शरीराचं ‘ऐकत’ गेलो, म्हणून..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 06:01 AM2021-05-16T06:01:00+5:302021-05-16T06:05:02+5:30
संसर्ग होणं म्हणजे माळरानावरून अनवाणी चालताना सराटा टोचणं ! एखाद्याच्या पायाला टोचेल, एखाद्याच्या नाही! संसर्ग झाल्यानंतर तुमचं मन-शरीर कसं प्रत्त्युतर देतं, हे महत्त्वाचं !
- सुकृत करंदीकर
जिवंत माणूस जरी समोर उभा ठाकला तरी त्याच्याआधी त्याच्याआडून अदृश्य कोरोनाचीच गडद छाया दिसावी असे हे शंकेखोर दिवस! शुक्रवार (9 एप्रिल) रोजी मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल न होता चौदा दिवस गृहविलगीकरणात राहणं मी स्वीकारलं. या सोळा दिवसांतल्या अनुभवांची ही शिदोरी...
1) आपलं काय होणार, मरणार की वाचणार, कोरोना संसर्गाचं स्वरूप काय असेल असलं काहीच एकदाही मनात आलं नाही. त्यासाठी 'थिंक पॉझिटिव्ह' वगैरे थेरं मुद्दाम करावी लागली नाहीत. मरण एक तर नैसर्गिक यावं किंवा वीरमरण. अपघाती आलं तर तेसुद्धा किमान दोनशे-तीनशेच्या वेगानं बाईक चालवताना किंवा एव्हरेस्टरवर पोहोचावं आणि हिमवादळात गोठून जावं किंवा विमानातून पॅराशूटसह उडी घ्यावी आणि पॅराशूटच उघडू नये...असा काही तरी भव्यदिव्य अपघात घडावा; पण 'तरुणपणी एका फुटकळ विषाणूच्या संसर्गानं मी मेलो' ही कल्पनासुद्धा मला आजारपणातही करवत नव्हती.
2) मी बरा होणार असल्याची खात्री वाटत होती कारण ऑक्सिजन पातळी कधीच धोकादायक स्थितीला गेली नाही, ना कधी ताप, खोकला आला.
3) डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार पूर्ण केले नाहीत, काही औषधं अजिबातच घेतली नाहीत, काही चाचण्या अजूनही केल्या नाहीत यामागे उद्दामपणा नव्हता. सांगितलेलं ऐकायचं नाही, असा उद्धटपणा नव्हता. तर शरीर आतून जे सांगत आहे ते मी ऐकत गेलो, त्यावर विश्वास ठेवला.
4) व्हॉट्स ॲप, वृत्तवाहिन्या, नियतकालिकं यांना चौदा दिवस आयुष्यात जराही थारा दिला नाही. त्यानंतरही व्हॉट्स ॲपचा वापर अगदी मर्यादित ठेवला. कोरोना पूर्वकाळापासूनच वृत्तवाहिन्या आयुष्यातून जवळपास पूर्ण वजा केल्या आहेत. कोरोनाबाधित झाल्यापासून नियतकालिकांना अजूनपर्यंत दूर ठेवलं आहे. यामुळं अडलं काहीच नाही; उलट अनावश्यक माहिती, खरे-खोटे तपशील, लागू-गैरलागू संदर्भ आदींचा कचरा मनात-मेंदूत साठणं बंद झालं.
5) भरपूर पुस्तकं वाचली. सिनेमे पाहिले. लहानपणी घरी टीव्ही नसल्यानं अनेक क्रिकेट सामने बघायचे राहिले होते. यू-ट्यूबवर त्या सामन्यांचा आनंद मनापासून लुटला. या सगळ्यामुळं मन प्रसन्न राहिलं.
6) दिवसातून अमूकवेळा वाफ घ्या, सारखं गरम पाणी प्या, तमूक काढे प्या यातला कोणताच उपाय गेल्या सोळा दिवसांत एकदाही केला नाही. दीर्घ श्वसनाचा व्यायाम मात्र जरूर केला.
7) 'वॉटर इन टेक' वाढवा, आहारात 'प्रोटिन्स' वाढवा हेही अट्टहासानं मुळीच केलं नाही. 'शरीराला गरज पडली की तहान लागतेच,' या सूत्रानुसार पाणी घेत होतो. ज्वारीची भाकरी, पालेभाजी, वरण, तूप-गूळ हाच आहार प्रामुख्यानं होता. चव यावी म्हणून लिंबाचं लोणचं चाखत होतो. जेवणात कच्ची काकडी, टोमॅटो, गाजर असायचं. मांसाहार अजिबातच नाही. डाळिंब, केळी, आंबा, कलिंगड, द्राक्षं, पपई यातलं एक तरी फळ रोज भरपूर प्रमाणात खात होतो. चहा-कॉफी घरी कधीच घेत नाही. कोरोनाकाळातही त्याची आठवण होण्याचं कारण नव्हतं.
8) सकाळी दहानंतरच्या उन्हात रोज अर्धा तास तरी बसत होतो. डी जीवनसत्त्व किती मिळालं माहिती नाही, पण ते मिळत आहे ही भावनाच ऊर्जा देत होती.
9) सगळ्यात महत्त्वाचं - मनाची उमेद कायम होतीच. शरीरालाही तयार करायचा निर्णय घेतला. 22 एप्रिलपर्यंत गृहविलगीकरणाचा कालावधी होता; पण रविवारी (दि. 18 एप्रिल) संध्याकाळी एकांतवास शोधून चालत निघालो. सव्वासहा किलोमीटरची रपेट मारूनच थांबलो. घरी आलो तेव्हा घामाने भिजलो होतो; पण दमछाक अजिबात झालेली नव्हती. पाय थोडे दुखल्यासारखे वाटत होते, पण तितकं तर अपेक्षित होतं. त्यानंतर पुढचे चार दिवस दररोज घड्याळ लावून चाललो. अंतरही रोज वाढवत नेलं. गृहविलगीकरणाचा शेवटचा दिवस होता म्हणून शुक्रवारी (23 एप्रिल) अंतर आणखी वाढवलं आणि 11.44 किलोमीटर चालून आलो. शनिवारी, रविवारीही सरासरी दहा किलोमीटर चाललो. ना दमछाक झाली ना श्वासोच्छ्वासास अडला. पुण्यात आलो त्याला आता दोन दशकं झाली. या दोन दशकात नियमित व्यायाम करण्याचा संकल्प मी किमान दहा हजार वेळा तरी सोडला असेल; पण आजवर कधी तो प्रत्यक्षात उतरलेला नाही. कोरोना संसर्गानंतर तरी तो आता प्रत्यक्षात यावा, अशी अपेक्षा आहे.
10) गेल्या वर्षी कोरोनाची साथ सुरू झाली त्यानंतर एक बातमी आली होती. युरोपातल्या दोन फुटबॉल टीम अख्याच्या अख्या कोरोनाबाधित झाल्या होत्या.
व्यावसायिक फुटबॉलपटूंएवढी दमदार फुप्फुसं खचितचं कोणाची असू शकतील. यावरून तेव्हाच खूणगाठ बांधली होती की कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. घरात एकही दिवस न बसलेल्या आपल्याही कधी तरी हा गाठेलच.
संसर्ग होणं म्हणजे माळरानावरून अनवाणी चालताना सराटा टोचण्यासारखंच आहे. एखाद्याच्या पायाला टोचेल, एखाद्याच्या नाही; पण महत्त्वाचं काय तर संसर्ग झाल्यानंतर तुमचं मन आणि शरीर त्याला कसं प्रत्त्युतर देतं? किती वेगानं, किती सहजतेनं तुम्ही त्याच्यावर मात करता? शरीर खंबीर तेव्हाच होईल जेव्हा मन आधी ठाम असेल. रक्तदाबाचा त्रास, हृदयविकार, मधुमेह आदी सहव्याधी नसल्याचा आणि वय कमी असल्याचाही फायदा मला निश्चितच झाला असेल; पण जोडीला असणारी माझी जन्मजात बेफिकिरी जास्त कामी आली असा माझा दावा आहे.
10) कोरोना विषाणूचे परिणाम शरीरात बरेच दिवस राहतात. अशक्तपणा एक-एक, दोन-दोन महिने जात नाही. बघू कसं होतं ते. आत्ता कुठे सुरुवात झालीय संघर्षाला. मात्र गेल्या सोळा दिवसातले प्रत्यक्ष कोरोनाबाधित होण्याच्या आधीचे तीन दिवस आणि बाधित झाल्याचे समजल्यानंतरचे दोन दिवस असे एकूण पाच दिवस काय तो अंगदुखीचा त्रास झाला. बाकी सध्याला माझी प्रकृती दमदार आणि मन:स्थिती गुलजार आहे.
11) एक गोष्ट चांगली झाली या कोरोनाच्या सक्तीच्या एकांतवासात. जे आयुष्य आजवर जगलो त्याकडं वळून पाहिलं. पुढं काय, याचाही अदमास घेण्याचा प्रयत्न झाला. काही गाठी पुन्हा पक्क्या बांधल्या मनाशी. काही मुलायम निरगाठी नव्यानं जुळवल्या. कोरोना अंगावर आला खरा; पण त्याला माझ्या पद्धतीनं शिंगावर घेतलंय. कोरोना विषाणूला आव्हान देण्याचं मी ठरवलंय. अर्थात यातला 'मी' फक्त दर्शनी. त्यामागची सगळी ताकद आहे मित्रांनी माझ्यावर लावलेल्या जीवाची! सोबतीचे सख्खे मित्र कोणत्याही प्रसंगात मागे हटणार नाहीत याची खात्री असल्यानंच खरं तर माझी बेफिकिरी चौखूर उधळत राहते. असे कित्येक विषाणू येतील आणि जातील त्यांच्याविरोधातल्या 'अँटिबॉडीज' पुरवणारी जिवाभावाची नाती आहेत तोवर जिवाणू-विषाणूंची काळजी करायला आहे कोण इथं मोकळं?
(सहसंपादक, लोकमत, पुणे)
sukrut.karnadikar@lokmat.com
------------------
कोरोनाबरोबरच्या सहवासाचे "असे" सुखांत अनुभव दुर्दैवाने सगळ्यांच्या वाट्याला येत नाहीत, हे खरं!- पण तरीही हे युद्ध जिंकणाऱ्या कहाण्या दर रविवारी या पानावर प्रसिद्ध करण्यामागे एकच हेतू आहे : सध्याच्या भयग्रस्ततेतला दुर्मीळ दिलासा!!!- तुमचे असे अनुभव अवश्य पाठवा.
त्यासाठी ईमेल : manthan@lokmat.com.