कृषिभूषण सुरेश वाघधरे...आता उरल्या फक्त आठवणी
By सुधीर महाजन | Published: November 9, 2019 06:30 PM2019-11-09T18:30:24+5:302019-11-09T18:44:58+5:30
कृषिभूषण सुरेश वाघधरे यांचे नुकतेच निधन झाले. ते प्रयोगशील शेतकरी. सातत्याने प्रयोग करीत राहणे आणि नव्याचा ध्यास घेणारे. आंब्याविषयी त्यांच्या संशोधनाची दखल सरकारलाही घ्यावी लागली.
गुरुवारी २४ तारखेला सकाळी फोन वाजला, विनयचा कॉल पाहताच शंकेची पाल चुकचुकली. हॅलो म्हणताच, ‘हॅप्पी दिवाळी काका’ असे उत्तर येताच हायसे वाटले; पण हा दिलासा जेमतेम चार दिवस टिकला. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची भेट घेतली होती. कृषिभूषण सुरेश वाघधरेंशी संबंध आला तो सोलापूरला असताना साधारण २००३ साली. राजू मुलानी या वार्ताहराने, गोबर गॅसवर वीजनिर्मिती करून त्यावर सिंचन करणाऱ्या शेतकऱ्याची बातमी पाठविली आणि उत्सुकतेपोटी मी माळीनगरला सुरेश वाघधरेंच्या केशरबागेत माळीनगरला पोहोचलो. बहुतेक वेळा अशा प्रयोगाचे स्वरूप प्रसिद्धी मिळविण्यासाठी असते; पण पहिल्याच भेटीत त्यांचे वेगळेपण आणि शेतीवरील निष्ठा, प्रयोगशीलता आणि कामात झोकून देण्याची स्वभाव वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवली. या सर्वांवर कडी करणारा गुण म्हणजे प्रामाणिकपणा, जो जरा अभावानेच आढळतो. ही भेटच कायमचे ऋणानुबंध बांधणारी ठरली आणि तेव्हापासून वाघधरे हे माझ्या कुटुंबाचे अविभाज्य घटक बनले. निर्व्याज प्रेम करणे. वेळेला धावून जाणे आणि हे सारे निरपेक्षपणे करणे, हा त्यांचा स्वभाव आणि यासाठी पदरमोड करण्यासही त्यांची तयारी असायची.
गोबर गॅसद्वारे वीजनिर्मिती, गांडूळ खत, व्हर्मी वॉश, अग्निहोत्र, असे एक ना अनेक प्रयोग त्यांचे चालू असत. कमीत कमी खर्चात शेती कशी करता येईल, याचा ते केवळ विचार करीत नव्हते, तर सहसा शेतकरी ठेवत नसलेला खर्चाचा हिशेब ते फार चोख ठेवायचे. आंबा हा त्यांच्या संशोधनाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आणि आंब्याची नर्सरी ही प्रयोगशाळा. यातून आंबातज्ज्ञ म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. बारामतीला अजित पवारांना जेव्हा आंबा लागवड करावी वाटली त्यावेळी त्यांनी वाघधरेंना बोलावले. पहिल्याच भेटीत आठवड्यातून एकदा तुम्ही शेतावर आले पाहिजे. शेतीही मजुरांच्या भरवशावर करणारी गोष्ट नाही, हे अजित पवारांना सांगायला ते विसरले नाहीत. आंब्याची लागवड केली. बारामतीच्या त्यांच्या चकरा सुरू झाल्या. तीन-चार महिने वाट पाहून त्यांनी जाणे बंद केले. कारण मालकच शेतावर येत नव्हते. अनेकांच्या आंब्याच्या बागा त्यांनी उभ्या केल्या. त्यासाठी प्रवास केला, खस्ता खाल्ल्या; पण हे सारे विनामोबदला. सूर्यकांता पाटलांची बाग उभी करण्यासाठी ते वर्षभर नांदेडला जात होते.
संशोधन आणि उत्सुकता हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव म्हणावा लागेल.
गाय हा शेतीचा आधार आहे. हे लक्षात येताचा त्यांनी गीर जातीच्या शंभरावर गायी पाळल्या; पण त्या दुधासाठी नव्हे, तर शेण व गोमूत्रासाठी. गोमूत्रावर संशोधन प्रक्रिया करून ते विविध आजारांवर कसे गुणकारी औषध आहे, हे ते सांगत. शिवाय पिकांसाठी गोमूत्राचे महत्त्वही सांगत. आंब्याची लागवड, दोन झाडांतील अंतर, दिशा यातून उत्पादनात कसा फरक पडतो, याचाही त्यांनी अभ्यास केला. आपल्या प्रयोगाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. ते इतके की, दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतात मोफत निवासाची व्यवस्था केली. आपले उत्पन्न कसे वाढले, हे सहसा कोणी सांगत नाही. तंत्रज्ञान देत नाहीत; पण येणाऱ्या प्रत्येकाला ते मुक्तहस्ते माहिती देत म्हणूनच त्यांच्या शेतावर रोज दीड-दोनशे शेतकरी भेट देतात. त्यात राज्यातले, राज्याबाहेरचे असे सगळेच असत. सेंद्रिय फळबागांच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आयुष्य वेचले.
आंब्यावरील प्रयोग व संशोधनासाठी त्यांना राज्य सरकारने कृषिभूषण सन्मान दिला. त्यांच्या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली आणि राष्ट्रीय पातळीवरचा जगजीवनराम पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. साखर कारखान्यावर लेखापाल म्हणून आयुष्याची सुरुवात केली. तरी त्यांचा पिंड शेतकऱ्याचा होता. अन्याय व भ्रष्टाचार याची प्रचंड चीड त्यांना वाटे. यासाठी त्यांनी साखर कारखानदारीविरुद्ध आघाडीच उघडली होती. अगदी अलीकडे चार वर्षांपूर्वी राज्यातील कोट्यवधीचा ठिबक सिंचन घोटाळा त्यांनी बाहेर काढला आणि थेट न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणात त्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला; पण दबावासमोर, आमिषासमोर ते झुकले नाहीत. एकाकी लढा देत त्यांनी सरकारला कारवाई करायला भाग पाडले.
माझे सोलापूर सुटले; पण त्यांचा स्नेहबंध कायम राहिला. दोन-तीन महिन्यांत ते अचानक यायचे. मग सारा वृत्तांत कथन करणार. काय नवीन केले ते सांगणार. भ्रष्टाचाराबद्दल पोटतिडिकेने बोलणार. बोलणे संपले की आता मी मोकळा झालो, असे म्हणणार. शेती, प्रयोग, सरकारचे धोरण, अशा वेगवेगळ्या विषयांवर आमचा रात्रभर मैफलीसारख्या गप्पा रंगत. आता अशी मैफल होणार नाही.