क्यूं??
By admin | Published: July 15, 2016 04:52 PM2016-07-15T16:52:03+5:302016-07-15T16:52:03+5:30
काश्मीर खो-यातल्या तरुणांच्या डोक्यात राग आणि हातात दगड आहेत, ते कशामुळे? बडगाम ल्ह्यातल्या गत्तीपुरा या गावातून पुण्यात शिकायला आलेल्या एका तरुणाने सांगितलेली आप-बिती.
Next
>
शब्दांकन : समीर मराठे
(22 वर्षीय तरुण लेखक काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील रहिवासी असून, गेल्या 14 वर्षापासून ‘सरहद’ या संस्थेच्या माध्यमातून पुण्यात राहतोय. सध्या पदव्युत्तर शिक्षण घेतोय.)
एक बात तय है. मैं हिंदुस्तान में रहूँ, पाकिस्तान में, या कश्मीर में, फरिश्ता मुङो जन्नत बख्शेगा
या जहन्नुम, ये तय करेगा सिर्फ मेरा काम.
काश्मीर खो-यातल्या तरुणांच्या डोक्यात राग आणि हातात दगड आहेत, ते कशामुळे?
बडगाम ल्ह्यातल्या गत्तीपुरा या गावातून पुण्यात शिकायला आलेल्या एका तरुणाने सांगितलेली आप-बिती.
- जावेद अहमद वानी
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातलं गत्तीपुरा हे माझं गाव. अगदी कोप-यातलं.
पंधरा वर्षाचा होतो मी. एके दिवशी संध्याकाळची वेळ. आम्ही मित्र मित्र खेळत होतो. तेवढय़ात चार-पाच हट्टय़ाकट्टय़ा लोकांचा एक घोळका अचानकच आला. हातात बंदुका. एके फोर्टीसेवन.
माझं बखोट धरलं, आपली गन माझ्या हातात दिली, काश्मिरी भाषेत मला माझं नाव विचारलं आणि तालपुरा गावाचा रस्ता विचारला. हे गाव साधारण पाच किलोमीटर होतं.
आम्ही सात-आठ जण खेळत होतो, पण त्यांनी मलाच का पकडलं असावं?
- खेळत असलेल्या त्या सर्व मुलांमध्ये बहुधा मी सर्वात उंच आणि मोठा दिसत होतो.
मी प्रचंड घाबरलो होतो. ते ठोसत मला त्या गावार्पयत घेऊन गेले. लपतछपत आम्ही चाललो होतो. तिथे पोहोचेर्पयत एके फोर्टीसेवन त्यांनी माझ्याच हातात दिली होती.
माझं सुदैव की त्यावेळी मिलिटरीच्या जवानांनी, पोलिसांनी हे दृश्य पाहिलं नाही.
काहीही झालं तरी माझा मृत्यू अटळ होता. गोळीबारात मी जवांनाकडून तरी मारला गेलो असतो, नाहीतर माझ्यासोबतच्या अतिरेक्यांकडून तरी. पकडला गेलो असतो तरी सुटण्याची शक्यता कमीच होती. कारण मी अतिरेक्यांबरोबर होतो. माङया हातात गन होती आणि पर्यायानं प्रथमदर्शनीच मी अतिरेकी किंवा त्यांचा ‘साथीदार’ ठरत होतो.
‘सापडलो’ असतो तर माझं भविष्य त्याच वेळी ‘लिहिलं’ गेलं असतं.
सुदैवानं तसं काही झालं नाही. मी त्यांना तालपुरार्पयत रस्ता दाखवला. त्यांनी रात्रीच्या अंधारात मला तिथेच सोडलं. मीही परत अंधारात ठेचकाळत तसाच घरी परत आलो. त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते.
हा प्रसंग माङयाच बाबतीत घडलाय असं नव्हे. काश्मीर खो:यात वाढलेल्या, आज विशी-पंचविशीत असलेल्या माङयासारख्या असंख्य तरुणांनी हा अनुभव घेतला आहे.
काहींना तर पार मध्यरात्री बारा-एक-दोनच्या सुमारास अतिरेक्यांनी घरातून उचललंय आणि आपल्या बरोबर नेलंय.
मौत इधर भी, उधर भी.
माङया बाबतीत हा प्रसंग घडला त्यावेळी खरं तर मी पुण्यात शिकायला होतो. आणि सुटीत घरी गेलो होतो.
काश्मीर खो:यातला हिंसाचार, क्षणाक्षणाला होणारा गोळीबार, दोन्हीकडची मरणारी माणसं, कफ्यरू, हातांना काहीही काम नसणारे बेकार तरुण आणि त्यांच्या रिकाम्या डोक्यांत ‘दगड’ पेरणारे फुटीरतावाद्यांचे काही कंपू. हे सारं सारं मला फक्त वर्तमानपत्रतल्या बातम्यांमधून अगर टीव्हीवरल्या रिपोर्टमधून नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्यातून माहीत आहे. कारण ते सारं मी जगलोय.
ना शिक्षण, ना रोजगार, ना करमणूक. आठवडय़ातून चार-चार दिवस शाळा, कॉलेजेस बंद आणि मरणाच्या धाकातलं आठवडय़ातलं दोन दिवसांचं कसंबसं शिक्षण. हे सारं मी खूप जवळून अनुभवलं आहे.
याच पाश्र्वभूमीवर पुण्यासारख्या ठिकाणी आल्यानंतरचं भयमुक्त, जात-पात-धर्मविरहित इन्सानियतचं वातावरण तर मी रोज प्रत्यक्षच अनुभवतो आहे. त्याचमुळे काश्मीर खो:यातले माङो जे मित्र मला हल्ली वर्तमानपत्रंच्या पानांवर आणि टीव्हीच्या पडद्यावर भेटतात/दिसतात, त्यांच्या डोळ्यांत अंगार, डोक्यात विखार आणि हातात पत्थर का असतात, हेही मला थोडंफार उमजू शकतं.
मी जर पुण्यात न येता काश्मिरातच राहिलो असतो तर काय झालं असतं माझं?.
शायद मैं हाथ में पत्थर कभी ना उठाता, बुरहान वानी जैसे आतंकवादीयोंका समर्थन भी ना करता, क्योंकी मेरे घरवालोंकी तालीम.
माङो घरचे या सा:या गोष्टींपासून कायमच दूर होते. मलाही त्यांनी जाणीवपूर्वक त्यापासून दूर ठेवलं. पण हाती दगड घेतला नसता तरी आमच्याच समाजाच्या, शिया-सुन्नींत होणा:या रोजच्या हाणामा:यांपासून मी कसा दूर राहू शकलो असतो? मी अनपढ राहिलो असतो, या किचाटात राहून कदाचित इथलाच एक अस्वस्थ अतूट हिस्सा बनून जगत राहिलो असतो.
मला माझा भूतकाळ आणि भविष्यकाळ अगदी डोळ्यांसमोर दिसतोय.
माङयाच छोटय़ाशा गावाचं उदाहरण. गावाचं जाऊ द्या, ज्या शाळेत मी शिकत होतो तिथलाच माझा वर्ग. शाळा तर कायम बंदच असायची. कारण दंगेधोपे. माङया वर्गात साधारण पन्नास मुलं शिकत होती. त्यातला एकही जण आठवी-नववीच्या पुढे गेला नाही. मेरे वानी कौम में तो मै अकेलाही ग्रॅज्युएट हॅँू. बाकी लोग जादासे जादा दसवीतक पढे होंगे!
माङो काका, वडील यांना माहीत होतं, इथल्या रोजच्या खूनखराब्यात राहून डोक्यात ‘अंगार’ भरल्याशिवाय दुसरं काहीच होणार नाही. इथून बाहेर पडलं तरच काही प्रगती.
मी चौथी-पाचवीत होतो. त्याचवेळेस माङया काकांनी कुठूनतरी पुण्यातल्या ‘सरहद’ या संस्थेचा फॉर्म आणला आणि घरच्यांना माङयासाठी म्हणून तो भरायला सांगितला. अनेक नातेवाइकांनी, जवळच्या लोकांनी त्याला विरोध केला. इस ‘सरहद’ से उस ‘सरहद’ पे जायेगा. जिंदगी से गोली का साया छुटेगा क्या? क्यूं भेजते हो बच्चे को? मरने के लिए?.
काश्मिरी तरुणांना शांतीची वाट दाखवणारी ‘सरहद’ ही खरी तर पुण्यातली एक स्वयंसेवी संस्था. पण माङया नातेवाईकांना वाटत होतं, मी आणखी कुठल्या तरी ‘बॉर्डर’वर जाणार. पण वडिलांनी ठामपणो सांगितलं, ‘होनी को कौन टाल सकता है. जे होईल ते होईल, मी मुलाला पाठवणारच.’
शिक्षणासाठी माझं पुण्याला जाणं निश्चित झालं. अर्थातच माझा राहण्याचा, खाण्या-पिण्याचा, शिक्षणाचा सारा खर्च ‘सरहद’ करणार होती.
मी इथून जाणार म्हटल्यावर माझा जिगरी यार, माझा वर्गमित्र मुख्तारनंही घरी हट्टच धरला. मुङो भी जावेद के साथ जाना है. रडून भेकून त्यानं घर डोक्यावर घेतलं, पण आपला हट्ट सोडला नाही. शेवटी तोही माङयाबरोबर पुण्याला आला.
पाचवीत असताना आम्ही काश्मीर सोडलं, इथे पुण्यात आल्यावरही दहावीर्पयत आम्ही एकाच वर्गात शिकलो. दहावीनंतर आमचे मार्ग वेगळे झाले. तो मेडिकलला गेला, मी आर्ट्सला. तो आता फिजिओथेरपिस्टचं शिक्षण घेतोय. आमच्या गावातला तो एकमेव डॉक्टर असेल!
इथे आल्यानंतर मला कळतंय, दोन्हीकडच्या आयुष्यात किती आणि कसा फरक आहे.
‘तू हिंदूंमध्ये राहशील, तिथे तुला ख्रिश्चन बनवतील, धर्म सोडायला लावतील.’ असं एक ना अनेक आम्हाला ऐकवलं गेलं होतं. आमच्या डोक्यात भीती पेरली गेली होती.
पण त्यातली एकही गोष्ट खरी नव्हती. एक टक्काही.
पुण्यात येऊन मला आता चौदा र्वष झाली, मला एकदाही असा काही अनुभव आला नाही. नाहीतर मी कधीच परतीचा रस्ता धरला असता.
मी काश्मिरातून बाहेर पडलो. पुण्यात आलो. आणि आयुष्यत पहिल्यांदा वेगळं जग दिसलं मला. इथे आल्या आल्या कारमध्ये बसवून जवळची मशीद आम्हाला दाखवून सांगितलं गेलं, यहॉँ आके नमाज पढते जाना.
पहिला धक्का तिथेच बसला. नंतर असे अनेक धक्के बसत गेले आणि आता तर असे धक्के वाटणंच बंद झालंय. आता मी इथल्या आयुष्यात रुळलो आहे.
रोजचं नियमित शिक्षण, अभ्यास, करिअरचा विचार, काम. या सा:यांत रिकाम्या गोष्टींचा विचार करायला डोक्यात जागा उरतेच कुठे?
..पण खो:यातली परिस्थिती सैतानाच्या घरासारखी!
स्वत:ची जान पणाला लावण्याइतका विखार इथल्या तरुणांच्या डोक्यात का भरला गेला असावा? त्यांच्या हातात दगड का आले असावेत? अतिरेकी म्हणून मारल्या गेलेल्यांच्या अंत्यविधीला तरुणांची इतकी गर्दी कशी? बाहेरच्या जगासाठी अतिरेकी असणारे ‘तिथे’ हिरो का ठरतात
- असे अनेक प्रश्न पडतात. मलाही ते सातत्याने विचारले जातात. मी काही राजकीय तज्ज्ञ नाही. काश्मिरातल्या परिस्थितीचं विश्लेषण करण्याची माझी पात्रताही नाही. ना तेवढी जाण आहे माङयाकडे. पण एक मात्र नक्की, माङया वयाचे तिथले तरुण काय भोगतात, हे मी खात्रीनं सांगू शकतो.
- एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. तिथली अशांतता. मृत्यू हे तिथलं रोजचं वास्तव आहे. कधी लष्कराचे जवान, कधी अतिरेकी, तर कधी सर्वसामान्य माणसं.
मरणारा, मेलेला माणूस कितीही वाईट असला, तरी त्याचे नातेवाईक, त्याचं समर्थन करणारे लोक असतातच. त्यात तेल ओतायला फुटिरतावादी तयारच असतात. ते अशा घटना मुद्दाम उचलतात. विखारी, विषारी प्रचार करतात. जाळपोळ, दंगे घडवतात. मेलेल्या सर्वसामान्य माणसांच्या नातेवाइकांचा रोष तर स्वाभाविकच.
चिंगारी चिंगारीसे मिलके अंगार बन जाती है.
खरं सांगायचं तर हे असे लोक अगदी थोडे. भारताच्या विरोधात नारे देणा:या लोकांची संख्याही थोडीच. मात्र ती आहे हेदेखील खरंच.
भारत सरकारच्या विरोधात इथे नारेबाजी होते, लष्कराच्या जवानांवर, पोलिसांवर दगडफेक होते, पण मिलिटरी नसती तर आहे तोही काश्मीर राहिला नसता, आणखी खूनखराबा झाला असता हेही इथली सामान्य माणसं जाणून असतात मनातून!
गावात असलेल्या लष्कराच्या जवानांना भेटायला माङो वडील मला मुद्दाम घेऊन जायचे. त्यांच्याशी हात मिळवायला लावायचे. तेही आमची ख्यालीखुशाली विचारायचे. त्यामुळे निदान आम्हाला तरी त्यांची भीती, दहशत कधीच वाटली नाही.
भारत सरकारनंही काश्मीरसाठी काहीच केलेलं नाही, असं नाही. करोडो रुपये आजवर काश्मीरमध्ये, काश्मीरसाठी ओतले गेलेत. पण मला वाटतं, त्याची प्राथमिकता थोडी वेगळी असायला हवी होती. काश्मिरात खूप मोठय़ा संख्येनं रस्ते झाले. गावागावांत पोहोचले, पण त्या तुलनेत इथला उद्योग वाढला नाही, व्यवसाय बहरला नाही, इथल्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार रोजगार पुरेसा वाढला नाही, शिक्षणावर पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही.
करायला काहीच नसेल तर रिकामे हात उचलले जाणारच ना.
आणि जी माणसं मेली, त्यांचे नातेवाईक, आप्त शिव्याशाप देणारच ना?.
काश्मिरातल्या हिंसाचाराचं हेही एक महत्त्वाचं कारण आहे.
सच कहता हॅँू, काश्मिरी नौजवान को ना तो आजादी चाहिए, ना पाकिस्तान चाहिए. उन्हें तो चाहिए सिर्फ अमन, एज्युकेशन और हाथ को काम.
काश्मिरात सफरचंदांच्या अमाप बागा आहेत. सुकामेवा, लाकूड, निसर्ग, पर्यटन. इथे ऑइल इंडस्ट्री उभ्या राहू शकतात. वनस्पतींपासून निरनिराळी औषधं, त्यासंबंधीचे उद्योग उभारता येऊ शकतात. ज्यूस इंडस्ट्री, हस्तकलेवरचे उद्योग, शिक्षण. या सा:या गोष्टींना चालना देता येऊ शकते. पावसाळ्यात जेव्हा हिमवर्षाव होतो तेव्हा जवळजवळ तीन महिने काश्मीर ठप्प झालेलं असतं. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन काश्मीरचा विकास झाला, तरुणांच्या हाताला काम मिळालं, दंगेधोपे बंद झाले, तरुणांचे हात आणि डोकं विधायक कामात गुंतलं तर खूनखराबा बराचसा कमी होईल.
काश्मिरात कितीतरी वेळा दंगे झाले. गोळीबार, कफ्यरू तर पाचवीलाच पुजलेला. पण अगदी एकदाही इथल्या छोटय़ातल्या छोटय़ा इंडस्ट्रीचं कोणीच नुकसान केलं नाही. प्रसंगी माणसं मेली, पण आपल्या पोटावर स्वत:हून कोणीच लाथ नाही मारली.
इतक्या वर्षात लोकांच्या डोक्यात, मनात इथे बरंच काही साचलेलं आहे, फ्रस्ट्रेशन आहे. डोक्यातला हा संताप लगेच निघणार नाही हेदेखील खरंच. त्यादृष्टीनं प्रयत्न व्हायला हवेत.
माङया लहानपणची गोष्ट. शेतात पाणी देण्यासाठी चाचाबरोबर मी आमच्या शेतात चाललो होतो. रात्री दहाची वेळ. अचानक जवळूनच आवाज आला, ‘हात उपर करो’. चाचाला वाटलं, कोणी शेजारी चेष्टा करतोय. तेही गंमतीत म्हणाले, ‘कौन है? पहले आप हात उपर करो.’
त्यांनी असं म्हणायचा अवकाश, लगेच तीन-चार गन लोड केल्याचे खटके वाजले. चाचांच्या लक्षात आलं, हे अतिरेकी आहेत. त्यांनी लगेच सांगितलं, आम्ही आमचे हात वर केले आहेत.
गन सरसावत अतिरेकी जवळ आले, आमची झडती घेऊन चौकशी केली, शेजारी समजून मजाकमध्ये मी बोललो हे चाचांनी विनवण्या करून सांगितलं. बहुधा त्यांना ते पटलं असावं. तरीही त्यांनी चाचाची कानफटं लाल केलीच.
या सगळ्या गोष्टी सतत सगळ्यांच्या बाबतीत घडत असतात आणि गन घेतलेले एक-दोन अतिरेकीही अख्ख्या गावाला वेठीला धरू शकतात.
असं वातावरण नेहमीचंच. मी अधूनमधून माङया गावी जात असतो. गेल्यावेळी दोन महिने गावी होतो. त्यावेळी गावातल्या दहावीच्या सर्व मुलांना मी फुकट शिकवलं.
मी ािश्चन झालो नाही, माझं शिक्षण उत्तम झालंय, कुठल्याही बॉर्डरवर मी मारला गेलो नाही, मी एक चांगला नागरिक झालोय हे पाहून गावातली बहुतांश लोकं आता मला सांगतात, आमच्याही मुलांना आम्हाला आता बाहेर पाठवायचंय. गावातल्या चौघा मुलांना तर त्यांच्या पालकांनी स्वखर्चानं काश्मीरबाहेर शिकायला पाठवलंय.
एक बात तय है, मैं हिंदुस्तान में रहूॅँ, पाकिस्तान में, या कश्मीर में, फरिश्ता मुङो जन्नत बख्शेगा या जहन्नुम, ये तय करेगा सिर्फ मेरा काम.
फिलहाल तो हमें हात पकडना है इन्सानियत का.
सध्या हीच इन्सानियत निदान मला तरी इथे जागोजागी दिसते आहे. असंच काश्मिरातही झालं तर तिथल्या तरुणांची डोकी शांत होतील, हातातले दगड खाली पडतील.