आपला मूड चांगला ठेवण्यासाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 06:02 AM2021-01-17T06:02:00+5:302021-01-17T06:05:06+5:30

अनेकदा आपल्या दिवसाची सुरुवातच खराब होते. मूड नसतो. भांडणं होतात आणि अख्खा दिवस आपली चिडचिड होत राहते. असं होऊ द्यायचं नसेल तर काय करायचं?

To keep your mood good .. | आपला मूड चांगला ठेवण्यासाठी..

आपला मूड चांगला ठेवण्यासाठी..

Next
ठळक मुद्देप्रसन्न राहायचं असेल तर या पाच गोष्टी करून पाहाच..

- लोकमत न्यूज नेटवर्क

अनेकदा आपला दिवसच खराब जातो. सकाळी उठल्यापासूनच त्याची चिन्हं दिसायला लागतात. काहीच मनासारखं घडत नाही. चिडचिड होते. ऑफिस किंवा कॉलेजला गेलं किंवा घरातच असलं तरी बोअर होतं. काहीच करावंसं वाटत नाही. अख्खा दिवस डल जातो. टेन्शन येतं.. कोणावर तरी ओरडावंसं, उगीचंच भांडावंसं वाटतं..

तुम्हालाही असं होतंय? वाटतंय?

कोरोनाकाळात अनेकांसाठी ही गोष्ट जणू नॉर्मल झाली आहे.

दिवसाचे दिवस एकाच ठिकाणी, एकाच परिस्थितीत, त्याच त्याच लोकांच्या संगतीत राहिल्यानं असं होऊ शकतं, असं कोलंबिया बिझिनेस स्कूलच्या संशोधकांचं म्हणणं आहे. पण त्यावर त्यांनी उपायही सांगितला आहे. नुकताच त्यांनी त्याबाबत अभ्यास केला आणि आपले निष्कर्षही जाहीर केले आहेत.

काय कराल?..

१- छोटी छोटी ध्येयं निश्चित करा -

तुमचं कोणतंही ध्येय असू द्या, त्याचे छोटे, आवाक्यातले टप्पे करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. समजा तुम्हाला रोज लवकर उठायचंय, आपलं वजन कमी करायचंय, स्वत:साठी वेळ काढायचाय.. त्याप्रमाणे ठरवा आणि करा.

२- कृतज्ञता बाळगा

कुठल्याही गोष्टीवर रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे, त्याविषयी कृतज्ञता बाळगा. मग ते काही का असेना, आपलं घर, आपलं कुटुंब, आपला जॉब. यामुळे तुमचा ताण तर कमी होईलच; पण सतत येत असलेले निराशाजनक विचारही दूर पळतील.

३- संगीत ऐका

नैराश्य दूर करण्यासाठी संगीताचा खूप मोठा उपयोग होतो. संशोधनातूनही हे सिद्ध झालं आहे. आपल्या आवडीचं संगीत ऐकलं तर त्यामुळे शरीर आणि मन रिलॅक्स होईल. ब्लड प्रेशर नॉर्मल राहील. मनोवैज्ञानिक क्रिया व्यवस्थित होतील. मुख्य म्हणजे शारीरिक, मानसिक ताण आणणारे हार्मोन्स कमी होतील.

४- सकारात्मक विचार करा

अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ सायन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनं केलेल्या संशोधनानुसार सकारात्मक विचारांमुळे आपल्यातली नकारात्मकता कमी होते. स्वत:ला प्रेरणा मिळते आणि प्रगतीच्या दिशेनं जाण्यासाठी आपण प्रवृत्त होतो. व्हिज्युअलायझेशनच्या तंत्राचाही खूप फायदा होतो. त्यासाठी वर्तमानात राहून सतत चांगल्या गोष्टी डोळ्यांसमोर आणल्या पाहिजेत.

५- ठरवून काही गोष्टी करा

आपला दिवस चांगला जाण्यासाठी आपली लाइफस्टाइलही व्यवस्थित असायला हवी. योग्य आहाराबरोबर जेवणाची आणि झोपेची वेळही साधारणत: ठरलेली असावी. सकाळी १५-२० मिनिटं चालायला जाणं, झाडांना पाणी घालणं यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींनीही दिवसभर आपला मूड चांगला राहण्यास मदत होते.

Web Title: To keep your mood good ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.