जगणे-गाणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 06:00 AM2021-03-28T06:00:00+5:302021-03-28T06:00:02+5:30

किशोरीताई म्हणतात, एकदा लहानपणी मी फरसबी चिरीत होते. पाठीमागून एकदम माईचा आवाज कानावर आला, ‘काय भाजी चिरते आहेस की थट्टा? केवढाले मोठाले हे तुकडे केलेस या शेंगांचे? अशी चिरतात का फरसबी?’ आणि पुढे, ‘जिला भाजी नीट चिरता येत नाही ती गाणे काय चांगले म्हणणार?’ अशी मल्लिनाथी !

Kishori Amonkar and Mogubai Kurdikar.. A heart relationship | जगणे-गाणे...

जगणे-गाणे...

Next
ठळक मुद्देकिशोरीताई सांगतात, ‘एकसारखी, बारीक तुकडे असलेली माईने चिरलेली फरसबी बघताना मला आठवण आली ती तालाची, एकही मात्रा कधीच मागेपुढे होऊ न देणाऱ्या तिच्या चोख, नेटक्या ख्यालाची!

- वंदना अत्रे

कोणत्याही नृत्याच्या प्रारंभी भूमातेचा आशीर्वाद मागणारा आणि त्यानंतर स्वतःभोवती नृत्यासाठी एक अवकाश रेखून घेणारा पदन्यास हा मला नेहेमीच एक कृतज्ञ आणि कलाकाराला विनम्र करणारा क्षण वाटत असतो. तो जेवढा निखळ प्रामाणिक, तेवढे पुढचे नृत्य रंगत जाण्याची शक्यता अधिक..! पायाखाली असलेल्या मातीतून, या मातीशी जोडलेल्या जगण्यातून जी कला मिळते ती आधी त्याच मातीच्या पायाशी नम्रपणे ठेवण्याची ही क्रिया. किती प्रामाणिक. कलाकाराला जे काही मिळत असते ते जगण्यातूनच तर मिळत असते. जगण्यातील सुख-दुःख, वेदना-आनंद, क्षणभंगुरता आणि तरीही काहीतरी मिळवत राहण्याचा ध्यास हे काही नसते तर काय मांडले असते आमच्या गाण्यांमधून आणि नृत्यामधून? आपल्या लहान वयातील एक फार तरल आठवण किशोरीताईंनी त्यांच्या चरित्रात सांगितली आहे. कुर्डी नावाच्या अतिशय निसर्गरम्य गावात त्यांचे घर होते. झाडापानांनी गजबजलेले. त्या परिसरात एक भले मोठे बकुळीचे झाड होते. बकुळीचा बहर आला की त्यांचा मुक्काम सतत त्या झाडासमोर असायचा. एकटक त्या झाडाकडे बघत राहत. कशासाठी? त्या सांगतात, या झाडावरून खाली पडणारे फूल कधीच टपकन खाली पडत नसे. स्वतःभोवती गिरक्या घेत-घेत खाली येणारे हे फूल बघून कित्येकदा मनात येई, त्या फुलाच्या गिरक्यांचा हा झोक आणि डौल गाण्यात मांडता येईल? पण जगणे म्हणजे केवळ बकुळीचा बहर नसते ना, त्यामध्ये कडकडीत वास्तव असेही काही असतेच. आणि ते वास्तवही आपल्यामधील गाण्याला आकार देत असते, दृष्टी देत असते, याचे अनेक धडे त्यांना त्यांच्या आईने, मोगूबाईंने दिले. त्याच्या कितीतरी आठवणी किशोरीताई सांगतात. म्हणतात, एकदा लहानपणी मी फरसबी चिरीत होते. पाठीमागून एकदम माईचा आवाज कानावर आला, ‘काय भाजी चिरते आहेस की थट्टा? केवढाले मोठाले हे तुकडे केलेस या शेंगांचे? अशी चिरतात का फरसबी?’ आणि पुढे, ‘जिला भाजी नीट चिरता येत नाही ती गाणे काय चांगले म्हणणार?’ अशी मल्लिनाथी !

बारीक चिरलेली फरसबी आणि गाणे याचा संबंध? किशोरीताई पुढे सांगतात, ‘एकसारखी, बारीक तुकडे असलेली माईने चिरलेली फरसबी बघताना मला आठवण आली ती तालाची, एकही मात्रा कधीच मागेपुढे होऊ न देणाऱ्या तिच्या चोख, नेटक्या ख्यालाची! कुठेही बेढबपण नाही, अस्ताव्यस्तपणा नाही. मोगूबाईंच्या लेखी गाण्याचा रियाझ म्हणजे फक्त तंबोरा घेऊन स्वर लावणे किंवा पलटे घोकणे एवढे कधीच नव्हते. तसे ते नसतेही. गाणे हा जगण्याचा एक भाग असेल, जगण्याच्या अवकाशातच ते घडत असेल तर जगण्यातील प्रत्येक कृती ही त्याच्याशी जोडलेली असतेच की..! त्यामुळे जात्यावर दळताना होणाऱ्या शरीराच्या हालचाली, पुरणपोळीच्या कडेलासुद्धा असलेला लुसलुशीत मऊपणा आणि पाट्यावरचे एकजीव झालेले वाटण हे सगळे त्यांच्या लेखी रियाझासारखे होते. सौंदर्याचा, नेमकेपणाचा आग्रह धरणारा हा रियाझ.

आणि मग अगदी अपरिहार्यपणे आठवण होते ती गाण्यासाठी अनवाणी पायांनी, तापत्या रस्त्यावर खांद्यावर पाण्याच्या घागरी वाहून आणणाऱ्या पंडितजींची. अंगात ताप असताना, लालबुंद डोळ्यांनी खांद्यावर घागरी घेऊन आलेल्या मुलाकडे बघून त्यांचे वडील, गुरुराजजी कमालीचे व्यथित झाले. राग अनावर होऊन ते गुरुजींना म्हणाले, त्याच्या अंगात ताप आहे आणि तुम्ही त्याला पाणी आणायला सांगताय? गुरुजी शांतपणे उत्तरले, ‘जे योग्य आहे तेच करतोय. पसंत नसेल तर मुलाला घेऊन जाऊ शकता..’ ते ऐकून वडिलांना जवळ बोलावून भीमसेनजी कुजबुजले, ‘मी सुखात आहे, काळजी करू नका’ या शिष्याच्या नावापुढे पंडितजी ही उपाधी लागली त्या काळात एकदा या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘तेव्हा मनात एकच विचार यायचा, घागरीचा आकार मोठा असता तर गाणे शिकायला थोडा अधिक वेळ मिळाला असता...’ गुरुजींच्या घरापासून दूर, गावाबाहेर असलेल्या नदीवरून पाणी वाहून आणताना जी वाट तो शिष्य रोज तुडवीत होता, त्या वाटेने त्यांना गाण्यातील ठहराव आणि स्वरांना थेट भिडण्याचे नेमकेपण दिले असेल? जगणे जेवढे मातीशी जोडलेले तेव्हढे गाणे रसरशीत..

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com

Web Title: Kishori Amonkar and Mogubai Kurdikar.. A heart relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.