कोलकाता

By admin | Published: June 10, 2016 03:39 PM2016-06-10T15:39:53+5:302016-06-10T15:39:53+5:30

देशाच्या नकाशावर कायम आपला एक खास ठसा उमटवणारं महत्त्वाचं शहर म्हणजे हे कोलकाता. हुगळी नदीच्या वाहत्या पाण्यासोबत या शहरातही अनेक नव्या कल्पना, नवे विचार झुळझुळत राहतात

Kolkata | कोलकाता

कोलकाता

Next
>सुधारक ओलवे
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल  पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे  फोटो एडिटर आहेत.)
 
महानगर. 1963 साली आलेला नितांत सुंदर क्लासिक सिनेमा. हा सिनेमा एका महानगराचं चित्र दाखवतो, त्या महानगराच्या जुन्या जमानातल्या सांस्कृतिक जगण्याची एक झलक देता देता, त्या काळच्या नव्या शिकल्यासवरल्या लोकांच्या बदलत्या उदारमतवादी विचारांच्या कक्षा उलगडतो आणि एका बाजूला शहराचं ऐतिहासिक रूप दाखवताना त्याचसमोर वर्तमानातलं गरिबीचं विरोधाभासी चित्र उभं करतो. हे सारं आरती नावाच्या महानगरीय जीवन जगणा-या एका स्त्रीच्या नजरेतून उलगडत जातं.
बदलत्या महानगरीय जाणिवांसह बदलत जाणारे विचार दाखवणारा हा सिनेमा त्या काळाच्या कितीतरी पुढचा होता.
आणि ते शहर होतं-
कोलकाता.
आणि सिनेमाचे कर्तेधर्ते होते, महान दिग्दर्शक सत्यजित रे.
देशाच्या नकाशावर कायम आपला एक खास ठसा उमटवणारं महत्त्वाचं शहर म्हणजे हे कोलकाता. हुगळी नदीच्या वाहत्या पाण्यासोबत या शहरातही अनेक नव्या कल्पना, नवे विचार झुळझुळत राहतात. या शहरानं कलेच्या प्रांतात केलेलं संपन्न समृद्ध योगदान देशभर एक चळवळ म्हणून पोहचत राहिलं. या शहरातलं जगणंही कधी पावसाळ्यात उधाणलेल्या हुगळी नदीसारखं खवळलेलं असतं, तर कधी हिवाळ्यात शांत-संयत सहज वाहणा-या नदीच्या प्रवाहासारखं निवांत असतं.
कितीदा मी आजवर कोलकात्याला गेलोय. (आता तर मोजणंही बंद केलं.) मी विमानतळावर किंवा शिलादा किंवा हावडा रेल्वे स्टेशनवर उतरताच छान पिवळ्याधम्म टॅक्सीला हात देतो. आणि पहिले थेट जातो ते ‘बडा बाजारा’त. तिथं संदेस, रसगुल्ला, राजभोग, आइस्क्रीम संदेश, मातीच्या इटुकल्या मटक्यात मिळणारं मिश्ती दोही यासारख्या बंगाली मिठ्ठास मिठाया माझी वाटच पाहत असतात. खवय्यांसाठी कोलकाता हे शहर म्हणजे खरी चंगळ आहे. प्रवासात असताना मी स्वत:वर नियंत्रण ठेवतो, पण या ‘सिटी ऑफ जॉय’ अर्थात आनंदी शहरात रसना खवळतेच. मुंबई सोडून दुसरीकडे कुठं स्थायिक व्हायला आवडेल असा प्रश्न मनात आला तर त्याचं उत्तर हेच- कोलकाता.
कोलकाता हे शहरच असं भारलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रवादी संकल्पनांनी इथंच मूर्त रूप घेतलं. शहरात राष्ट्रवादानं इतकं प्रखर रूप धारण केलं की ब्रिटिशांना आपली राजधानीच कोलकात्याहून दिल्लीला हलवावी लागली. राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद, ईश्वरचंद्र विद्यासागर, सुभाषचंद्र बोस यांसारख्या किती महान सुधारकांनी, स्वातंत्र्यसेनानींनी या शहराच्या साक्षीनं नव्या विचाराची, नव्या समाजाची स्वप्नं पाहिली. तेच कलेच्याही संदर्भात. कोलकाता आणि कला हे एक समीकरणच आहे. बंगाल रेनेसॉँ चळवळीचं हे शहर केंद्रबिंदू होतं. सामाजिक सुधारणा, चळवळी, महिलांसाठीच्या समाज सुधारणा, सिनेमा, साहित्य आणि उदारमतवादी विचारांना मिळणारं बळ हे सारं या शहरात दशकानुदशकं ‘घडत’ गेलं. आजही घडतं आहे. सत्यजित रे, ऋत्विक घटक, बिमल रॉय आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, बंकीम चंद्र ही नावं आणि त्यांच्या कलाकृती ही काही ठळक उदाहरणंच या शहराविषयी पुरेशी बोलकी आहेत.
कोलकात्याच्या रस्त्यावरून फिरत राहणं हे एखाद्या खुल्या म्युझियममध्ये फिरण्यासारखं आहे. प्रत्येक दृश्य, प्रत्येक इमारत तुम्हाला काहीतरी एक खास गोष्ट सांगते. प्रत्येक पाडय़ाची एक कथा, प्रत्येक ट्राम, सायकल रिक्षा तुमच्यासोबत फिरताना काही बोलत राहतात. कार्ड क्लब, टी हाऊसेस यांचा तर काही औरच मामला आहे. तिथं येणारे बंगाली पुरुष दार्जिलिग चहासोबत धुराचे लोळ सोडत जगाच्या राजकारणावर खल करतात. तसंच जगभरातल्या कला, साहित्य, कम्युनिस्ट पक्ष, फुटबॉल आणि माशांच्या चढत्या उतरत्या किमती यावर अखंड गप्पाष्टकं रंगतात. या बौद्धिक गप्पांच्या जागांना कोलकात्यात ‘अड्डा’ म्हणतात. आपल्या आंगतुक या सिनेमात रे यांनी या अड्डय़ाची मुळं शोधली आहेत ती थेट ग्रीसर्पयत! कोलकात्याविषयी बोलावं ते कमीच आहे. कोलकात्यातल्या माणसांचा स्नेह, त्यातली ओढ, त्यांचे हसरे चेहरे, संततधार बरसणा-या पावसात गच्च ओल्या गर्दीचे वाहते रस्ते, हावडा ब्रिज, मुघलाई पदार्थ, बंगाली प्रसिद्ध माछेर झोल, कुल्छातला चहा हे सारं कोलकाता या शहराच्या ‘अनुभवा’चा एक नितांत सुंदर भाग आहे. मला हे शहर मनापासून आवडतं.
मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे आणि कोलकाता मन:पूत जगण्याचं आणि आपली स्वप्नं पूर्ण झाल्याच्या आनंदात भरभरून सुख अनुभवण्याचं शहर आहे.

Web Title: Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.