दीपस्तंभ

By admin | Published: August 5, 2016 06:45 PM2016-08-05T18:45:28+5:302016-08-05T18:45:28+5:30

संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी मराठी रंगभूमीला दिलेली देणगी अनन्यसाधारण आहे. साऱ्या महाराष्ट्राचा लाडका असा हा गायक नट होता. वक्तशीरपणा तर त्यांच्याकडूनच शिकावा. काहीही झाले तरी प्रयोग ठरलेल्या वेळीच सुरू होणार.

Lampstand | दीपस्तंभ

दीपस्तंभ

Next
>प्रेमला नारायण भोसले
(लेखिका संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या पुतणी व कोल्हापूर येथील कलानिकेतन महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य आहेत)
 
संगीतसूर्य केशवराव भोसले यांची ९ ऑॅगस्ट रोजी १२६वी जयंती. त्यानिमित्त..
 
संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी मराठी रंगभूमीला दिलेली  देणगी अनन्यसाधारण आहे. साऱ्या महाराष्ट्राचा लाडका असा हा गायक नट होता. वक्तशीरपणा तर त्यांच्याकडूनच शिकावा. काहीही झाले तरी प्रयोग  ठरलेल्या वेळीच सुरू होणार. एक मिनिटाचाही फरक नाही. प्रेक्षकांना मायबाप मानायचे आणि त्यांना ताटकळत ठेवायचे  हे त्यांना अजिबात मान्य नव्हते. 
 
संगीतसूर्य केशवराव भोसले. कोल्हापूरचा गुणी सुपुत्र. या गायक नटानं ९५ वर्षांपूर्वी मराठी रंगभूमी अक्षरश: गाजवली होती. त्यामुळे साऱ्या महाराष्ट्राचा अत्यंत लाडका असा हा नट होता. 
दरवर्षी त्यांच्या जयंती व स्मृतिदिनी काही मोजक्याच लोकांनी त्यांची आठवण करण्यापेक्षा ललितकलेतील सर्व कलाकारांनी त्यांच्या अवघ्या ३१ वर्षांच्या जीवनपटाचे गुणावलोकन करावे, त्यापासून आपल्याला काही शिकता येते का, काही मार्गदर्शन मिळते का याचा विचार करावा, असे माझ्या कलाकार मनाला वाटतेय. ललित कलातील विश्वाचा काहीवेळ अगदी जवळून, तर काहीवेळा थोडा दुरून मी अनुभव घेतला आहे. त्यावेळी विचारमंथन करताना या विश्वातील भरकटलेल्या तारूंना दीपस्तंभ दिसावा यासाठीही हा प्रयत्न आहे.
अवघ्या ३१ वर्षांत एखादा कलाकार एवढा लांब पल्ला गाठू शकतो, तर इतर कलाकार गलितगात्र होऊन सरकारकडे मानधनाच्या भिकेची याचना करणारे असे का व्हावे? कलाकारांनी अंतर्मुख होऊन याचा विचार करावा. दोष परिस्थितीचा, नशिबाचा की स्वत:चा? 
केशवरावांचे लहान बंधू नारायणराव भोसले यांची मी सर्वांत लहान मुलगी. माझ्या वडिलांच्यात व काकांच्यात १२ वर्षांचे अंतर होते. पहिली चार वर्षे सोडली तर माझे वडील अखेरपर्यंत त्यांच्या बरोबर होते. त्यामुळे काकांची माहिती त्यांना जेवढी होती, ती इतरांजवळ नव्हती.
अत्यंत लहानपणी आई-वडिलांना मुकलेल्या माझ्या वडिलांना काकांनी पित्याची माया दिली. स्वत:ला शिकता आले नाही म्हणून छोट्या भावाने खूप शिकावे अशी त्यांची इच्छा होती. वडिलांना त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिकवले. 
वडील सकाळी उठले की प्रथम भावाच्या फोटोला नमस्कार करीत हे मी पाहिले आहे. असे हे देवतुल्य काका होते तरी कसे याची माहिती जेव्हा मला मिळाली, तेव्हा मनातल्या मनात मी त्यांना गुरूच करून टाकले. कारण कलाकार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहे. 
स्वदेश हितचिंतक नाटकमंडळीचे मालक व अभिनय गुरू जनूभाऊ निमकर यांनी काकांना वयाच्या चौथ्या वर्षी ईश्वरप्रेमाची ओळख करून दिली. ईश्वरनिष्ठा पाठीशी असेल तर कलाकाराला काही कमी पडत नाही यावर त्यांचा विश्वास होता. त्यानंतर येते ती गुरुनिष्ठा. त्यांचे पहिले संगीत गुरू दत्तोपंत जांभेकर बुवा. 
बाराव्या वर्षी जांभेकरबुवांकडे त्यांचे रीतसर शिक्षण सुरू झाले. पुढे प्रसिद्धीनंतर मानपत्र, महावस्त्र व सुवर्णपदक देऊन त्यांचा सत्कार झाला. तेव्हा मिळालेले सर्व सन्मान आपले गुरू जांभेकरबुवांच्या चरणी अर्पून त्यांनी गुरुनिष्ठेचा धडाच घालून दिला. 
आत्मविश्वास, जिद्द व कठोर परिश्रम यांच्या जोरावर वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी ‘ललितकलादर्श’ ही आपली स्वतंत्र कंपनी स्थापन केली. पुढे या नावाला साजेल अशाच कृती त्यांच्या हातून घडल्या.
चित्र-शिल्प कलेतील मातब्बर आनंदराव व बाबूराव पेंटर या बंधूद्वयींना त्यांनी पडदे व नेपथ्यासाठी निवडले. तसेच पु. श्री. काळे यांनाही जवळ केले. त्यामुळे त्याकाळी गाण्यालाच नव्हे, तर नेपथ्यालाही टाळ्या मिळू लागल्या. सच्चा कलाकार इतर कलाकारांना ओळखू शकतो, कदर करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण. ही करामत इतर नाटकमंडळींकडून न झाल्यानेच ‘ललितकलादर्श’चा उत्कर्ष होत गेला.
त्याकाळी बरीच नाटकमंडळी राजाश्रयाखाली कामे करत होती. काकांनी सर्वप्रथम वेगळेपण दाखवून कंपनी लोकाश्रयाखाली चालविली. नाटकाला प्रेक्षकांकडून तिकिटाद्वारे जे मिळते तेच खरे. राजाश्रयाने बांधिलकीला सामोरे जावे लागते, असे त्यांना वाटले असावे. स्वकर्तृत्वावर कार्य करताना जे स्वातंत्र्य मिळाले, त्यातूनच ते कलाक्षेत्रात विविध प्रयोग करू शकले. 
पूर्वी नाटकाच्या दर्शनी पडद्यावर चित्रे काढलेली असत. नाटक सुरू होण्यापूर्वी प्रेक्षक ती पाहत. त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष विचलित होते असे वाटल्याने त्यांनी नाटकाचा पडदा मखमली व विना चित्रांचा केला. नंतर तीच प्रथा पडली. त्यामुळे पडदा बाजूला जाताच प्रेक्षक नाटकाशी एकरूप होत. खरे तर हे मानसशास्त्रीय सत्य, पण काहीही शिक्षण घेतलेले नसतानाही त्या काळातही त्यांना ते उमगले.
नाटकाचे विषय निवडतानाही प्रेक्षकांना ते कळतील, असेच विषय त्यांनी निवडले. परंपरेनं चालत आलेल्या सं. सौभद्र, सं. मानापमान, सं. मृच्छकटिक इत्यादिंसोबत हाच मुलाचा बाप, राक्षसी महत्त्वाकांक्षा, संन्यासाचा संसार, सत्तेचे गुलाम, शहाशिवाजी यासारखी नाटकेही त्यांनी रंगभूमीवर आणली. कलावंत स्त्रीचे ‘सं. दामिनी’ इतर कंपन्यांनी अव्हेरले, पण त्याच नाटकाला त्यांनी रंगभूमीवर आणले. स्त्री कलाकाराचा हा सन्मानच होता.
काकांनी शून्यातून विश्व निर्माण केले. भरपूर पैसाही मिळवला; पण तो केवळ स्वत:साठी वापरण्याचा अट्टहास त्यांनी कधीच धरला नाही. या पैशाचा त्यांनी चांगला विनियोग केला. राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन कित्येकांना गुप्तदान केले. संस्थांना मदत केली. गरिबांना सहस्रभोजन घातले. पॅलेस थिएटरच्या (सध्याचे केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर) उद्घाटनप्रसंगी महाराजांना नजराणा पेश करून त्यांना वंदन केले. त्यावेळी मुक्काम वाढून आणखी केलेल्या प्रयोगाचे सर्व पैसे कोल्हापुरातच खर्च केले. त्यात अंबाबाईच्या देवळाची शिखरे पाजळली. पहिलवानांना बादली फेटे बांधले. नरसोबावाडीला सहस्त्रभोजन घातले.
लोकमान्य टिळकांच्या स्मृतीसाठी महात्मा गांधींनी एक कोटीचा संकल्प केला होता. त्या टिळक फंडासाठी काका व बालगंधर्व या दोघांनी संयुक्त ‘मानापमान’ व ‘सौभद्र’चे प्रयोग करून मिळालेले सर्व पैसे फंडाला दिले. त्या ऐतिहासिक प्रयोगात ‘सूर्य-चंद्र’ एकाच रंगभूमीवर तळपले. बालगंधर्वांनी हे धाडस करू नये असे म्हणणारे काही महाभाग होते; पण बालगंधर्वांनी त्याला न जुमानता प्रयोग केलाच. काका तर प्रथमपासूनच तयार होते. कारण ही देशपे्रमाची वेळ होती. चंद्र-सूर्यात एकी होती; पण पाठीराखे अडचण आणत होते. ते महाभाग प्रयोगाला हजर राहिले नाहीत; पण त्यांच्यावाचून काही अडले नाही. प्रेक्षकांनी प्रयोगाला यशस्वीतेची पावती दिली.
‘आपल्यानंतर काय?’ याचाही विचार काकांनी अगोदरच करून ठेवला होता. भवितव्याचा विचार करून मृत्युपत्रात सगळ्या गोष्टींची योग्य ती दखल घेतली होती. त्यांनी कंपनीला बापूसाहेब पेंढारकर व नानासाहेब चापेकरांच्या ताब्यात दिले. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात त्यांचा हातखंडा होता हे इथेही दिसून आले. 
सर्वांत महत्त्वाचा व अलीकडच्या कलाकारांनी स्वीकारावा असा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे वक्तशीरपणा. प्रयोग ९.३० म्हणजे ९.३० वाजताच सुरू होणार! तिसरी घंटा वाजून पडदा बाजूला सरला की घड्याळात बघावे, साडेनऊच वाजलेले असायचे. 
प्रेक्षकांना मायबाप मानायचे व त्यांना ताटकळत ठेवायचे हे त्यांना अजिबात आवडत नव्हते. सध्याचे कलाकार या गोष्टीकडे लक्ष देतील का?
 
दहाव्या वर्षी ‘स्टार’!
काकांचे (केशवराव) शिक्षण सुरू होण्यापूर्वी घडलेली घटना रंजक तसेच त्यांच्या धाडसाची आहे. ‘संगीत शारदा’मध्ये ते वयाच्या चौथ्या वर्षापासून लहानमोठी कामे करीत असत. त्यावेळी नुसते ऐकूनच त्यातले संवाद त्यांनी पाठ केले होते व गाणीही साथसंगतीशिवाय तयार केली होती. नाटकात काम करणारा ‘कृष्णा देवळी’ अचानक आजारी पडला. नाटकाची तारीख जाहीर झालेली होती, तिकीट विक्रीही झाली होती. ऐनवेळी प्रयोग रद्द करण्याची वेळ आली, तेव्हा ‘मी करतो ती भूमिका’, असे आत्मविश्वासाने सांगून त्यांनी त्यातले संवाद व गाणी तोंडपाठ म्हणून दाखविली. तीही सूर, तालबद्ध. चकित झालेल्या मालकांनी देवळीच्या जागी ‘केशव भोसले’ लिहून प्रयोग पार पाडला. प्रयोग उत्तम झाला. ‘मूर्तिमंत भिंती उभी’ या गाण्याला तर तब्बल सात ते आठ वेळा वन्समोअर मिळाला. आजच्या भाषेत बोलायचे तर काका एका रात्रीत स्टार झाले. त्यावेळी त्यांचे वय केवळ दहा वर्षांचे होते.

Web Title: Lampstand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.