शाळा ‘सुरू’ राहाव्यात यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 06:00 AM2021-07-11T06:00:00+5:302021-07-11T06:00:02+5:30

येत्या काही दिवसांत बऱ्याच ठिकाणी शाळा पुन्हा उघडतील; पण त्या ‘सुरू’ राहाव्यात, मुलांचं आयुष्य पूर्वपदावर यावं यासाठी आपल्याला बरंच काही करावं लागणार आहे.

To keep the school 'running' ... | शाळा ‘सुरू’ राहाव्यात यासाठी...

शाळा ‘सुरू’ राहाव्यात यासाठी...

Next
ठळक मुद्देशाळेशी संबंधित प्रत्येक घटकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. असं झालं तर शाळा नुसत्या चालू होणार नाहीत तर सुरू राहतील.. त्याची जबाबदारी सगळ्यांची आहे..

- डॉ. श्रुती पानसे

किमान आठवी ते बारावी या इयत्तांच्या शाळा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. ही शालेय व्यवस्थेच्या दृष्टीने खरोखरच चांगली बातमी म्हणता येईल. परंतु चालू झालेल्या शाळा तशाच सुरू राहाव्यात याची सर्व काळजी घेऊन शाळा सुरू होतील. हे काम शाळेत होईल, परंतु तेवढ्याने भागणार नाही. मुलांच्या वाहतुकीची जी काही व्यवस्था असेल त्या व्यवस्थेनेसुद्धा काळजी घेणे खूपच आवश्यक आहे. जर मुलं पालकांबरोबर शाळेत येणार असतील तर पालकांवरही तेवढीच जबाबदारी आहे. थोडक्यात शाळेशी संबंधित प्रत्येक घटकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. असं झालं तर शाळा नुसत्या चालू होणार नाहीत तर सुरू राहतील.. त्याची जबाबदारी सगळ्यांची आहे..

पालक - शिक्षकांना काय करता येईल?

१. मुलं शाळेत आल्यानंतर अर्थातच लगेच अभ्यास सुरू करण्याची घाई शिक्षकांनी करू नये. पहिले काही दिवस मुलांना बोलतं करावं. शिक्षकांनीही आपले अनुभव सांगावेत. मुलांनी आपले अनुभव सांगावेत. ज्या मुलांच्या कुटुंबाचं या काळामध्ये नुकसान झालेलं आहे; मग ते नुकसान व्यक्तीच्या स्वरूपातील असेल किंवा आर्थिक असेल, काही जणांना स्थलांतर करावं लागलेलं असेल, असे कोणतेही विचित्र वाईट अनुभव मुलांना या काळामध्ये आलेले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पहिले काही दिवस मुलांनी मनातल्या गोष्टी दुसऱ्या कुणाशी तरी बोलणं हे खूप आवश्यक आहे.

२. मुलांनी दुसऱ्या कुणाशी तरी बोलणं आवश्यक आहे, तसंच त्यांनी आपापसांत, समोरासमोर एकमेकांना बघून प्रत्यक्ष बोलणं हेसुद्धा तितकंच आवश्यक आहे. त्यांना एकमेकांना काही ना काही सांगायचं असणार आहे. त्यामुळे एकमेकांशी अनुभव शेअर करणं यासाठी शिक्षकांनी तसा आवर्जून प्रयत्न करावा.

३. काही मुलांच्या बाबतीत जर जवळची व्यक्ती गेली असेल तर शिक्षकांनी स्वतःहून अशा मुलांशी संपर्क करावा आणि त्यांना आधार द्यावा.

४. काही मुलांच्या बाबतीत त्यांना खेळायला थोडा तरी वाव मिळालेला असेल, पण काही मुलांच्या बाबतीत अशी शक्यता नाही. त्यामुळे पहिले काही दिवस मुलांना खेळण्यासाठी सोडावं लागेल आणि हे खेळसुद्धा सामाजिक अंतराचं भान राखून त्यांना खेळू द्यावे लागतील. हे शक्य नसेल तर किमान ‘ग्राउंडला फेऱ्या मारून या’ असं तरी सांगावं लागेल.

५. आठवी ते बारावी या काळात मुलांचा स्वभाव बदलत असतो. त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस फार मोठ्या प्रमाणात होत असतात आणि त्याचप्रमाणे मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स इथेही महत्त्वाचे बदल होत असतात. त्यामुळे मुलं अडनिड्या वयात असतात. इतके दिवस बंद असलेलं आयुष्य अचानक सुरू होणार आहे, सगळे एकमेकांना भेटणार म्हणून एक वेगळ्या प्रकारचं आकर्षणही मुलांमध्ये असू शकतं. हे समजून घेणं आवश्यक.

६. मागच्या दीड-दोन वर्षांत दुसरी कोणतीही ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे आणि शिक्षण ऑनलाइन असल्यामुळे मुलांच्या हातात वेगवेगळी गॅजेट्स होती. विशेषतः या वयातल्या मुलांचा बहुतांश वेळ दिवसाचा आणि रात्रीचाही - वेगवेगळे गेम्स खेळण्यात आणि सोशल मीडियावर सक्रिय असण्यात गेलेला आहे. जेव्हा कोणीही माणूस खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक गॅजेट हाताळत असतो, त्या वेळेला तो काही प्रमाणात निष्क्रिय झालेला असतो.

सध्याच्या आणि यापुढच्याही काळात ऑनलाइनशिवाय काहीही चालणार नाही असं असलं तरीही प्रत्यक्ष शारीरिक हालचाल करणं वेगळं अन‌् दिवस आणि रात्रीचा बराचसा काळ ऑनलाइन असणं वेगळं! यात खूप मोठा फरक आहे. या निष्क्रियतेवर मात करण्यासाठी मुलांचे काही बौद्धिक खेळ घेणं आवश्यक ठरेल. मेंदूला आणि पर्यायाने शरीरालासुद्धा झटकून जागं करणं आवश्यक आहे. त्यामुळे बौद्धिक खेळ म्हणजे काही गणिती खेळ, भाषिक खेळ, जनरल नॉलेजवर आधारित एखादी क्विज यामुळे मुलांचा मेंदू पुन्हा एकदा तरतरीत व्हायला मदतच होईल.

७. आठवी ते बारावीच्या सर्वच वर्षांतल्या परीक्षा महत्त्वाच्या मानल्या जातात आणि ते सर्व अभ्यासक्रम हे एरवीपेक्षा थोडे अवघडही असतात. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे खूप लक्ष पुरवलं जातं, वेगळे क्लासेस लावले जातात. अभ्यासाचं वातावरण तर काहीच नाही, पण अभ्यास करण्याची मात्र सक्ती आहे अशा मानसिकतेत ही मुलं असतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जर मुलं मोकळेपणाने बोलली, मोकळेपणाने वागली तर काहीच दिवसांत त्यांना अभ्यासाच्या रुळावर आणता येईल आणि ते आवश्यकही आहे.

८. या काळात खूप मोठ्या प्रमाणात केवळ मुलांच्याच नाहीत तर मोठ्यांच्याही रोजच्या सवयी बदललेल्या आहेत. जे लोक रात्री उशिरापर्यंत झोपत नाहीत ते लवकर उठण्याची शक्यताच नाही. हेच मुलांच्या बाबतीत घडून येण्याचा संभव आहेच. रात्री उशिरा झोपलेली मुलं आता थेट दुपारी ११-१२ला उठतात असं बऱ्याच घरांचं टाइमटेबल बदललेलं आहे. शाळा सकाळच्या वेळात असेल तर लवकर उठून शाळेत येणं ही मुलांसाठी मोठीच कसरत ठरणार आहे; पण अर्थात तो बदल मुलांना करावाच लागणार आहे. तिथे कोणतीही अनावश्यक सवलत देण्याचं कारण नाही. आयुष्य पुन्हा एकदा पूर्वपदावर येणं हे महत्त्वाचं आहे.

(लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)

drshrutipanse@gmail.com

Web Title: To keep the school 'running' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.