‘त्या’ शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिले २२ भाषांचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 08:00 AM2018-12-09T08:00:00+5:302018-12-09T08:00:04+5:30
अनेक माणसं ध्येयवेडी असतात. शासनाच्या सेवेत असताना दिलेले कार्य आत्मीयतेने पूर्ण करण्याची जणू हौसच असते.
उदय गडकरी
नागपूर: अनेक माणसं ध्येयवेडी असतात. शासनाच्या सेवेत असताना दिलेले कार्य आत्मीयतेने पूर्ण करण्याची जणू हौसच असते. देशात अशा ध्येयवेड्या माणसांची कमी नाही. मात्र त्यातूनही आपले वेगळेपण जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांची संख्या फारच विरळ. अशाच एका जि. प. प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने केलेले शासनाच्या उपक्रमाचे कार्य प्रशंसनीय तर आहेच, शिवाय दखलपात्रही आहे.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या ‘भाषा संगम’ या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना २२ भाषांचे ज्ञान देण्याचे निर्देश जि. प. प्राथमिक शाळांना देण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समिती अंतर्गत जि.प. प्राथमिक शाळा सिंदोळा येथील उपक्रमशील शिक्षक सुधीर मोहरकर यांनी विद्यार्थ्यांना २२ भाषांचे धडे देण्याचा निर्णय घेऊन अमलातही आणला आहे. भाषा संगम हा उपक्रम संपूर्ण भारतातच लागू केला असून यामुळे विद्यार्थ्यांना किमान देशातील विविध भाषांची ओळख होवून व्यक्तीसापेक्ष संवाद साधता यावा, हा त्यामागचा उदात्त हेतु. प्रत्येक भाषेतील किमान पाच वाक्ये विद्यार्थ्यांना मुखोद्गत व्हावे, ही भूमिका आहे. शासनाच्या अध्यादेशात त्याची विस्तृत माहिती आहे. मात्र अनेक शिक्षकांना त्याचे आकलन झाले नसल्याने हा विषय हाताळण्यापासून ते अलिप्तच असल्याचे चित्र आहे.
सावली पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या ९२ शाळा व ३८५ शिक्षक आहेत. त्यापैकी केवळ सुधीर मोहरकर या उपक्रमशील व हाडाच्या शिक्षकाने केंद्र शासनाच्या उपक्रमाची नेटाने सुरूवात केली. त्यांचे अनुकरण इतरही शिक्षक करीत असले तरी त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. शासनाच्या अध्यादेशाचे वाचन करून, समजून घेऊन शिकविलेले व्हिडिओ त्यांनी यु-ट्युबच्या माध्यमातून अपलोड केले आहेत. याशिवाय ‘उपक्रम काही आगळे वेगळे, काही मनातील’ या आशयाचे फेसबुक पेज तयार केले आहे. त्यांच्या अध्यापणाची पद्धत विद्यार्थ्यांनाही जाम आवडली आहे.
पूर्वी केळझरच्या शाळेत असताना त्या शाळेला एक लक्ष रूपयांचा मॉडेल स्कूल पुरस्कार मिळविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. सहा महिन्यांपूर्वी ते सिंदोळा येथील शाळेत रुजू झाले. रोटरी क्लब चंद्रपूरच्या वतीने नेशन बील्डर अवॉर्ड, मराठीचे शिलेदार संस्थेकडून उपक्रमशील शिक्षक अवॉर्ड, यासारखे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
त्यांच्या शैक्षणिक कार्याची अनेक शिक्षकांनी प्रेरणा घेऊ न शालेय ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य करावे म्हणून सावली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांच्याकडून प्रोत्साहित केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन कार्य सुलभ होते. यात विद्यार्थ्यांची क्षमता तपासून त्यांचा गृहपाठही शाळेतच करवून घेतला जातो. यामुळे सर्व विषयांचे आकलन होण्यास विद्यार्थ्यांना सहज शक्य होत आहे. दोन शिक्षकी शाळा असलेल्या मोहरकर सरांकडे ३ रा व ४ था वर्ग आहे.
या दोन्ही वर्गाचे अध्यापणाचे कार्य एकाच खोलीत चालते. त्यामुळे कोणत्या वर्गाला शिकविण्याची सुरूवात करावी याकरिता टॉस करून त्या - त्या वर्गाचे अध्यापन करण्याचे कार्य सुरू आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद वाळके यांचेही त्यांना सहकार्य आहे.
भाषा संगम या उपक्रमातून शिकविण्यात येत असलेल्या भाषांचे व्हिडिओ तयार करून सुधीर मोहरकर यांनी त्यांच्या मित्र परिवार ग्रुपवर पाठविल्यामुळे अनेक शिक्षकांनी हा विषय शिकविण्याची सुरूवात केली आहे. वास्तविक, या उपक्रमाचा कालावधी २२ दिवसात २२ भाषा शिकविण्याचा असतानाही वर्षभर हा उपक्रम चालू ठेवणार असल्याचा त्यांचा माणस आहे. मोहरकरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. रोटरी क्लब चंद्रपूरच्या वतीने नेशन बील्डर अवॉर्ड, मराठीचे शिलेदार संस्थेकडून उपक्रमशील शिक्षक अवॉर्ड यासारखे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याची अनेक शिक्षकांनी प्रेरणा घेऊ न शालेय ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य करावे म्हणून सावली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांच्याकडून प्रोत्साहित केले जात आहे.
- , सावली