झाले गेले विसरून जाऊ.. पाण्यासाठी एकत्र येऊ

By admin | Published: September 2, 2016 04:26 PM2016-09-02T16:26:10+5:302016-09-02T16:26:10+5:30

एक मागा, चार मिळतील, इतके गावात ड्रायव्हर. दुष्काळी गावात दुसरं करणार काय? - पण खापरटोन गावातल्या गावकऱ्यांनी अवघ्या पंचेचाळीस दिवसांत गावाचं नशीबच पालटून टाकलंय. दोनशे वेळा पंप खालीवर केला तरी गावच्या तीन हातपंपातून पाण्याचा थेंबही येत नसे. आता फक्त एकदा पंप खालीवर केला तरी पाणी धो-धो वाहू लागलंय!! ...पण गावकरी आता म्हणतात, पंपातलंच काय, सांडपाणीसुद्धा वाया नाही जाणार आमच्या गावात!

Let's go away. Come together for water | झाले गेले विसरून जाऊ.. पाण्यासाठी एकत्र येऊ

झाले गेले विसरून जाऊ.. पाण्यासाठी एकत्र येऊ

Next
अंबाजोगाई तालुक्यातल्या खापरटोन या दुष्काळी गावाने आपलं नशीब पालटवलं, त्याची गोष्ट!

- प्रताप नलावडे

मला अमीर सायब म्हणले की तुमच्या गावाचं काम लई भारी हाय म्हणून.. तरीपण पहिला नंबर कसा काय हुकला काय कळत नाय... भटकळ सायबास्री इचारणार हाय मी.. की बाबा आमचे मार्क कमी कशात झाले?...’’
- साठ वर्षांचे पाटलोबा चाटे स्कॉलर विद्यार्थ्याचा एखाद्या मार्काने पहिला नंबर हुकल्यानंतरच्या तळमळीने बोलत होते. आमीर खानचा आता त्यांच्यासाठी अमीर साहेब झालेला! आमीर, सत्यजित भटकळ आणि आणखी बऱ्याच जणांचा उल्लेख ते असा करत होते की जणू काय ही सगळी मंडळी त्यांच्या गावातीलच आहेत. रोजच्या उठण्याबसण्यातली! ओळखीची.. जवळची!
खापरटोन... अंबाजोगाई तालुक्यातील हे अगदी छोेटंसं गाव. आजूबाजूला डोंगर. तालुक्यापासून २९ किलोमीटर अंतरावरच्या या गावाने आमीर खानच्या पानी फाउंडेशन प्रायोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आणि गावाचा ‘टोन’च बदलला. अंबाजोगाईहून खापरटोनकडे जातानाच रस्त्यावर दोन-चार ठिकाणी खापरटोन गावाने वॉटर कप स्पर्धेत पारितोषिक पटकावल्यामुळे गावाचे अभिनंदन करणारे फ्लेक्स झळकत होते. 
खरं तर ट्रक ड्रायव्हरचं गाव अशी या गावाची ओळख आहे. खापरटोनच्या प्रत्येक घरातून एकजण तरी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतोच. शेतात काही पिकत नाही आणि शिक्षण घेण्याचीही ऐपत नाही म्हणून मग ड्रायव्हरकीचा सरळधोपट मार्ग तरुणांनी निवडलेला. जिल्ह्यात कोणालाही ड्रायव्हरची आवश्यकता असली की त्याने खापरटोन गाठायचं. एक मागितला तर चार ड्रायव्हर मिळतील, इतके गावात ड्रायव्हर. गाव नेहमीच दुष्काळाशी सामना करत राहिलेलं. 
पाण्यासाठी संघर्ष पाचवीला पुजलेला. पिण्यासाठी बारा महिने टँकरचा आधार आणि घागरभर पाण्यासाठी पाच-सहा किलोमीटरची भटकंती ठरलेली!! सगळंच प्रकरण विकास नावाच्या गोष्टीपासून कोसो दूर.
अंबाजोगाईत मुकुंदराज सभागृहात एक दिवस सत्यजित भटकळ यांनी तालुक्यातील ग्रामस्थांना बोलावून वॉटर कप स्पर्धेची माहिती दिली आणि भटकळ यांचे बोलणे ऐकत असतानाच चांगदेव फड या तरुणाच्या डोक्यात वीज चमकली. आपल्या गावाचा कायापालट करण्यासाठीची एक भन्नाट कल्पना त्याला अस्वस्थ करून गेली.
दुसऱ्या दिवशी गावात आल्यानंतर चांगदेवने सरपंच सुरेखा हरिराम चाटे आणि त्यांचे पुतणे गौतम चाटे यांच्यासमोर स्पर्धेची कल्पना मांडली. त्या दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामसभा बोलावली आणि सगळ्यांनाच याची माहिती दिली. नेमकं काय करायचंय, याचा अंदाज प्रत्येकालाच आला नाही; परंतु पाण्याचा विषय आहे, आणि त्यासाठी काम करायचंय, इतकं मात्र कळलं. एक दोघांनी कुरकुर केली. असं कुठं असतंय का, फावडी-कुदळी घेऊन दगड-माती फोडायला घेतली तर हे करत बसल्यावर पोटापाण्याची कामं कधी करायची, असा सूर आळवला गेला. परंतु ही कुरकुर तेवढ्यापुरतीच राहिली आणि सर्वांच्या मतांनी वॉटर कप स्पर्धेत भाग घेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं. 
अवघ्या ४५ दिवसांत गावातील पाण्याची पातळी तर वाढवायची होतीच परंतु त्यासोबत नावीन्यपूर्ण उपक्रमही राबवायचे होते. 
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मग चांगदेव फड, मारुती चाटे, अयोध्या फड, पंचफुला चाटे हे चौघेजण हिवरा येथील प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले. त्यानंतर ४५ दिवसांत त्यांना नेमकं काय करायचंय याचा अचूक अंदाज आला आणि सुरू झाली पाण्यासाठीची एक अनोखी चळवळ.
त्या दिवशी गाव जागं झालं ते देवळातील घंटानादाने. पहाटे पाच वाजता दीर्घकाळ होणारा घंटानाद गावातील प्रत्येकाला जणू सांगत होता, आता उठा आणि कामाला लागा. उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्हाला काही करायचं आहे.
पुढले सलग ४५ दिवस देवळातील घंटा पहाटे पाच वाजता वाजायची आणि श्रमदानासाठी लोक धावत पळत देवळाजवळ जमायचे. तासाभरात म्हणजे बरोब्बर सहाच्या ठोक्याला देवळाजवळ जेमतेम दहा-बाराजण गोळा झाले. पहिलाच दिवस होता.
किमान शंभरएक लोक येतील असा अंदाज बांधलेल्या चांगदेवचा चांगलाच हिरमोड झाला. ही सगळी मंडळी मग हातात टिकाव, खोरे, कुदळ आणि पाट्या घेऊन निघाले आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं.
पहिल्यांदा त्यांनी गावात शोष खड्डे तयार करण्याचं काम हाती घेतलं. 
दररोज लोकांची संख्या वाढू लागली. आठव्या दिवशी मंदिरातील घंटा वाजल्यानंतर तीनशे लोक जमा झाले. शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत मग ही संख्या कमी झाली नाही. 
हातात हात घालून शोष खड्डे, गायरानात पाणी जिरविण्यासाठी खंदलेला चर, वृक्षारोपण, गावातील दोन तलाव जोडण्याचं काम, बांध बंदिस्ती, नाला खोलीकरण अशा कामांचा सपाटाच सुरू झाला. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एक रोपवाटिका तयार केली. त्याला पाणी देण्यापासून ते त्याची जपणूक करण्यापर्यंतचे काम ही मुलंच करू लागली. शोष खड्डे आणि पाणी जिरविण्यासाठी केलेल्या चरांमुळे याचा अपेक्षित परिणामही गावाने लगेचच अनुभवला. 
गावासाठी श्रमदान करताना अगदी कार्पोरेट जगतात जशी कामाची आखणी केली जाते, तसंच नियोजन करणाऱ्या या लोकांनी कधी कार्पोरेट हा शब्दही ऐकलेला नाही, हे विशेष. 
सकाळी सहा वाजता सगळ्यांनी एकत्र जमायचं. जेथे काम करायचं आहे, त्याठिकाणी सर्वांनी मिळून जायचं. टिकाव, खोरे, कुदळ, पाटी असं जे काही साहित्य लागतं, त्यासाठी प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी दिलेली असायची. काम सुरू करताना ते साहित्य ज्याच्यावर जबाबदारी आहे, त्याने लोकांना द्यायचे आणि ते पुन्हा काम संपलं की गोळा करून ठेवायचं. कामावर आलेल्या लोकांना चहा आणि नास्ता देण्याचं कामही अयोध्या फड आणि पंचफुला फड यांनी सांभाळलं. दररोज संध्याकाळी दुसऱ्या दिवशी कोणतं काम करायचं, याचं नियोजन केलं जायचं. त्यानुसार काम झालं की नाही हे तपासलं जायचं. 
श्रमदानातून ही सगळी पाणी जिरवण्यासाठीची कामं करताना ती कामं आपण का करत आहोत, त्यातून गावाला नेमका फायदा काय होणार आहे, जे काम करत आहोत त्यामुळे एका पावसात किती पाणी जमिनीत मुरणार आहे याची माहिती चांगदेव फड हा तरुण देत राहायचा. त्यामुळे आपण नेमकं काय काम करत आहोत, हे लोकांना समजायचं आणि काम करताना ते कंटाळवाणंही व्हायचं नाही. 
सकाळी कामाच्या ठिकाणी जमल्यानंतर बरोब्बर सात वाजता सामुदायिक गीत म्हटलं जायचं.
झाले गेले विसरून जाऊ...
पाण्यासाठी आता आपण 
एकत्र येऊ 
या गीताने सगळ्यांच्या अंगात चैतन्य निर्माण व्हायचं. दररोज साडेतीनशे लोक सहा तास श्रमदान करायचे. कोणाकडे पै-पाहुणा आला तर तोही या श्रमदानात आनंदाने सहभागी व्हायचा. लोकांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी कधी आराधी मंडळींची गाणी, कधी भजनी मंडळी, तर कधी गावातील शिक्षकही कार्यरत असायचे. काम सुरू असताना हलगी वाजत राहायची. संगीताच्या ठेक्यावर लोक कामाचा सूर पकडायचे. सगळं गाव कसं श्रमदानात रमून जायचं. काम हे काम राहिलंच नव्हतं. तो एक उत्सव बनला होता.
पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ द्यायचा नाही, हे गावाने आता मनावरच घेतलं आहे. यातूनच गावाबाहेर गायरानाजवळ एक सामुदायिक धोबीघाट तयार होत आहे. याठिकाणी कपडे धुण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, गावातील महिला एकत्रित येथे कपडे धुण्याचे काम करतील. 
यातून वाया जाणारं पाणी गायरानातील झाडांना मिळेल आणि जमिनीतही मुरेल. गावात दोन पाझर तलाव आहेत. हे दोन्ही तलाव एकमेकांना जोडण्यात आले आहेत. यासाठी एक स्वतंत्र पाइपलाइनही टाकण्याचा ग्रामस्थांचा विचार आहे. उसासारखं जास्तीचं पाणी लागणारं पीक घ्यायचं नाही, हा गावाचा निर्धार आहे.
श्रमदानातूनच गावातील सगळं सांडपाणी एकाच ठिकाणी जिरविण्यासाठी गावाच्या शेवटच्या टोकाला एक मोठा शोष खड्डा तयार करण्यात आला आहे. नालीतून येणारं सगळं पाणी याठिकाणी येतं. शिवाय घरासमोर छोटे-छोटे शोष खड्डेही तयार करण्यात आले असल्याने स्वच्छता तर झालीच पण सांडपाण्यावरून होणारी भांडणं कायमची बंद झाली. 
श्रमदानाने केवळ पाणलोटचं कामच झालं असं नाही, तर गावकऱ्यांमध्ये एकोप्याचं वातावरण निर्माण झालं, आणि राग, द्वेष, हेवेदावे लोकांनी दूर ‘लोट’ले. गावाच्या विकासाची ईर्ष्या निर्माण झाली. 
गाव छोटंसं असलं तरी जिद्दीला पेटल्यावर काय करू शकतं याचं उदाहरण खापरटोनने समोर ठेवलं. अधून-मधून महाश्रमदान दिवस आयोजित केला जायचा. यात आठशेपेक्षाही जास्त लोक सहभागी व्हायचे. 
अवघ्या पंचेचाळीस दिवसांत सगळं गावच बदलून गेलं. गावात तीन हातपंप होते. दोनशे वेळा पंप खालीवर केला तरी पंपातून पाण्याचा थेंबही येत नसे. 
आता फक्त एकदा पंप खालीवर केला पाणी 
धो-धो वाहू लागतं. गाव डासमुक्त झालं आहे. सांडपाण्याचा एक थेंबही उघड्यावरून वाहून जात नाही. 
प्रत्येकाच्या घरातील सांडपाणी थेट जमिनीत मुरवण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक घराच्या भिंतीतून एक पाइप जमिनीत खोलवर गेलेला दिसतो. 
सगळं गाव हगणदारीमुक्त झालंय. गावात ८० विहिरी आहेत. या सगळ्या विहिरींना पहिल्याच पावसात पाणी आलंय. 


पाय पांगळे, तरीही...
खापरटोनच्या प्रत्येकाच्या मनात विकासाचे स्फुलिंग पेटलेलं दिसतं. स्पर्धेतील कामं करण्यासाठी लोकवर्गणी गोळा करायचं ठरलं. हे काम बाबूराव चाटे या दोन्ही पायांनी अपंग असलेल्या व्यक्तीने आपल्याकडे घेतलं. मंदिराच्या समोर ते दिवसभर बसून असायचे. ज्यांना या कामासाठी पैसे द्यायचेत त्यांनी बाबूरावकडे पैसे जमा करायचे. बाबूराव पैसे घेऊन त्यांना त्याची पावती द्यायचे. श्रमदानात आणि इतर कामात आपल्या अपंगत्वामुळे सहभागी होता येत नसलं, तरी जे शक्य आहे ते मी करणारच हा बाबूरावचा निर्धार सगळ्या गावाच्या कौतुकाचा विषय ठरलाय.



वॉटर कप : तीन
आमीर खानच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या ‘पानी फाउंडेशन’ने यावर्षीच्या दुष्काळात महाराष्ट्रातल्या ११६ गावांमध्ये ग्रामस्थांना साद घालत एकत्र केले आणि गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावातच अडवण्यासाठी लोकांच्या हाती कुदळी आणि फावडी आली.
सरकारवर अवलंबून न राहता आपले पाणी आपणच अडवण्याचा, जिरवण्याचा, वाचवण्याचा आणि जबाबदारीने वापरण्याचा वसा घेऊन कामाला भिडलेल्या या गावांनी जबरदस्त लढत दिली. पाण्याच्या थेंबाथेंबासाठी झालेल्या या स्वयंस्फूर्त संघर्षाच्या यशोगाथांनी ग्रामीण महाराष्ट्रात एक नवे चैतन्य आणले आहे.
पानी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत पहिला -दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या वेळू आणि जायगावची भटकंती झाली.
आज भेट विभागून दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या गावाची : अंबाजोगाई तालुक्यातल्या खापरटोनची. 

निराधारांनीही दिला आधार..
गावाच्या विकासाचं काम होत असताना एकही जण मागे हटायला तयार नव्हता, हे खापरटोन गावाच्या एकीचं हटके उदाहरण. गावातील निवृत्ती चाटे, गंगाधर चाटे आणि सत्यभामा कांगणे हे निराधार. श्रावणबाळ योजनेतून दर महिन्याला पाच-सहाशे रुपये त्यांना मिळतात. 
सगळं गाव श्रमदान करतंय, कामासाठी पैसा देतंय आणि आपण वृद्धत्वामुळे श्रमदान तर करू शकत नाहीच परंतु या कामासाठी आपण काही देऊही शकत नाही, ही त्यांच्या मनाला लागलेली बोच. 
मग तिघांनीही विचार केला आणि आपल्या हाती आलेली निराधार पेन्शनची रक्कम त्यांनी या कामासाठी आनंदाने दिली. गावकऱ्यांनी त्यातील प्रत्येकाचे शंभर-शंभर रुपये घेतले आणि बाकीची रक्कम त्यांना परत केली. 

दोन मीटर कापड
गावाने जसा पाण्याचा चोख ताळेबंद स्पर्धेदरम्यान आखला, अगदी त्याचा कागदोपत्री हिशेबही ठेवला. दररोज गावाने काय केलं याची सगळी माहिती लिखित स्वरूपात ठेवली आणि स्पर्धेसाठीचा तपशीलही लिहून ठेवला. हे सगळं ठेवण्याची जबाबदारी पाटलोबा फड यांच्याकडे होती. आपल्या गावाने केलेलं काम किती मोठं होतं, हे सांगण्याचा त्यांचा फंडाही वेगळा आहे. 
ते सांगतात, आम्ही आमचा सगळा अहवाल स्पर्धेसाठी दिला. ती कागदं बांधून देण्यासाठी दोन मीटर कापड लागलं बघा.


गावाची सर्वसाधारण माहिती.
लोकसंख्या: १२५४
महिला: ५९१
पुरुष: ६६३
कुटुंब संख्या: २२८
क्षेत्र: ५४९ हेक्टर
पाझर तलाव: ३
विंधनविहिरी : १५
विहिरी: ८०
शैक्षणिक सुविधा: सातवीपर्यंतची शाळा
आरोग्य सुविधा: प्रा. आरोग्य उपकेंद्र

(लेखक ‘लोकमत’चे बीड जिल्हा प्रतिनिधी आहेत.)

pratap.nalawade@lokmat.com

Web Title: Let's go away. Come together for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.