढे अगदीच बिन महत्त्वाचे वाटू लागले होते. हे जिला समजत होते ती माझी आई ‘नो स्टेइंग इन इंडिया’ असे पुन्हा पुन्हा बजावत होती. तोपर्यंत माझ्या बँकेत जमलेले पगाराचे पैसे भारतात राहण्यासाठी पुरेसे वाटले. ही गोष्ट 1995 सालामधील, (म्हणजे थोडी स्वस्ताई असलेल्या काळातील!) मी एका ओळीत आईला माझा निर्णय कळवला, ‘स्टेइंग इंडिया’ आणि दिल्लीत कथक गुरुचा शोध सुरू केला.! मालती श्याम या माझ्या पहिल्या गुरु , त्यानंतर पंडित बिरजू महाराजजी यांचे चिरंजीव जयकिशन महाराज आणि त्यानंतर स्वत: बिरजू महाराजजी.
‘स्टेइंग इंडिया’ असे म्हणत घराचे सगळे दरवाजे बंद करणे सोपे होते; पण आता कित्येक दैनंदिन व्यवहारातील प्रत्येक गोष्टींची जबाबदारी अंगावर घेत मला माझ्या वेडासाठी, कथकसाठी वेळ द्यायचा होता. सर्वात आधी, एका अनोळखी देशात एकट्या तरु णीला राहण्यासाठी घराची सोय करायची होती. जपानी भाषेखेरीज मला येत असलेली आणि भारतात चालणारी भाषा म्हणजे इंग्लिश, त्या माझ्या कामचलाऊ इंग्लिशच्या मदतीने इथल्या समाजात वावरायचे होते आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, त्याच भाषेच्या मदतीने नृत्याच्या बंदिशी समजावून घेत नृत्याच्या अर्थापर्यंत पोहोचायचे होते. तेव्हा जाणवले, निव्वळ खिशातील पैसे नव्या देशाला आपलेसे करण्यासाठी पुरेसे नसतात. आणि एखाद्या देशाचे नृत्य समजून स्वत:मध्ये उतरवण्यासाठी भाषा हा अगदी प्राथमिक मुक्कामाचा टप्पा असतो. ते नृत्य आत्मसात करण्यासाठी त्या देशाच्या संस्कृतीमध्ये आणि ती व्यक्त करणार्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उतरावे लागते, त्यांचे संदर्भ समजून घेत, त्यावर कोणतेही शिक्के न मारता त्यांच्याकडे बघावे लागते. तो प्रवास एकीकडे सुरू करीत असताना दिल्लीत स्वत:ला स्थिर करण्यासाठीच मला तब्बल 22 वेळा घरे बदलावी लागली. प्रत्येक ठिकाणी नेमके काय बिनसत होते? बोट ठेवावे असे कदाचित काही नसेल; पण एकीकडे कथकचे धडे घेत असताना पाठीवर बिर्हाड घेऊन मी मला खात्री देणारे घर शोधत होते. अशावेळी आधार होता तो मालती श्याम या माझ्या गुरुंचा. नव्या देशातील वेगळ्या चवीचे अन्न स्वीकारताना येणारे आजारपण, घरे शोधताना कधी अकस्मात अंगावर कोसळणारे एकटेपण. अशा अवघड काळात माझ्यासाठी तेच हक्काचे घर होते. अन्य देशांतून भारतात कथक शिकायला आलेल्या माझ्यासारख्या आणखी काही विद्यार्थिनी मला कथक केंद्रात भेटल्या आणि त्यांच्याबरोबर मी राहायला लागले.
घरदार सोडून आणि कुटुंबाला दुखावून त्यांच्यापासून काही हजार किलोमीटर दूर राहण्याची भरभक्कम किंमत मी ज्या नृत्यासाठी देत होते ते नृत्य मला का एवढे जिवाभावाचे वाटले? सर्वात प्रथम मला आवडला तो त्यातील अभिनय आणि र्िहदम, लय. मग हळूहळू त्या नृत्यावर या देशातील गुरुंच्या अनेक पिढय़ांचे त्यावरील संस्कार मला जाणवू लागले. भारतातील हस्तकला, घरांच्या भिंतींवर रंगवलेली चित्रं, देवळांच्या रचना, त्यातून निसर्गाशी साधलेला संवाद आणि इथले संगीत-नृत्य अशा अनेक कलाप्रकारांमध्ये असलेल्या आंतरिक नात्याचा तरल धागा मला दिसू लागला आणि मग त्यातून व्यक्त होणारी डिव्हाइन ओढ.! या प्रवासात माझ्यासाठी महत्त्वाचा क्षण कोणता होता? - हे सगळे मी जे काही अनुभवत होते त्यात मला मिळत असलेला सुकून मला प्रथम जाणवला तो.
एक नक्की, ही संस्कृती मला कम्फर्टेबल वाटत होती, जवळची वाटत होती. आमच्यामधील अनोळखीपण फार झपाट्याने मावळले होते! शिवाय, या नृत्यात घातले जाणारे मोठय़ा घेराचे तजेलदार रंगाचे कपडे, त्यावरील नाजूक कशिदाकारी असलेल्या रेशमी ओढण्या आणि पारंपरिक दागिने घातल्यावर दिसणारी, आरशात दिसणारी मी बघताना माझी एप्रन घातलेली संशोधकाची प्रतिमा कधी धूसर होत गेली हे कळलेच नाही.
माझ्यासाठी या नृत्यातील आव्हान होते ते फूटवर्कचे. पायात घुंगरू बांधून तबल्याच्या मात्रांवर होणारे फूटवर्क ही माझ्यासाठी अत्यंत खडतर साधना होती. ठेक्याच्या वाढत्या वेगाबरोबर जुळवून घेत, घुंगरांच्या वजनासह बिनचूकपणे फक्त पावलांनी होणारा नृत्य-लयीचा संवाद, त्यातील सवाल-जबाब आणि नोकझोक ही कथक नृत्यातील परमोच्च बिंदूकडे जाणारी वाटचाल. माझी हट्टी पावले मात्र मला त्यासाठी साथच देत नव्हती. सर्वस्व पणाला लावून सराव करत-करतासुद्धा एखाद दिवस कमालीच्या नैराश्याचा यायचाच.. आणि अनेकदा अशा वेळी नेमका माझ्या खास जपानी अशा बारीक डोळ्यांवर टिपणी करणारा एखादा ‘हितचिंतक’ भेटायचा. अभिनयासाठी ‘बडी-बडी ऑँखे’ हवी असे आपल्या गुरुने कधी म्हटले नाहीय ना, असे म्हणत मी स्वत:ची समजूत काढायची! कथकमध्ये मला सर्वात छळले ते कृष्ण आणि त्याच्या राधेने. आणि त्यांच्या प्रेमाच्या अभिव्यक्तीने. एकमेकांना बेडीत न अडकवणारे आणि तरीही भेटीच्या चुटपुट्या क्षणांचा ध्यास घेणारे हे नाते मला, एका जपानी तरु णीला, समजणे अवघडच होते. त्या नात्यातील अक्षय गोडवा, हुरहूर, अंतरीची निरपेक्ष ओल हे आजवर कधीच माझ्या भवतालाचा भाग नव्हते. कसे आणि कधी समजणार होते मी हे सारे? ‘सलज्ज राधा’ म्हणजे काय, हे सांगताना महाराजजी म्हणायचे, ‘लाज मनमे आती है, चेहरेपे आती है उसकी लाली..’ प्रेमातील इतक्या तरल लाजेचा अनुभव आजवर कधी ऐकला-बघितला नसताना नृत्यातून तो येणार कसा? तो समजून घेता घेता मी एक समजदार कलाकार होत गेले. नवी नाती समजून घेण्यास आणि त्यांना नृत्यरूप देण्यास उत्सुक. आव्हानांमध्ये वाढीच्या संधी शोधणारी कलाकार.
नऊ वर्षांच्या या भारतातील मुक्कामाने मला अनेक गोष्टी दिल्या. पण सर्वात मौल्यवान म्हणजे, नृत्य शिकण्याचे अबोल स्वप्न मनाशी घेऊन जगणार्या माझ्या देशातील मुलींसाठी काम करण्याचा आत्मविश्वास मला दिला. आणि त्यासाठी मला रोज कथकमधील नवे काही दाखवणारा महाराजजींसारखा गुरु दिला. आईचा सततचा लग्नाचा तगादा कानाआड करण्याचा धीटपणा दिला आणि जपानला ‘कथकची ओळख करून देणारी गुरु ’ ही अभिमानाने मिरवावी अशी माझी ओळख मला मिळवून दिली..! कथकचे हे ऋण फेडण्यासाठी पुढील कित्येक जन्म पायात घुंगरू बांधण्यासाठी मी आनंदाने तयार आहे..
मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे
vratre@gmail.com