खानू- सेंद्रिय शेतीचे महाराष्ट्रातील पहिले गाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 06:01 AM2018-11-11T06:01:00+5:302018-11-11T06:05:02+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील जेमतेम ४३५ घरांचं गाव. शेतीसाठी गावात कोणीच कीटकनाशके वापरत नाहीत. इथे होते ती केवळ सेंद्रीय शेती! सेंद्रिय शेतीचे महाराष्ट्रातील हे पहिले गाव!
मेहरून नाकाडे
गाव करील ते राव न करील या म्हणीचा तंतोतंत परिचय रत्नागिरी तालुक्यातील खानू गावात पाहायला मिळतो. शेती, बागायती हेच आपले उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे, हे लक्षात घेत या गावाने गेल्या काही वर्षात कायापालट केला असून, आता समोर आला आहे तो ‘खानू खजाना’ ब्रॅण्ड ! कोणतीही रासायनिक खते नाही किंवा कीटकनाशक नाही. इथं होते फक्त शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीची शेती ! म्हणूनच हे गाव महाराष्ट्रातील पहिले सेंद्रिय गाव म्हणून गौरविलं गेलंय.
केवळ भारतच नाही तर जागतिक बाजारपेठेत संपूर्ण गावातील उत्पादित वस्तू विक्रीसाठी तृतीय पक्ष प्रमाणीकरण मिळविणारे राज्यातील पहिले गाव ही या गावाची आता नव्याने झालेली ओळख.
प्रत्येक घरातील ओला, सुका कचरा एकत्र करून त्याचे खत तयार करण्यात येते. शिवाय शेण, गोमूत्र, पीठ, काळा गूळ यांच्या मिश्रणातून ‘जीवामृत’ तयार करण्यात येते. सेंद्रिय गटाव्दारे शेती करीत असताना कोणत्याही प्रकारची रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. याशिवाय दशपर्णी अर्काची फवारणी करण्यात येते. एकूणच सेंद्रिय शेतीतून पारंपरिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यात आले आहे. रासायनिक खतांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता सेंद्रिय शेतीचे महत्त्व कळू लागल्यानेच सेंद्रिय शेतीला वाढता प्रतिसाद आहे.
रत्नागिरी तालुक्यातील खानू गावचे एकूण ९९८ हेक्टर क्षेत्र असून, सर्व क्षेत्र सेंद्रिय आहे. या गावात १८६६ शेतकरी आहेत. आंबा, काजू, काळी मिरी, कोकम, नाचणी, भात, फणस लागवड करण्यात आली आहे. गावात नियोजित उद्दिष्टापेक्षा अधिक काजू लागवड करण्यात आली आहे. शेतकºयांनी लाल, काळ्या भाताचे पीक घेतले आहे. गावातील सर्व शेतकºयांनी मातीचे प्रमाणीकरण करून घेतले आहे. त्यामुळे येथील शेतकरी आपल्या शेतातील उत्पादने जगाच्या कोणत्याही बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू शकतात. ‘वाडा कोलम’प्रमाणे खानू येथील लाल, काळा तांदूळ स्वत:च्या ब्रॅण्डनेमने बाजारपेठेत दाखल झाला असून, त्याला मागणीही सर्वाधिक आहे. याशिवाय तांबडा काळा पोहा, चुरमुरा उत्पादने बाजारात उपलब्ध असून, त्यासाठीचीही मागणी उत्कृष्ट आहे.
घर तेथे कंपोस्ट युनिट
खानू गावाची दिवसेंदिवस प्रगतीच्या वाटेवर वाटचाल सुरू आहे. यावर्षी ‘घर तेथे नॅडेप-कंपोस्ट’ युनिट बसविण्यात येणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी ग्रामीण योजनेंतर्गत कंपोस्टचे शंभर टक्के प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ठराव संमत करण्यात आला आहे. घराशेजारी किंवा शेतात कंपोस्ट युनिट बांधण्यात येत आहेत. यामुळे येथील शेतकºयांना सेंद्रिय खतासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. घरातील ओला, सुका कचरा, परसदारातील पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहेत. त्यासाठी ‘इको-फ्रेण्डली फार्मस’ गटाचे प्रमुख व शेतीतज्ज्ञ संदीप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गावामध्ये जैवविविधता समिती असून, वृक्षतोडीसाठी शंभर टक्के बंदी आहे.
कीटकनाशकांवर बंदी
खानू गावचे क्षेत्र ९९९.९१.५९ हेक्टर असून, लोकसंख्या १८६६ आहे. पुरुष संख्या ९०२ ते ९६४ स्त्रियांची संख्या आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे. मुख्य पीक काजू, आंबा, भात, नागली, नारळ आहे. गावामध्ये ५११ गाई असून, ६४ म्हशी आहेत. गार्इंची संख्या सर्वाधिक आहे. गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे रासायनिक खते, कीटकनाशके विक्री शंभर टक्के बंद असून, शेतकरी बाहेरूनही रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करीत नाहीत.
बियाणांची बचत
गावामध्ये भात शेती करीत असताना लागवडीपूर्वी भाजावळ केली जात नाही. भाताची तूस जाळून त्याची राख तयार केली जाते. तीन फूट रुंदीचा व पाहिजे त्या लांबीचे वाफे तयार करून त्यामध्ये आडव्या रेषा आखण्यात येतात. त्यावर चिमटीने भात पेरणी केली जाते. या पद्धतीमुळे २० किलो बियाणे जेथे लागते तेथे फक्त तीन किलो बियाणे पुरेसे होते. ही पद्धत संदीप कांबळे यांनी सूचविली असून, त्याचा वापर गावकरी करीत आहेत. लाल भाताची लागवड सुधारित पेर पद्धतीने केली जाते. यामध्ये लावणी/काढणी केली जात नाही. एकदा पेरणी झाल्यानंतर तयार भातच काढला जातो त्यासाठी मुटगा व सर्वट जातीचे वाण लावण्यात येते.
खानू गावामध्ये शासकीय रोपवाटिका आहे. इथेही सेंद्रिय पद्धतीनेच आंबा, काजू तसेच अन्य जंगली ७० हजारपेक्षा अधिक रोपे तयार करण्यात येतात. त्यांना चांगली मागणी होत आहे.
लाल आणि काळा भात !
लाल भात हे पारंपरिक पीक असून, काळा भात ‘बेंगलोर’मधून मागविण्यात आला आहे. भाताचा रंग काळा, लाल असला तरी दोन्ही भात चवीला अप्रतिम आहेत. लोह, जीवनसत्त्व, स्टार्च सर्वाधिक आहे. शिवाय साखरेचे प्रमाण अल्प आहे. खिरीसाठी तसेच आजारपणात मऊ भातासाठी या भाताचा सर्वाधिक वापर केला जातो. पचायला हा भात चांगला असल्यामुळे या भाताला सर्वाधिक मागणी आहे. १३५ ते १४० दिवसात हा भात तयार होत असल्यामुळे शेतकरीवर्गासाठी फायदेशीर ठरत आहे.
संपूर्ण गावासाठी एकच ब्रॅण्डनेम !
शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी गावात कृषी जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. गावामध्ये २८ बचतगट आहेत. या बचतगटांची विविध उत्पादने आहेत मात्र ‘खानू खजाना’ या एकाच ब्रॅण्डनेमने त्याची विक्री सुरू आहे हे विशेष ! गावातील शंभर एकर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. आरोग्यवर्धक लाल व काळा भात लागवड करून त्यापासून लाल/काळा तांदूळ, पोहे, चुरमुरे यांना मुंबई, पुणे शहराबरोबर अन्य ठिकाणांहूनही चांगली मागणी आहे. लाल भाताचे दहा टन उत्पादन घेण्यात येत असून, दोन टन पोहे तयार करून विक्री केले जातात. काळ्या तांदुळाचे पाच टन उत्पादन घेण्यात येते. एक टनाचे पोहे तयार केले जातात. काळ्या व लाल भातापासून प्रत्येकी ५०० किलो चुरमुरा तयार केला जातो. त्याच्याही विक्रीसाठी बाहेर जावे लागत नाही, आगावू मागणी केली जात आहे. लाल, काळ्या भाताचे बियाणेही तयार करून विक्री करण्यात येते. लाल तांदुळामध्ये सोनफळ, मूडगा, तूर्ये, सरवट या लुप्त होत चाललेल्या प्राचीन वाणांचे जतन करण्यात आले आहे. काळ्या तांदुळामध्ये गोविंद भोग व काळबायो (स्थानिक वाण) लावण्यात येत आहे.
राज्य शासनाचा पुरस्कार
गावामध्ये शोषखड्डा घरोघरी बांधण्यात आला असून, त्यामुळे गावातील डासांचे प्रमाण संपुष्टात आले आहे. गावात स्वच्छता अधिक आहे. शेतीसाठी रासायनिक खते, कीटकनाशकांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केला जात आहे. त्यामुळे गावातील आजारांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. गावामध्ये एकही क्षयरुग्ण, कुष्ठरोग रुग्ण नाही. खानू पंचक्रोशीतून येणाऱ्या रुग्णांची संख्या बºयापैकी असली तरी गावातील रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. खानू प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्य शासनाचा जिल्हास्तरीय ‘काया कल्प’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
- डॉ. एस.एस. रेवंडेकर, आरोग्य अधिकारी, खानू प्रा. आरोग्य केंद्र
शोषखड्ड्याचे ‘पेटंट’ घेणार !
खानू गावात ४३५ घरे असून, घरोघरी शोषखड्डा बसविण्यात आला आहे. या शोषखड्ड्याच्या मॉडेलला जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर चांगली मागणी आहे. शोषखड्ड्यामुळे गावातील डासांचे प्रमाण कमी झाले आहे. शोषखड्डा वर्षानुवर्षे भरत नसल्यामुळे त्याचा फायदा तर होतोच शिवाय कचरा शोषखड्ड्यातील बादलीत जमा होऊन दुर्गंधीविरहित सांडपाणी परसदारातील झाडांमध्ये सोडण्यात आले आहे. गावाने तयार केलेल्या या शोषखड्ड्याच्या ‘पेटंट’साठी प्रयत्न सुरू आहेत.
(लेखिका लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
manthan@lokmat.com