‘लावण्यवती’ माधुरी दीक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 06:01 AM2020-08-30T06:01:00+5:302020-08-30T06:05:01+5:30
वेगवेगळ्या प्रसंगी माधुरीचे काही भाव मला टिपता आले. माधुरीसारख्या सुंदर चेहर्याचे चित्रण करायला कुणाला आवडणार नाही? पण का कोण जाणे, आजही माझ्या मन:चक्षुंसमोर मेणवलीच्या त्या चंद्रकोरीच्या घाटावर भरदुपारी हातात बंदूक घेतलेली, डोळ्यात अंगार असलेली, कणभरही मेक-अप न केलेली केतकी सिंग ऊर्फ माधुरी दीक्षितच उभी राहते.
- सतीश पाकणीकर
29 जानेवारी 2020ची आठवण आहे. मी व माझे एक मित्र अनिरुद्ध मेणवलीकर, त्यांच्याच गाडीतून वाई गावाच्या दिशेनी निघालो होतो. त्यांच्या जुन्या वाड्याचे नूतनीकरण सुरू होते. त्या वाड्याचे काही प्रकाशचित्रण करायचे होते. त्या निमित्ताने आम्ही तेथे निघालो होतो. वाडा पेशवेकालीन. पण तरीही बर्यापैकी व्यवस्थित जतन केलेला. आता त्याचे पर्यटन ठिकाण करण्याचा विचार सुरू होता. त्याच्या प्रसिद्धीसाठी काही प्रकाशचित्रे लागणारच. म्हणून तो वाडा बघायला निघालेलो.
तासाभराचा रस्ता. वाई पार करून आम्ही मेणवली या गावात पोहोचलो. आम्ही वाड्यावर पोहोचलो. नाना फडणवीस यांना हे गाव 1768 साली इनाम म्हणून मिळालेले. गावाच्या कडेनी शांत प्रवाहाची कृष्णा नदी. नाना फडणवीस यांनी हे गाव परत वसवले. त्यांनी निसर्गरम्य अशा कृष्णेकाठी चंद्रकोरीच्या आकाराचा उत्तम चिरेबंदी घाट, र्शी विष्णू आणि मेणेश्वराची देखणी मंदिरे व स्वत:साठी मजबूत तटबंदी असलेला मोठा सहा चौकी वाडा बांधला. हाच तो मेणवलीचा वाडा. आम्ही वाड्यात सर्व दालनात कोठे, कसे प्रकाशचित्रण करता येईल हे ठरवत होतो. पण माझ्या मनाची अवस्था माझ्या जन्माच्याही आधी म्हणजे 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘मधुमती’ या चित्रपटातील नायक देवेन याच्यासारखी झालेली. फरक इतकाच की देवेनला एका जुन्या ‘मंझील’मध्ये आल्यावर त्याच्या पूर्वजन्माची आठवण येते. माझ्या बाबतीत ती आठवण माझ्या याच जन्मातली होती. साधारण चोवीस वर्षांनी मी परत या वाड्यात येत होतो आणि माझ्या मनात ती आठवण जागी होत होती.
15 मे 1996 या दिवशी मी व माझा एक मित्र चारू किंजवडेकर स्कूटरवरून या वाड्यात आलो होतो. आम्हाला असे कळले होते की, मेणवलीच्या वाड्यात एका सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. बाकी तपशील माहीत नव्हते; पण चित्रपटाची नायिका त्यावेळची सर्वात जास्त मानधन घेणारी भारतीय प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेली आणि अर्थातच मूर्तिमंत सौंदर्य असलेली लावण्यवती माधुरी दीक्षित आहे हे आमच्यासाठी पुरेसं होतं.
त्या युनिटमध्ये साधारण शंभर-सव्वाशे तरी मंडळी होती. हळूहळू आम्ही स्थिरावलो. माझ्या गळ्यात कॅमेरा असल्याने तशी अडचण आली नाही. मग माहिती कळली की चित्रपटाचे नाव ‘मृत्युदंड’ असे आहे. दिग्दर्शक आहेत सामाजिक अन्यायाचे आपल्या चित्रपटातून परिणामकारी दर्शन घडवणारे प्रकाश झा. काही वेळ आधीच वाड्यातला एक प्रसंग चित्रित झालेला होता. अशावेळी जे लाइटबॉय असतात त्यांच्याशी बोलल्यावर बरीच माहिती मिळते. तशीच ती आम्हालाही मिळाली. नंतरचा प्रसंग वाड्याच्या मागील दरवाजातून घाटावर जाणार्या पायर्यांवरून थेट नदीपात्रापर्यंत असणार होता. दुपार झाली असल्याने युनिटची जेवण्याची वेळ झाली. आमच्या लक्षात आले की, आता त्या ‘सौंदर्या’चे दर्शन घडायला तासभर तरी वेळ लागणार आहे. आम्ही वाड्याच्या बाहेरच्या डेरेदार वृक्षाखाली विसावलो. मे महिन्याच्या मध्यातले रणरणते ऊन. सर्वत्र दुपारचा सन्नाटा आणि काहिली. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे शेजारील कृष्णेचा शांत करणारा प्रवाह.
तासाभराने परत हालचाल सुरू झाली आणि आम्ही वाड्याच्या मागच्या बाजूस नदीच्या घाटावर जाऊन थांबलो. कॅमेरामन राजन कोठारी यांनी येऊन कॅमेर्याची जागा ठरवली. मोठमोठे प्रकाश परावर्तक उभे केले गेले. गर्दी हटवायला युनिटमधील काही जण सरसावले. काहीच मिनिटात दिग्दर्शक प्रकाश झा येऊन उभे राहिले. हातात भाले घेतलेल्या काही स्रिया नदी काठावर कडेला उभ्या होत्या. मी कॅमेरामनच्या मागील बाजूस जाऊन उभा राहिलो. मी एका टीव्ही सिरिअलसाठी आधी स्थिरचित्रण केले असल्याने मला त्यांच्यात चाललेल्या संवादाची भाषा कळत होती. त्यांच्या सूचना कळत होत्या. आता उत्सुकता होती की चित्रीकरण कोणत्या प्रसंगाचे होणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे त्या प्रसंगातील पात्र रचना काय असणार आहे? सर्व जय्यत तयारी झाल्यावर कोठारी यांच्या सहायकाने सर्वांना ‘कॅमेरा रेडी’ अशी सूचना केली.
मी श्वास रोखून वाड्याच्या मागच्या दरवाज्याकडे पाहत होतो. आम्ही उभे होतो तेथून सलग त्या दरवाज्यापर्यंत पायर्या चढत गेलेल्या होत्या. समोर लाकडी चौकट. त्यामागून डोकावणारी हिरव्या पानांची एक फांदी. सगळंच चित्रमय. इतक्यात त्या दरवाज्यातून धोतर व फाटलेला कुडता असा पेहराव असलेले, कपाळावरून रक्ताचे ओघळ वाहत असलेले, ते रक्त कुडत्याच्या वरच्या भागात पसरलेले, पायातूनही वाहणारे रक्त अशा वेशातील अभिनेते मोहन जोशी लंगडत त्या पायर्या भेलकांडत उतरू लागले. ते त्या चित्रपटातील खलनायक तिर्पत सिंग. त्यांच्या मागूनच पांढर्या रंगाची गुलाबी काठांची साधी सुती साडी नेसलेली व उजव्या हातात बंदूक घेतलेली चित्रपटाची नायिका केतकी सिंग पायर्या उतरू लागली. तिने आधीच खलनायकाचा पाय बंदूक चालवून जायबंदी केलेला. डोळ्यात अन्याय व अत्याचाराविषयीचा अंगार भरलेला. पायर्या उतरताना अशा खलनायकी वृत्तीचा पूर्ण नाश करण्याचा निश्चय केल्याचा दमदारपणा. अवघ्या तरुणाईच्या हृदयाची धडकन असलेली ती नायिका म्हणजे माधुरी दीक्षितपण अगदीच वेगळ्या रूपात. अन्यायाच्या विरोधात उभी असलेली रणचंडिका दुर्गाच जणू!
चित्रपटसृष्टीच्या चंदेरी चमचमीचे यथार्थ दर्शन घडवणार्या व तारे-तारकांच्या चकचकीत प्रतिमांची रेलचेल असलेल्या अनेक मासिकांमधून मी या अभिनेत्रीचे असंख्य फोटो पाहिले होते. त्या सर्व प्रकाशचित्रात तिने केलेला मेक-अप वेगवेगळा असला तरी त्याचं साहाय्य पुरेपूर होतं. पण आत्ता समोर चेहर्यावर कणभरही मेक-अप नसलेली माधुरी उभी होती. गौर मुखकांती, चेहर्याला शोभणारी अतिशय सुंदर अशी जिवणी, ओठांचा प्रमाणबद्ध असा आकार आणि या सर्वांवर कडी करणारे मोठे चॉकलेटी बोलके डोळे. ते चेहर्यावरील सौम्यपण क्लासिक म्हणता येईल असं सौंदर्य. कोणत्याही पोट्र्रेट करणार्या कलाकाराला स्फूर्ती देईल असं, कोणत्याही कोनातून फोटो काढला तरी तो उत्तमच येईल असं आरस्पानी सौंदर्य!
पुढचा सीन होता तो खलनायक तिर्पत सिंग नदीपात्रापर्यंत जातो. त्याच्या मागोमाग जात केतकी सिंग त्याच्यावर बंदूक रोखते. तिर्पत सिंग दयेची याचना करीत असतो; पण चाप ओढला जातो. तिर्पत सिंग नदीपात्रात कोसळतो. न्यायासाठी लढणार्या केतकीला न्याय मिळतो. हा सर्व प्रसंग दिग्दर्शक प्रकाश झा यांनी दोघांनाही समजावून सांगितला. दोघेही जणू टीपकागद असल्यासारखे त्या सूचना ऐकत होते. व्यावसायिकपणाबरोबरच त्याला अनुभवाची जोड मिळाली. पुन्हा एकदा कॅमेर्याची जागा ठरली. माधुरी तोपर्यंत एका छत्रीखाली उभी होती.
तिने पुन्हा एकदा बंदूक उचलली. कोठारी यांची सूचना आली - ‘कॅमेरा रोलिंग.’ सीन नंबर आणि सिंक पॉइंटच्या पाटीने क्लॅप दिला गेला. पुढच्याच क्षणी तिच्या चेहर्यावर तेच भाव प्रकटले, डोळ्यात अंगार पेटला. चाप ओढला गेला. शॉट ओ के झाला.
आउटडोअर शूटिंग असेल आणि जर ते कमी वेळात पूर्ण झाले तर सर्वांनाच आनंद होतो. त्यामुळे सगळे खूश झाले. रिवाजाप्रमाणे माधुरीपाशी येत सगळ्यांनी तिची स्तुती केली. आम्हीही पुढे झालो. मी एक शुभेच्छापत्र बरोबर घेतले होते. ते तिला देत म्हणालो - ‘जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’
कारण तो तिचा जन्मदिन होता ना ! शुद्ध मराठीत शुभेच्छा मिळाल्याने तीही आनंदी झाली. त्या दिवसाचे शूटिंग संपले होते. आम्हीही आनंदाने पुण्याच्या दिशेने निघालो.
‘मृत्युदंड’ चित्रपट 11 जुलै 1997 रोजी प्रदर्शित झाला. बिहारच्या बिलासपूर येथील एका घटनेवर आधारलेला हा चित्रपट पाहताना त्यावेळच्या तेथील सामाजिक गुंतागुंतीचं, स्री अत्याचाराचं, भ्रष्टाचारचं जे रूप आपल्याला दिसतं त्यांनं आपण अगदी हलून जातो. चित्रपटभर एक सततचा ताण एकामागून एक दृश्यांमधून जाणवत राहतो. तेथील भाषेचा उत्तम पकडलेला लहेजा, चांगले काव्य, र्शवणीय संगीत व उत्तम; पण वेगळी अशी नृत्ये या सर्वांबरोबरच माधुरीचा बोलका अभिनय हाही एक अनुभवण्याचा भाग बनतो. दिग्दर्शकाचं भाष्य थेट आपल्या हृदयात पोहोचतं.
त्याच्यानंतर मी माधुरीला परत पाहिलं ते 24 एप्रिल 2012 या दिवशी. मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये. मा. दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीच्या कार्यक्रमात. त्या दिवशी तिच्या सिनेमामधील कारकिर्दीबद्दल तिला दीनानाथ पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे. मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरी करणार्या व्यक्तींना ‘दीनानाथ पुरस्कार’ या मानाच्या पुरस्काराने गौरविले जाते. त्यामुळे स्टेजवर र्शी. विक्रम गोखले, र्शी. एस. एल. भैराप्पा, पं. कुमार बोस, र्शी. राहुल देशपांडे व माधुरी दीक्षित असे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर बसलेले होते. असा तारांकित कार्यक्रम असल्याने अर्थातच माधुरी पूर्ण मेक-अप करूनच आलेली होती. ती पाच-दहा मिनिटे उशिराच पोहोचली. पण ती आल्यावर प्रेक्षकांनी ज्या टाळ्या वाजवल्या त्या हे सांगत होत्या की तिचे गारूड त्यावेळी जराही कमी झालेले नाही. प्रेक्षकात पहिल्याच ओळीत तिचा स्वीय-सहायक राकेश, तिचे वडील व आई, तिचा पती डॉ. र्शीराम नेने व बहीण हा गौरवसोहळा आपापल्या डोळ्यात साठवत बसले होते. आदरणीय लतादीदींच्या हस्ते सत्कार स्वीकारल्यावर माधुरी बोलण्यास उभी राहिली. पाच-सात मिनिटांचे अतिशय छोटेखानी भाषण. पण शिताफीने तिने तिचा सारा प्रवास त्यात गुंफला होता. यश डोक्यात गेलेलं नाही हे तिच्या वाक्यावाक्यात जाणवत होतं.
तिचं भाषण संपलं तसं निवेदक सुधीर गाडगीळ यांनी तिला गाण्याची उत्तम समज आहे व तिचा अभ्यास आहे असे सांगून तिला चक्क गाण्याचा आग्रह केला. समोर साक्षात गानसम्राज्ञी बसलेली. माधुरीच्या चेहर्यावर जे भाव प्रकट झाले ते माझ्या कॅमेर्याने पटकन टिपले. पण तिला आग्रह केल्यावर तिने एक छोटी शास्रीय बंदिश सादर केली. कोणत्याही साथीशिवाय असं गायन सादर करणं ही एक परीक्षाच. पण आ. दीदी अतिशय तन्मयतेने ते ऐकत होत्या. बंदिश संपली आणि माधुरीने हुश्श केले. नंतर झालेल्या दीदींच्या मनोगतात जेव्हा त्यांनी तिच्या गाण्याचे मनोमन कौतुक केले त्यावेळची माधुरीची मुद्राही बघण्यासारखी होती. अर्थातच माझ्या कॅमेर्याने तिचा तो भावही अंकित केला होताच.
वेगवेगळ्या प्रसंगी एकाच कलाकाराचे असे विभिन्न भाव टिपताना मला मात्र खूपच आनंद झाला होता. माधुरीसारख्या सुंदर चेहर्याचे चित्रण करायला कुणाला आवडणार नाही? पण का कोण जाणे आजही माधुरी दीक्षित म्हणताच माझ्या मन:चक्षुंसमोर मेणवलीच्या त्या चंद्रकोरीच्या आकाराच्या घाटावर भरदुपारी हातात बंदूक घेतलेली, डोळ्यात अंगार असलेली, कणभरही मेक-अप न केलेली केतकी सिंग ऊर्फ माधुरी दीक्षितच उभी राहते.
sapaknikar@gmail.com
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)