बुडत्याला काडीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 04:36 PM2019-03-31T16:36:48+5:302019-03-31T16:38:07+5:30
निसर्गाच्या कुशीत : मराठवाड्यातील सध्याच्या भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे वन्य पशू-पक्षी थेंबभर पाण्यासाठी, चिमूटभर घासाच्या शोधार्थ रानोवनी भटकंती करीत आहेत.
- सिद्धार्थ सोनवणे
अन्न-पाण्याच्या शोधात असलेले एक दुर्मिळ जावडी मांजर नुकतेच पाडळी येथील प्रगतिशील शेतकरी काळू सरवदे यांच्या शेतातील पाण्याचा हौदात पडले होते. त्याचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले असले तरी खऱ्या अर्थाने त्याचे प्राण वाचले ते त्या हौदात असलेल्या वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्यामुळे! ‘बुडत्याला काडीचा आधार’ ही म्हण येथे प्रत्यक्षात प्रत्ययास आली होती.
दुष्काळामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने तहानलेल्या वन्य पशू-पक्ष्यांची तृष्णा भागविण्यासाठी पाडळी येथील शेतकरी काळू सरवदे यांनी त्यांच्या शेतातील हौदात पाणी भरून ठेवले. या पाण्यावर परिसरातील वन्यजीव आपली तहान भागवत. काही दिवसांनी जेव्हा सरवदे पुन्हा हौद भरण्यासाठी गेले तेव्हा त्यांना हौदात एक अनोळखी प्राणी पडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ मला या घटनेची माहिती दिली. मी अवघ्या पाच मिनिटांत तेथे पोहोचलो. पाहतो तर हौदात दुर्मिळ जावडी मांजर पाण्यावर तरंगत असलेल्या वाळलेल्या लाकडी ओंडक्यावर आधार घेऊन बसलेले.
ते बऱ्याच दिवसांपासून हौदात अडकलेले असावे. त्याचे भुकेने पोट पार आत गेलेले. शरीर थरथरत होते. हालचाल मंदावलेली. अशा अवस्थेतही जेव्हा विठ्ठल सरवदे यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी पकडले तेव्हा या जावडी मांजराने त्यांच्या अंगावर गुदद्वाराच्या जवळ असलेल्या ग्रंथीतून घाणेरडा उग्र दुर्गंधीयुक्त पिवळसर स्राव अंगावर सोडला, तसे ते जावडी मांजर माझ्या हवाली केले. मी त्याला पोत्यात घातले आणि हौदातील पाणी शेवटपर्यंत प्राण्यांना पिता यावे, त्यांना हौदातून बाहेर येता यावे यासाठी मोठे लाकूड, मोठा दगड हौदात ठेवण्याचे सांगून त्यांचा निरोप घेतला.
सर्पराज्ञीत आणल्यानंतर मी व सृष्टीने त्याला कपड्याने पुसून पूर्ण कोरडे करून घेतले. तरीही त्याचे शरीर थरथर करीतच होते. तोल जात होता. त्यामुळे त्याला कोवळ्या उन्हात ठेवले. अर्ध्या तासाने ग्लुकोजचे पाणी पाजले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात ठेवून खाण्यासाठी केळी टाकली. उदमांजरे मांसाहारी आणि शाकाहारीही असतात. तीन तासांनंतर त्याच्या शरीराची थरथर थांबली. त्यानंतर त्याने केळी खाली.दुसऱ्या दिवशी ते पिंजऱ्यात फिरू लागले. ते बरे झाले होते; परंतु त्याला थोडी विश्रांती आणि शरीरात थोडी ताकद येण्यासाठी आम्ही त्याला एक आठवडा ठेवून पुन्हा त्याला निसर्गात सोडून दिले.
(लेखक : सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र, तागडगाव, ता. शिरूर कासार, जि. बीडचे संचालक आहेत.)