मुलांनो...संशोधक दृष्टी अंगी रुजवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:07+5:30
शालेय वयात संशोधन व्हावे ही संकल्पनाच अजून मुळात दृढ झाली नाही. ती दृढ होणे गरजेचे आहे.
चंद्रकांत ठेंगे
नागपूर:
एकविसाव्या शतकाचे वर्णन हे ज्ञानावर आधारित समाज, ज्ञान अर्थव्यवस्था, ज्ञान भांडवलाचे शतक असे केले जाते. भारत २०२० पर्यंत जागतिक महासत्ता होणार हे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार करण्यासाठी विविधांगी प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच शिक्षण क्षेत्रात संशोधनाला चालना देणारे अनेक उपक्रम शासनाने हाती घेतले आहेत. त्यामध्ये अनेक वर्षापासून विविध स्तरावर आयोजित करण्यात येणारे विज्ञान प्रदर्शन मोठी भूमिका बजावतात. मुलांना बालवयातच संशोधनाला प्रोत्साहन मिळावे याकरिता शालेय विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. तालुका, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर चढत्या क्रमाने याचे आयोजन करताना संशोधन हा महत्त्वाचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात तो उद्देश काही प्रमाणात साध्यही झाला आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून ही विज्ञान प्रदर्शने एका कृत्रिम वाटेने चालत असल्याचे दिसून येत आहे.
विज्ञान संशोधन ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. मात्र दरवर्षी अशा स्पर्धांचे पत्रक हाती आले की सहभाग नोंदविण्याकरिता एखादा प्रकल्प हाती घेतला जातो. अनेकवेळा गुगल बाबाचा आधार घेऊन जुन्याच प्रकल्पांना मुलामा देऊन ते सादर करण्याचा प्रयत्न होतो. अर्थात सरसकट विद्यार्थी असे करतातच असे नाही. आजही अनेक शाळा महाविद्यालयात संशोधनाकरिता विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहित केल्या जाते. परंतु सद्यस्थितीत या विज्ञान प्रदर्शनांना लागलेले कॉपी-पेस्टचे ग्रहण दूर करण्याचा प्रयत्न होत नाही तोवर या विज्ञान प्रदर्शनांचा मूळ हेतू साध्य होणार नाही. या परिस्थितीस कोणत्याही एका घटकाला कारणीभूत धरता येणार नाही. शालेय वयात संशोधन व्हावे ही संकल्पनाच अजून मुळात दृढ झाली नाही. ती दृढ होणे गरजेचे आहे. आजही ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी नवनवीन लघु संशोधन करीत असतात. परंतू ते तालुका पातळीवर सादरीकरण करण्यात कमी पडतात. शहरी भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांपुढे ग्रामीण भागातील मुलांचे संशोधन मागे पडते. अनेकवेळा संशोधनाची नाविन्यता लक्षात न घेता प्रतिकृती, सादरीकरण याला अवाजवी महत्त्व दिले जाते. त्यामुळे आपण शहरी शाळांतील विद्यार्थ्यांसमोर कमी पडू ही भावना ग्रामीण भागातील मुलांमध्ये बळावते.
शिक्षणाचे उद्दिष्ट्य मुलांना कुशल कामगार म्हणून तयार करणे हे न ठेवता नागरिक म्हणून विचार करणारा, संविधानिक मूल्य जोपासणारा नागरिक निर्माण करणे हे असले पाहिजे. असा नागरिक तयार करायचा असेल तर त्याचा पाया शालेय वयातच रचला जातो. त्या करिता शालेय शिक्षणातील विज्ञान शिक्षण व संशोधनाबद्दलची अनास्था दूर झाली पाहिजे. शासन स्तरांवर अनेक योजना येतात परंतू त्यातून अभिप्रेत असलेले उद्दिष्ट साध्य होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. गेल्या काही वर्षापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात, तालुका स्तरावर विज्ञान केंद्रे उभारली गेली. ज्या संस्थेत ही विज्ञान केंद्रे उभारली गेली त्या संस्थेशिवाय तालुक्यातील इतर किती शाळांनी भेटी दिल्या हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. सद्यस्थितीत अनेक योजना शासन जाहीर करते पण सर्व सोपस्कर कागदोपत्री पार पाडण्यावर भर असतो.
तालुका आणि जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाला शासनाकडून निधी उपलब्ध केल्या जात नाही, तरीसुद्धा प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येते. अनेक विद्यार्थी यात सहभागी होतात. पण यातून उत्साह आणि वर्तमानपत्रातील बातम्या याशिवाय जास्त काही हाती लागत नसल्याचे दिसून येते.
दरवर्षी पंढरीच्या वारीप्रमाणे विज्ञान शिक्षकांचा गोतावळा यानिमित्ताने एकत्र येतो. विचारांचे आदानप्रदान होते. त्या चर्चांमध्ये प्रकल्पांच्या कॉपी पेस्टचीसुद्धा चर्चा होते. परंतु आपल्या विद्यार्थीरुपी पांडुरंगाला सोबत घेऊन यात सहभाग घेतल्याशिवाय पर्याय नसतो. आजवर शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामधून अनेक प्रकल्प समोर आले. परंतु आता शालेय वयात संशोधन वृत्ती वाढीस लागावी याकरिता नैसर्गिक मार्ग शोधून काढणे गरजेचे झाले आहे. कालसुसंगत उपक्रमांची आखणी करताना यात आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. कोणताही देश व समाज युद्धसाहित्याच्या जोरावर महासत्ता होत नाही. त्यासाठी कुशल संशोधकांची आवश्यकता आहे. असे कुशल संशोधक शाळेच्या चार भिंतीत निर्माण करण्याची क्षमता शिक्षकांमध्ये आहे. गरज आहे केवळ कालसुसंगत बदलाची.