क्रांतीज्योती सावित्रीबाई : कर्तृत्वाचा प्रेरणास्त्रोत, पेटती मशाल, शोषितांची ढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 01:32 PM2022-01-03T13:32:33+5:302022-01-03T13:34:32+5:30
Krantijyoti Savitribai Fule: सावित्रीबाईंच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आलेख हा प्रेरणादायी आणि काळाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय, अनुकरणीय ठरणारा आहे.
- वंदना रघुनाथराव थोरात, सहायक संचालक ( माहिती )
भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका आणि सामाजिक परिवर्तानाच्या लढाईतील वीरांगणा सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती आज साजरी होत आहे. आज विविधांगी क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या समस्त स्त्रियांच्या कर्तृत्वाचा पाया स्त्री शिक्षणाच्या कार्यातून ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी रचला. सुधारणा कार्यात जोतिबा फुले यांना सर्मथ कृतीशील साथ देणाऱ्या सावित्रीबाई फुले म्हणजे अष्टपैलु व्यक्तित्व, व्यासंग आणि काळाच्या पुढे बघण्याचे द्रष्टेपण होय. या सदगुणांच्या माध्यमातून महात्मा जोतिबा यांच्या सोबत सावित्रीबाईंनी टाकलेले प्रत्येक पाऊल येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिशा देणारे आहे. प्रचंड प्रतिकुलतेत ही स्वहिमतीवर योग्य सुधारणावादी भूमिका घेण्याची वैचारिक क्षमता त्यांच्याकडे होती. त्यासोबतच विरोधाला न जुमानता घेतलेल्या सुधारणावादी भूमिकेवर प्रवाहाच्या विरोधात जाऊन ठाम राहण्याचा निश्चयीपणा सावित्रीबाईंच्या तेजस्वी कारर्किर्दीचे ठळक वैशिष्ट आहे.
शिक्षण, संशोधन ,अध्यापन, विज्ञान, तंत्रज्ञान, सुरक्षा, साहित्य, सांस्कृतिक, समाजकारण ते राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात चौफेर कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांच्या कारकीर्दीचे हे शतक साक्षीदार आहे. त्याचसोबत या सगळ्या क्षेत्रातील महिलांचा वावर आज जितका सुलभ, विनासायास बनलेला आहे, त्याच्या कितीतरी अधिक कठिण होते सावित्रीबाईंच्या काळात तत्कालीन समाजाच्या प्रखर विरोधाची खडतर वाट तुडवत मुली,महिला,वंचित, शोषित घटकांना शिक्षण,प्रगतीच्या संधी मिळवून देणे. हे केवळ अवघड नव्हे तर जवळपास अशक्य होते.
धर्ममार्तंडांनी लादलेल्या जुनाट रूढी परंपराचे जोखड घेऊन जगणाऱ्या तत्कालीन समाजात स्त्रीया, मुलीं, वंचितांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे धर्म द्रोह समजले जाई. अशा समाजात ज्यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक सुधारणेला गतिमान करणारी लक्षवेधक सुधारणा केली, त्या फुले दाम्पंत्यांच्या सुधारणा कार्यात तत्कालीन समाजाने हरतऱ्हने संघटीत प्रयत्न करुन अनेक अडचणी आणल्या. मात्र धीरोदात्त, कृतीशील आणि हाडाचे द्रष्टे सुधारक असलेल्या महात्मा जोतीबा आणि सावित्रीबाई यांनी आपल्या उदात्त, निस्वार्थी ध्येयावरची निष्ठा जराही ढळू न देता धैर्याने आणि प्रचंड चिकाटीने विविध सामाजिक सुधारणासह स्त्री शिक्षणाचे भव्य कार्य सुरु ठेवले आणि अनेक अडचणींचा ठामपमे सामना करत ते कार्य वाढवले. यामध्ये ज्योतिबांच्या पाठीशी खंबीरपणे सावित्रीबाई उभ्या राहील्या, नुसत्याच उभ्या राहून त्यांनी केवळ पाठिंबा दिला नाही तर पूढे होऊन स्वतः या सर्व सामाजिक सुधारणा कामात प्रत्यक्ष सहभागी झाल्या. जोतिबांच्या निधनानंतर ही त्यांनी त्याच निष्ठेने त्यांचे काम सुरु ठेवले.
आपल्या जोडीदाराच्या सोबतीने समाजसेवेचे व्रत समजून घेत ते स्विकारण्याची वैचारीक समज इतक्या लहान वयात असलेल्या सावित्रीबाईंमध्ये उपजतच असामान्य साहस, खंबीरपणे योग्य गोष्टीसाठी आग्रही राहण्याचा ठामपणा , समाजाकडुन दृष्टहेतूतून दिला जाणारा टोकाचा रोष सहन करण्याची सहनशीलता या सदगुणांची देण होती. ज्या प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी निग्रहाने सुधारक वाटचाल केली आणि समर्पित वृत्तीतुन ज्योतिबांना साथ दिली. त्या सर्व घटना स्तिमित करणाऱ्या आणि सावित्रीबाईंच्या प्रभावी, भारदस्त कर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या आहेत.
देशातील प्रथम महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका बनलेल्या सावित्रीबाई यांनी इतकी महत्वाची जबाबदारी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी यशस्वीपणे पेलली. उत्कृष्ट शिक्षिका म्हणून त्यांनी अध्यापनासोबतच विर्द्यार्थींनीच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना दिली. त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यात आत्मविश्वास रुजवला. जिथे एकीकडे समाजातील स्वंयघोषीत धर्माचे सरंक्षक त्यांच्यावर रोष व्यक्त करत होते. त्यांच्या चांगल्या दिशार्शक कामात अडथळे आणत त्यांना ध्येयापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करत त्यांची कुचुंबणा करत होते. यासगळ्या अपप्रवृत्तीकड व्रतस्थपणे दुलर्क्ष करुन आपल्या कार्यात निष्ठेने पुढेने जाणाऱ्या सावित्रीबाईंचा निर्धार ठाम होता. शिक्षण कार्यासोबतच विधवा स्त्रियांच्या फसवणूकीतून जन्माला येणाऱ्या निष्पाप बाळांच्या जीवीत संरक्षणाच्या उद्देशाने महात्मा जोतिबा यांनी सुरु केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृह(1853), विधवांसाठी गृह स्थापनेच्या (1863) कामातही सक्रियपणे सावित्रीबाई सहभागी होत्या. याठिकाणी त्यांनी विधवा स्त्रियांची 35 बाळंतपणे करुन वात्सल्याने त्यांची सेवासुश्रसा केली.
फुले दाम्पत्यांनी एका बालविधवेचे बाळ दत्तक घेऊन त्याला स्वतःचे नाव,सामाजिक जाणीवेचा वारसा देत आपला उत्तराधिकारी बनवले.त्यांचा हा सुपुत्र म्हणजे डॉ.यशवंत . वंचित,शोषितांच्या कल्याणाची आतंरिक ओढ लागलेल्या फुले दाम्पत्यांनी सातत्याने तत्कालिन समाजाचा विरोध पचवून दिशादर्शक काम जोमाने उभे केले. त्यात निश्चितच जोतिबांच्या प्रत्येक कार्याला सावित्रीबाईंचे सर्वाथाने योगदान राहीलेले आहे. अनाथ बालकाश्रम चालवण्यात सावित्रीबाईंनी घेतलेला पुढाकार असेल, 1868 मध्ये घरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करण असेल, 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना जोतिबांनी केली .त्या कामात सुरवातीपासून सावित्रीबाई सक्रिय होत्याच पण जोतिबांच्या निधनानंतर ही त्यांनी सत्यशोधक समाजाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.या संस्थेमार्फत आजच्या काळातही दिशादर्शक ठरतील असे अनेकविध उपक्रम राबवल्या जात होते. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय शेती व शेतीसुधारणा यावरील उपाय यावर पुस्तक लिहणाऱ्यास पन्नास रुपये बक्षीस जाहीर केलेले होते.यातुन फुले दाम्पंत्यांची मुलभूत प्रश्नाची जाणीव व प्रगत विचारसरणी अधोरेखीत होते. त्यावेळी सन 1877 मध्ये पडलेल्या भयंकर दुष्काळात जोतिबांच्या पुढाकारात पुणे परिसरात गोरगरिबांसाठी जेवणाची सोय करणारे 52 अन्नछ्त्राद्वारे सोबतच्या बायकांसह स्वयंपाक करुन अन्नदानाचे काम फुले दाम्पत्यांनी दोन वर्ष (1875 ते 77) चालवले. पण पुन्हा जेव्हा 1896 साली दुष्काळाचे संकट आले तेव्हा जोतिबांचे निधन झालेले असल्याने त्यांची साथ सावित्रीबाईंना नव्हती . तरी ही त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा,चर्चा करुन सामान्यांना दुष्काळात सुविधा देण्याचे कार्य यशस्वीपणे केल. स्त्रीयांना आणि एकंदरीत माणूस म्हणून प्रत्येकाला सुरक्षित आणि स्वतंत्र, गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याचा हक्क आहे , या विचारांचे पुरस्कर्ते असलेल्या जोतिबासावित्री यांनी कायम त्याच दृष्टीतुन तत्कालीन प्रत्येक वाईट प्रथेविरोधात आवाज उठवला. यामध्ये विधवांच्या केशवपनाच्या अनिष्ट प्रथे विरोधात फुले दाम्पंत्याने 1890 मध्ये न्हाव्यांचा संप घडवून खुप मोठे क्रांतीकारी पाऊल उचलले. 877 सालच्या प्लेगसारख्या महामारीच्या साथीच्या आजारात सावित्रीबाईनी जोतिबांच्या पाठी दाखवलेलं शौर्य, सेवाभाव आणि त्यांच्या धडाडीचे असामान्यत्व अधिक प्रकर्षाने जाणवते. यामध्ये स्वतःसोबत आपल्या मुलाच्या जीवीताची कुठलीच भिती न बाळगता त्या प्लेग रुग्णांच्या सेवेत दिवसरात्र राबल्या. आपल्या जीवीताची किंमत देत त्यांनी या काळात सामान्यांना उपचार मिळून देण्यासाठी परिश्रम घेतले.
सावित्रीबाईंच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आलेख हा प्रेरणादायी आणि काळाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय, अनुकरणीय ठरणारा आहे. त्यांच्या कणखर व्यक्तिमत्वाला तरल कवीमनाची सोबत होती. नितळ मनाच्या सावित्रीबाईच्या लेखनातून सोप्या,सहजतेने गहन आशयाला मांडण्याचे कौशल्य ठळकपणे दिसते. कृतज्ञता ,देण्याची वृत्ती, वात्सल्य, निर्सगप्रेम,सौंद्यदृष्टी आणि प्रसन्नतेने जगण्याचा संस्कार याची मांडणी त्यांच्या काव्यपक्तींतुन ठळकपणे दिसुन येते. काव्यफुले(1854) मध्ये त्यांनी प्रामुख्याने निसर्ग,आत्मपर तसेच बोधपर आणि सामाजिक , संस्कार या विषयावरील काव्यलेखन केल्याचे बघायला मिळते. माझी जन्मभूमी,शिवस्त्रोत, छत्रपती ,राणी ताराबाई,यांच्या कर्तृत्वाची महती सांगणारे काव्य, निर्सग, शिक्षणाचे महत्व, प्रबोधनपर काव्य, त्यांनी लिहले. तसेच ‘ तेच संत ’ या अभंगात
‘ वाचे उच्चारी, तैसी क्रिया करी, तीच नरनारी पूजनीय,
सेवा परमार्थ, पाळी व्रत सार्थ,होई कृतार्थ,तेच वंद्य,
सुख,दुःख काही,स्वार्थपणा नाही ,परहित पाही तोच थोर,
मानवाचे नाते,ओळखती जे ते सावित्री वदते , तेच संत….
अशा सोपेपणाने अतिशय सहजतेने संतत्व नेमक काय आहे याची मांडणी सावित्रीबाई करतात. तर,
'मुलाबाळांना आपण शिकवू आपणसुद्धा शिकू,
विद्या घेऊनी ज्ञान वाढवून नीतीधर्मही शिकू'
या पंक्तींतून त्या शिक्षणाचे महत्व आणि ते ग्रहण करण्याचे सहजतेने सांगतात. त्याप्रमाणे सुबोध रत्नाकर (1892) या त्यांच्या दुसऱ्या काव्यसंग्रहामध्ये सामाजिक स्थिती, इतिहास,आंग्लई,पेशवाई या काव्य लेखनासोबतच सहजीवन, सुखी संसार, जोतिबांच्या सहवासातून खुले होत असलेले जीवनाचे व्यापक अवकाश याबद्दलची कृतज्ञ जाणीव व्यकत करत जोतिबांच्या भव्य कामाप्रतीचे कौतुक,अभिमान व्यक्त करणारे ही काव्यलेखन त्यांनी केले आहे.
यासोबतच आपल्या सहचराला त्याच्या उदात्त कामात येणारे अडथळे हे थांबवू शकत नाही, किंबहूना आपण आता हाती घेतलेले सुधारणा कार्य कुठल्याही परिस्थीतीत थांबता कामा नये, याची मनस्वी इच्छा असलेल्या सावित्रीबाई आपल्या नायगाव मुक्कामी जोतिबांना पत्र पाठवून कळवतात. त्यांची जोतिबांना लिहलेली पत्रे ही देखील त्यांच्या समंजस आणि समाजसेवे प्रति असलेल्या निष्ठेची दयोतक आहेत.यामध्ये माहेरीदेखील काही अंधश्रद्धा,सामाजिक दबावातून नाहक दोन लोकांची जमावाकडून होत असलेली जीवघेणी मारहाण वेळीच हस्तक्षेप करत यशस्वीपणे थांबवून त्यांनी त्या लोकांना जोतिबांकडे पुण्यात पाठवल्याची माहिती देणारे त्यांचे मुद्देसुद पत्र , आपल्याच भावाचा त्यांच्या कार्याला होत असलेला विरोध मार्मिक मुद्द्यांच्या आधारे खोडून आपल्या आई,भावाला जोतिबांच्या ऐतिहासीक कार्याची महती पटवून देणारे संभाषण चार्तुर्य असेल, त्या काळात ‘ उद्योग ’, ‘ विद्यादान ’ , ‘ सदाचरण ’ , ‘ व्यसने ’,‘ कर्ज ’ या सारख्या सामाजिक आणि आज एकविसाव्या शतकातही समोयचित असलेल्या विषयांवर शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी अधिकारवाणीने केलेली प्रभावी भाषणे असतील , अशा विविध पद्धतीने सावित्रीबाईंच्या ठायी असलेल्या व्यासंगी व्यक्तीत्वाची प्रचिती त्यांच्या लेखनातून,भाषणांतून त्यांच्या विषयांच्या निवडीतुन आणि त्यांच्या समस्त कार्यकर्तृत्वातुन प्रकर्षाने दिसून येते.
येणाऱ्या काळाला दिशादर्शक ठरणारे प्रेरक आयुष्य जगलेल्या महान विभूतींनी सहन केलेला संर्घष ही तितकाच कठीण असतो. त्याच न्यायाने माणूस म्हणून भावनिक हळव्या क्षणात जिथे कुणाचाही कस लागू शकतो असे अनेक प्रसंग सावित्रीबाईंच्या आयुष्यात आले . पण त्या भावनिक घटनांमध्ये ही आपल्या अगंभूत साहसी स्वभावाने सावित्रीबाई न कोलमडता धैर्याने उभ्या राहिल्या.ज्योतीबांच्या निधनामुळे त्यांची साथ सुटली , हा अवघड क्षण सावित्रीबाईंना वयाच्या साठाव्या वर्षी सहन करावा लागला. एकीकडे हा भावनिक आघात झालेला असताना जोतिबांच्या अत्यंविधीच्या वेळी त्यांच्या दत्तक पुत्राला हा अधिकार देण्यावरुन फुले यांच्या भावबंद मंडळी अडवणूक करत होते. त्यावेळी वैयक्तिक दुःखाचा आघात बाजूला ठेऊन सावित्रीबाई त्या उतार वयातही ठामपणे सुधारणावादी भूमिका घेऊन अत्यंविधी यात्रेच्या पुढे यशवंत आणि त्यांच्या पुतण्याला सोबत घेत स्वतः गेल्या.
आयुष्यभर एका निष्ठेने हे दाम्पंत्य कृतीशील राहीले. त्यांच्या परिश्रमातून येणाऱ्या अनेक पिढ्या उज्वल वाटचाल करत आहे , करत राहतील. महात्मा जोतिबा आणि सावित्री बाईं यांनी खडतर प्रतिकुलतेतही अविरत कष्ट सहन करुन वंचित, शोषितांसह स्त्री शिक्षणाची दारे खुली करत व्यक्तिमत्व विकासाची दिशा दाखवल्यामुळेच आज देशभरातील सर्व समाजातील, सर्व स्तरातील मुली, महिला, सामान्यातील सामान्य माणूस ही उत्तुंग झेप घेण्याची स्वप्न पाहू शकत आहेत. विविधांगी क्षेत्रात स्त्रीयांना शिक्षणाची, प्रगतीची संधी निर्माण करुन देणाऱ्या सावित्रीबाईंच्या आदरणीय व्यक्तीत्वाला, कर्तृत्वाच्या या प्रेरणास्त्रोताला जयंतीदिनी कृतज्ञतापूर्ण मानाचा मुजरा.