कुमारजी, भानुकुल आणि ते दोन दिवस

By admin | Published: January 21, 2017 10:36 PM2017-01-21T22:36:49+5:302017-01-21T22:36:49+5:30

पंडित कुमार गंधर्व यांच्या पंचविसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कलापिनी कोमकली यांनी देवासला एका हृद्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

Kumari, Bhanukul and they are two days | कुमारजी, भानुकुल आणि ते दोन दिवस

कुमारजी, भानुकुल आणि ते दोन दिवस

Next

- सायली राजाध्यक्ष

पंडित कुमार गंधर्व यांच्या पंचविसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कलापिनी कोमकली यांनी देवासला एका हृद्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

 
देवास, इंदूरजवळचं लहानसं टुमदार गाव. गावात एकच मुख्य रस्ता जो सगळ्या गावाला कवेत घेतो. त्या मुख्य रस्त्यावर डाव्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिराकडून तुम्ही डावीकडे वळलात की लागतो माताजी का रास्ता. देवासमधल्या चामुंडा मंदिराकडे जाणारा रस्ता म्हणून माताजी का रास्ता. हा लहानसा रस्ता जिथे संपतो तिथे जरासं अलीकडे, रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे भानुकुल, पंडित कुमार गंधर्वांचं घर. या घरात कुमारजींचं अनेक वर्षं वास्तव्य होतं. आता त्यांची कन्या प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली आणि नातू गायक भुवनेश कोमकली इथे राहतात. या घरात अजूनही कुमार गंधर्वांचं वास्तव्य असावं असं वाटतं इतकं सुरेख सगळं जतन केलेलं आहे. त्यांची गाण्याची खोली, त्यांचा पलंग, पुस्तकं, टेबललँप सगळं काही तितकंच सुबक रितीनं ठेवलेलं आहे. 
यंदा १२ जानेवारीला कुमार गंधर्वांची पंचविसावी पुण्यतिथी होती. दरवर्षीचा त्यांचा स्मृती-महोत्सव यावर्षी जरा अधिकच गहराईने साजरा करण्याचं ठरवून कलापिनीने कुमारजींच्या सुहृदांना निमंत्रित केलं आणि एक अविस्मरणीय मैफल बहरली.
ख्यातनाम लेखक आणि नाटककार महेश एलकुंचवारांनी त्यांच्या स्वभावाला साजेसा सुंदर प्रारंभ केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान अत्यंत प्रांजळपणे बोलले.
भारतात समूहगान किंवा कॉयरला फारसं महत्त्व दिलं जात नाही. किंबहुना आपल्याकडे हा प्रकार अजिबातच लोकप्रिय नाही. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या गांधर्ववृंदानं या संगीत महोत्सवाची बहारदार सुरुवात केली. एकूण २६ स्त्री-पुरुष, तीन तबलजी, तीन हार्मोनियनवादक यांनी बनलेल्या या वृंदाचा आपसातला ताळमेळ बघण्यासारखा होता. कुमार गंधर्वांचे शिष्य आणि संगीततज्ज्ञ मधुप मुद्गल यांनी या वृंदाचं संयोजन केलं होतं. संस्कृत श्लोकांच्या स्वस्तीगानानं या वृंदानं सुरुवात केली आणि उत्तरोत्तर कार्यक्र म रंगत गेला. विशेषत: बंगाली, राजस्थानी, गोवन रचना तसंच अमीर खुस्रोच्या रचनेचं कव्वाली ढंगात केलेलं सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण होतं.
या सत्राची अखेर कुमार गंधर्वांच्या एका दुर्मीळ ध्वनिचित्रफितीनं झाली. मुंबईतल्या ताडदेव इथल्या १९८५ मधल्या एका खासगी मैफलीची ही चित्रफीत होती. बागेश्री आणि गारा अशा दोन रागांमधल्या रचना या चित्रफितीत समाविष्ट होत्या. सभामंडपातला काळोख, मंचावर मधोमध लावलेल्या पडद्यावर साक्षात कुमार गंधर्व गाताहेत, त्यांच्या मागे तानपुऱ्यावर लहान वयातली कोवळी कलापिनी बसलेली आहे. आणि मंडपातले शेकडो लोक उत्स्फूर्त दाद देत गाणं ऐकताहेत हा अनुभव विलक्षण होता. 
दुसऱ्या दिवशी सकाळीच मी आणि सचिन कुंडलकर लवकर भानुकुलला पोहोचलो. आम्हा दोघांना कुमारांचं घर तर बघायचंच होतं पण तो सगळा परिसर शांतपणे अनुभवयाचा होता. त्यानुसार कुमारांची खोली बघितली. त्याच खोलीत कलापिनी त्या दिवशी जे काही गाणार होती त्याची तिच्या साथीदारांबरोबर तयारी करत होती. सकाळची प्रसन्न वेळ, खिडकीतून येणारा कोवळा सूर्यप्रकाश, कुमार गंधर्वांची खोली, तानपुऱ्यांची जुळवाजुळव, कलापिनीचे सूर... मी वर्णन नाही करू शकणार त्या अनुभवाचं. १०-१५ मिनिटं शांतपणे बसून ते सगळं बघणं हा विलक्षण अनुभव होता. 
हे दुसरं सत्र मुद्दाम उभारलेल्या मोठ्या मंडपात नव्हे, तर भानुकुलच्या आवारात होणार होतं. १० वाजताच्या सत्राआधी दोन मिनिटं कलापिनी सगळ्या तयारीनिशी मंचावर होती. बरोबर दहा वाजता तिनं षड्ज लावला आणि मैफलीला सुरुवात झाली. रामकलीच्या सुरांनी आसमंत भरून गेला. रामकलीनंतर कलापिनीनं देसीतली एक बंदिश गायली. त्यानंतर कुमारांचं एक निर्गुणी भजन आणि माळव्यातलं लोकगीत गायलं. या सत्रातला जिव्हाळा डोळ्यांना पाणी आणणारा होता. एकतर कुमारांची लाडकी कन्या त्यांच्याकडून जे काही शिकली ते ती इतरांबरोबर वाटून घेत होती... आणि भानुकुलच्या आवारातले वृक्ष, त्यावर टांगलेली कुमारांची दुर्मीळ छायाचित्रं, पक्ष्यांचं कूंजन, झाडांवर मनसोक्त भिरभिरणाऱ्या खारी.. या सगळ्यामुळे या सत्राला एक वेगळीच आपुलकी होती.
कलापिनीच्या गाण्यानंतर कुमारजींचे मित्र आणि शिष्य त्यांच्याबद्दल, त्यांच्या गाण्यांबद्दल बोलले. कुमार गंधर्वांचं गाणं हे मार्गी आहे असं हिंदीतले प्रसिद्ध लेखक उदयन वाजपेयी सांगत होते. मृगया म्हणजे शिकार. पण मृगया शब्दाचा अर्थ असा की शिकार करणारा एका मार्गावरून पाठलाग करतो आणि भक्ष दुसऱ्या मार्गाकडे पळत असतं. म्हणून शब्द झाला मृगया. मार्गी संगीत म्हणजे ज्या संगीताला असंख्य शक्यता आहेत, अनेक मार्ग आहेत. कुमारांचं गाणं हे म्हणूनच मार्गी संगीत आहे असं मला वाटतं, असं उदयन वाजपेयी म्हणाले.
रामुभय्या दाते हे कुमारांचे निस्सीम चाहते आणि मित्र. त्यांचे पुत्र आणि संगीतकार रवि दाते हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी कुमारांचे अनेक किस्से यावेळी सांगितले. एकदा पंडित नेहरू इंदूरला आले होते आणि त्यांना संध्याकाळचा वेळ मोकळा होता. तेव्हा त्यांच्यासाठी एखादी मैफल करावी असं ठरलं. कुमार तेव्हा नुकतेच त्यांच्या मोठ्या आजारातून उठले होते. डॉक्टरांनी त्यांना एका वेळी फक्त २० मिनिटं गाण्याची परवानगी दिली होती. रामुभय्यांनी त्यांचं आणि भानुतार्इंचं गाणं करायचं ठरवलं. वर रामुभय्या पंडित नेहरूंना म्हणाले, हा मुलगा गाण्यातला पंडित नेहरू आहे. तो मोठ्या आजारातून नुकताच उठला आहे, पहिल्यांदाच गाणार आहे, त्याला प्रोत्साहनाची गरज आहे. त्यामुळे जरी तुम्हाला गाणं आवडलं नाही तरी त्याला दाद द्या! तसं झालं नाही आणि नेहरूंना कुमारांचं गाणं आवडलं ही गोष्ट अलाहिदा. पण कुमारांच्या प्रेमापोटी नेहरूंना असं जाऊन बोलणं धाडसाचंच! 
कुमारांनी गाण्यातल्या शक्यता पडताळून बघायला शिकवलं त्याबाबतचं ॠण कुमारांचे पट्टशिष्य सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केलं. 
पंडित योगेश समसी यांच्या एकल तबला वादनानंतर या संगीत महोत्सवाचं सगळ्यात मोठं आकर्षण होतं ते म्हणजे उस्ताद अमजद अली खान यांचं सरोदवादन. 
खच्चून भरलेल्या सभामंडपातल्या आतूर श्रोत्यांना खांसाहेबांनी भरभरून दिलं. या वयातही त्यांच्या बोटांमध्ये असलेलं चापल्य थक्क करण्यासारखं आहे. त्यांचं वादन हा ऐकण्यासारखा नव्हे तर बघण्यासारखाही अनुभव असतो. ते देखणे तर आहेतच पण वाजवताना ते अधिक देखणे दिसतात. अधूनमधून नखं फाइल करणं (सरोद वाजवण्यासाठी ते आवश्यक असतं), थोडंसं गाणं आणि तल्लीन होऊन वाजवणं हे सगळं बघणं अतीव सुंदर होतं.
हा संगीत महोत्सव नुसता सुश्राव्य नव्हता तर देखणाही होता. सभामंडपाची नेटकी सजावट, रघु राय यांनी काढलेलं कुमारांचं श्वेतश्यामल छायाचित्र, त्यासमोर मोठ्या रांजणांमध्ये ठेवलेली ग्लॅडिओलाची फुलं, लालबुंद गुलाबाच्या परड्यांनी केलेली सजावट, नेटका मंच, पाहुण्यांचं गुलाबांच्या परड्यांनी केलेलं स्वागत... आणि भानुकुलमध्ये असलेल्या कुमारांच्या आठवणींची सोबत...
काय हवं आणखी?
 
माझ्या भावाला अभिजात शास्त्रीय संगीताचा शौक होता. तो वेगवेगळ्या गायक-गायिकांच्या रेकॉडर््स आणत असे. विशेषत: अब्दुल करीम खान आणि केसरबाई केरकर या दोघांचं गाणं आमच्या घरात सतत ऐकलं जात असे. एकदा त्यानं कुमार गंधर्वांची रेकॉर्ड आणली. ते गाणं ऐकतानाच जाणवलं की हे काही वेगळंच आहे. माझे वडील कधीही आमच्याशी मोकळेपणानं बोलत नसत. किंबहुना तेव्हा मोठ्यांशी अंतर राखून वागण्याचीच पद्धत होती. पण कुमारांचं गाणं ऐकल्यावर मात्र ते आतून हलले असावेत. ते म्हणाले होते, ‘हे काही विलक्षण आहे.’- महेश एलकुंचवार
 
कुमारांनी कबीर, तुलसी, मीरा यांच्या रचना गायल्या होत्या. कालिदासाच्या रचना मात्र तोपर्यंत कुणी गायलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी कालिदासाच्या रचना संगीतबद्ध करून गाव्यात असं मी एकदा कुमारांना सुचवलं. बरेच दिवस ते काही झालं नाही. मी कुमारांना परत परत आठवण करून देत असे. एकदा अशीच परत आठवण केल्यावर कुमार म्हणाले, मी कालिदासाच्या रचना गायलो नाही तर कालिदासाच्या प्रतिष्ठेत काही फरक पडणार आहे का? त्याचं जे स्थान आहे ते अबाधितच आहे ना? 
- मी हो म्हणालो. त्यावर त्यांनी मान डोलावली आणि हसून म्हणाले, ज्या व्यक्तीच्या स्थानात माझ्या रचनेनं फरक पडेल अशा व्यक्तीच्या रचना मी गाईन! - अशोक वाजपेयी
(लेखिका मुक्त पत्रकार आणि ब्लॉगर आहेत. sayali.rajadhyaksha@gmail.com)

 

Web Title: Kumari, Bhanukul and they are two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.